४० लाख लोकसंख्येच्या नागपूरात वर्षभरात फक्त २४ हजार रुपये दंड वसूल
अनाधिकृत आठवडी बाजारांना मनपा कर्मचा-यांचाच पाठिंबा!
मनपा सभागृहात नगरसेवकांचा धक्कादायक आरोप
नागपूर,ता.२२ एप्रिल २०२६: भाजपचे नगरसवेक ॲड.संजय बालपांडे यांनी शहराच्या वस्त्यांमधील अवैधपणे लागत असलेल्या आठवडी बाजारांच्या संदर्भात कारवाई करण्याचे अधिकार कोणत्या विभागास आहे?प्रभाग क्र.१९ मधील गांधीबाग व इतवारी परिसर तसेच रजवाडा पॅलेस ते दवाई मार्केट गंजीपेठ परिसरांतील अवैध बाजारांवर संबधित विभागाने आजपर्यंत कोणती उपाययोजना केली?अवैध बाजार लावणा-या दुकानदारांवर फौजदारी कारवाई केला का?मागील एक वर्षात दंड स्वरुपात किती रकम महापालिकेला प्राप्त झाली,हा प्रश्न आज मनपाच्या सभेत मांडला ,त्यावर उत्तर देताना मनपा प्रशासनाने अवैध आठवडी बाजार लावणा-यावर फक्त एक फौजदारी कारवाई केल्याचे धक्कादायक उत्तर दिले!
इतकंच नव्हे तर गेल्या वर्षभरात अवैध आठवडी बाजार लावणा-यांकडून फक्त २४ हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती दिली.यावर बालपांडे यांनी अनेक ठिकाणी मनपा कर्मचारी हे अवैध दूकानदारांवर कारवाई करण्यास घाबरतात,असा आरोप केला.मनपाच्या अतिक्रमण विभाग व झोनकडूनच अशा अवैध आठवडी बाजारांना संरक्षण प्राप्त असून अश्या कारवाईची सूचना झोनचे कर्मचारीच आधीच अवैध बजार भरवणा-यांना देतात असा खळबळजनक आरोप त्यांनी केला!
रस्त्यांवरील अवैध बाजारांना अटकाव करण्याची जबाबदारी ही झोनच्या सहायक आयुक्तांची आहे मात्र,ते आपल्या वातानुकूलीन कक्षाच्या बाहेरच पडत नाहीत.संपूर्ण शहरात ही समस्या दिसून पडतेय,असा संताप त्यांनी व्यक्त केला.
भाजप आमदार प्रवीण दटके यांनी १ फेब्रुवरी २०२५ रोजी मनपा आयुक्तांना या संदर्भात निवेदन दिले होते,तरी पण आजही अवैध बाजार तिथेच भरतोय जिथे तो भरत होता.संत्रा मार्केटच्या ५० मीटर दूर जुना बाजार भरतो.शनिवार-रविवारी भरणारा हा बाजार आता नातिक चौकापर्यंत पोहोचला आहे.लवकरच तो श्याम टॉकिज व पुढे बडकस चौकापर्यंत पोहोचेल.महत्वाचे म्हणजे त्या जुना बाजार ज्याला चोर बाजार देखील संबोधल्या जातं,एक ही दूकानदार आमच्या भागातील नाही,असे बालपांडे म्हणाले.
तक्रार केल्यानंतर मनपाचे चार डगे हलतडूलत कारवाईसाठी येते तोपर्यंत ते गल्ल्यांमध्ये गायबही होतात व पुन्हा रस्त्यांवरच बाजार भरवतात.अतिक्रमण विभागाने एकच मोठी कारवाई करने गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
महाल भागात तर गल्लीमध्ये असणा-या स्वत:च्याच घरात माणूस दूचाकीनेही शिरु शकत नाही.अनेकदा तक्रारी करुन झोनचे कर्मचारी कारवाईसाठी येतात मात्र,त्या आधी तेच अवैध दूकानदारांना कारवाईची आगाऊ सूचना देतात,त्यांना गल्ल्यांमधले रस्ते लपण्यासाठी दाखवतात!यानंतर सायंकाळी घरी जाताना त्या कर्मचा-यांच्या हातातील दोन्ही पिशव्या या वजनाने भरलेल्या असतात.ही त्यांच्यावर अतिक्रमणधारकांनी केलेली ‘कृपा’असते,असा खळबळजनक आरोप करण्यात आला.
दिव्या धुरडे यांनी देखील हसनबाग,साेमवारी बाजार,नंदनवन ते तिरंगा चौकपर्यंत भर रस्त्यांवर भरणा-या अवैध बाजारांचा मुद्दा मांडला.पहले हा बाजार फक्त लोखंडी बाजार होता,आता दररोज भरणा-या या बाजारात कपडे,खेळणे,चपलांची दूकाने थाटलेली दिसून पडतात.त्याच्यातून वाट काढत जवळच असलेल्या रेल्वे स्टेशनला प्रवाशांना पोहोचणे दुरापस्त झाले आहे.अनेकांच्या गाड्या ही सुटल्या.
