

डॉ.नितीन राऊत यांच्या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते
नागपूर,ता.१७ एप्रिल २०२२: डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे काळाच्या कितीतरी पुढे होते.आंबेडकरांनी अनेक विषयांवर मार्गदर्शकपर पुस्तके लिहली,त्यांनी ’जात’या विषयावर देखील भरपूर लिखाण केले.‘जात’ही राष्ट्रविरोधी संकल्पना आहे असे डॉ.आंबेडकर म्हणत असत,‘जात’ही भावना दूजाभाव,ईष्या निर्माण करते,आज समाजात काय घडतंय?जाती,धर्माच्या नावावर समाज विभागल्या जातोय आणि याला कोणीही थांबवत नाही,असे विधान राज्यसभेचे विरोधी पक्ष नेेते व खासदार मल्लिकार्जून खरगे यांनी केले.ते देशपांडे सभागृहात आज रविवार दि.१७ एप्रिल रोजी उर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत लिखित ‘आंबेडकर ऑन पॉपुलेशन पॉलीसी कॉन्टेनपररी रिलीवन्स’पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते.याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष सुखदेव थोरात, अमेरीकेतील इंडियाना विद्यापीठाचे प्रो.डॉ.केविन डी. ब्राऊन, अनुसूचित जाती आयोगाचे समन्वयक के. राजू व तामिळनाडूचे आमदार सिलिव्हम उपस्थित होते.राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे डॉ.राऊत यांना शुभेच्छा प्रदान केल्या.
तब्बल एक तासाच्या भाषणात खरगे यांनी अनेक विषयाला स्पर्श केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून तर राज ठाकरे यांच्या धोरणावर प्रखर टिका केली.राज ठाकरेंवर निशाना साधताना खरगे म्हणाले, की प्रबोधनकार ठाकरे यांचा वारसा उद्धव ठाकरे चालवतात आहेत.जातीपातीचा भेद गाडणारे प्रबोधनकार ठाकरे यांचा पुतळा मुंबईत अाहे.राज ठाकरे यांनी तो पुतळा बघून काही बोध घ्यावा,प्रबोधनकार तर त्या काळी जाती आणि धर्माच्या विषमतेविरुद्ध लढा देत होते,राज ठाकरे यांनी किमान आजची गोष्ट करावी.राज ठाकरे यांनी प्रबोधनकारांचे विचार आठवावे.ते त्याच वारश्यातून येतात मात्र प्रबोधनकार हे जातीधर्माच्या समूळ नाशाची गोष्ट करीत होते राज ठाकरे जाती-धर्मांमध्ये भांडणे लावण्याची गोष्ट करतात.
माझ्यासारख्या दलिताला देवस्थानात दर्शनाचा हक्क नव्हता.मी पाणी नव्हतो घेऊ शकत.शस्त्र नाही बाळगू शकत,माझ्यासाठी शिक्षण देखील नव्हते,तर माझ्यासाठी या समाजव्यवस्थेत होते तरी काय?माझ्या मुलांच्या जात आणि शिक्षणाच्या प्रमाणपत्रावर ‘हिंदू-महार’असा उल्लेख आहे.समाजातील काही सुप्रिम लाेक वर्चस्व ठेवण्यासाठीच अशी भांडणे लावतात.डॉ.आंबेडकरांनी कुटूंब नियोजनाचा पुरस्कार केला आहे,हे चांगले आहे.पण दुसरीकडे गावात एखाद्या दलिताची वरात नाही निघू शकत,प्रेम विवाह नाही करु शकत,असे केल्यास त्याच्या तोंडात मूत्र टाकले जाते,अशी गद्दारी आपल्याच लोकांसोबत जेव्हा होते तेव्हा कोण धर्माच्या नावावर समाज विघातक विचारांना पाठींबा देणार?
समाज व देशाला मजबुत करण्यासाठी तीन गुण महत्वाचे आहेत असे डॉ.आंबेडकर सांगतात.मनुष्य बळ,मानसिक बळ व आर्थिक बळ.गरीबांसाठी मानसिक बळ हे एकमेव असते.एकीसाठी मनुष्य बळाची गरज असते.जी विचारधारा तुम्हाला पिडीत करीत असते व काही लोकांना तीच विचारधारा कायम ठेवायची असते त्यांना आता हाकलून लावण्यासाठी तुमची एकता महत्वाची आहे,असा टोला खरगेंनी मोदी यांना लगावला.
