
‘मेट्रो‘समोर राष्ट्रवादीचे’तालवादन’
मेट्राेने थकवले उद्याजकांचे कोट्यावधी रुपये
मेट्राेने ओबींसीची जागा आरक्षणनिहाय भरावी:दुनेश्वर पेठे यांची मागणी
विकासकामे जनतेसाठी की कंत्राटदारांसाठी?ज्वाला धोटे यांचा सवाल
नागपूर,ता.९ फेब्रुवारी २०२२ : मेट्रो प्रशासनाने स्थानिक उद्योजकांचे जवळपास ३८.८७ कोटी रुपये थकवले असून हे उद्योजक अाता अक्षरश: देशोधडीला लागले आहे. मेट्रोमध्ये सर्रास ‘कमिशनखोरी’सुरु असून हा प्रकल्प नागपूरात साकारणारे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील उद्योजकांना राज्यात आमंत्रित करतानाच त्यांचा मतदारसंघ असणा-या नागपूरमधील लघु उद्योकांवर देखील लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन राष्ट्रवादी नेते व ‘जय जवान जय किसान’संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी केले.गडकरी यांनी नुकतेच केंद्रिय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर राज्यातील उद्योजक व व्यवसायिकांशी संवाद साधला होता,या पार्श्वभूमीवर प्रशांत पवार यांनी गडकरी यांना त्यांच्या मतदारसंघातील, मेट्रोमुळे आर्थिकरित्या उधवस्त झालेल्या उद्योजकांशी देखील संवाद साधण्याचे आवाहन केले.आज नागपूरातील स्थानिक व्यापा-यांनी मेट्रोच्या विरोधात दीक्षाभूमी जवळील मेट्रो भवनसमोर मेट्रोच्या विरोधात ‘तालवादन’केले.
याप्रसंगी बोलताना पवार म्हणाले,की नागपूर मेट्रोने स्थानिक व्यापा-यांचे जवळपास ३८ कोटींचे बिल थकवले असल्याने या व्यापा-यांवर व त्यांच्यावर अवलंबून असणा-या अनेक कर्मचा-यांवर उपासमारीची वेळ आली आहे.हे तेच स्थानिक व्यापारी आहेत ज्यांनी मेट्रोला संपूर्ण साथ देत,दिवसरात्र काम करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते वेळेवर मेट्रोचे उद् घाटन होण्यासाठी मोठा हातभार लावला होता.सिताबर्डी ते खापरी-मिहान या रिच-१ वर सर्व स्टेशन व मेट्रो लाईन टाकण्याचे काम ’आयएल ॲण्ड एफएस’ या कंपनीला देण्यात आले होते.२१ जुलै २०१६ रोजी सुमारे ५३३ कोटींचा करार या कंपनीसोबत झाला होता.याच कामाच्या आधारे ७ मार्च २०१९ रोजी पंत्रप्रधान यांनी या मार्गिकेचे लोकार्पण केले होते.परंतु मेट्रोने या कंपनीला नोटीस देऊन दोन-तीन महिन्यांच्या आधीच करार रद्द केला मात्र संपूर्ण काम या कंपनीशी जुळलेल्या वेंडर्सकडूनच मेट्रोने करुन घेतले.ही कंपनी एनसीएलटी कडे गेल्यामुळे त्यांच्या कामावर परिणाम झाला,याचा फायदा घेऊन मेट्रोने आयएल ॲण्ड एफएस चा करार रद्द केला.
महत्वाचे म्हणजे पंतप्रधान यांच्या हस्ते लोकापर्ण होण्यापूर्वीपर्यंत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रृजेश दीक्षीत यांनी या संपूर्ण व्यापा-यांची बैठक घेऊन त्यांच्या संपूर्ण बिलाची रक्कम देण्याचे कबूल केले होते मात्र पंतप्रधान यांच्या हस्ते लोकर्पण होताच दीक्षीत यांनी या स्थानिक व्यापा-यांसोबत भेटण्यास देखील नकार दिला.मुख्य बाब म्हणजे आयएल ॲण्ड एफएस या कंपनीने त्यांच्यासाठी काम करणा-या ज्या स्थानिक व्यापा-यांची त्यांना भुगतान करायचे होते त्या सर्वांची यादी महामेट्रोकडे दिली होती.जवळपास ३८.८७ कोटी रुपये विविध व्यापा-यांचे महामेट्रो देणे लागते.
ही यादी २ फेब्रुवारी २०१९ रोजी कंपनीकडून महामेट्रोला मिळाल्यानंतर मेट्रोने या व्यापा-यांना पैसे देण्याचे मान्य ही केले होते.यानंतर माशी कुठे शिंकली हे कळत नाही,मेट्रोने अचानक या रकमेविषयी घुमजाव केला.पैसे देण्यास टाळाटाळ केली.विशेष म्हणजे आयएल ॲण्ड एफएस या कंपनीला मेट्रोकडून डिसेंबर २०१८ पर्यंत ३६.२९ कोटी ‘घेणे’ होते.आपल्या या रकमेतून मेट्रोने स्थानिक व्यापा-यांचे भुगतान करावे अशी विनंती या कंपनीने मेट्रोला केली मात्र मेट्रोने कानावर हात ठेवले व स्थानिक व्यापा-यांना जगण्या मरण्याच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले.
