Homeनागपूर न्यूजकाँग्रेसचा उमेदवार नेमका कोण?गटबाजीतून भोयर यांना बसणार फटका!

काँग्रेसचा उमेदवार नेमका कोण?गटबाजीतून भोयर यांना बसणार फटका!

Advertisements


तुली येथील बैठकीत भोयर यांची अनुपस्थिती

अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख केदारांच्या बैठकीत उपस्थित

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता.८ डिसेंबर:विधान परिषदेची स्थानिक मतदार संघाची निवडणूक जाहीर होताच पहीला धक्का भारतीय जनता पक्षाला बसला.३४ वर्षे भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते असणारे डॉ.छोटू भोयर यांनी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या गोटातील, माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांना तिकीट घोषित होताच बंडाचा झेंडा हातात घेऊन २० नोव्हेंबर २०२१ रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.काँग्रेसने चोवीस तासात त्यांची उमेदवारी घोषित केली आणि २३ नोव्हेंबर रोजी भोयर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.या वेळेपर्यंत संपूर्ण काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून भोयर यांच्या पाठीशी होती मात्र गेल्या काही दिवसातच निवडणूकीतील रणनीतीचा संपूर्ण ‘नूरच’पालटला,आज सदर येथील तुली इंटरनॅशनलमध्ये पार पडलेल्या काँग्रेसच्या बैठकीत निवडणूकीतील तिसरे अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांची उपस्थिती ‘बरेच काही’सांगून गेल्याने काँग्रेसचा उमेदवार नेमका कोण?या चर्चेला आता उधाण आले आहे.

काँग्रेसमध्ये अगदी पूर्वीपासूनच गटातटाच्या राजकारणाचा दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत असा पारंपारिक‘इतिहास’आहे.विदर्भ तसेच उपराजधानी देखील याला अपवाद नाही.मात्र छोटू भोयर यांनी ज्यावेळी भाजपचा साथ सोडून काँग्रेसशी ’हात’मिळवणी केली तेव्हाच त्यांनी आपले हात चांगलेच पोळून घेतले असल्याची कुजबुज खासगीत ऐकू येऊ लागली.

सर्वात महत्वाचे म्हणजे काँग्रेसचे मतदारच आता निवडणूकीच्या या शेवटच्या टप्प्यावर भयंकर संभ्रमात आहेत, त्यांचा नेमका उमेदवार कोण?छोटू भोयर की मंगेश देशमुख?देशमुख यांना आज माध्यमांनी ‘अखेर या बैठकीत काय ठरलं?अशी विचारणा केली असता,अजून ठरायचे आहे,ठरले की कळवू’अशी सूचक प्रतिक्रया दिल.मंगेश देशमुख हे पूर्वीपासून काँग्रेसचे महादूला नगर पालिकेचे सदस्य आहेत.गेल्या निवडणूकीत त्यांना तिकीट नाकारल्याने त्यांनी अपक्ष म्हणून ती निवडणूक जिंकली.

(व्हिडीयो-अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख बैठकीला जाताना)

परिणामी विधान परिषदेच्या स्थानिक मतदारसंघाचा निवडणूक अर्ज शेवटपर्यंत त्यांनी मागे घेतला नाही तेव्हाच ते नेमके कोणाचे उमेदवार आहेत?याविषयी चर्चा सुरु झाली होती.त्यामुळेच त्यांची हॉटेल तुली मधील आजची उपस्थिती व तुली मध्ये पार पडलेल्या बैठकीत निश्‍चितच काहीतरी ‘ठरतंय’किंबहूना ’ठरवल्या जातंय’या शंकेला बळ मिळालं.

काँग्रेसच्या बैठकीत अपक्ष उमेदवाराची उपस्थिती कशी?यावर क्रीडामंत्री केदार यांनी ते महादूलाचे असल्याने महादूलामधून काही निरोप आला का?अशी मिश्‍किलीत प्रश्‍नाला बगल दिली असली तरीही प्रश्‍नाचे गांर्भीय आणि शंकेची दाट छाया दूर होने शक्य नाही.

