Homeब्रेकिंग न्यूजका उतरले आयुक्त रस्त्यावर?

का उतरले आयुक्त रस्त्यावर?


२८ ता.पासून शहरात कर्फ्यू!

नागपूर,ता. २० जुलै : सोमवारी आज महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे हे अखेर दूकानदारांना व नागपूर शहरातील नागरिकांना समज द्यायला आणि दंडात्मक कारवाई करायला रस्त्यावर उतरले. शहरात दररोज बाधितांचा आकडा हा चिंताजनकरित्या वाढत असून याची संपूर्ण जवाबदारी ही व्यापारी,दूकानदार व नागरिकांचीच असून शासनाच्या दिशा निर्देशांचे पालन न केल्यानेच काल पासून महापौर संदीप जोशी तर आजपासून आयुक्त हे रस्त्यावर उतरल्याचे चित्र जनता बघत आहे.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार कोरोनाचा संसर्ग वाढत असण्याचे कारण, व्यापारी व दूकानदारांच्या, एकाच दिवसात अनेक ग्राहक संपर्कात येत अाहेत. यामुळेच दररोज बाधितांचा आलेख हा सतत चढता असल्याचा अहवाल आयुक्तांना प्राप्त झाला.त्यातूनच संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी कठोर लॉक डाऊनच्या मानसिकतेपर्यंत आयुक्तांची तयारी पोहोचली. ‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत १ जून पासून अनलॉक-१ होताच,तीन महिन्यांपासून व्यापार उद्दीम बंद करुन घरात बसलेले उद्योजक,दूकानदार यांनी तीन महिन्यात झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी जूण कंबर कसली आहे.

त्यातही प्रशासनाच्या निर्देशाप्रमाणे एक दिवसा आड दूकान सुरु करण्याची परवानगी मिळाली,या शिवाय ‘ऑड-इवन’ फॉर्मूला लादण्यात आला.एका दिवशी एकाच ओळीतील पाच दूकाने सुरु ठेवली जात आहे,त्यातही वेळेचे कठोर बंधन घालण्यात आले,परिणामी गेल्या तीन महिन्यात ‘बुडालेले नुकसान’भरुन काढण्यासाठी व्यापारी आणि दूकानदार हे ’कोरोना’च्या भीतीला पार विसरले म्हणूनच दूकानदारांपासून किंवा दूकानदारांपर्यंत झपाट्याने संसर्गित होणा-या कोरोनाला थांबविण्यासाठी आयुक्त रस्त्यावर उतरले असल्याची माहिती समोर आली आहे.

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज बाजारपेठांचा आकस्मिक दौरा केला. झांशी राणी चौक ते आनंद टॉकीज दरम्यानच्या रस्त्यावरील बाजारामध्ये नियमांचे पालन होत आहे अथवा नाही, याची त्यांनी शहानिशा केली. नियम मोडणाऱ्या दुकानांमध्ये स्वत: जाऊन दुकानदारांची कानउघाडणी केली. ज्या दुकानांतील कर्मचारी अथवा येणारा ग्राहक मास्कचा वापर करताना आढळला नाही, त्यांच्यावरही दंड आकारण्याचे निर्देश दिले. मनपाच्या अधिकाऱ्यांनी अशा नियम मोडणाऱ्या दुकानदारांवर तात्काळ दंडात्मक कारवाई केली.
यानंतर बर्डी, कॉटन मार्केट परिसर, सुभाष रोड, चिटणवीस पार्क, शिवाजी पुतळा ते गांधीसागरदरम्यानच्या मार्गावरील बाजारात फिरून नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. या मार्गावर मोठ्या प्रमाणात हॉकर्स फुटपाथवर बसलेले आढळले. हॉकर्सला सध्या दुकान थाटण्याची परवानगी नसतानाही ते कसे काय दुकान थाटून बसले, याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. अशा हॉकर्सवरही यावेळी कारवाई करण्यात आली.

