पत्रकार परिषदेत ‘WHE THE PEOPLE ‘संस्थेचे विश्वस्त प्रमोद भागचंदानी यांचा गंभीर आरोप
पोलिस विभागातील तिघे हे घरचे भेदी!पत्रकाराला पुरवतात आतील माहिती!
नागपूर,ता.१८ मे २०२६: नागपूरातील ‘लोकमत समाचार’ या हिंदी वृत्तपत्राचे क्राईम बिट सांभाळणारे वरिष्ठ पत्रकार जगदीश जोशी यांनी पत्रकारितेच्या नावाखाली कोट्यावधीची माया कमावली असून,वाठोडा येथील कोट्यावधीचा बंगला,नैनिताल येथील मालमत्ता तसेच नागपूरातील शेतजमीनींसह अनेक फ्लॅट्स व भूखंडांची केंद्रीय व राज्यातील तपास संस्थांनी चौकशी करावी,अशी मागणी आज पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ‘WHE THE PEOPLE ‘संस्थेचे विश्वस्त प्रमोद भागचंदानी यांनी केली.
खंडणीतून बक्कळ पैसा कमविण्यासाठी हा पत्रकार राज्य आणि केंद्र सरकारी अधिकाऱ्यांच्या उच्च पदांच्या नावाचा वापर करीत असल्याचा आरोप याप्रसंगी भागचंदानी यांनी केला. जगदीश जोशी याच्यावर कठोर कारवाई करून भ्रष्टाचाराच्या पैशातून खरेदी केलेली संपूर्ण मालमत्ता व कुटुंबीयांच्या नावावर बँकेत गुंतवणूक केलेली रक्कम जप्त करावी,अशी मागणी त्यांनी केली, लोकमतसारख्या नामांकित वृत्तपत्रात जगदीश जोशी हे गेल्या २० वर्षांपासून ‘लोकमत समाचार’ या वृत्तपत्रात गुन्हेगारी वार्ताहर आहेत. ते मूळचे नैनितालचे असले तरी, गेल्या ३० वर्षांपासून ते आपल्या कुटुंबासह नागपूरात राहत आहेत. त्यांचे वडील इतवारीमध्ये चहा विकायचे, पण आता गेल्या १५ वर्षांपासून ते त्यांच्या वाठोडा येथील आलिशान बंगल्यात राहत आहेत. एका पत्रकाराची ही आर्थिक गगनझेप अनाकलनीय असल्याचे ते म्हणाले.
माझ्या माहितीनुसार, लोकमत समाचारमध्ये क्राईम रिपोर्टर म्हणून त्याचा मासिक पगार ४० ते ५० हजारांच्या दरम्यान असावा, सध्या त्याचा पगाराचा पॅकेज ६ लाख असायला हवा.मात्र,काही वर्षांपूर्वी त्याने नागपूरमधील मोक्याच्या ठिकाणी ३-४ फ्लॅट्स आणि २-३ भूखंड खरेदी केले आहेत. त्याने नैनितालमध्ये एक हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरू केले आहे. तसेच त्याने आपल्या भावासाठी लोकमत बिल्डिंगमध्ये मोबाइलचे एक दुकान खरेदी केले आहे. जोशी याची नागपूरमध्ये शेतजमीनही आहे, परंतु आयकर ताळेबंदात यापैकी कोणत्याही मालमत्तेचा उल्लेख नाही,असा गंभीर व धक्कादायक आरोप याप्रसंगी भागचंदानी यांनी केला.
पत्रकार जगदीश जोशी याने वाठोडामध्ये एवढी मोठी मालमत्ता कशी खरेदी केली आणि एक भव्य बंगला कसा बांधला ? तसेच त्याच्याकडे आलिशान गाड्या आहेत, ते विमानाने प्रवास करतात, त्यांची मुलगी मुंबईतील एका नामांकित कॉलेजमध्ये शिकत आहे, जिथे सामान्य माणसाची मुलगी शिकू शकत नाही.एवढी आर्थि सुबत्ता एका पत्रकाराकडे आली कुठून? त्यामुळे जगदीश जोशी यांच्याकडे एवढा खर्च, जमिनीची खरेदी करण्यासाठी एवढा पैसा येतो कूठून,याची चौकशी करण्यासाठी मी केंद्रीय तसेच राज्य स्तरावरील सर्व तपास संस्थेसह प्रशासकीय विभागाला तसेच राज्याचे मुख्यमंत्री यांना देखील निवेदन पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत बाेलताना भागचंदानी म्हणाले की, पत्रकार जगदीश जोशी यांना दर महिन्याला एक निश्चित खंडणी मिळते! जे त्याला पान मटेरियल, गुटका असोसिएशन, क्रिकेट सट्टा असोसिएशन, सुपारी व्यापारी संघटना, आरटीओ विभाग, हवाला व्यापारी, तेल भेसळ करणारे व्यापारी, एमडी ड्रग्स व्यापारी, गांजा व्यापारी आणि दारू संघटनेकडून मिळतो,असा खळबळजनक आरोप त्यांनी केला.
