फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजलातूरचे पत्रकार सोमवंशी यांची करोनाने एक्झीट!

लातूरचे पत्रकार सोमवंशी यांची करोनाने एक्झीट!

Advertisements

आर्थिकदृष्टया खासगी रुग्णालय परवडले नसल्याचे पत्र व्हायरल

नागपूर ता. ३० जुलै: आज महाराष्ट्राच्या पत्रकार जगतात लातूर ते नागपूर अशी सर्वदूर सोशल मिडीयावर एकच बातमी दिवसभर चर्चिली गेली ती म्हणजे लातूरचे पत्रकार गंगाधर सोमवंशी यांचं करोनाने झालेलं निधन.मृत्यूपूर्वी ज्यांना ज्या मरणयातना भोगाव्या लागल्या त्या अंगावर काटा आणणा-या आहेत,त्याही पेक्ष्ा महत्वाचे म्हणजे त्यांचे व्हायरल झालेले पत्र ज्यात त्यांना ७५ हजार रुपये खासगी रुग्णालयात जमा करता न आल्याने शासकीय रुग्णालयात उपचार घ्यावे लागले असल्याची व्यक्त केलेली खंत!

अर्थात शासकीय असो किवा खासगी दोन्हीकडे करोनावर चांगला उपचार जरी होत असला तरी सोमवंशी यांना ह्दयविकार तसेच मधूमेह असल्याने त्यांची खासगी रुग्णालयात उपचार करवून घेण्याची आंतरिक इच्छा असताना त्यांना शासकीय रुग्णालयात करोनामुळे मृत्यू पत्करावा लागला,याचीच हळहळ सोशल मिडीयावर उमटली होती.

सोमवंशी यांच्याकडे पैसे असते आणि त्यांना योग्य उपचार मिळाला असता तर त्यांच्यावर जग सोडायची वेळ आली नसती.एक पत्रकार हकनाक गेला,असा संतापही सोशल मिडीयावर उमटला. सोमवंशी यांना करोनाचा संसर्ग झाल्याचे लक्ष्ात आल्यानंतर त्यांनी काही खासगी रुग्णालयात दाखल होण्याचा प्रयत्न केला,मात्र आधी ७५ हजार रु.जमा करा नंतरच उपचार होतील असं त्यांना सांगण्यात आलं.शिवाय दररोज किमान ५ हजार रुपये लागणार असल्याचे सांगण्यात आले.

जिल्हा पातळीवरील दैनिकात बातमीदारी करणा-या सोमवंशी यांना ७५ हजार रु.जमा करता आले नाही,त्यामुळे त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल व्हावं लागलं.

तेथे त्यांची प्रचंड परवड झाली आणि काल बुधवारी त्यांचे निधन झाले.मृत्यू पूर्वी त्यांनी संपूर्ण व्यथा लिहून ठेवली.ते पत्र आता व्हायरल झाले आहे. हा व्यवस्थेचा,अनास्थेचा बळी असल्याचा संताप आता पत्रकार जगतात उमटला आहे.

मध्यंतरी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकाराचे करोनाने निधन झाल्यास त्याच्या कुटुंबियांना तातडीने मदत करण्याची घोषणा केली होती.त्या मदतीच्या निकषामध्ये सोमवंशी यांना मदत मिळणार का?असा सवाल आता विचारला जात आहे.जिल्ह्यातील प्रभावी पत्रकार संघाने देखील यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांना भेटून पत्रकारांनी करोना चाचणी करुन घेण्याची मागणी देखील पुढे आली आहे.

एक पत्रकार गेल्यानंतर रुक्ष् पणे श्रद्धांजलीचे चार शब्द टाईप करायचे व आपले इतिकर्तव्य संपल्याचे समाधान मिळवायचे अशी भूमिका घेऊन अाता चालणार नाही,आपणच आपली काळजी घेणे गरजेचे असल्याचा सूर सोशल मिडीयावर उमटला. प्रत्येक वेळी सरकारच्या नावाने बोटे मोडून देखील उपयोग नाही,आपण आपल्यासाठी काय करतो हे देखल तेवढेच महत्वाचे आहे,आपल्यालाही थोडं स्वार्थी व्हायला शिकावं लागेल, ते करताना जिल्हास्तरावरील यंत्रणांशी संपर्क साधून कोविड चाचण्या करुन घ्यावात जेणे करुन पुन्हा कुणा पत्रकाराला श्रद्धांजली वाहण्याची वेळ आपल्यावर येऊ नये,असे भावनिक आवाहन फेसबूकवर एस.एम.देशमुख यांनी केले.

सध्या वातावरणच गंभीर आहे. एक अस्वस्थता,एक बैचेनी आहे,पत्रकार हा प्रचंड दडपणात काम करीत आहे आणि म्हणून उद्वेगही आहे.एका पत्रकाराला फक्त पैश्‍यांअभावी मनासारखा उपचार करुन घेता आला नाही,हे खूप व्यथित करणारे आहे.आपल्या व्यवस्थेवर चाबूक ओढणारे असल्याची प्रतिक्रिया अभिजित देशमुख यांनी दिली आहे.

खासगी रुग्णालयांनी या वैश्‍विक महामारीच्या काळात नफाखोरीचा धंधा बंद करुन ’मोफत’नव्हे तर ’माफक’दरात उपचार करावा अशी आशा व्यक्त केली जात आहे.याकरिता प्रत्येक शहरातील व जिल्ह्यातील इंडियन मेडीकल असोसिएशने पुढाकार घेण्याचे आवाहन देखील मोठ्या प्रमाणात सोशल मिडीयावर करण्यात आले .या संकटकाळात एकमेकांना समजून घेऊन,सांभाळून घेतले तरच मानवतेचा मार्ग साधला जाऊ शकतो,असेच आता म्हणावे लागेल.

या जिगरबाज हाडाच्या पत्रकाराला ’सत्ताधीश’ची विनम्र श्रद्धांजली.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या