कळमना घाटवर तर त्यांच्या गाड्या उड्डाण पूलांपर्यंत पोहोचल्या आहेत.याच वाहतूक कोंडीत अडकून एक महिला नुकतीच बेशुद्ध झाली.मनपाच्या थूल या अधिका-याला चार वेळा फोन करुन देखील उचलण्यात आला नाही.यानंतर झोनच्या सहायक आयुक्तांना फोन लावला.त्यांनी वाहतूक पोलिसां्ना पाठवतो म्हणून सांगितले.मात्र,यंत्रणा त्या महिलेपर्यंत पोहाेचूच शकली नाही,अशी कैफियत धूरडे यांनी मांडली.
मनीषा अतकरे यांनी देखील प्रभाग क्र.४ मधील हसनबाग चौकातून दूचाकी देखील निघत नसल्याचे सांगितले.वाठोडामध्ये तर इतके अतिक्रमण झाले आहे,ज्यामुळे सामान्य नागपूरकरांची अक्षरश: कोंडी झाली आहे.यावर बंटी कुकडे यांनी रात्री देखील अतिक्रमणधारकांवर कारवाई झाली पाहिजे,अशी मागणी केली.
विकी कुकरेजा यांनी त्यांच्या जरीपटका भागातील जिंजर मॉल,दयानंद पार्क व नारा गावच्या बाजूला अतिक्रमण वाढले असल्याचे सांगून परिस्थिती इतकी विकट आहे की त्यातून रुग्णवाहीका देखील जाऊ शकत नसल्याचे सांगितले.
यावर विरोधी पक्षातील नगरसेवक असलम यांनी संपूर्ण सत्ता पक्ष हा गरीबांवर कारवाई करण्यासाठी सरसावला असल्याचा आरोप केला.यावर बंटी कुकडे यांनी हा गरीबी-श्रीमंतीचा विषय नसून अपघातांचा विषय आहे,नागरिकांच्या गैरसोयीचा विषय असल्याचे सांगितले.या अवैध बाजारांचा सर्व्हे झाला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
या चर्चे दरम्यान सत्ता पक्ष व विरोधकांमध्ये आठवडी बाजारला ’चोर बाजार’ उल्लेखल्यामुळे व चोरीचे सामान विकत असल्यामुळे,शाब्दिक चकमक घडली.यानंतर ‘चोर बाजार’ हा शब्द कामकाजातून काढून टाकण्यात आला.
यावर नगरसेवक असलम यांनी सामान्य नागरिकांना आठवडी बाजार हवे असल्याची पुश्ती जोडली.यानंतर सभागृहात अवैध आठवडी बाजार,अतिक्रमण,अवैध जाहीरातींचा विषय देखील चर्चिला गेला.
कोणत्याही धर्माचा सणवार असो किंवा कौटूंबिक कार्यक्रम,सर्रास रस्त्यावरच पॅण्डोल टाकून तीन-तीन ,चार-चार दिवस रस्ता अडवला जातो.यावर शिवसेनेचे नगरसेवक किशोर कुमेरियांनी सामान्य नागरिकांना त्रास झाला नाही पाहिजे असे धोरण ठरवा,अशी मागणी केली.
यानंतर विरोधी पक्ष नेते संजय महाकाळकर यांनी फक्त गरीबच नव्हे तर मोठमोठे मॉल्स,दूकानधारक हे फूटपाथवर अतिक्रमण करीत असल्याचे सांगितले.यासाठी झोनच्या सहायक आयुक्तांवरच कठोर कारवाई झाली पाहिजे,अशी मागणी त्यांनी केली.
नगरसेवक असलम यांनी पॅण्डोल टाकून रस्ता अडवणा-या कुटूंबियांवर नव्हे तर पॅण्डोल मालकांवरच कारवाईचा सपाटा लावला पाहिजे जेणेकरुन यावर नियंत्रण मिळेल,असा सल्ला दिला.तो अधिक पैसे मिळण्यासाठी संपूर्ण रस्ताच पॅण्डोलने झाकतो.
यावर सत्ता पक्ष नेते बाल्या बोरकर यांनी मनपा आयुक्तांनी यावर निवेदन द्यावे,अशी सूचना केली.महापौरांच्या सूचनेनंतर मनपा आयुक्त डॉ.विपीन इटनकर यांनी ते नुकतेच या पदावर रुजू झाल्यामुळे शहराचे विषय गांर्भीयाने समजून घेत असल्याचे सांगितले.सभागृहाच्या ज्या भावना आहेत त्याच्याशी सहमत असून, यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
शहराच्या प्रश्नावर ‘मिशन-१००’ हा उपक्रम राबविण्यात येणार असून, बैठकीत आम्ही फूटपाथवरील अतिक्रमण,अवैध आठवडी बाजार,अवैध जाहीराती फलक,फूटपाथवर कायमस्वरुपी अतिक्रमण,निवासी घरासमोरील अतिक्रमण इत्यादी ५३ महत्वाचे विषय अजेेंडावर घेतले आहे.ते शोधून काढले जातील व मनपा,पोलिस विभाग व महसूल विभागाच्या सहकार्याने हे प्रश्न सोडवले जातील,असे आश्वासन मनपा आयुक्तांनी दिले.
…………………………..
Advertisements
