फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजपिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त!

पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त!

Advertisements

(शुक्रवार स्तंभ- कहानी पुरी फिल्मी है)

 

रेवती जोशी-अंधारे

पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त!

प्रत्येकाच्या स्वप्नांची मायानगरी म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टी ! आपल्या देशात फक्त स्वप्न विकणा-या दोन मोठ्या इंडस्ट्रीज आहेत. एक म्हणजे विमा उद्योग आणि दुसरा बॉलीवूड ! पिढ्यान्पिढ्या चित्रपटांनी दाखविलेल्या प्रेम, मैत्री, कुटूंब, राजकारण, यश, गुन्हेगारी, शत्रुत्व, सुख-दु:ख अशा सामान्यांच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील कथा भारतीयांना भुरळ पाडत आल्या आहेत.

सोप्या भाषेत सांगायचे झाले तर आपण जे प्रत्यक्षातील दैनंदिन जीवनात करू शकत नाही आणि ते करण्याची प्रचंड इच्छा असते, ती सुप्त इच्छा सिनेमाच्या मोठ्या पडद्यावर बघून समाधान मानतात. थोडक्यात काय तर दुधाची तहान ताकावर भागवायची! म्हणून तर कोणी कितीही नावं ठेवो, आपलं सिनेमा आणि कलाकारांवरचं प्रेम कायमच राहतं. फक्त वाहवत जायला नको. कोरोनाच्या आघातानंतर आता ही स्वप्नांची दुनिया आपल्यासमोर पुन्हा एकदा खुली होणार आहे.

लॉक डाऊननंतर थिएटर्स पहिल्यांदा उघडतील आणि प्रथम प्रदर्शित होणारा चित्रपट असेल ‘खालीपिली’ ! अनन्या पांडे आणि ईशान खट्टर अभिनित हा तद्दन बॉलीवूड मसालापट येत्या शुक्रवारी म्हणजे १६ ऑक्टोबरला प्रदर्शित होतो आहे. मकबूल खान दिग्दर्शित खालीपिली डिजिटल प्लॅटफॉर्मवर आधीच प्रदर्शित झाला आहे. युवा कलाकारांमुळे या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे.

किन्नर लक्ष्मी शुक्ला यांच्या संघर्षमय जीवनावर आधारीत ‘लक्ष्मी बॉम्ब’ चा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आणि परिस्थिती बदलणार असल्याची चाहूल लागली. हातभर लाल बांगड्या आणि लाल साडी घातलेला अक्षय कुमार लक्ष्मीच्या भूमिकेत सॉल्लिडच दिसतो आहे. लक्ष्मण आणि लक्ष्मी अशा दुहेरी भुमिकेत अक्षय कुमार दिसणार असून, हा सिनेमा तामिळ चित्रपट ‘कंचना’चा रीमेक आहे. त्यात अक्षयसोबत कियारा अडवाणी, तुषार कपूर आणि शरद केळकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. सुपरहीट कंचनाचा डायरेक्टर राघव लॉरेन्सनेच ‘लक्ष्मी बॉम्ब’लाही दिग्दर्शित केले आहे. प्रदर्शनाच्या तब्बल १ महिन्याआधी हा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि नेटक-यांनी त्याला जोरदार प्रतिसाद दिला.

याशिवाय, ‘८३’ हा १९८३ च्या क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघावरचा चित्रपटही प्रदर्शनाच्या रांगेत आहे. दरम्यान, गेल्या तीन महिन्यांपासून चर्चेत असलेल्या सुशांत सिह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा धुरळा आता काहीसा बसला आहे. न्यू नॉर्मल च्या निर्धारासोबत आपण सगळेच पुढे जात आहोत. असं असलं तरी या दिवसांत बॉलीवूडच्या अब्रूची लक्तरं झालेली जगाने पाहिलीत. त्या कटू आठवणी इतक्या लवकर विसरता येतील, असं वाटत नाही. बात निकली है तो…दूर तलक जाएगी, या न्यायाने वेळोवेळी ड्रग्जचा हा नागोबा फणा काढणार आहेच. तोपर्यंत, बॉलीवूड नव्या नियमांसोबत जुळवून घेईल.

अनलॉक ५ मध्ये टॉकीज आणि मल्टीप्लेक्सेस उघडण्यासाठी नवे निर्देश जारी करण्यात आले आहेत. दोन प्रेक्षकांच्या मध्ये एक खुर्ची मोकळी सोडायची असून, सोशल डिस्टन्स पाळला जायलाच हवा. प्रेक्षकांच्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अ‍ॅप असायलाच हवेत.

सॅनिटायझर आणि हात धुण्याची व्यवस्था असायला हवी. थिएटरमध्ये प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येकाचे थर्मल स्क्रिनिंग  होणे आवश्यक असून, प्रत्येक व्यक्ती असिम्प्टोमॅटीकच असायला हवी आहे. थिएटरचे बॉक्स ऑफीस सुरू राहणार असले तरी नागरिकांनी ऑनलाईन बुकींग करावे, असा आग्रह आहे. रांगा लावण्यासाठीही क्यू सर्कल आखणे टॉकीज मालकांना बंधनकारक आहे. शिवाय, थिएटरच्या आत काहीही खाण्यापिण्याचे साहित्य नेता येणार नाही. तसा हा नियम आपल्याकडे ९० टक्के टॉकीजवाल्यांनी आधीच अंमलात आणला होता. एकाच वेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी शोच्या वेळा बदलण्याचीही सोय आहेत. नियमित सॅनिटायझेशन, एसीचे २४ ते ३० दरम्यान तापमान, मास्कचे बंधन तर असणारच आहे पण सोबत प्रत्येकाला त्याचा मोबाईल नंबरही नोंदवावा लागणार आहे. आवश्यकतेनुसार, ट्रेस करायला हा डेटा वापरला जाईल.

गजबजलेले थिएटर्स, पॉपकॉर्न आणि समोस्यांचा दरवळ, कोल्डड्रिंक्सची फसफस, मित्रमैत्रिणींची हसण्याची खसखस … असे सगळे चैतन्य पुन्हा एकदा थिएटर्समध्ये परतेल. येत्या १५ ऑक्टोबर पासून, थिएटर्स सुरू होणार असल्याचे वृत्त आहे. सात महिन्यांच्या ब्रेकनंतर आपले लाडके बॉलीवूड पुन्हा एकदा त्याच्या मूळ ग्लॅमरसह परतणार आहे. थोडा खंड पडला असेल, नकारात्मकतेचा झाकोळ असेल, ड्रग्ज-आत्महत्येचा गुंता असेल तरी…पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त !
………….

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या