Homeराजकारणधर्मेंद्र प्रधान आणि पेपर लीक माफियाचे संबंध काय?

धर्मेंद्र प्रधान आणि पेपर लीक माफियाचे संबंध काय?

Advertisements

काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ.शमा मोहम्मद यांचा सवाल

नागपूर,२५ जून २०२६ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सरकार जेव्हा पासून केंद्रात आली तेव्हा पासून बिहार,मध्यप्रदेश,गुजरात,राजस्थान अश्‍या भारतीय जनता पक्षाची सरकार असलेल्या राज्यातच मोठ्या प्रमाणात पेपर फूटीच्या घटना घडल्या. मूळात लोकशाही देशात सरकारचे आपल्या जनतेप्रती उत्तरदायित्व असते,जनतेच्या प्रश्‍नांना सरकारला उत्तर देणे लोकशाहीमध्ये अभिप्रेत असते मात्र,मोदी शासन काळात देशात लोकतंत्र उरलं आहे का? ‘न्यूज लाॅन्ड्री’च्या अहवालानुसार मागील १० वर्षात आपल्या देशात ७९ वेळा पेपर फूटीच्या घटना घडल्या आहेत,त्यामुळेच आमचा प्रश्‍न आहे,केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेद्र प्रधान व पेपर लीक माफियांमध्ये काही संबंध आहे का?असा सवाल काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ.शमा मोहम्मद यांनी आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.

याप्रसंगी बोलताना,त्या म्हणाल्या,की मागील १० वर्षात ७९ वेळा पेपर फुटीच्या घटनांमुळे देशातील ६ कोटी ५ लाख विद्यार्थी भरडल्या गेले.हा काही लहान आकडा नाही.नुकतेच ’नीट’पेपर फूटीची घटना घडली,त्यामुळे ही परिक्षाच रद्द करण्यात आली,यामुळे देशातील १९ विद्यार्थ्यांनी नैराश्‍यातून आत्महत्या केली.त्यांच्या मृत्यूला कोणीच जबाबदार नाही का?

याच अहवालात स्पष्ट केले आहे की,एकूण ४८ परिक्षा या दुबार घेण्यात आल्या.२२ परिक्षा तर रद्दच करण्यात आल्या.देशातील विद्यार्थी यांच्या विषयी या सरकारला कोणतीही संवेदनशीलता आहे का?‘नीट’ची परिक्षा ३ मे २०२६ रोजी झाली आणि १२ मे रोजी शिक्षण मंत्र्यांनी ती एका आदेशात रद्द केली.मी स्वत: डॉक्टर आहे.वैद्यकीय प्रवेशासाठी ‘नीट’ची परिक्षेतील काठीण्य मला माहिती आहे.परिक्षा संपल्याबरोबर प्रत्येक विद्यार्थी हा त्याला तिन्ही पैकी कोणत्या विषयात किती गुण मिळतील याची खूप आशेनी आकडेमोड करीत असतात.मात्र,धर्मेंद्र प्रधान यांनी एका झटक्यात देशातील २५ लाखांच्या वर विद्यार्थ्यांची आशा ‘नीट’ची परिक्षा रद्द करुन धुळीला मिळवली,इतकंच नव्हे तर फर्मान सोडले,आणखी एक वेळा परिक्षा द्या!यातून लाखो विद्यार्थी तनावात आले की दुबार परिक्षा ही आणखी जास्त कठीण असेल,त्यात यश मिळेल का?यातून अनेक विद्यार्थ्यांनी नैराश्‍यातून आत्महत्या केली.