मनपातील विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे यांनी देखील ’पक्ष ज्यांच्या पाठीमागे असेल त्याला मतदान करु’असे सूचक विधान केले.याचा सरळ-सरळ अर्थ पक्ष जर डॉ.छोटू भोयर यांच्या ऐवजी मंगेश देशमुख यांना मतदान करण्याची सूचना करेल तर काँग्रेसची मते ही देशमुख यांनाच मिळेल.अश्‍या परिस्थितीत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार भोयर यांचे राजकीय जीवन हेच संपुष्टात येण्याची शक्यता वाढली आहे.

काँग्रेसमधील ‘गुटबाजी‘ बघता भोयर यांनी ही ’आंधळी कोशंबिर’खेळल्याची भावना आधीच व्यक्त केली जात होती.त्यात भोयर हे नेमके कोणाचे उमेदवार आहेत?याच संभ्रमात संपूर्ण निवडणूकीचा काळ लोटला.अातापर्यंत भोयर हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे उमेदवार असल्याचा मानस कॉंग्रेसच्या मतदारांचा होता,तर अनेक मतदारांच्या, भोयर हे सुनील केदार यांचे उमेदवार असल्याची भावना मनात होती.

मात्र काँग्रेसच्या अनेक मतदारांच्या मनात अद्यापही भोयर हे भाजपचेच उमेदवार असल्याची दाट शंका असून भोयर यांच्यावर काँग्रेसचे उमेदवार अद्यापही विश्‍वास ठेवण्यास तयार नसल्याचे चित्र उमटले आहे.
अनेक ग्रामीणच्या मतदारांनी ही शंका बोलून देखील दाखवली असल्याची माहिती आहे.

जो उमेदवार ३४ वर्षे पक्षात राहून एका आमदारकीसाठी आपल्या निष्ठेसोबत,आपल्या विचारधारेसोबत बेईमानी करतो तोच उमेदवार आमदार होताच पुन्हा भाजपमध्ये जाईल, अशी शंका अनेक मतदारांनी खासगीत व्यक्त केल्याची माहिती आहे.

उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवसापर्यंत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष् राजेंद्र मुळक ही निवडणूक लढण्यास इच्छूक होते मात्र नाना पटोले यांनी वरिष्ठ स्तरावर राजकारण करुन, भोयर यांना पक्षात ओढले असे बोलले जात आहे.एका स्वयंसेवकाला काँग्रेसवासी केल्याची किमया त्यांना दिल्लीश्‍वरांपर्यंत गाजवायची होती,त्यासाठी ही ‘खेळी’केल्याची चर्चा आहे.

मात्र उमेदवारी अर्ज भरल्यानंतर हा संपूर्ण जोश गटबाजीतून ओसरला आणि निवडणूकीचा ज्वर चढण्याचे दिवस असतानाही पुन्हा, गटबाजीमुळेच, भोयर हे नेमके कोणाचे उमेदवार आहेत?पटोले की केदारांचे?असा संभ्रम काँग्रेस मतदारांना पडला.

(व्हिडीयो-मनपाचे काँग्रसेचे नगरसेवक बैठकीला खालील मजल्यावरील सभागृहात असे उपस्थित हाते मात्र ग्रामीण मतदारांसोबत केदार यांनी खोली क्र.२०५ मध्ये प्रदीर्घ अशी बंद दार बैठक घेतली)

तुली येथील आजच्या बैठकीत आमदार विकास ठाकरे,जिल्हाध्यक्ष् राजेंद्र मुळक यांची अनुपस्थिती खूप काही सांगून जाणारी ठरली.आजच्या बैठकीला क्रीडा मंत्री सुनील केदार यांनीच एकमेव मार्गदर्शन केले व ‘योग्य’ती मतदारांना ’सूचना’केल्याची चर्चा आहे.आ.अभिजित वंजारी अल्प काळ आले आणि निघून गेले.ग्रामीणच्या संपूर्ण मतदारांना ’बंद दाराच्या आड’केदार यांनी नेमक्या कोणत्या सूचना केल्या?याचे उत्तर आता १४ डिसेंबर ,मतमोजणीच्याच दिवशीच नागपूरकरांना मिळेल.

