
१८ तारखेला उके व ॲड.रवि जाधव यांचा युक्तीवाद
न्यायालयात आज अनेक महत्वाच्या मुद्दांवर अर्ज
नागपूर,ता.१२ एप्रिल २०२२ : मुंबई येथील इडी न्यायालयाने ॲड.सतीश उके व त्यांचे बंधू प्रदीप उके यांना आज १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.इडीच्या अधिका-यांनी आज पुन्हा उके बंधूंची कस्टडी मागितली मात्र ॲड.रवि जाधव यांनी याचा पुरजोर विरोध केला.दोन्ही कडील बाजू ऐकून आज न्यायालयाने ॲड.सतीश उके व त्यांच्या भावाला इडीची कस्टडी न देता न्यायालयीन कोठडी सुनावली.३१ मार्च रोजी पहाटे ५ वाजता उके यांच्या रामेश्वरी येथील घरावर मुंबई येथील इडीच्या अधिका-यांनी धाड टाकली होती व १ एप्रिल रोजी उके बंधूंना अटक करुन मुंबईच्या इडी कार्यालयात नेले होते.नागपूरात एका वकीलाच्या घरी इडीसारख्या केंद्रिय तपास यंत्रणेने धाड टाकल्याने नागपूरकरांमध्ये प्रचंड खळबळ माजली होती.
आज न्यायालयात अनेक महत्वाच्या मुद्दांवर अर्ज सादर करण्यात आले.विशेष म्हणजे न्यायमूर्ती लोया यांच्या गुढ मृत्यू प्रकरणाचा संदर्भ न्यायालया पुढे मांडण्यात आल्याचे मुंबई काँग्रेसचे लिगल सेलचे अध्यक्ष ॲड.रवी जाधव यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले.न्या.लोया प्रकरणाताील जे पत्र इडीने सीझ केले त्या पत्राची कॉपी देण्याची विनंती न्यायालयाला करण्यात आली.
आजच्या सुनावणीत ॲड.जाधव व ॲड.उकेंतर्फे सात ते आठ अर्ज न्यायालयासमोर सादर करण्यात आले.यात उके बंधूंना जामीन मिळण्याबाबत तसेच इडीने उके बंधूंना अटक करताना आपल्या कार्यक्षेत्राबाबत नियमांची जी पायमल्ली केली आहे याविषयीचा देखील अर्ज आहे.
इडीने आपल्या कार्यकक्षेच्या बाहेर जाऊन उके बंधूंना मुंबईत आणले.इडीने नागपूर इडीच्या न्यायालयाची दिशाभूल करुन नागपूर येथे इडीचं न्यायालय असतानाही उके बंधूंना अटक करुन मुंबईत आणण्यात आलं.२०१६ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश यांचेच इडी न्यायालयांबाबत स्पष्ट आदेश असताना नागपूरात इडीचं कोर्ट असतानाही उके बंधूंना मुंबईत आणण्यात आलं व न्यायालयात १ तारखेला हजर करण्यात आलं.यानंतर ज्या पद्धतीने वकील म्हणून भेटू दिलं नाही,याकडे देखील न्यायालयाचे लक्ष वेधले. ६ एप्रिल रोजी दुस-या सुनावणीच्या वेळी आम्ही ही बाब न्यायालयासमोर आणल्यानंतर न्यायालयाने दररोज अर्धा तास,ते ही आमच्या सोयीनुसार उके बंधूंना भेटण्याचे आदेश दिले होते,असे ॲड.रवी जाधव यांनी सांगितले.
या भेटीतून एक गंभीर बाब आमच्या समारे आली की इडी अधिका-यांनी ज्या कागदपत्रांचा उल्लेख तपासादरम्यान ’जप्त’ म्हणून केला त्या व्यतिरिक्त काही अतिशय महत्वाची कागदपत्रे इडी अधिका-यांनी उके यांच्या घरातून सोबत घेतली होती.या ही बाबतीत आम्ही आमचा आक्षेप मागच्या दोन्ही सुनावणीच्या वेळी ठेवण्याचा प्रयत्न केला होता.
आज सर्वात महत्वाचा अर्ज उके यांनी न्यायालयात सादर केला त्यात स्पष्ट उल्लेख आहे की इडीने पंचनाम्यात पीएमएलए कायद्यान्वये जप्त केलेल्या कागदपत्रांची तपशीलवार एक प्रत त्यांना देखील मिळण्याबाबतचा हा महत्वाचा अर्ज होता.इडीने पंचनाम्यात उल्लेखलेल्या कागदपत्रांशिवाय एक खूप महत्वपूर्ण कागद इडीने जप्त केला होता, उके यांच्या घरातून,तो कागद न्या.लोया यांच्या गुढ मृत्यू संदर्भातला असल्याचे ॲड.रवी जाधव यांनी सांगितले.