सीबीआयने १५ मे रोजी पुण्यामध्ये अश्‍या आरोपीला अटक केली जी ’नीट’मधील रसायनशास्त्र(केमेस्ट्री)च्या पेपर सेटिंगमधील सदस्य होती!प्रक्रियातील या ढिसाळपणाला परिक्षा प्रक्रिया पार पाडणारी नॅशनल टेस्टिंग एजन्सी( एनटीए) आणि पर्यायाने केंद्रीय शिक्षण मंत्री जबाबदार नाहीत का?एनटीए शासनाचा एक भाग कसा?असा सवाल त्यांनी केला.देशाच्या विद्यार्थ्यांसाठी वारंवार अपयशाची साखळी ठरलेल्या एनटीएला बंद करा,अशी मागणी त्यांनी केली.

२०२४ मध्ये संसदीय स्थायी समितीने महिला व यूथ विषयीच्या दिलेल्या अहवालात देखील एनटीए वर गंभीर प्रतिक्रिया दिल्या होत्या.एनटीएने २०२४ मध्ये १४ परिक्षा घेतल्या त्यातील ५ परिक्षांमध्ये गंभीर त्रुट्या आढळल्या.ही बाब धर्मेंद्र प्रधनांना माहिती होती. तेव्हाच एनटीएला बाहरेचा रस्ता दाखवून चौकशीसाठी समिती गठीत का नाही केली?‘नीट’रद्द करुन विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची वाट बघण्यात आली का?असा खोचक सवाल याप्रसंगी शमा मोहम्मद यांनी केला.

