Homeनागपूर न्यूजकर्तुत्वाचा ‘दीपस्तंभ’: वैशाली सुधाकर कोहळे

कर्तुत्वाचा ‘दीपस्तंभ’: वैशाली सुधाकर कोहळे

Advertisements

(जागतिक महिला दिन विशेष)

माहेर वर्धेचे.वडील पांडूरंग कोकाटे पाटबंधारे विभागात अभियंता होते.आई गृहीणी.दोन भाऊ.एक थोरला,एक धाकटा.मोठा भाऊ सेलू येथे नेत्र चिकित्सक सहायक पदावर तर धाकटा हा हिंगणघाट येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात शिक्षक आहे.वडीलांची एकूलती एक लाडकी कन्या बघता बघता एम.एस.सी,बी.एड.झाली.वयाच्या २५ साव्या वर्षी १५ जून १९९७ साली लग्न झाले.भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार सुधाकर कोहळे हे नागपूरात तेव्हा नवयुग महाविद्यालयात शिक्षक होते.सासरी भरलापूरला संसार होता.सासू,सासरे,दोन भासरे,एक दिर,एक नणद तरी देखील लग्नानंतरही शिक्षिकेची नोकरी करण्याची मुभा होती.हेमंत जकाते शाळेत शिक्षिका म्हणून व्यक्तीमत्व घडत ही होतं व विद्यार्थ्यांचं व्यक्तीमत्व घडवल्या ही जात होतं.लग्नाच्या एका वर्षानंतरच मोठा मूलगा जगात आला.यानंतर २००२ मध्ये मुलगी तेजस्वीनी जन्माला आली.ओजस व तेजस्वीनीने जगण्याचे सगळे संदर्भच बदलले.आज मागे वळून बघते तर चिमूकला ओजस आज एम.बी.ए चं शिक्षण घेतोय तर ओजस्वीनी संगणक अभियंताची पदवी घेत आहे यावर विश्‍वास बसत नाही.काळ इतक्या लवकर हातातून निसटून गेला.ज्या मुलांच्या मोठे होण्याची वाट बघत नोकरी सोडली होती तीच मुले पटकन ५-६ वर्षांची झाली आणि त्यांच्या शालेय शिक्षणासोबतच पुन्हा आतात खडू आला,आणि जिवनाचं सार्थक झाल

समाजसेवा ही संस्कारातच असल्याने समाजकार्यालाही वाहून घेता आलं.घरी गरजू आला तर त्याची मदत झालीच पाहिजे हे बाळकडू माहेरीच मिळाले होते.त्याचाच उपयोग आमदार पत्नी झाल्यावर ही केला.मोठी नाही किमान लहानशी तरी मदत गरजूंना झाली पाहिजे ही सतत तळमळ असल्याने मैत्रिणींच्या ग्रूपसोबत ‘दीपस्तंभ’ची स्थापना केली.एकमेकींच्या वाढदिवसाचा आनंद साजरा करतानाच ही जाणीव रुजली व रुचली,हा आनंद इतरांच्याही वाट्याला येणे खूप गरजेचे आहे तेव्हाच माणूस म्हणून जगण्याचे सार्थक आहे,हे मनोमन पटले.

