नगरसेवक अभिजित झा यांनी स्थगन प्रस्तावात घातला नागपूकरांच्या काळजाला हात
नागपूर,ता.१० ऑगस्ट २०२६: सध्या संपूर्ण नागपूरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील महत्वाकांक्षी अमृत-२ योजनेचे काम सुरु असून, हा प्रकल्प राबविणा-या एका खासगी कंपनीने संपूर्ण शहराचा सत्यानाश करुन ठेवला असल्याचा घणाघात, आज सोमवार दिनांक १० ऑगस्ट रोजी नियोजन भवनात पार पडलेल्या मनपाच्या सर्वसाधारण सभेत मांडलेल्या स्थगन प्रस्तावात, काँग्रेसचे नगरसेवक अभिजित झा यांनी केला.संपूर्ण जगात इतक्या ‘निकृष्ट’ आणि ‘निष्क़ाळजी’कामाचे दुसरे उदाहरण शोधून ही सापडणार नसल्याचा दावा त्यांनी केला.
माझ्या स्वत:च्या प्रभागात गेल्या तीन महिन्यांपासून या योजनेसाठी कंपनीने रस्ते खोदून ठेवले असून, वरुन काम बंद करुन ठेवले!दादाधाम ते रवि नगर वसाहत,सी पी क्लब पासून तर अगदी मुख्यमंत्री निवासस्थान असलेल्या रामगिरीपर्यंत हीच अवस्था आहे.दररोज नागरिकांचे अपघात होत आहेत.दुचाकीस्वार घसरुन पडत आहेत,जखमी होत आहेत मात्र,या कंपनीला याचे कोणतेही सोयरसूतक नाही.मुख्यमंत्र्यांच्या रामगिरीपासून अवघ्या २०० मीटर,मनपा आयुक्तांच्या लॉ कॉलेज चौकातील बंगल्यापासून अवघ्या २०० मीटर,आज ज्या नियाेजन भवनात ही सभा होत आहे तिथून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर धोकादायकरितीने खोदलेल्या रस्त्यांची हीच अवस्था आहे,असे झा म्हणाले.

याहून गंभीर बाब म्हणजे,संबंधित मनपाचे विभागीय अधिकारी वारंवार या कंपनीच्या एकूण कारभाराबाबत दिशाभूल करीत आहेत.त्यांचे दावे व आजची जीपीएस छायाचित्रे त्यांच्या खोट्या दाव्यांची साक्ष असल्याचे झा यांनी सांगितले.मी एकूण ५२ वेळा संबंधित अधिकारी व नागपूरात अमृत-२ योजना राबविणा-या खासगी कंपनीच्या अधिका-यांना या संबंधी तक्रारी दिल्या मात्र,ना कंपनीचे ना मनपाच्या अधिका-यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करण्याचे सौजन्य दाखवले.
कंपनीच्या अधिका-याने हे नक्कीच मान्य केले अतिशय निकृष्ट दर्जाचे काम झाले असून रस्ते खोदल्यानंतर ते पूर्ववतही करण्यात आले नाहीत.मात्र,यासोबतच ते शहरातील आमदार व मोठ्या नेत्यांचे नाव घेऊन सांगतात ’उनसे पूछ लिजिए मेरे बारे में….!’
कालच केंद्रीय मंत्री व नागपूर शहराचे खासदार नितीन गडकरी यांनी नाग नदी प्रकल्पासाठी घेतलेल्या बैठकीत अश्या कंपन्यांना सज्जड दम देत,नाग नदी प्रकल्पासाठी खोदण्यात येणा-या रस्त्यांसाठी जर असे निकृष्ट काम झाले किंवा रस्ते पूर्ववत करण्यात कसूर केली तर अश्या कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्यात येइल व संबंधित अधिका-यांवर जबाबदारी निश्चित केली जाईल,असा इशारा दिला आहे.मला त्यांच्या या भूमिकेमुळे आनंद झाला असल्याचे अभिजित झा म्हणाले.
अमृत-२ सारख्या अनेक योजना मनपा शहरात राबविते,चूका आम्ही करतो भोगून देतात मात्र नागपूरकर.त्यामुळेच प्रभाग क्र.१४ मध्ये या कंपनीने जे अतिशय निकृष्ट काम केले त्या कामांची तात्काळ चौकशी करावी व कारवाई करण्याची मागणी आपल्या स्थगन प्रस्तावात अभिजित झा यांनी केली.
विरोधी पक्ष नेते संजय महाकाळकर यांनी देखील विविध प्रकल्प राबविणा-या कंपन्यांनी,कंत्राटदारांनी रस्ते खोदल्यानंतर त्यांचे पूर्नभरण व्यवस्थित केले नसल्यास त्यांच्या सुरक्षा ठेवी गोठवून ठेवण्याची मागणी केली.अमृत-२ योजनेचे काम ज्या कंपनीला देण्यात आले त्यांनी अतिशय बोगस काम केले असून त्यांच्या अधिका-यांनी प्रत्यक्ष पाहणी न करता वातानुकुलीन कक्षात बसून रेषा ओढल्याचा आरोप त्यांनी केला.अमृत-२ च्या कामावर मनपा प्रशासनाचे नियंत्रणच नाही.कंपनीने शहराच्या विकासासाठी दिलेला आराखडा ही तपासून पाहण्याची तसदी घेण्यात आली नाही.आराखडा तपासला नाही,याला कोणता अधिकारी जबाबदार आहे?हे प्रशासनाने सांगावे.