मेट्राने आणखी एक ‘बदमाशी’ करीत आयएल ॲण्ड एफएस,ॲफकॉन,आयटीडी सिमेंटेशन यासारख्या प्रमुख कंपन्यांसोबत कामाचे करार केले होते मात्र त्यांचे करार संपुष्टात आणले व स्थानिक वेंडर्सच्या माध्यमातूनच कोणत्याही निविदा न मागवता कामे करुन घेतली.जवळपास दोन हजार कोटींची कामे कोणत्याही निवेदेशिवाय स्थानिक वेंडर्स यांनी महामेट्रोसाठी केली मात्र महामेट्रोचे अंकेक्षण झाले त्यात ही बाब नमूदच करण्यात आली नाही.
आयएल ॲण्ड एफएस या कपंनीने जे पत्र महामेट्रोला दिले त्या पत्रानुसार त्यांचे, मेट्रोकडे जमा असलेल्या पैश्यांमधून स्थानिक व्यापा-यांच्या बिलांचे भूगतान करण्याची मागणी ’जय जवान जय किसान’संघटनेने केली होती मात्र याची कोणतीही दखल मेट्रोने घेतली नाही.त्यामुळे आज राष्ट्रवादी तसेच ‘जय जवान जय किसान’ संघटनेतर्फे महामेट्रोसमोर व्यापा-यांच्या आर्थिक भूगतानासाठी नारेबाजी व तालवादन करण्यात आले.गडकरी यांनी नागपूरात मेट्रो तर आणली मात्र बाहेरच्या उद्योजकांना याचा फायदा मिळत असून, स्थानिक उद्याेजकांकडून मात्र काम काढून घेतल्यानंतर त्यांना देशोधडीला लावण्यात आले,असा आरोप प्रशांत पवार यांनी केला.२०१९ पासून आपल्याच कामांचे पैसे हे स्थानिक उद्योजक मेट्रो प्रशासनाला मागत आहेत.२०१९ पासून तर आज २०२२ उजाडले मात्र त्यांचे कोट्यावधी रुपये मेट्रोने उद्याेजकांचे अडवून ठेवले आहे,परिणामी या उद्योजकांवर लाखो रुपयांच्या व्याजाचा देखील भुर्दंड बसत असल्याचे पवार यांनी सांगितले.
आज नागपूरचा हा उद्योजक रस्त्यावर आला आहे.कोणाच्या गाड्या उचलून नेण्यात आल्या तर बँकेतर्फे कोणाची घरे ही नीलाम झाली,आता आत्महत्या करण्याशिवाय या उद्योजकांकडे दूसरा पर्याय उरला नाही त्यामुळेच गडकरी यांनी आपल्या मतदारसंघातील स्थानिक उद्योजकांची आधी काळजी घ्यावी,गडकरी यांनी बृजेश दीक्षीत यांना सांगितले देखील आहे की स्थानिकांचे देणे फेडा मात्र बृजेश दीक्षीत एवढा अहंकारी नोकरशहा आहे की गडकरी यांच्या सूचनांना देखील जुमानत नाही.अनेक व्यापा-यांनी तर हे देखील सांगितले की आम्ही दीक्षीत यांच्याकडे पैश्यांचा बॅग पोहोचवत होतो,याचा अर्थ बृजेश दीक्षीत हे ’कमिशनखोरी’करीत असून ज्यांचे कमिशन पोहोचले त्यांचे देणे फिटले जे नाही देऊ शकले ते आज रस्त्यावर आले.आजपर्यंत दीक्षीत यांना आमच्या संघटनेने प्रसार-प्रचार माध्यमांच्या माध्यमातूनच इशारा दिला आहे आता मात्र आमचा संयम संपला असून या पुढे स्थानिक उद्योजकांना रस्त्यावर आणना-या व ओबीसी,अनुसूचित जाती,जमातीच्या ९०० आरक्ष्त जागांवर इतर वर्गीयांना नोकरी देणा-या मेट्रोवर यानंतर हल्ला बोल झाल्याशिवाय राहणार नाही,असा इशारा पवार यांनी दिल.
याप्रसंगी बोलताना राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी देखील हे आंदोलन ओबीसी,अनुसूचित जाती,जमातीच्या संवैधानिक हक्काच्या जागांसाठी व स्थानिक व्यापा-यांना न्याय मिळवून देण्यासाठी केले जात असल्याचे सांगितले.
राष्ट्रवादीच्या अर्बन सेलच्या शहर अध्यक्षा व अन्याय निवारण समितीच्या ज्वाला धोटे यांनी देखील महामेट्रोला इशारा देत शहरात जी विकासकामे सुरु आहेत ती स्थानिकांसाठी आहेत की कंत्राटदारांसाठी?असा घणाघाती सवाल उपस्थित केला.‘जय जवान जय किसान’ ही संघटना सातत्याने मेट्रोच्या भ्रष्ट कारभाराविषयी पत्र परिषदा घेत आहे,आंदोलने करीत आहे,साखळी उपोषण करीत आहे मात्र आता हद्द झाली असून स्थानिक व्यापा-यांनाच देशोधडीला लावणा-या महामेट्रोला आता ’सीधी उंगली से घी नही निकलता तो उंगली टेडी करनी पडती है’या उक्तीप्रमाणेच धडा शिकवावा लागेल,असा गर्भित इशारा त्यांनी दिला.
याप्रसंगी आंदोलनकर्त्यांनी महामेट्रोच्या कार्यालयासमोर भजने व तालवादन केले.

आमचे चॅनल subscribe करा