२०१५ मध्ये .‘दीपस्तंभ’ची स्थापना केली.सुनंदा शहाकार,कल्पना पोतेवार,किर्ती लाखे,विद्या खडसे,नंदा खोलकूटे,सरोज जगताप,कुंदा नागपूरे,संध्या गुडधे,सारिका मिलमिले आदी ५० जणी मिळून दीपस्तंभची स्थापना झाली.यानंतर कोणकोणत्या गरजूंना दीपस्तंभची मदत होऊ शकते याचा शोध घेतला.सर्वात पहीला उपक्रम पंचवटी वृद्धाश्रमात राबवला.भेटवस्तू व जेवणाचा आनंद आम्ही देण्याचा प्रयत्न केला.प्रत्येकाच्या जीवनात त्यांच्या-त्यांच्या व्यथा होत्या!त्यांनीच आग्रहाची मागणी केली स्वामी समर्थांची साधना त्यांच्या वृद्धाश्रमात व्हावी.आम्ही लगेच संपूर्ण भजनाचा संच त्या ठिकाणी घेऊन गेलो आणि त्यांच्यासोबतच आम्ही देखील त्या पारलौकिक सुखाचा आनंद लृटला.ईच्छा त्यांची पूर्ण झाली मात्र एक वेगळीच तृप्ती आम्ही अनुभवली.यानंतर भारत देशाच्या सीमेचे रक्षण करणा-या सैनिकांना राख्या पाठवण्याचा उपक्रम राबवला.सुर्यनारायण रुग्णसेवा साहित्य केंद्रात दिव्यांगांसाठी व्हीलचेअर दान केली.दीपस्तंभमध्ये मध्यम व निम्न वर्गीय महिलांचाच सहभाग असल्याने प्रत्येकीला फक्त १०० रु.वर्गणी महिन्याकाठी द्यावी लागते.‘बूंद बूंद से घाघर भरे’या उक्तीप्रमाणे त्या रकमेतून कोणातरी गरजूची सेवा घडते हे समाधान दीपस्तंभच्या सदस्यांना दर महिन्यात अधिकाधिक सेवाकार्यकरण्याची प्रेरणा देऊन जात असते.

शिवजंयतीच्या कार्यक्रमापासून हळदी-कूंकूचा कार्यक्रम अश्‍या प्रत्येक कार्यक्रमात दीपस्तंभचा पुढाकार असतो.मार्गदर्शनपर व्याख्याने हा आमच्या सर्वाधिक आवडीचा विषय.‘पुरोगामी व आजच्या मातेची भूमिका’‘शिवबाला जिजाऊंनी घडवला’अश्‍या बौद्धिक विचार मांडणारी व्याख्याने दीपस्तंभने आयोजित केली.प्रत्येक कार्यक्रमाला दीपस्तंभच्या महिला सभासंदाचा उत्साह वाखाण्याजोगा असतो.

२०२० मध्ये कराेनाच्या पहिल्या लाटेत हे सामाजिक भान आणखी तीव्र झालं आणि मग दीपस्तंभने अन्नधान्य वाटपाचे नैतिक कर्तव्य पार पाडण्यास सुरवात केली.हा काळ बौद्धीक किवा पारलौकिकतेपेक्षाही भूकेने व्याकूळ जीवांच्या तृत्पतेच्या गरजेचा काळ होता.त्रिकोणी मैदानातील मातृसेवा अनाथालयातील ५-६ वर्षांच्या लहान मुलींपासून तर महाविद्यालयीन मुलींसाठी नवीन वस्त्रे व मिठाई घेऊन आमच्या दीपस्तंभमधील अनेकींचा वाढदिवस आम्ही तिथेच साजरा केला.

स्वरसाम्राज्ञी लता मंगेशकर यांना नुकतीच देवाज्ञा झाली.त्यांना श्रद्धांजलीपर ‘स्वरांजली’दीपस्तंभातर्फे अपर्ण करण्यात आली.

माणसाने माणसाशी माणसासम वागावं’या प्रार्थनेवर अतूट श्रद्धा असल्यानेच दीपस्तंभने देखील स्वत:ची अशी ‘तू बुद्धि दे,तेज दे,नवचेतना,नवविश्‍वास दे’ही प्रार्थना रचित केली.दीपस्तंभच्या प्रत्येक उपक्रमापूर्वी संपूर्ण सभासद ही प्रार्थना गातात.

