अल्पसंख्यांक आयोगाने वेळेवर दखल घेतली नसती तर दंगल
निश्चित:प्यारे खान यांचा दावा
नवनीत राणा यांच्या ‘रिल‘ने हिंदूंनाच आणले असते धोक्यात!पत्रकार परिषदेत केला खुलासा
नागपूर,ता.१७ एप्रिल २०२६: अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण करण्याची संतापजनक घटना परतवाडा-अचलपूर भागात घडली.या घटनेतील मुख्य आरोपी १९ वर्षीय अयान अहमद याला पोलिसांनी अटक केली मात्र,या घटनेकडे आता हिंदू-मुस्लिम दृष्टिकोणातून बघितले जात असून, भाजप नेत्या व अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी,या घटनेतील सर्व पिडीत या हिंदू धर्मिय असून यात एक ही बुरखाधारी नसल्याचा आरोप केला होता,यावर परतवाडा-अचलपूर लैंगिक शोषणमधील घटनेत एक ही हिंदू पिडीत नसनू सर्व आठही पिडीता या मुस्लिम धर्मिय असल्याचे राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
याप्रसंगी त्यांनी नवनीत राणांवर कठोर प्रहार करीत,नवनीत राणा यांना हिंदू-मुस्लिम दंगली घडवून आणायचा होत्या यामुळेच त्यांनी ‘रिल’व्हायरल केली,असा आरोप केला.अल्पसंख्यांक आयोगाने आपले एक विशेष पथक परतवाडा येथे पाठवले होते.अमरावतीचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी दिलेल्या माहितीनुसार पिडीतांमध्ये एक ही हिंदू मुलगी नसल्याचे प्यारे खान यांनी सांगितले.अशी अफवा पसरवणारा नेता कितीही मोठा असला तरी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचा इशारा याप्रसंगी प्यारे खान यांनी दिला.नवनीत राणा या फक्त स्वत:च्या राजकारणासाठी पराचा कावळा करीत असल्याची टिका करीत,पिडीतांमध्ये सर्वाधिक मुली या अल्पवयीन असून नवनीत राणा यांच्यावर पोस्को अंतर्गत कारवाई करण्याची मागणी पिडीतांच्या कुटूंबियांकडून माझ्याकडे आली असल्याचे त्यांनी सांगितले.
तातडीने घटनास्थळी पोहोचून पत्रकार परिषद घेऊन मी जनतेला आवाहन केल्यामुळे हिंदू-मुस्लिम दंगल घडली नाही अन्यथा राणा यांच्या विधानानंतर अशी दंगल घडण्याची संपूर्ण शक्यता निर्माण झाली होती ज्यामध्ये हिंदू तरुणच हे अडचणीत आले असते,असा दावा त्यांनी केला.त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले असते,त्यांचे जीवन बर्बाद झाले असते,राणा यांच्या कुटूंबाचे कोणतेही नुकसान झाले नसते,दंगल घडवायचीच होती तर राणा यांचे कुटूंबिय सर्वात आधी पुढे आले असते का,असा संताप याप्रसंगी प्यारे खान यांनी व्यक्त केला.
राणा यांच्या विरोधात थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शहा,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आयोग पत्र लिहून तातडीने राणा यांची हकालपट्टी करण्याची तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाणार असल्याचे ते म्हणाले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ’सबका साथ,सबका विकास,सबका विश्वास और सबके लिये प्रयास’हा नारा दिला,त्यांच्या किंवा गडकरी,फडणवीस तसेच सरसंघचालक मोहन भागवत यांच्या तोंडून कधीही देश तोडण्याची भाषा व धर्माधर्मात तेढ निर्माण करण्याची भाषा ऐकू आली नाही.त्यांचे प्रयत्न हे सर्व धर्मांना जोडून विकासाचे राजकारण करण्याचा असतो.अगदी २०४७ च्या विकासाचेही व्हीजन त्यांच्याकडे आहे,फडणवीस हे महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी चोवीस तास आणि वर्षाचे ३६५ दिवस परिश्रम घेत आहेत,महाराष्ट्राला सशक्त बनवण्यासाठी अहोरात्र प्रयत्नरत आहेत,दूसरीकडे नवनीत राणा या पक्षाची छवि खराब करीत आहेत,नवनीत राणांनी फडणवीस,गडकरींसारखे काम करुन दाखवावे,असे आव्हान करीत,हिंदू समाजामध्ये दंगली घडवून ,हिंदूना अडचणीत आणूनच त्यांना राजकारणात मोठे व्हायचे आहे का?असा प्रश्न त्यांनी केला.