महापौर नीता ठाकरे यांनी शहरावर अन्याय होऊ द्यायचा नाही असा निर्धार व्यक्त केला.प्रशासनाने ज्या कंपनीला काम दिले त्या कंपनीच्या मूळ मालकाला घेऊन संबंधित अधिका-याने येत्या चार दिवसात बैठक घेण्याचे आदेश महापौरांनी दिले.
यावर महाक़ाळकर यांनी,कपंनी शहरभर राबवित असलेल्या चुकीच्या आराखड्यावर काम सुरु असल्याचे सांगत याचे अनेक व्हिडीयोज आहेत मात्र,साधे झोनचे अधिकारी ही अनेक तक्रारी देऊन सुद्धा ते पाहत नाहीत,कामाचा दर्जा तपासून बघत नाही,कंपनी कुठलीही असो कपंनीला भुगतान करण्यात येऊ नये,अशी मागणी केली.
सत्ता पक्ष नेते बाल्या बोरकर यांनी देखील,कोणीही येते व रस्ता खोदून जात असल्याची तक्रार केली.सध्या एमएसईबी भूमिगत केबल टाकण्यासाठी शहरभर रस्ते खोदत आहे.एक किलोमीटर रस्ता खोदण्याची परवानगी घेऊन दोन किलोमीटर रस्ते खोदले जात आहेत.नियमबाह्य कामांची तपासणी करण्यासाठी भरारी पथक बनवल्यास यातून मनपाला देखील दंडाच्या स्वरुपात आय प्राप्त होईल.खाेदकाम केल्यानंतर ते पूर्ववत करण्यासाठी संबंधित कंपनीकडूनच खर्च घेण्यात यावा.रस्ते खोदण्याची परवागनी देणारा विभाग,हॉट मिक्स विभाग यासोबतच नगरसेवकाला याची माहिती देण्यात यावी नेमका त्यांच्या प्रभागात कुठला रस्ता कोणत्या कामासाठी खोदला जात आहे.कोण खोदत आहे,अशी मागणी त्यांनी केली.
यानंतर महापौरांनी आयुक्तांना सूचना केली सर्व झोनच्या सहायक आयुक्तांकडे जबाबदारी द्यावी.अमृत योजनेसह ज्या प्रकल्पासाठी शहराचे रस्ते खोदले जात आहेत त्याची माहिती मनपा प्रशासनाकडे असायलाच हवी,असे महापौर म्हणाल्या.
यावर स्थायी समिती अध्यक्ष शिवाणी दाणी यांनी अर्थ संकल्पात ज्या डक्टींग पॉलिसीचे समायोजन करण्यात आले आहे त्या कामांची गती वाढवण्याची मागणी केली.
अभिजित झा यांनी तीन महिन्यांच्या पाठपुराव्यानंतरही संबंधित कंपनीचे व मनपाचे अधिकारी तक्रारीतील खोदलेल्या रस्त्यांना प्रत्यक्ष भेट देत नाहीत त्यांच्यावर काय कारवाई होणार?याची माहिती विचारली.
बाल्या बोरकर यांनी सध्या शहरात एका कपंनीला काम मिळाल्यानंतर ते तीन ते चार उपकंपन्यांना किंवा कंत्राटदारांना कामाचे वाटप करुन टाकतात,अशी माहिती दिली.
यावर महापौरांनी शहर विद्रुप होऊ नये यासाठी मनपा आयुक्तांनी नियम अधिक कठोर करण्याची सूचना केली. कोणत्याही कंपनीला खोदकामांचा निश्चित कालावधी आखून द्यावा.तीन-तीन महिने मनपाचे अधिकारी तक्रारींची दखल घेत नसल्यास ही गंभीर बाब आहे.यानंतर आपल्या कर्तव्यात हलगर्जी करणा-याला,काम पूर्ण झाले अशी खोटी दिशाभूल करणा-या अधिका-यांवर मनपा आयुक्तांनी येत्या आठ दिवसात कठोर कारवाई करण्याची सूचना महापौरांनी केली.
सध्या शहरात सुरु असलेल्या अमृत-२ योजनेचे काम अभि इंजिनिअरिंग कंपनी करीत असून पूर्वी देखील विविध टप्प्यातील सिमेंट काँक्रिट रस्त्यांच्या बांधकामांचे कंत्राट याच कंपनीला मिळाले आहे हे विशेष.सिमेंट काँक्रिट रस्त्यांच्या बांधकामात देखील अनेक त्रुटी असून या संबंधीची जनहित याचिकाच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल झाली आहे ज्यावर सुनावणी सुरु आहे.निकृष्ट आणि दोषपूर्ण रस्त्यांच्या बांधकामांमुळे आता पर्यंत अनेक अपघातात अनेक नागपूरकरांनी हकनाक आपला जीव गमावला आहे.घरातून कामासाठी बाहेर पडल्यानंतर सुखरुप ते आपल्या कुटूंबात जिवंत परतलेच नाही.त्यामुळे देखील या कंपनीवर जनप्रतिनिधींसह अनेक बुद्धीजीवींचा रोष असलेला आढळून येतो.
…………………………………………………….