या देशात ‘हम दो हमारे दो’चा नारा प्रसिद्ध आहे मात्र काही लोकांवर हे स्लोगन चपखल बसतो असे सांगून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाना साधला.हे दोघे आपल्या देशाला बर्बाद करीत आहेत.१३० कोटीं लोकसंख्येचा देश बर्बाद करीत आहेत.पेट्रोल महाग,डिजेल महाग,गॅस महाग,एवढी महागाई वाढवली,काय ठेवले गरीबांसाठी?फक़्त धर्माच्या नावावर लोकांच्या भावनांशी खेळ खेळल्या जातोय.१३० कोटी जनतेला धोका दिल्या जातोय.डॉ.आंबेडकर सांगत असत ‘माणसाची जात जन्माने ठरत नाही,धर्म हा माणसांसाठी बनला आहे,माणूस हा धर्मासाठी बनला नाही’.तुमच्या धर्मात माणूस आणि माणूसकीला जागाच नाही.
नागपूर शहर तर विखारी विचारधारेचे मोठे केंद्र आहे,असे म्हणत, त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर ही निशाना साधला.मात्र याच नागपूरात डॉ.आंबेडकरांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला.हे तोडा,ते तोडा,लाऊडस्पीकर काढा,हिजाब घालू नका,हे खाऊ नका,ते खा,हे तुम्ही शिकवणार का?
याप्रसंगी समोर बसलेले काँग्रेसचे माजी आमदार सतीश चतुर्वेदी यांना उद्देशून ’तुम्ही तर चतुर्वेदी आहात,तुम्हीच सांगात ९९ टक्के ब्राम्हण काय खातात?९९.९९ टक्के ब्राम्हण हे मासोळी खातात.ज्या स्वामी विवेकानंदाचे ते नाव घेऊन त्यांच्याही नावाचे राजकारण करतात ते विवेकानंद देखील मांसाहारी होते.विवेकांनदांचे नाव घेणारे मात्र त्यांची तत्व पाळीत नाहीत.यांना समाजाला जोडायचे नाही तर तोडायचे आहे,अशी प्रखर टिका खरगे यांनी केली.
डॉ.बाबासाहेबांनी मुंबईतच्या सिद्धार्थ महाविद्यालयात अनेक आएएस,आयपीएस अधिकारी,प्राध्यापक,शिक्षक यांच्यासेबत एकदा बैठक घेतली त्यावेळी ते अत्यंत चिंतित होते.त्यांच्या चिंतेचे कारण या उच्च विद्याभूषित वर्गाने विचारले असता बाबासाहेब म्हणाले,की मी नाराज नाही पण मला चिंता आहे मी सुशिक्ष्तांसाठी खूप काही केले,त्यांना शिक्षण व नोकरीत आरक्षण दिले मात्र जे गरीब,मजूर व शेतकरी आहेत त्यांचे काय होईल?मला त्यांची चिंता आहे. ‘समाज सुधारणेचा रथ मी ओढून इथपर्यंत आणला आहे,आता तुमच्या हाताने हा रथ पुढे न्या,पुढे नाही नेऊ शकत तर पुढची पिढी बघून घेईल त्याचे काय करायचे मात्र समाज सुधारणेच्या या रथाला कधीही मागे नेऊ नका.’यासाठीच आपल्याला काम करायचे आहे.बाबासाहेबांनी संविधान लिहले त्यात मूलभूत अधिकार दिले मात्र पुरोगामी अश्या महाराष्ट्रात दाभोळकर,पानसरे यांचा खून होतो.हेच लोक दक्ष्णेत येऊन गौरी लंकेश,कलबुर्गी यांचा मुडदा पाडतात.अजून ही या घटनांचा तपास योग्य तपास झालाच नाही,मारेक-यांना शिक्षा मिळाली नाही.त्यामुळे आपल्याला बघणे व लढणे हे दोन्ही गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
याप्रसंगी त्यांनी सुखदेव थोरात यांचे कौतूक करीत थोरात हे ज्या ज्या पदावर राहीले त्यांनी समाजाचा विचार केला.ते समाजाला खूप काही द्यायला बसले होतेे.त्यावेळी समाज घ्यायला तयार नव्हता.(एवढ्यात खरगे यांचा माईक बंद पडला त्यांनी यावर कोटी करीत यहा भी मोदी आ गये?माईक पण बदलून गेला,मला माईक सांगतोय बंद कर बोलणे,अशी मिश्किली त्यांनी केली
डॉ.आंबेडकरांचे महिलांप्रतिचे विचार देखील खूप उच्च विचार होते.तोच समाज प्रगती करीत असतो ज्या समाजातील महिलांची प्रगती होत असते,असे बाबासाहेब म्हणत असत.बाबासाहेबांनीच संविधानात महिलांना समान काम समान वेतन,समानतेचे धोरण याच पुरस्कार केला.बाबासाहेबांचे सगळेच विचार हे समकालीन विचार होते.राऊत यांनी त्यांच्या लोकसंख्येच्या विचारावर पुस्तक लिहले.राऊतांनी बाबासाहेबांच्या इतर विचारांवर देखील पुस्तक लिहावे,असा सल्ला या प्रसंगी खरगे यांनी दिला.