मुले आता मोठी झाली त्यामुळे सामाजिक कार्याला आणखी जोमोन वाहून घेता आलं,आणखी जास्त वेळ देता येऊ लागला.सासू आता हयातीत नाही मात्र ८५ वर्षीय सासरे हे परमेश्‍वराच्या कृपेने अद्यापही स्वस्थ असून दररोज सांयकाळी ज्येष्ठांसोबतच्या बैठकीत रमतात.त्यामुळे मला समाजकार्याची आवड म्हण्यापेक्षा ‘जबाबदारी’ पूर्ण करता येत आहे.

राजकारणाविषयी चर्चा छेडली असता,माजी आमदार सुधाकर कोहळे यांना राजकारण तर मला समाजकारणच आवडतं असं त्या सांगतात.राजकारण म्हणजे आता नुसता चिखल झाला असला तरी चांगल्या माणसांनी राजकारणात येणेही खूप गरजेचे आहे.राजकारणात चांगल्या माणसांना घेऊन चालणेही खूप गरजेचे आहे,असा टोला त्यांनी अप्रत्यक्षरित्या भाजप श्रेष्ठींना हाणला.

आमदार पत्नी म्हणून भूमिकेबाबत विचारले असता सुधाकर कोहळे यांची राजकारणातील आवड,निष्ठा,आनंद व चेह-यावरचे समाधान बघूनच पाठींबा दिला.राजकीय जिवनात खूप चढ-उतार आले त्या-त्यावेळी त्यांनाही सांभाळून घेणं मला ही पत्नी या नात्याने खूप जड गेलं,असं ते प्रामाणिकपणे कबूल करतात.चांगलं काम करणा-याच्या वाटेला असं कसं येऊ शकतं?याचं उत्तरच मला मिळत नाही आहे.

कधी-कधी वाटतं दोन घास खाऊन सुखी राहवं,मनातलं बोलता ही येत नाही,या मुस्कटदाबीचा खूप त्रास होतो.सुधाकर यांना आमदारकीची एक टर्म आणखी मिळायला हवी होती कारण खरंच त्यांचं काम खूप चांगलं होतं.माझी दृढ निष्ठा आहे भारतीय जनता पक्षात पुन्हा चांगूलपणाला आणि काम करणा-याला महत्व प्राप्त होईल.’मी पुन्हा येईल….’यावर माझी पण दृढ निष्ठा आहे.यांना २०१९ मध्ये विधान सभेची तिकीट मिळणार नाही ही गोष्ट आमच्या गावांपर्यंत माहिती होती मात्र आम्हीच अजाण राहीलो!आमचा विश्‍वासच बसत नव्हता,पक्ष असं काही अनाकलनीय करेल!माझा नवरा इतका भोळा आहे की ‘जगभर पसरलं होतं पण यांच्या मनात उतरलं नव्हतं.भूमिपूजनाच्या कामाचा सपाटा लावला होता.सतत आपला मतदारसंघ पिंजून काढत होते.लक्षच नव्हत जग काय सावध करतंय त्याकडे!नुकतेच डबलडेकर टाकीचे भूमिपूजन झाले, ती संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी यांनीच खेटे खालले होते.राजकारणातील दावेदारीने घात केला…….!

हा भाग पूर्ण अविकसित होता.२००७ मध्ये आम्ही या भागात राहायला आलो तेव्हा भीषण पाण्याचा दुष्काळ होता.हे पहिल्यांदा नगरसेवक झाले होते.हे घरी नसायचेच मग बाईंना भेटायचे आहे,माझी मुले कधीकधी उपाशी झोपून जायची मात्र एका भागातील नागरिक गेले की दुस-या कोणत्या तरी भागातील नागरिक हे समस्या घेऊन येत होते.उन्हाळ्यात पाण्यासाठी,पावसाळ्यात साप निघणे,पाणी तुंबणे,एवढं पाणी तुंबायचं की लाेकांच्या घरातील धान्याच्या कोठ्या त्यात तरंगायच्या.भाऊ-भाऊ म्हणत लोकं रोडवर जमा होत होते.मग हे चालले पाहणी करायला,मनपा प्रशासनाला बोलावून काम करायला लावत होते.एकदा तर इतकं पाणी तुंबलं की ते बाहेर काढण्यासाठी भोलेबाब नगरातील शिवमंदिरातली सुरक्षा भिंत तोडायला लावली.नाग नदीचं पाणी लोकांच्या घरात शिरत होते कारण भिंती नव्हत्या.रात्री अंधारात संपूर्ण प्रभाग बुडून जायचा कारण स्ट्रीट लाईट्स नव्हते.पावसाळ्यात रस्ता संपूर्ण चिखलात बूडून जायचा त्यावरुन साधी सायकल देखील घेऊन जाने दुरापस्त होते.जीव तोडून काम केलं यांनी.