विशेष म्हणजे आज भाजपचे उमेदवार बावणकुळे हे जरी शर्यतीत पुढे दिसत असतील तरी काँग्रेस फक्त ३० मतांनी अल्पमतात आहे आणि केदार यांचे ग्रामीण भागातील वर्चस्व बघता ३० मतांचे मताधिक्य ५० मतांमध्ये करण्यात त्यांचा हातखंडा कोणी पकडू शकत नाही,हे त्यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत सिद्ध केले आहे.

त्यामुळेच भाजपसाठी ही निवडणूक वाटते तेवढी सोपी नाहीच.गेल्या निवडणूकीचा अनुभव बघता भाजपही या वेळी कोणताही धोका पत्करण्याच्या मूडमध्ये नाही.गेल्या वेळी भाजपकडे ५० मतांची आघाडी असताना ४ मतांनी मूळक यांनी ही निवडणूक जिंकली होती,हे विशेष!

यावेळी तर राज्यात काँग्रेस सत्तेत वाटेकरी आहे आणि स्वत: सुनील केदार हे मंत्री पदावर आहेत.ग्रामीण भागात त्यांचा प्रभाव बघता भाजपला ही निवडणूक सोपी नाहीच.याशिवाय भाजपने आपले १०५ नगरसेवक तसेच ग्रामीण मधले मतदार यांना कितीही ‘सहली’ला पाठवले असले तरी भाजपचे संपूर्ण मतदार हे पक्षाशी एकनिष्ठ राहतीलच,याची शाश्‍वती स्वत:ब्रम्हदेव ही देऊ शकणार नाहीत.

शेवटी कोणतीही निवडणूक म्हटली तर ‘ना बिबी है ना बच्चा ना बाप बडा ना मैया,द होल थिंग इस दॅट के भैया सबसे बडा रुपय्या’हेच या भूतळावरील त्रिकालबाधित सत्य असल्याचे ‘मेहमूद’ जगाला सांगून गेला.

आजच्या तुली येथे मतदानाच्या दोन दिवसांपूर्वी, पार पडलेल्या तसेच अतिशय‘प्रदीर्घ’चाललेल्या बैठकीत, काँग्रेस शहराध्यक्ष आ.विकास ठाकरे,राजेंद्र मुळक आणि सर्वात महत्वाचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ.छोटू भोयर यांची अनुपस्थिती,परवा पार पडणा-या ’मतदानाची’दिशा स्पष्ट करुन गेल्याचे बोलले जात आहे.

भोयर हे काँग्रेसवर ‘लादलेले’ उमेदवार असल्याचे केदार यांनी त्यांच्या मतदारांच्या मनावर बिंबल्यास याचा फार मोठा फटका भोयर यांना बसू शकतो.काँग्रेसची एक ‘विचारधारा’आहे आणि त्या विचारधारेत छोटू भोयर हे फिट बसत नाहीत असा मतदारांचा आक्षेप आहे ,याशिवाय काँग्रेसमध्ये अनेक दिग्गज नेते आहेत ज्यांचे आपापले ’गट’ आहेत,आपल्या प्रदीर्घ राजकीय प्रवासात भोयर यांना काँग्रेसच्या याच ‘गटबाजीचा’ प्रत्यय या निवडणूकीत बसणार असल्याची जोरदार चर्चा चघळली जात आहे.

 

 

 

 

Latest बातम्या