आज सार्वजनिक उद्योग धंदेच मोडकळीस आले आहे.आरक्षण संपत आहे,त्यामुळे शिका आणखी शिका,जागा आणखी जागा’बाबासाहेब म्हणायचे ’पढना भी है और लढना भी है’.इतकं शिका की जग तुम्हाला घाबरेल.आता तर उच्च वर्णियांसाठी देखील १० टक्के आरक्षण देण्यात आले आहे.हूकूमशाही आली तर सगळंच संपेल,आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात जो भक्ती आणि अंधभक्तीचा उल्लेख केला तो अतिशय योग्य असून भक्ती ही धर्मात असावी,राजकारणात नाही.उद्धव ठाकरे हेच म्हणाले मी बाबासाहेबांचा भक्त आहे मात्र मी अंधभक्त नाही.आम्हाला तेच हवे,अंधभक्तीतून बाहेर पडा असे आवाहन त्यांनी मोदी व राज ठाकरे यांचे नाव न घेता केले.
भगवान गौतम बुद्धाने देखील हेच सांगितले माझा धम्म आधी तपासस मग स्वीकारा.सध्या महाराष्ट्रात तीन चाकी गाडीची सरकार चालू आहे,चार चाकीची देखील सरकार असतेच.आपल्याला आघाडीला आणखी मजबूत करायचे आहे.आम्ही तत्वांच्या आधारावर आघाडी स्थापित केली.बाबासाहेब,फूले,बसेश्वर यांच्या विचारधारणेला तोडण्याचे प्रयत्न केल्यास नेहमीचा मृत्यू ओढवेल,असा गर्भित इशारा खरगे यांनी याप्रसंगी दिला.
प्रारंभी खरगे यांनी राऊत यांचे पुस्तक इंग्रजीमध्ये असल्याने मी माझे भाषण देखील इंग्रजीत लिहून आणले असल्याची कोटी केली.मात्र राऊत यांनी त्यांचे भाषण मराठीत सुरु केले व इंग्रजीत संपवले.मी देखील मराठीत सुरु करतो मात्र पुस्तकाबाबत मी इंग्रजीतच बोलणार असल्याचे ते म्हणाले.नागपूरचे लोकं हे खूप भाग्यवान आहेत ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या या दीक्षाभूमीसारख्या पवित्र ठिकाणी जन्माला आले ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी धम्माची दीक्षा घेतली,असे ते म्हणाले.हे पुस्तक २०१४ सालीच प्रकाशित झाले असते मात्र फक्त माझी वेळ मिळावी म्हणून थांबले असे सांगण्यात येत आहे यासाठी मी प्रारंभी याची माफी मागतो.माझ्यामुुळे उशिर झाला याची जबाबदारी मी घेतो,असे खरगे म्हणाले.
मला एकदा मोदी हे संसदेत म्हणाले की मला ५० वर्षे झाली राजकारणात,मी ११ वेळा आमदार तर २ वेळा खासदार राहीलो.मी त्यांना म्हणालो आता ५० चे ५३ वर्ष झाले असते पण तुम्ही मध्ये आलात!जीवनात मी पहील्यांदा निवडणूकीत मोदींमुळे हरलो मात्र शेवटी राज्यसभेत पोहोचलोच.या जगात बाबासाहेब,महात्मा गांधी,नेहरु,विवेकानंद पैदा नाही झाले असते कर काय झाले असते?एकेकाळी या जगाची लोकसंख्या ही फक्त २ कोटी होती.आंबेडकरांना कुटुंबापेक्षा देशाचा विचार महत्वाचा वाटत असे.डॉ.नितीन राऊत यांना २ अपत्ये आहेत.मी मात्र माझ्या वडीलांचा एकमेव अपत्य आहे कारण ‘रझाकार’चळवळीत माझी बहीण व आई मारल्या गेल्या.मी एकटाच वडीलांसोबत ६ वर्षांचा असताना वाचलो.
१९६२ साली मी नागपूर विद्यापीठात रिपब्लिकन स्टूडंट फेडरेशनच्या चर्चासत्रासाठी पहील्यांदा आलो.त्यावेळी आमदार बी.पी.मोर्य यांनी डॉ.आंबेडकरांवर अत्यंत प्रभावी भाषण केले.त्या भाषणाचा माझ्यावर खोलवर परिणाम झाला.मला त्या भाषणातून प्रेरणा मिळाली.
