फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजस्त्री जन्मा तुझी हीच कहाणी....

स्त्री जन्मा तुझी हीच कहाणी….

Advertisements

बीडमधील स्त्री भ्रूण हत्यांचा मारेकरी डॉ.सुदाम मुंडेंचे कारनामे पुन्हा सुरु!

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता.७ सप्टेंबर: पुरोगामी महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यात २०१२ साली गाजलेल्या स्त्री भ्रूण हत्याकांडाच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. अतिशय सुनियोजित पद्धतीने डॉक्टरांच्या पेश्‍याला काळीमा फासणा-या जल्लाद डॉ.सुदाम मुंडे याचे थरारक कारनामे हे दररोजच्या वृत्तपत्रातील ठलक मथळे बनत होते.गर्भातले स्त्री भ्रूणच नव्हे तर पुरुष भ्रूण देखील या जल्लादाने जन्माला येण्यापूर्वीच ओरबडून काढले व गावाबाहेरील फॉर्म हाऊसमध्ये उपाशी जगंली कुत्र्यांना खाऊ घातले!

सांगताना ही किळस येईल,माणूस म्हणून या भूतळावर जगण्याची लाज वाटेल,अश्‍या कर्मांची जंत्री या डॉक्टर म्हणून घेणा-या कर्मदरिद्री माणसाच्या हिशेबात कायमची संचित झाली आहे. ‘पैसा हाच देव‘या लोभाला चटावलेल्या या नृशंस हत्येकरीला असंख्य कळ्या मातेच्या गर्भातच खूरडायची शिक्षा अद्याप मिळालीच नाही …!त्याचा वैद्यकीय व्यवसाय परवाना देखील २०२० पर्यंत प्रलंबित करण्यात आला होता.मात्र त्यापूर्वीच या नराधमाने आपल्या डॉक्टर मुलीच्या नावाने रुग्णालय उघडून पुन्हा गर्भातील कळ्या खुरडायचं कारस्थान सुरु ठेवलं.

नुकतेच या नराधमाला पुन्हा अटक करण्यात आली आहे. मुंडे हा जामिनावर बाहेर अाल्यानंतर आणि वैद्यकीय परवाना निलंबित असताना राजरोसपणे पुन्हा आपला वैद्यकीय व्यवसाय सुरु केला हाेता विशेष म्हणजे, त्याच्या रुग्णालयात करोनासदृश रुग्णांवरही उपचार सुरु होते!याशिवाय गर्भपातासाठी आवश्‍यक उपकरणेही सापडल्याचे प्रशासनाच्या कारवाईत निष्पन्न झाले.या प्रकरणात गुन्हा दाखल करुन त्याला पुन्हा अटक करण्यात आली.

डॉ.सुदाम मुंडे व त्याची पत्नी सरस्वती मुंडे यांनी अवैध हत्या करुन हजारो स्त्रीभ्रूण गर्भातच मारल्याचे उघडकीस आले.विशेष म्हणजे अनेक महिलांच्या गर्भात पुरुष भ्रुण असताना देखील स्त्री भ्रूण असल्याचे सांगून या नराधमाने फक्त पैसा कमवण्यासाठी भ्रूण हत्या केल्या.या प्रकणात त्यांना अटक झाली होती व दोघेही जामिनावर बाहेर आले.मुळात न्यायपालिकेने एवढ्या गंभीर व सराईत पांढरपेशी गुन्हेगाराला तर जामिन तर सोडा पॅरोल देखील नाकारायला हवी होती. सरळ फासावर लटकवले असते तर राज्यातील इतर डॉक्टर्सला धडकी भरली असती मात्र असे घडले नाही.

या माणसाचा चेहरा हा एखाद्या जल्लादापेक्षा ही क्रूर असा वाटतो.आईच्या गर्भातून कोवळे प्राण हिरावताना त्याचे हात लटपटत नाहीत,त्याचं काळीज चरकत नाही,रक्ताचा सडा त्याला त्याच्या ऑपरेशन थेटरमध्ये बघण्याचा आसुरी आनंद मिळतो.मात्र या पापात फक्त या डॉक्टरची चूक आहे का?समाजातील ते दाम्पत्यही तेवढेच गुन्हेगार आहेत ज्यांनी फक्त मुलाच्या हव्यासापायी आपल्या अंशाला या जल्लादाच्या सुपुर्द केले!दूर्देवाने या जल्लादाकडून गर्भपात करुन घेणा-या एकाही दाम्पत्याचा शोध घेऊन त्यांना शिक्षा झाली नाही.