ही निश्चित मासिक रक्कम या पत्रकाराला २०१७ पासून मिळत आहे, ज्यासाठी त्याने एक करार केला आहे की तो असे गैरप्रकार करणा-यांच्या विरोधात वर्तमानपत्रांमध्ये लिहिणार नाही. कोरोना नंतरही हे स्पष्ट झाले.गेल्या ७ वर्षांपासून या पत्रकाराने वर नमूद केलेल्या विभागांविरुद्ध काहीही लिहिलेले नाही, जे तो पूर्वी लिहायचा. पत्रकारिता आणि ती ही लोकमतसारख्या वृत्तपत्रात,यामुळे त्याने स्वतःची अशी प्रतिमा तयार केली आहे की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,सरसंघचालक, न्यायालयाचे न्यायाधीश यांच्या सोबतच नागपूरचे सीपी, सह सीपी, डीसीपी क्राईम नागपूर, सीबीआय अधीक्षक नागपूर, उपसंचालक अंमलबजावणी संचालक उपविभाग नागपूर यांच्याशी त्याचे चांगले आणि थेट संबंध आहेत. त्याने बाजारात अशा प्रकारची प्रतिष्ठा आणि प्रतिमा निर्माण केली आहे, याचाच फायदा घेत गैरप्रकार करणारे,भेसळ करणारे,सट्टा लावणारे,क्रिकेट बुकी आदींसोबत त्याने आपले आर्थिक हितसंबंध निर्माण केले. यांच्यामार्फत महिनाकाठी तो बक्कळ खंडणी गोळा करत आहे,असा खळबळजनक आरोप याप्रसंगी भागचंदानी यांनी केला.
महत्वाचे म्हणजे पोलीस खात्यात त्याचे तीन दलाल आहेत जे या पत्रकारासाठी काम करतात व जगदीश जोशी याच्याशी अनेक वर्षांपासून ते प्रामाणिक आहेत. ते त्याला पोलीस खात्यातील गुप्त आणि गोपनीय माहिती पुरवत आहेत, ज्यामध्ये नागपूरमधील सर्व मोठ्या अधिकाऱ्यांची आणि सर्व पोलीस ठाण्यांची माहिती समाविष्ट असते. त्यांची नावे देखील पत्रकार परिषदेत भागचंदाानी यांनी विशद केली.हे तिन्ही लोक पोलीस खात्याकडून पगार घेतात आणि जगदीश जोशी यांच्यासाठी काम करतात,असा धक्कादायक आरोप पत्रकार परिषदेत भागचंदानी यांनी केला.मात्र,पोलिस खात्यातील पोलिसांवरील आरोपांबाबत त्यांच्याकडे पुरावे आहेत का?अशी विचारणा केली असता,पुरावे नसल्याचे सांगत,ते शोधण्याचे काम पोलिसांचे आणि प्रशासनाचे असल्याचे ते म्हणाले.मी पत्रकार परिषदेत केलेल्या तिन्ही पोलिसांवरील आरोपांची चौकशी पोलिस खात्याने करावी,अशी पुश्तीही त्यांनी जोडली.
अलीकडेच जगदीश जोशीने नागपूर पोलीस आयुक्त आणि गुन्हे शाखेचे डीसीपी यांच्या नावाने सुपारी मार्केटमधून वसुली सुरू केली आहे. यासाठी तो दरमहा १५ लाख रुपये घेत आहेत. हे करताना हा पत्रकार, नमूद केलेल्या दोन्ही अधिकाऱ्यांशी आपले चांगले संबंध असून ते सुपारी मार्केटला कोणताही त्रास देणार नाहीत, असे आश्वासन देत आहेत,असा खळबळजनक आरोपही भागचंदानी केला.
यामुळेच नागपूरात जनतेच्या जीवावर उदार झालेले प्रचंड गैरव्यवहार व गुन्हेगारी घडत असतानासुद्धा गेल्या ७ ते ८ वर्षांपासून या क्राईम रिपोर्टरने वर नमूद केलेल्या विभागांविरुद्ध काहीही लिहिलेले नाही हे स्पष्टपणे दिसून येते,
याहून महत्वाचे म्हणजे,लोकमत प्रेस व्यवस्थापनाने गेल्या १५ वर्षांपासून, प्रचंड भ्रष्टाचार करूनही या पत्रकाराची साधी चौकशीही न करता, त्याला शिक्षा का केली नाही.?असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
या पार्श्वभूमीवर मी मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस,राज्याचे पोलिस महासंचालक, नागपूरचे पोलिस आयुक्त,लोकमत समाचार या हिंदी आवृत्तीचे सर्वेसर्वा राजेंद्र दर्डा,राज्याचे मुख्य सचिव,उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार,नागपूरचे पोलिस उपायुक्त,लोकमत समुहाचे संचालक विजय दर्डा,आयकर विभागाचे प्रमुख यांना निवेदन पाठवले असून,मुख्यमंत्री यांच्यासह या सर्व विभागांना मी विनंती करतो की, जगदीश जोशी याच्यावर कठोर कारवाई करावी आणि त्याने भ्रष्टाचाराच्या पैशातून खरेदी केलेली मालमत्ता तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर बँकेत गुंतवलेले भ्रष्टाचाराचे पैसे परत मिळवावेत,अशी मागणी भागचंदानी यांनी केली.
याबाबत पत्रकार जगदीश जोशी यांच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता,सातत्याने कॉल व्यस्त असल्याने संपर्क होऊ शकला नाही.
……………………………………………..
Advertisements