त्यावेळी फक्त मोजके विद्यार्थी विद्यापीठाचे शिक्षण घेऊ शकत होते.सवर्ण व लिंगायत विद्यार्थ्यांचाच शिक्षण क्षेत्रात भरणा होता.मी शिकलो आणि त्याच वेळी काँग्रेसमध्ये दोन गट पडले.
स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी मला गुलबर्गच्या मला विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष केले.आजपर्यंत मी त्या पदावर कायम आहे.१९७१ ला मी पहील्यांदा आमदार झालो.२०१८ मध्ये माेदी यांनी खरगे आता सदनात उपदेश देण्यासाठी राहतील की नाही?अशी उपरोधिक टिका केली होती,२०१९ ची लोकसभेची निवडणूक मी हरलो पण सदनात परतलो,असे खरगे यांनी सांगितले.
यावेळी डॉ.राऊत यांच्या लोकसंख्येवरील पुस्तकाचे औचित्य धरुन खरगे यांनी माझ्या वडीलांचा मी एकुलता एक अपत्य असल्याने माझ्या वडीलांनी मला एक किवा दोन अपत्यांवर थांबू दिले नाही,त्यांचे खूप जास्त दडपण माझ्यावर होतं.खानदानीच्या नावावर ते मला नेहमीच भावनिक साद घालत होते,तुझ्या मुलांना मी या ही वयात काम करुन जेऊ घालील मात्र तू किवा तुझ्या पत्नीने संतती नियमाची शस्त्रक्रिया करु नये नाही तर मी आत्महत्या करील अशी धमकी ते मला देत असत,असे खरगे यांनी सांगून सभागृहात हास्य फूलवले.डॉ.आंबेडकरांचे विचार लोकसंख्येच्या बाबतीत प्रासंगिक असतानाही त्यावेळी भारतीय समाजातील कुटुंबियांच्या भावनिक मुद्दासमोर आंबेडकरांचा प्रस्ताव हा फेटाळला गेला असावा,असे खरगे यांनी सांगितले.ती मतांचे राजकारण होते मात्र इंदिरा गांधी यांनी बाबासाहेबांचा मुंबई विधान सभेत १९३७ साली फेटाळल्या गेलेला हाच प्रस्ताव १९७४ मध्ये अमलात आणला व संतती नियमासाठी कुटूंब नियोजनाच्या योजना राबविण्यास सुरवात केली,असे ते म्हणाले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ घटनाच लिहिली असे नाही तर त्यांनी पुढे निर्माण होणाऱ्या अडचणी अडथळे दाखविले. त्या अडथळ्यांवर उपाय सूचविले. ज्ञानाचा अथांग सागर असणारे बाबासाहेब सर्वकालीन मार्गदर्शक आहे. जेव्हा तुम्ही थांबता. काय करावे समजत नाही. त्यावेळी बाबासाहेबांचे विचार मार्गदर्शक ठरतात. असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज येथे केले.
सामान्यता: राजाकरणातील व्यक्तीमत्व अभ्यास करून काही लिहिल याबाबत शंका उपस्थित केली जाते. मात्र डॉ. नितीन राऊत यांनी आपल्या सर्वांचे दैवत असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार वारस्याला पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी अभ्यासूपणे बाबासाहेबांच्या विचारांवर पुस्तक लिहून राजकारणी अभ्यासू असतो हे दाखवून दिले आहे. एक अभ्यासू व्यक्तिमत्व व मंत्रीमंडळातील सहकारी म्हणून नितीन राऊत यांचा आपल्याला अभिमान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बाबासाहेबांचे विचार कायम उपाय सुचवित असते. यापुस्तकात देखील त्यांनी लोकसंख्येसंदर्भातील विचारांची, धोरणांची माहिती दिली आहे. नितीन राऊत हे बाबासाहेबांचे भक्त आहेत. त्यांचे विचार त्यांनी कधीच सोडले नाही. ते अंधभक्त नाहीत. बाबासाहेबांचे विचार घेवून पुढच्या पिढीला मार्गदर्शन करण्याची त्यांची भुमिका कौतुकास्पद, आहे अशा शब्दात या साहित्य निर्मीतीचा त्यांनी गौरव केला.