नगरसेवक असताना इतकी कामे केली तर आमदार असताना त्यापेक्षाही जोमाने मतदारसंघाच्या विकासासाठी काम करीत होते.आ.प्रवीण दटके यांच्या महाल प्रभागात स्ट्रीट लाईट्सची एवढी निकड नसल्याने आपल्या प्रभागात ते दटके यांच्याशी तडजोड करुन लाईट्स घेऊन येत असे.एवढंच नव्हे तर स्ट्रीट लाईट एखाद्या खराब झाला तर नागरिकांनी अंधारात राहू नये म्हणून दुरुस्तीसाठी स्वखर्चातून पैसा देत असे.आपल्या प्रभागाच्या आपल्या मतदारसंघाच्या विकासाची खरी तळमळ सुधाकर यांच्यात आहे.कसे ही करुन नागरिकांना समाधान देने हा त्यांचा स्थायीभाव आहे.पावसळ्यात रस्ते नव्हते तर मुरुम गिट्टी शोधत बसायचे.शोधून आणून टाकायचे.त्यांची तळमळ आणि त्यांचे काम बघूनच सर्व लोकांना हीच अपेक्षा होती की त्यांच्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व पुन्हा आ.सुधाकर कोहळे यांनीच करावं.

यांनी राजकारणात काही जर कमावलं असेल तर फक्त नाव कमावलं.राजकारणातील दगाफटक्यामुळे आता कुठे ते कुटूंबाच्या व्यवसायाकडे गांर्भीयाने लक्ष देत आहे.

राजकारणातील अश्‍या बेभरवश्‍याच्या खेळामुळेच दोन्ही मुले ही राजकारणापासून चार हात लांबच आहेत.आई तुळजाभवानीवर पूर्ण विश्‍वास आहे ती सगळं परत करेल.

हे आहेत दिपस्तंभचे शिलेदार-

वैशाली सुधाकर कोहळे,कल्पना कोतेवार,विद्या कपूर,कीर्ती लाखे,नंदा खोलकुटे,सुनंदा शहाकार,सरोज जगताप,विद्या खडसे,अपर्णा मानेकर,स्मिता वडळ्याकर,अर्चना कोहळे,संध्या गुडधे,सारिका मिलमिले,अर्चना क्षीरसागर,रजनी चव्हाण,भारती उबाळे,अस्मिता पांगूळ,कल्पाना पावडे,पुष्पा चाफळे,माया गोडे,राजश्री खडतकर,नविता ढवळे,शुभांगी हयार,रजंना राऊत,शोभा आसरे,प्रतिभा चव्हाण,मीना ठाकरे,दिपाली लाखे,संगीता डवरे,उज्जवला ढेंगे,भांडवलकर ताई,मीना गायकवाड,डॉ.वर्षा वंजारी,शीतल गोपावार,सुरेखा देवगिरीकर,रेखा मेश्राम,बेबी पुंड,मोटघरे ताई,माधुरी डफरे,कुंदा नागपूरे,संगीता जिचकार,लता पेठे,निर्मला टिकस,अंजली व्यास,मंगला चौधरी,सारिका ठाकरे

(शब्दांकन-डॉ.ममता खांडेकर)

 

Latest बातम्या