सिल्वर पॅलेसमधील संगणक विक्रेता दूकानदार आढळला आज कोरोनाबाधित-

धंतोली ही कॉम्प्यूटर सामानाच्या विक्रीचा हब समजल्या जाते.आज सोमवारी येथील सिल्वहर पॅलॅस इमारतीतील एक सुप्रसिद्ध संगणक विक्री दूकानाचा मालक हा कोरोना पॉझिटीव्ह आढळला! परिणामी या दूकानदाराकडून शहरातील किती नागरिकांना आणि कोणत्या कोणत्या भागातील ग्राहकांपर्यंत कोरोना पाेहोचला असेल याची काळजी प्रशासनाला पडली आहे. महत्वाचे म्हणजे या व्यक्तिीची पत्नी ही दररोज सिल्वर पॅलेसमधील फ्लॅटमध्ये आपल्या आजारी भावाला दररोजचा नाश्‍ता व जेवण देण्यासाठी येत होत्या. हा भाऊ आजारी असून एकटाच फ्लॅटमध्ये राहत असल्याचे सांगितले जात आहे. या संगणक विक्रेत्याचे घर धंतोलीमध्येच पत्रकार भवन समोरील गल्लीत अाहे,याचा अर्थ उद्या पत्रकार भवन समोरील गल्ली प्रतिबंधित होईल व सिल्वर पॅलेसमधील त्यांच्या पत्नीचा भाऊ कोरोना पॉझिटीव्ह निघाल्यास सिल्वर पॅलेसमधील ’सुनीता पान अँड ज्यूस सेंटरची’ गल्ली देखील सील केली जाईल.विशेष म्हणजे याच गल्लीच कॉम्यूटरची होलसेल आठ ते दहा दूकाने आहेत. सिल्वर पॅलेसमधील ‘त्या’ कोरोनाबाधित दूकान मालकाकडे संगणकाची सामग्री न पटल्यास अनेक ग्राहक त्याच्या संपर्कात आल्यानंतर या सर्व जवळ-जवळ असणा-या अनेक होलसेल दूकानांमध्येही फिरले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

२८ पासून कर्फ्यू!
शहरातील याच परिस्थितीचा संपूर्ण अदमास घेतल्यानंतर आयुक्तांनी कडक लॉक डाऊनची मनशा बाजूला सारुन आता शहरात कर्फ्यू लावण्याचा मानस बनविल्याचे सांगितले जात आहे.अर्थात पालकमंत्री नितीन राऊत यांनी जनतेला, प्रशासनाच्या कोणत्याही निर्णयाची माहिती ही आधीच दिली जाईल, जेणेकरुन ते जिवनावश्‍यक सामग्री घरात भरुन ठेऊ शकतील,असा दिलासा दिला आहे.
खरेदीच्या वेळी होणा-या गर्दीचे काय?

देशात पहीला लॉक डाऊन हा २३ मार्चपासून घोषित झाल्याबरोबर नागपूर शहरातील नागरिकांनी भाजीपाला विकत घेण्यासाठी कॉटन मार्केटमध्ये धाव घेतली होती. रात्री ८ वा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉक डाऊनची घोषणा केली होती आणि नागपूरकरांनी रात्रीच्या १२ वाजेपर्यंत कॉटन मार्केटमध्ये प्रचंड गर्दी करुन भाजीपाला विकत घेतला होता. जणू भाजीपाला आता कधी मिळणारच नाही,एवढी अनागोंदी माजली होती.गर्दी इतकी प्रचंड होती की अनेकांच्या भाजीच्या पिशव्याही चोरीला गेल्या.

तशीच परिस्थिती या पंधरा दिवसांच्या कर्फ्यूच्या घोषणेनंतर उद् भवू शकते असा अदमास आहे. लोकं जिवनावश्‍यक वस्तूंच्या साठ्यासाठी, खरेदीसाठी प्रचंड गर्दी करतील कारण विक्रीची वेळ आयुक्तांनी ’ठराविक’च ठेवलेली आहे.अश्‍यावेळी कोराेनापासून बचावासाठी प्रशासन कोणती खबरदारीची उपाययोजना करणार आहेत?असा प्रश्‍न उपस्थित होतो.

श्रावण सुरु,सणांची रेलचेल-
श्रावण महिना येत्या दोन दिवसांनंतर सुरु होणारअसून नागपंचमी, राखी पोर्णिमा, कानोबा,गौरी-गणपतीसारखे धार्मिक सणांची रेलचेल याच महिन्यात असते. अश्‍यावेळी शहरात कर्फ्यू लागल्यास भाविकांची प्रचंड घालमेल होणार असून भाजीपाला किवा अनेक बाबींची साठवणूक करणे अशक्य बाब ठरणार आहे.