अमेरीकेतील इंडियाना विद्यापीठाचे प्रो.डॉ.केविन डी. ब्राऊन यांनी दिक्षाभूमी येथे जाऊन दर्शन घेतल्याचे सर्वप्रथम सांगितले. भारत आणि अमेरिका यादोन्ही देशात वर्णभेद आणि जातीभेद यासमस्यांनी अनेक पिढ्यांचे नुकसान केल्याचे सांगितले. मात्र भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याविरोधात उभा केलेला लढा केवळ भारतासाठीच नव्हे तर जगासाठी मार्गदर्शक असून भारताच्या लोकसंख्येच्या प्रश्नावर देखील त्यांनी उपाय योजना सुचवल्या आहे. एका चांगल्या विषयाला पुस्तकात हातळल्याबद्दल त्यांनी डॉ. नितीन राऊत यांच्या पुस्तकाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष सुखदेव थोरात यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात मानव जातीच्या समस्येच्या कोणत्याही प्रश्नावर उपाय योजना सुचविण्याची क्षमता आंबेडकरी साहित्यात असल्याचे सांगितले.

तत्पुर्वी पुस्तकाचे लेखक डॉ. नितीन राऊत यांनी मनोगत व्यक्त केले. लोकसंख्येच्या समस्ये संदर्भात बाबासाहेबांनी केलेले सुतोवाच लक्षात घेतले गेले नाही. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना लोकसंख्या नियंत्रणावर ७० च्या दशकात धाडसी निर्णय घ्यावे लागले. बाबासाहेबांनी सुचवलेल्या मार्गंनी निर्णय घेतल्यामुळे १९५० च्या काळात १ लाख मुलांच्या जन्मामागे १ हजार महिलांचा प्रसूती दरम्यान वा पश्चात मृत्यु होत होता. मात्र आता दोन अपत्यांचा निणर्य घेतल्यामुळे ताजा आकडेवारीनुसार ही संख्या एक लाखाला १०३ पर्यत कमी झाली आहे. बाबासाहेबांची पुढील वर्षी १३२ वी जयंती साजरी करतांना अल्पउत्पन्न गटातील दारीद्य रेषेखालील कुटुंबानी एक अपत्यापर्यंत आपले कुटुंब सिमीत ठेवल्यास एक रकमी प्रोत्साहनपर बक्षीस देण्याची योजना सुरू करण्याबाबत शासनाकडे आग्रह करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच बाबासाहेबांनी लोकसंख्या नियंत्रणाचा विचार मांडण्याच्या घटनेला ८४ वर्षपूर्ण होत आहेत. त्याची आठवण म्हणून हे वर्ष लोकसंख्या नियंत्रण वर्ष म्हणून घोषित करण्यातबाबत मागणी असल्याचे सांगितले.
ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत प्रदिप आगलावे यांनी यावेळी या पुस्तकावर समिक्षण सादर केले. डॉ. नितीन राऊत यांच्या ‘आंबेडकर ऑन पॉपुलेशन पॉलीसी कॉन्टेनपररी रिलीवन्स’ हे पुस्तक त्यांच्या पीएचडीच्या संशोधनावर आधारीत आहे. लोकसंख्येचा विस्फोट संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इंडीपेडंट लेबर पार्टीच्या जाहिरानाम्यात चिंता व्यक्त केली होती. यासंदर्भात बाबासाहेबांनी १० नोव्हेबर १९३८ रोजी मुंबई विधानसभेत बिल सादर केले होते. त्याला प्रचंड विरोध झाला. परंतू नंतर बाबासाहेबांच्या धोरणांचाच भारताने पुरस्कार केला. गर्भनिरोधक हा महत्वाचा उपाय त्यांनी सुचविला होता. भारताची लोकसंख्या १९२१ पासूनच्या जनगणनेचा आधार घेतल्यास कधीच कमी झाली नाही. सतत वाढत गेली आहे. यासगळया वस्तुस्थितीची मागणी त्यांनी या पुस्तकात केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा कुटुंब नियंत्रणाच्या संदर्भातील दृष्टीकोन आजच्या काळात देखील महत्वपुर्ण आणि प्रासंगिक आहे. असे या पुस्तकात स्पष्ट करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
देशपांडे हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला आमदार राजू पारवे, जिल्हाधिकारी आर. विमला, अतिरिक्त आयुक्त माधवी खोडे, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सूर्यवंशी, राज्याचे माहिती आयुक्त राहुल पांडे, माजी पालकमंत्री सतिश चतुर्वेदी, माजी खासदार गेव्ह आवारी, सामाजिक कार्यकर्ते गिरीष गांधी, याशिवाय सामाजिक, राजकीय व आंबेडकरी चळवळीतील अनेक मान्यवर सहभागी उपस्थित होते.

आमचे चॅनल subscribe करा