
अॅग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनीचा समारोप
पुढील वर्षी प्रदर्शनीचा कालावधी वाढणार
अॅग्रो व्हिजन ही चळवळ झाली आहे
नागपूर, २७ डिसेंबर: आगामी काळात अॅग्रो व्हिजनच्या माध्यमातून जैविक व प्राकृतिक शेतीसाठी शेतक-यांना प्रोत्साहित करणार तसेच विदर्भातील शेतक-यांचे कापूस, सोयाबीन, संत्रा आदी पिकांचा उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढविण्याकडे अधिक लक्ष केंद्रित करण्याचा मानस केंद्रीय महामार्ग वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
अॅग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनीचा आज समारोप झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी अॅग्रो व्हिजनचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी गडकरी यांनी या प्रदर्शनीत सहभागी होणा-या देशभरातील शेतकरी, तज्ज्ञ, विविध क्षेत्रातील मान्यवर, विविध कंपन्यांचे संचालक, प्रयोग यशस्वी करून दाखविणा-या शेतक-यांचे आभार मानले. अॅग्रो व्हिजनमध्ये झालेल्या विविध विषयांवर कार्यशाळांनाही चांगला प्रतिसाद मिळाला. शेतक-यांचा चांगला सहयोग या कार्यशाळांना मिळाला. हे पाहता अॅग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनी पुढील वर्षी ८ दिवसांच्या कालावधीचा करण्याचा मानस ही गडकरी यांनी व्यक्त केला.
अॅग्रो व्हिजन प्रदर्शनी आता चळवळ झाली असल्याचे सांगताना गडकरी म्हणाले,की शेतक-यांना मार्गदर्शनासाठी या प्रदर्शनाचे काम आता पूर्ण वेळ असावे अशी आवश्यकता जाणवू लागली आहे. सेंद्रीय शेती व फळ उत्पादन करणा-या शेतक-यांना चांगली बाजारपेठ उपलब्ध व्हावी असे प्रयत्नही या माध्यमातून केले जात आहे.
ड्रोनच्या माध्यमातून फवारणी हे शेतक-यांसाठी आता वरदान ठरले आहे, असे सांगताना गडकरी म्हणाले,की विदर्भातच किमान दीड हजार ड्रोनची गरज पडणार आहे. ड्रोन चालविण्यासाठी प्रशिक्षित व्यक्ती लागतील. यामुळे ग्रामीण भागात ५० लाख बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल. तसेच शेतक-यांनी आता बांबू लागवडीकडे वळावे. जमिनीच्या धु-यावरही ही लागवड करता येते. आता औष्णिक विद्युत केंद्रात १० टक्के बांबू जाळला तरी २५ लाख टन बांबू आपल्याला लागणार आहे. आज एवढा बांबू उपलब्ध नाही. त्यामुळे आगामी काळात बांबू लागवडीमुळे शेतक-यांची आर्थिक स्थिती सुधारेल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
विदर्भात सहा हजार मालगुजारी तलाव आहेत. पण मासेमारी होत नाही. जर गोड्या पाण्यात मासेमारी झाली तर मासेमारीचा मोठा उद्योग उभा राहू शकेल, असे सांगताना गडकरी यांनी सिंदी ड्रायपोर्ट लवकरच कार्यरत होईल, येथून बांगला देश व देशांतर्गत निर्यात करण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.
भविष्यात संत्र्याचे ५ हजार कंटेनर निर्यात व्हावे, अशी अपेक्षाही व्यक्त करून, प्रत्येक क्षेत्रासाठी एक-एक योजना बनवून त्यावर काम करण्याचा दृष्टिकोन ठेवला पाहिजे,असे सांगितले.
इथेनॉलवर वाहने चालत आहेत. वाहनांना फ्लेक्स इंजिन लागणार आहे. आजच फ्लेक्स इंजिनचा ऑर्डर निघाला असल्याचे सांगताना गडकरी म्हणाले,की शेतक-यांनी आता स्वत: निर्माण केलेल्या जैवइंधनावरच आम्ही वाहन चालवू असा संकल्प करावा. विदर्भातही पीकपध्दतीत बदल करूनच शेतक-यांचे आर्थिक उत्पन्न सुधारेल व सकल राष्ट्रीय उत्पन्नात भर पडेल तेव्हाच आपण आत्मनिर्भर होऊ,असे त्यांनी सांगितले.
तेलंगखेडीत लवकरच ‘अॅग्रो कन्व्हेन्शन सेंटर ’उभारण्यात येणार आहे. १५० कोटींचा हा प्रकल्प आहे. हे केंद्र देशात आदर्शन मॉडेल बनेल, याकडेही गडकरी यांनी लक्ष वेधले.
फ्लेक्स इंजिन व हायब्रिड इले. वाहनांच्या उत्पादनासाठी मान्यता-
पेट्रोलियम आयातीला पर्यायी इंधन म्हणून आणि देशातील शेतक-यांना थेट फायदा मिळवून देण्यासाठी आता देशातील ऑटोमोबाईल वाहने उत्पादन करणा-या कंपन्यांना फ्लेक्स इंजिन इंधन वाहने आणि फ्लेक्स इंधन मजबूत हायब्रिड इलेट्रीक वाहनांचे उत्पादन सुरु करण्यास केंद्र शासनाने मान्यता दिली आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज ट्विटवरून सांगितले.
येत्या सहा महिन्यात बीएस ६ मापदंडांचे पालन करने तसेच पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत घोषणेला अधिक मजबूत आणि यशस्वी करण्याच्या दृष्टीने इथेनॉल या जैवइंधनाला वाहतूक इंधन म्हणून प्रोत्साहन देण्याचे शासनाचे धोरण आहे, असेही गडकरी म्हणाले.
फ्लेक्स इंधन वाहने १०० टक्के पेट्रोल किवा १०० टक्के बायो इथेनॉलवर चालू शकतात. तसेच मजबूत हायब्रिड इलेक्ट्रिक तंत्रज्ञानासह चालण्यासही सक्षम आहेत. या निर्णयामुळे पेट्रोल डिझेलच्या वाहनांपासून निर्माण होणारे कार्बन उत्सर्जन कमी होईल. २०३० पर्यंत अब्ज टन कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल व प्रदूषणाची हानी टाळता येईल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

आमचे चॅनल subscribe करा