न्या.लोया यांच्याच हस्ताक्षरात काळ्या शाईने लिहलेलं मूळ पत्र इडीने उके यांच्या घराची झडती घेताना जप्त केलं.त्या पत्रात जो उल्लेख करण्यात आला होता तो ‘मुख्यमंत्री साहेब यांना(माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना)लवकर पंतप्रधान व्हायचे आहे पण त्याकरिता इतरांना ब्लॅकमेल करण्यास त्यांच्या राजकारणाच्या योजनेत माझ्यासारख्या लाेकांना दबावात टाकून का वापरायचे?त्यांनी मला भेटीस ही बोलणी करण्यास जोशीसही पाठवले,ते वारंवार माझ्याकडे येऊन वारंवार आमिष दाखवतात,मोठे साहेबांचे तर तुम्हाला माहितीच आहे,आता तर माझ्यावर जास्त नजर ठेवली जात आहे,मला एकटे केले आहे,माझ्यावर खूप जास्त दबाब आहे,मी कोणाशी भेटू शकत नाही ,मोबाईलवर बोलणे होणार नाही,घरच्या मंडळीची काळजी वाढली आहे,नागपूरला आल्यावर भेटू,खंडाळकर आणि ठोंबरे साहेब यांना भेटीबाबत कळवले आहे,भेटल्यावर सविस्तर सांगणे होईल’हे न्या.लोया यांच्या पत्रातील मूळ उतारा ॲड.सतीश उके यांनी कोर्टासमोर आज आणला.
या अर्जाची कॉपी मागण्यात आली असून मूळ प्रत इडीने जप्त केली आहे.दुसरा अर्ज केला तो म्हणजे इडीने ज्याप्रकारे इडी न्यायालयाची दिशाभूल आणि अवमानला केली आहे व त्यानुसार कारवाई करावी.यावर न्यायालयाने इडी अधिकारी शंकरन परमेश्वर यांना विचारपूस ही केली की नागपूरला विशेष पीएमएलए कोर्ट आहे का?त्यावर इडी अधिका-याने मान्य केले की इडीचे कोर्ट नागपूरात देखील आहे.यावर आज इडी कोर्टाचा एक स्पेशल रिमार्क आला की जर का हे अधिकारी जवाबदार असतील व तसे सिद्ध झालं तर या इडी अधिका-यांवर इडीने कारवाई करावी.
याच धर्तीवर ज्याप्रमाणे इडीने नागपूरात इडी कोर्ट असताना उके बंधूंना मुंबई कोर्टात आणलं,अश्या किती प्रकरणात त्यांनी नागपूर ऐवजी मुंबईंत आरोपींना आणले आहे?याची माहिती मागविणारा अर्ज देखील आज आम्ही सादर केला असल्याची माहिती ॲड.रवि जाधव यांनी दिली.
आता १८ एप्रिल रोजी या अर्जांवर सुनावणी व युक्तीवाद होईल,यावेळी ॲड.सतीश उके हे स्वत:साठी तर प्रदीप उकेंसाठी मी सुनावणीसाठी हजर राहणार आहे आणि या संदर्भात माननीय कोर्टाने पीपी आणि इडीच्या अधिका-यांनाही संबंधित अर्जाच्या प्रत देऊन,त्याची रिसिव्ड घेऊन ते कोर्टाच्या रेकॉर्डवर घेतलं असल्याचे ॲड.रवि जाधव यांनी सांगितले.
विशेष म्हणजे अर्जाची एक प्रत इडी अधिका-यांना देणे कायदेशीररित्या बंधनकारक असल्याने ॲड.जाधव यांनी इडी अधिका-यांना ती देण्याचा प्रयत्न केला असता इडीचे अधिकारी ते स्वीकारत नव्हते.खटल्यावर दूरगामी परिणाम करु शकणा-या व खटला हेतुपुरस्सर लांबविण्यापासून रोखण्यासाठी या तांत्रिक मुद्दाकडे ॲड.जाधव यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.यावर न्यायालयाने इडी अधिका-यांना आदेश देत न्यायालयासमोर ते स्वीकारण्यास सांगितले असल्याची माहिती उके यांच्या वकीलमित्राने दिली.
या सर्व अर्जांवर आता दोन्ही बाजूने १८ एप्रिल रोजी न्यायालयात युक्तीवाद होणार आहे.

आमचे चॅनल subscribe करा