आमचे नेते राहूल गांधी यांना या निष्पाप विद्यार्थ्यांच्या मृत्यूमुळे अतीव दु:खं झाले.त्यांच्याच नेतृत्वात आम्ही देशभर,’छात्रो की गुंज’हा उपक्रम राबवित आहोत.आमचे ध्येय हे मोदी व त्यांची सरकार विद्यार्थ्यांप्रति किती निर्लज्ज व असंवेदनशील आहे हे जनतेला दाखवायचे असल्याचे त्या म्हणाल्या.
२०१४ पूर्वी काँग्रेसची सरकार देशात असताना कोणत्याही केंद्रीय मंत्र्यांवर विरोधक आरोप करीत होते तेव्हा-तेव्हा आमच्या मंत्र्यांनी राजीनामा दिला,मग ते रेल्वे मंत्री असो किंवा इतर कोणीही.आमचे मंत्री जनतेप्रती झालेल्या चुकांचंी जबाबदारी घेत होते.मोदी काळात तर रोहित वेमूलाचा जीव जातो मात्र,स्मृति इराणी राजीनामा देत नाही.रेल्वेच्या इतक्या दूर्घटना झाल्या मात्र रेल मंत्री अश्‍विनी बैस राजीनामा देत नाही, जगभर गाजणा-या एपस्टीन फाईल्समध्ये नाव आल्यानंतर देखील पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी राजीनामा देत नाही मात्र,ब्रिटेनचे पंतप्रधान किअर स्टारमर यांनी नुकताच २२ जून रोजी पदाचा राजीनामा दिला कारण त्यांना माहिती असूनही ते अमेरिकाचा राजदूत म्हणून एपस्टीन फाईल्स मध्ये नाव आलेल्या पीटर मँडेलसन याची नेमणूक करतात.अर्थात पक्षांतर्गत असंतोष व तेथील स्थानिक निवडणूकीतील पराभव हे देखील मुद्दे होतेच.आपल्याकडे पठाणकोट, पुरी,पुलवामा,पहलगामसारख्या असंख्य दहशतवादी घटना घडूनसुद्धा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नैतिकता स्वीकारुन राजीनामा देत नाही,असा टोला त्यांनी हाणला.
काँग्रेसची ही मागणी आहे,धर्मेंद्र प्रधानांनंी देशातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची जबाबदारी स्वीकारत तात्काळ राजीनामा द्यावा.
केंद्रीयस्तरावरील परिक्षांसाठी नवीन व्यवस्था तयार करा जेणे करुन पेपर फुटीला चाप बसेल.आज देशातील १९ विद्यार्थी ,‘मम्मी पप्पा..मला माफ करा’म्हणून जग सोडून निघून गेले तरी देखील धर्मेंद्र प्रधान मात्र पदावरच आहेत!
‘नीट’पेपर फूटीतील आरोपींनी एकेका विद्यार्थ्याकडून ४०-४० लाख रुपये घेतल्याचे वास्तव समोर आले आहे,या माफियांचा संबंध कोणाकोणाशी आहे?याची चौकशी झाली पाहिजे.देशात असे डॉक्टर्स घडवणार का?मी स्वत: एक डॉक्टर आहे.मला याचे गांर्भीर्य माहिती आहे.एक ही चुकीचे इंजेक्शन रुग्णाचा जीव घेऊ शकतात.युपीएसीच्या परिक्षेत देखील हाच घोळ समोर आला.कोण पेपर फूटीतून पैसे कमवित आहे?पंतप्रधान मोदी हे तर यावर एक अवाक्षर ही बोलत नाहीत.ते तर देशातील प्रश्‍नांवर सदैव‘मौन‘असतात मात्र,इतर देशात जातात तर तेथील प्रश्‍नांवर भरभरुन बोलतात’संवेदनशीलता’व्यक्त करतात,असा टोला त्यांनी हाणला.
मोदी यांनी देशातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येवर एक शब्दाने तरी खेद व्यक्त केला का?त्यांच्या पालकांप्रति स्वत:ची संवेदनशीलता व्यक्त केली का? इजराईल,अमेरिका,व्हेनेजुएला किंवा यूकेच्या घटनांवर ते संवेदनशीलता व्यक्त करताना दिसून पडतात.हे कसले पंतप्रधान देशाला आज लाभले आहे?
त्यांनी तात्काळ धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेऊन निष्पक्ष चौकशी करावी.हीच आमची मागणी आहे.काँग्रेस पक्षाला पारदर्शिता हवी आहे,याच हेतूने आम्ही ‘माहितीचा अधिकार’आाणला.मात्र,त्यातही मोदी सरकारने या कायद्याची गळचेपी करणा-या अनेक दुरुस्त्या केल्या!त्यांना पारदर्शक कारभार नाही पाहिजे,हे याचे आणखी एक उदाहरण असल्याचा आरोप त्यांनी केला.
मध्यप्रदेशातील राज्यसभेच्या तीन जागांसाठी काँग्रेसकडून नामांकन भरताना मीनाक्षी नटराजन यांचा नामांकन अर्ज फेटाळण्यात आला,न्यायालयाकडूनही त्यांना दिलासा मिळाला नाही कारण त्यांनी नामांकन अर्जात त्यांच्यावरील दाखल गुन्ह्यांची माहिती लपवली,याकडे लक्ष वेधले असता,आजची पत्रकार परिषद ही फक्त ‘नीट’च्या मुद्दावर असून काँग्रेसला मुद्दा भटकावच्या नाही,असे म्हणून यावर उत्तर देण्याचे शमा मोहम्मद यांनी टाळले.
एनसीआरटीच्या पुस्तकात ९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी आता देशातील काँग्रेसकाळातील आपातकाल यावरील धडा समाविष्ट केला जात असल्यावर प्रश्‍न केला असता,त्यांचा अजेंडाच फक्त काँग्रेस विरोध असल्याचे त्या म्हणाल्या.हा देश लोकशाहीवर चालणारा देश असून आम्हाला आमचे लोकतंत्र परत हवे असल्याचे त्या म्हणाल्या.
पत्रकार परिषदेत काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रफूल्ल गुडधे पाटील,मुख्य प्रवक्ता अतुल लोंढे,मनपातील विराेधी पक्ष नेते संजय महाकाळकार,काँग्रेसचे स्वीकृत सदस्य अतुल कोटेचा,सरचिटणीस संदेश सिंगलकर आदी उपस्थित होते.
…………………………….

Latest बातम्या