पीसी-पीएनडीटीचा कायदा तर बनला मात्र तो प्रभावीपणे तेव्हाच राबविला गेला असता जेव्हा अश्‍या दाम्पत्यांनाही कठोर शिक्षा मिळाली असती.मूळात स्त्री किवा पुरुष भ्रूण निर्मित होणे ही फक्त आणि फक्त पुरुषाच्या गूणसूत्रातून ठरणारी जीवशास्त्रीय बाब आहे.निसर्गाने  पुरुष आणि स्त्री जन्म हा सर्वस्वी पुरुषांच्या गुणसूत्रांवर निर्भर केला आहे तर स्त्रीबीजमध्ये फक्त एक्स गुणसूत्रंच असतं. एक्स आणि एक्स यांचा संयाेग झाल्यास स्त्री भ्रूण तयार होतं तर एक्स आणि वाय यांच्या संयोगातून पुरुष भ्रूण तयार होतं. आज २१ साव्या शतकाच्या तिस-या दशकाच्या उंबरठ्यावरही जगातील पुरुषांना स्त्री किंवा पुरुष भ्रूणसाठी स्त्री जवाबदार नसून पुरुषच जवाबदार असतो,हे कळत नसेल तर ही या शतकातली फार मोठी शोकांतिका आहे.आजही खेडेगावात वारंवार मुलींना जन्म देण्यासाठी स्त्रीलाच जवाबदार धरले जाते.शहरातही परिस्थिती फारशी वेगळी नाहीच.यात पुढाकारही सासू नावाची एक स्त्रीच घेते,याची शेकडो उदाहरणे न्यायालयात प्रलंबित आहेत,हा वेगळ्या बातमीचा विषय होऊ शकतो. ग्रामीण भागात उदयास आलेली ’नकोशी’ही अघोरी संकल्पना देखील याच मानसिकतेतून खोलवर रुजली आहे.

२०१२ रोजी धारुर तालुक्यातील भोपा येथील विजयमाला महादेव पटेनकर या महिलेचा गर्भपातादरम्यान मृत्यू झाला.यानंतर या अघोरी विषयाला वाचा फूटली.मराठवाड्यासोबतच पश्‍चिम महाराष्ट्र,विदर्भ आणि सीमेलगतच्या राज्यातूनही गर्भपातासाठी या ठिकाणी लोक येत होते.जळगाव येथील डॉ.राहूल कोल्हे यांच्या रुग्णालयात सोनाग्राफी करण्यासाठी पाठविण्यात येत होते.याच घटनेतील एका प्रकरणात डॉ.मुंडे पती-पत्नीला चार वर्षांची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे.यानंतर पुन्हा आठ वर्षांनी मुंडे दाम्पत्याचे नाव समोर आल्याने या सर्व घटना ताज्या झाल्या.२०१० मध्ये स्टिंग ऑपरेशननंतर मुंडे हॉस्पीटलमधील सोनाग्राफी मशीन सील करण्यात आली होती.जून २०११ साली तेथे काही मृत भ्रूण सापडले!यानंतर सुदाम मुंडेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.अटकेनंतरही सुदाम मुंडेच्या पाशवी स्वभावात कोणतीही सुधारणा झाली नसून जामिनावर बाहेर येताच पुन्हा त्यांचा ‘पांढरपेशी रानटीपणा’सुरु झाला.महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात आणि संतांच्या पुण्यभूमीत हे घडतं,याचं जास्त दु:खं होतं.अश्‍या दानवांना फक्त फाशीच दिली गेली पाहीजे,असे लोकमत आहे.

मराठवाड्यातील बीड हा जिल्हा २०११ साली महाराष्ट्रातच नव्हे तर जगभर गाजला तो पांढरपेश्‍या डॉक्टरांनी कसाईप्रमाणे केलेल्या लाखो स्त्री भ्रूण हत्येच्या घटनांमुळे. याच सत्य घटनेवर आधारित एका तरुण दिग्दर्शकाने डॉ.अजित वाडीकर यांनी चित्रपट बनवण्याचं धाडस केलं,नुसतं धाडसच नाही केलं तर ते किळसवाणं,विदारक सत्य अतिशय प्रभावीपणे प्रेक्ष् कांपुढे मांडलं आणि…नागपूरकर प्रेक्ष् क हा चित्रपट बघून ‘स्तब्ध’झाला. या मराठी चित्रपटाचं नाव होतं ‘वाय’(WHY) म्हणजे का?कशासाठी?कोणासाठी?कशाला?असा त्यातून अर्थ ध्वनित होतो.या शिवाय ‘वाय’हा शब्द पुरुष च्या गुणसूत्रांना देखील संबोधित होतं,त्यामुळे या चित्रपटाचं शीर्षक आणखी गूढ होऊन बसतं!

ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप रविवार दि. ९ फेब्रुवारी २०२० रोजी झाला. दुपारी ४ वा. जसवंत आयनॉक्समधील स्क्रीन-२ वर हा चित्रपट दाखवण्यात आला. ‘सत्ताधीश’ने या चित्रपटाचे देखील समीक्ष् ण आपल्या वेब पोर्टलवर तेव्हा मांडले होते. या चित्रपटात मुख्य भूमिका करणारी अभिनेत्री मुक्ता बर्वे तसेच डॉक्टर पुरुषोत्तमची नकारात्मक भूमिका करणारे नंदू माधव हे प्रामुख्याने उपस्थित होते. हा चित्रपट अद्याप चित्रपटगृहात प्रदर्शित व्हायचा असून गोवा,पुणे यानंतर नागपूर चित्रपट महोत्सवात प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाचे कथानक हे मानवी संवेदनांना बोथट करुन जाणारे असून अडीच तासांचा हा चित्रपट बघताना डॉक्टरकी पेशाप्रति अतिशय घृणा दाटून येते. हा चित्रपट दिग्दर्शकाने मातेच्या गर्भातच प्राण असणारा,श्‍वास घेणारा मासाचा गाेळा म्हणजे‘ स्त्री भ्रूण’ ज्या निर्दयतेने खरडून काढून कुत्र्यांना खायला दिल्या गेले त्या अगणिक अर्भकांना समर्पित करण्यात आला आहे. भारतात जवळपास दीड कोटी स्त्री अर्भक या जन्मालाच आल्या नाहीत!

केंद्राने या घटनेनंतर वैद्यकीय क्ष्ेत्रासाठी जो कठोर पीसी-पीएनडीटी कायद्याची निर्मिती केली, त्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी वैद्यकीय क्ष्ेत्रातीलच काही डॉक्टरांची नियुक्ती केली.अशीच एक कर्तव्य कठोर वैद्यकीय अधिकारीच्या भूमिकेत सुप्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे आपल्याला पाहयला मिळते. या चित्रपटात देखील तिचा सहज, संयत अभिनय हा प्रेक्ष् कांना मनापासून भावतो. नाल्यात फेकलेले एक स्त्री अर्भक योगायोगाने तिच्यापर्यंत पोहोचतं आणि ती…तिलाच दत्तक घेऊन मोठं करते. एकीकडे जन्मदाते हेच स्त्री अर्भकाच्या अस्तित्वाचे वैरी बनले असताना ही वैद्यकीय अधिकारी त्या अर्भकाला नाव देते,ओळख देते,जीवन देते.

दुसरीकडे डॉ.पुरुषोत्तमसारखे नरभक्ष् क डॉक्टर्स असतात जे आपल्या पेशाला काळीमा फासतात फक्त पैशांच्या लालसेपोटी. स्त्रीच नव्हे तर बीडमध्ये अनेक डॉक्टर्सने पुरुष अर्भकाला देखील स्त्री भ्रूण सांगून पैसे लृटले. अनेक दृष्य हे सरळ अंगावर काटा उभा करतात. भ्रष्ट पोलीस,बेईमान नोकरशाही यांना तर कोणतीही शिक्षा २०११ पासून झालीच नाही मात्र ज्या लाखो जन्मादात्यांनी पैसे देऊन स्त्री अर्भकांचा खून केला त्या पैकी देखील एकालाही कायद्याद्वारे शिक्षा झालीच नाही हे आणखी एक फार मोठे दूर्देवच म्हणावे लागेल. फक्त सामाजिक किवा नैतिक नव्हे तर न्यायव्यवस्थेची आणि मानवतेची ही खूप मोठी ‘हार’असल्याची जाणीव हा चित्रपट करुन देण्यास यशस्वी होतो. ‘सोनोग्राफी मशीन सील करता येतात दृष्टिकाेण नाही’‘माझं दगडाचं काळीज झालं’ यासारखे संवाद सरळ अंगावरच येतात.

थोडक्यात ’स्त्री जन्मा तुझी हीच कहाणी….आंचल मे है दूध और आखो में है पाणी’एका शायरने म्हटलेले हेच कथन आजही भारतातील,जगातील स्त्रीवर सटीक बसतं,असेच दूर्देवाने म्हणावे लागेल.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या