
(शुक्रवार स्तंभ-कहानि पुरी फिल्मी है)

रेवती जोशी-अंधारे
कोरोना काळात ओटीटी प्लॅटफॉर्मला प्रेक्षकांची पसंती मिळाली आणि ती अजूनही कायम आहे. मिर्झापूर चा पहिला सिझन नेटक-यांनी असाच डोक्यावर उचलून घेतला होता. आता, याचा दुसरा सिझन लाँच झाला आहे. पहिला सिझन संपता-संपता अनेक कुटूंब संपले आणि फक्त तिघे जण जिवंत राहिले होते. त्यात गुड्डू पंडीत (अली फझल) या मुख्य पात्रासह त्याची बहिण डपी आणि बबलूची मैत्रिण गोलू हे तिघे होते. मुन्ना त्रिपाठी (दिव्येंदू शर्मा) याने गुड्डूच्या बायको-मुलांसह त्याच्या भावाची हत्या केल्याचा रक्तरंजित खेळ आपण पहिल्या सिझनमध्ये पाहिला होता.
साहजिकच दुसरा भागही तितकाच रक्ताळलेला आणि सूडाच्या संतापाने भरलेला असेल, हे सांगायला भविष्यवेत्त्याची गरज नव्हती. कदाचित म्हणूनच, प्रेक्षकांच्या या अपेक्षेपेक्षा काही वेगळे त्यांच्यासमोर देणारा असा यावेळचा सिझन तयार करणे निर्मात्यांसमोर कठीण आव्हान ठरले असेल. त्यात ते काही प्रमाणात यशस्वी ठरले आहेत, असे म्हणावे लागेल.
जौनपूर आणि मिर्झापूरसोबतच या सिझनमध्ये बिहारच्या आणखी एका टोळीची कथाही बघायला मिळते, जी मूळ कथेच्या बरोबरीने चालत राहते. अपेक्षेप्रमाणे गुड्डू पंडीत बदल्याच्या आगीत जळतो आहे आणि अशीच अवस्था गोलूचीदेखील आहे. या दोघांनीही आपल्या कुटूंबातील कोणाला तरी गमावले आहे आणि आता आपल्या मुलांनी परत यावे, असे त्यांना वाटते आहे. पण, पंडीतला केवळ बदलाच नाही तर मिर्झापूरची गादीदेखील हवी आहे. दुसरीकडे मुन्ना त्रिपाठी शरद शुक्लासोबत हातमिळवणी करतो तर अखंडा आणि मुख्यमंत्र्याची जोडी होते. रॅलीच्या दरम्यान मुन्ना मुख्यमंत्र्याच्या मुलीसोबत जवळीक वाढवतो, तिच्याशी लग्न करतो. मुख्यमंत्र्याची ही मुलगी पुढे मुख्यमंत्री बनते.
गुड्डू आणि लाला दोघे मिळून अफूचा व्यवसाय सुरू करतात. आता मुन्ना, शरद आणि गुड्डू तिघांनाही मिर्झापूरची गादी हवी आहे. तिघांना मिळणार आहे एकच संधी! कोणती संधी? कोण मिळवेल? कशी एन्कॅश करणार आहे? हीच या सिझनची खरी कथा आहे.
पहिल्या सिझनच्या तुलनेत दुसरा भाग थोडा संथ वाटत असला तरी त्याचा शेवट उत्कंठा वाढविणाराच आहे. अभिनय आणि निर्देशनाच्या जोरावर हा सिझन प्रेक्षकांना खिळवून ठेवेल. साधारण प्रत्येकी एका तासाचे दहा भाग आहेत आणि हे जरा कंटाळवाणे वाटू शकतात. अभिजात सौंदर्य, हळूवार संवाद आणि मानवता यांचा मिर्झापूरशी दुरान्वयेही संवाद नाही. भडक शिवीगाळ करणारे संवाद, न्यूडीटीची भरमार आणि अंगावर येणारी qहसा या न्यू नॉर्मलने मिर्झापूर ओथंबलेला आहे. धांसू म्हणता येतील, असे डायलॉग्स या भागातही आहेत. नेताजी बनना है तो गुंडे पालो, गुंडे मत बनो ! हा डायलॉग आधीच गाजतो आहे. या संवादांवर बनलेले मिम्स तूफान व्हायरल झालेत.
अॅक्शन, क्राईम आणि ड्रामा अशा तीन कॅटेगरी असणाèया मिर्झापूर २ चे निर्देशन गुरमीत सिंह, मिहिर देसाई आणि करण अंशुमन यांचे आहे. फरहान अख्तरची निर्मिती आणि कुलभूषण खरबंदा, श्वेता त्रिपाठी, राजेश तेलंग यांच्यासह मराठमोळ्या श्रेया पिळगावकरच्या यात प्रमुख भूमिका आहेत. सोशल मिडीयावर या सिझनला पाच पैकी चार असे गुण मिळत आहेत. पहिल्या सिझनच्या दोन वर्षांनंतर हे भाग आल्यामुळे चाहत्यांचा उत्साह वाढला आहे.
कलाकृती वगैरे बघण्याच्या अपेक्षेने मिर्झापूर बघणा-यांच्या पदरी निराशा पडेल. असले कन्टेन्ट न आवडणा-यांनी मिर्झापूरच्या वाटेला जाऊ नये, असे माझे प्रामाणिक मत आहे. नाही तर, कौन शिकार…कौन शिकारी ? अशीच आपली अवस्था व्हायची.
…………….




आमचे चॅनल subscribe करा