लॉक डाऊननंतर सगळं चांगलं होईल का?-
अनेक व्यापारी व दूकानदारांशी खास ‘सत्ताधीश’ने या विषयावर संवाद साधल्यावर त्यांनी लॉक डाऊननंतर सगळं चांगलं होईल का?असा प्रतिप्रश्‍न केला. प्रशासनाला संसर्गाची साखळी खंडीत करायची आहे,प्रशासनाकडे याशिवाय दूसरी उपाययोजना नाही,सगळं मान्य,मात्र यानंतर ते पुन्हा पंधरा दिवसांचा,पुढे पुन्हा पंधरा दिवसांचा…असेच लॉक डाऊन वाढवत राहतील,अशी आम्हाला शंका आहे.
नुकताच आम्ही हजारो रुपयांचा माल दूकानात भरला. आता कुठे व्यवसाय हळूहळू रुळावर येत असताना पुन्हा कडक लॉक डाऊन किंवा कर्फ्यू लावल्यास होणा-या आर्थिक नुकसानाला कोण जवाबदार राहील? सणांचे दिवस बघून मी आताच २२ हजारांचे १५ पोती नारळ दूकानात भरले, दूकानच बंद राहील तर मी ते विकू कसे?मनपा आयुक्त माझ्या नारळांचे पैसे देणार आहे का?गरीबांच्या जीवावर कोरोना उठला तसे प्रशासनही उठले…!आमचा कोणीच वाली नाही..!

मार्केटमध्ये वाद वाढले-
कोरानाच्या भीतीने मार्केटमध्ये गर्दीच्या ठिकाणी वाद ही वाढलेले दिसतात आहेत. गर्दीमध्ये कोणाचा धक्का ही लागला तर एकमेकांवर लोकं ओरडत आहेत. कोरोनाची भीती सर्वांनाच आहे,शहरातील सगळेच लाेकं तीन महिन्यांच्या बंदिस्त जीवनानंतर‘आनंददायी भ्रमंतीसाठी’ किवा फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडले नाहीत तर त्यांच्याकडे कोराेनाची भीती विसरुन घराबाहेर पडल्याशिवाय मार्गच उपलब्ध नसल्याने ते बाहेर पडत असल्याचे अनेकांनी सांगितले.

कळमन्यात लावली अखेर शिस्त-
कळमना मार्केटमध्ये अनलॉक-१नंतर प्रचंड गर्दी वाढली होती. या ठिकाणी कोरोनाच्या भीतीचे अस्तित्वच जाणवत नव्हते,एवढी प्रचंड गर्दी दररोज लोटत होती. अखेर प्रशासनाने कडक पावले उचलत एका दलालाकडे फक्त दोनच गाड्या व १०० ग्राहक,असा नियम राबविण्यास सुरुवात केली.त्यामुळे आज कळमन्याचे चित्र जरा वेगळे पहायला मिळाले.

भाज्या व जिन्नस आणखी होणार महाग-
कळमन्याला अशी शिस्त लावून प्रशासनाने कोरोनाला तर आटोक्यात आणले मात्र शहरातील ग्राहकांवर महागाईचा बोजा आणखी वाढवला. कारण एका दलालाकडे दोनच गाड्यामधील माल उतरणार याचा अर्थ शहरातील इतर भागात मालही कमी प्रमाणात पोहोचणार,परिणामी ’मागणी आणि पुरवठा’यांचे सूत्र बिघडणार व त्याचा परिणाम भाजीपाला व इतर जिन्नस आणखी महागात विकल्या जाण्यावर होणार.शेवटी याचा भुर्दंड पुन्हा सर्वसामान्य नागरिकांच्या खिश्‍यालाच बसणार. आधीच पेट्रोलचे दर वाढले,शाळेवाले मुलांच्या फीसाठी तकादा लावत अाहेत, वीज मंत्री यांनी अगदी ‘जिव्हाळ्यातून’ ग्राहकांना तीन महिन्यांचे भरमसाठ विज बिल पाठवले,बँकेचे हप्ते तुंबले,बँका थांबायला,ऐकायला तयार नाहीत, वरुन भाडेकरु कडून घरभाडे घेऊ नये या सारख्या मानवीय निर्णयांची मार झेलता झेलता सामान्य माणूस अगदी मेताकुटीला आला आहे.तीन महीन्यांच्या लॉक डाऊनच्या काळात लाखो लोकांच्या नोक-या गेल्या. एका मॅकनिकच्या दूकानात काम करणा-याने लॉक डाऊन पुन्हा लावल्यास जीवाचे बरे वाईट करेल असा इशारा दिला!उरले सुरले पोलीसवाले किवा मनपाचे सुरक्ष्ा रक्षक दंड वसूलीतून काढून घेतात!

नियम पाळा अन्यथा कारवाई : आयुक्त तुकाराम मुंढे
‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत लॉकडाऊनमध्ये दिलेली शिथिलता ही नागरिकांच्या भल्यासाठी आणि दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू राहावे, यासाठी आहे. मात्र, हे करताना शासनाच्या दिशानिर्देशांचे पालन करणेही आवश्यक आहे. तसे होत नसल्याचे वाढत्या रुग्णसंख्येवरून लक्षात येत आहे. नागरिकांनी सर्व नियमांचे पालन करावे अन्यथा नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला.

Latest बातम्या