Advertisements

तेल अवीव येथे पाककला व सांस्कृतिक आदानप्रदानासाठी विष्णू मनोहरांना विशेष आमंत्रण
नागपूर,ता.१४ ऑक्टोबर २०२६: भारतीय पाककला संस्कृतीचे जतन, संवर्धन आणि जागतिक स्तरावर प्रसार करण्यासाठी उल्लेखनीय योगदान देणारे नागपूरचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांना इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने विशेष आमंत्रित केले आहे.
नोव्हेंबर महिन्यात तेल अवीव येथे आयोजित करण्यात येणाऱ्या ‘क्युरेटेड कलिनरी अँड कल्चरल एंगेजमेंट’ या पाककला व सांस्कृतिक आदानप्रदानविषयक विशेष परिसंवादात ते भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या प्रतिष्ठित कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलेल्या भारतातील केवळ दोन शेफमध्ये त्यांचा समावेश आहे. ही बाब भारतीय पाककला क्षेत्रासाठी गौरवास्पद आहे.
तेल अवीव येथे होणाऱ्या आगामी परिसंवादाच्या माध्यमातून भारतीय खाद्यसंस्कृती, पारंपरिक पाककला आणि तिच्याशी निगडित सांस्कृतिक वारसा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडण्याची संधी त्यांना मिळणार आहे. भारतीय पाककलेची समृद्ध परंपरा जागतिक समुदायापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने त्यांची ही निवड महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
गेल्या चार दशकांपासून पाककला क्षेत्रात कार्यरत असलेल्या शेफ विष्णू मनोहर यांनी आपल्या प्रतिभेच्या आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या बळावर जागतिक स्तरावर स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांनी आतापर्यंत ५५ पुस्तके लिहिली असून, ५,००० हून अधिक पाककला कार्यक्रम सादर केले आहेत. पारंपरिक भारतीय खाद्यसंस्कृतीचा इतिहास, तिचे वैविध्य आणि सांस्कृतिक महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले आहे. पाककलेतील त्यांच्या अनोख्या प्रयोगांची आणि उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत त्यांच्या नावावर ३५ जागतिक विक्रम नोंदवले गेले आहेत.
समाजसेवा आणि शिक्षण क्षेत्रातही योगदान-
पाककलेसोबतच समाजसेवा, शिक्षण आणि खाद्यसंस्कृतीच्या संवर्धनासाठीही शेफ विष्णू मनोहर सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या योगदानाबद्दल अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील सांता क्लारा काउंटीने त्यांचा गौरव केला आहे. तसेच, त्यांना ‘विदर्भ भूषण’ पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. सध्या ते एमजीएम विद्यापीठ, संभाजीनगर येथे प्रोफेसर एमेरिटस म्हणून कार्यरत आहेत.
भारतातील बालकांचे कुपोषण आणि भूक दूर करण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या अमेरिकास्थित जागतिक स्वयंसेवी संस्था ‘शेअर अवर स्ट्रेंथ’च्या उपक्रमांमध्येही ते सक्रिय योगदान देत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनातून आणि सहभागातून आतापर्यंत भारतात चार कोटींहून अधिक भोजनांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे त्यांनी जनमानसात विशेष स्थान निर्माण केले आहे.
महाराष्ट्राच्या समृद्ध खाद्यपरंपरेचे दस्तऐवजीकरण करण्याच्या कार्यातही शेफ विष्णू मनोहर यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. महाराष्ट्र शासनासाठी तयार करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र खाद्यसंस्कृती कोश’ या महत्त्वपूर्ण उपक्रमात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.
अमेरिकेच्या महावाणिज्यदुतांकडूनही विशेष प्रशंसा-
शेफ विष्णू मनोहर यांच्या पाककलेची आणि भारतीय खाद्यसंस्कृतीच्या आदरातिथ्यपूर्ण परंपरेची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आली आहे. मुंबईतील अमेरिकेचे तत्कालीन महावाणिज्यदूत एडगार्ड डी. कॅगन यांनी १ मार्च २०१८ रोजी शेफ विष्णू मनोहर यांना पत्र पाठवून नागपुरातील ‘विष्णुजी की रसोई’ येथे मिळालेल्या आदरातिथ्याबद्दल विशेष आभार व्यक्त केले होते. या पत्रात त्यांनी अस्सल महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतल्याचा आनंद व्यक्त करत झुणका-भाकर, वांग्याची भाजी आणि सावजी खाद्यपदार्थांचा विशेष उल्लेख केला होता.
भारतीय खाद्यसंस्कृतीचा जागतिक स्तरावर प्रसार-
अनेक नामवंत आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वांसाठी खास पाककला अनुभव साकारण्याचा अनुभव शेफ विष्णू मनोहर यांना आहे. भारतासह अमेरिकेतही त्यांची ब्रँडेड रेस्टॉरंट्स आहेत. त्यांच्या पाककलेतील प्रयोगशीलता, भारतीय खाद्यपरंपरेविषयीची बांधिलकी आणि सामाजिक योगदानाची दखल भारतासह अमेरिकेतील माध्यमांनीही घेतली आहे.
पत्रकार परिषदेला विष्णू मनोहर यांनी संबोधित केले. यावेळी सचिन जहागिरदार, विजय जत्थे, मिलिंद देशकर, प्रवीण मनोहर, प्रफुल्ल मनोहर यांची उपस्थिती होती.
…………………………………….