राणांचे असे गलिच्छ राजकारण स्वीकारले जाऊ शकत नाही,त्यांनी विकासाची कामे करुनच हिंदू धर्मियांमध्ये मोठे व्हावे.दंगली घडवून आणनारा एक ही नेता भारतीय जनता पक्षात मोठा झाल्याचे उदाहरण सापडत नसल्याचा टोला त्यांनी हाणला.ज्यांना असं वाटतं की असे गचिल्छ राजकारण केल्याने त्यांना भाजपमध्ये संधी मिळेल ती चुकीची समजूत असून, भाजपमध्ये अशा विचारधारेच्या नेत्यांना मुळीच जागा नसल्याचे त्यांनी सांगितले.
पाच वर्षांपूर्वीही परतवाडा-अचलपूरमध्ये हिंदू-मुस्लिम दंगल घडली होती.नवनीत राणा यांनी अचलपूर-परतवाडा लैंगिक शोषण या गुन्ह्याची संधी साधून ज्या पद्धतीने स्वत:ची ‘रिल’व्हायरल केली,त्या मागील हेतू फक्त आणि फक्त हिंदू-मुस्लिम दंगली घडवणे हाच होता.त्यांच्यासारख्या नेत्यानी किमान ‘सत्य’घटनेवर तरी रिल बनवायला हवी होती,आम्ही त्यांच्यासोबत असतो.त्यांनी हे लक्षात ठेवावे की कोणीही चुकीच्या अफवाह पसरवून धार्मिक दंगल उफाळण्यासाठी कारणीभूत ठरतील तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कठोर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही मग गुन्हेगार हे हिंदू असो किंवा मुस्लिम.
हा तोच महाराष्ट्र आहे ज्यात फडणवीस गृहमंत्री असून त्यांच्याच पक्षाच्या नेत्यावर नितेश राणेवर देखील एफआयआर दाखल होऊ शकली.महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे,राजेशाही नाही हे नवनीत राणांनी लक्षात ठेवावे,अश्या शब्दात प्यारे खान यांनी नवनीत राणांना ठनकावले.एक टक्काही सत्यता नसल्याची रिल नवनीत राणा यांनी कॅमरा समोर उभे राहून बनवली, किमान सत्यता असलेली तरी त्यांनी रिल बनवायला हवी होती,अश्या कृतीतून हिंदू समाजाचा विकास होणार का?त्यांच्या कृतीतून हिंदू समाजाचा केवळ विनाशच होईल,असा संताप प्यारे खान यांनी व्यक्त केला.
नवनीत राणांच्या मुस्लिमांनी पाकिस्तानला जाण्याबाबत वक्तव्याचाही प्यारे खान यांनी चांगलाच समाचार घेतला.राणा यांना जायचे असल्यास त्यांनी पाकिस्तानला जावे,या देशातील मुस्लिम या देशाला आपला मानतो,या देशात मुसलमान हा स्वत:ला सुरक्षीत समजतो.आजचा मुसलमान हा सक्षम झाला आहे, त्यामुळे नवनीत राणांनी असले बयाण देणे बंद करावे,असा इशारा त्यांनी दिला.नवनीत राणा यांची सगळी कृती ही भाजपच्या विकासाला ब्रेक लावण्यासाठीच असल्याची टिका करीत राणा यांनी घटनास्थळीच्या कोणत्या पोलीस ठाण्यात जाऊन विचारपूस केली?कोणत्या पोलीस अधिका-यांना त्या भेटल्या?किती पिडीतांना त्या भेटल्या?त्यांच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले?
मी पण आज पत्रकार परिषदेते जे बोलत आहे,सांगत आहे ते शासकीय प्रशासनाच्या अहवालातून सांगत आहे त्यामुळे ताे अधिकृत आहे,रिल स्टंट नाही.अल्पसंख्यांक आयोगाची जी विशेष चमू घटनास्थळी गेली होती,त्यांच्या सर्वेक्षणातून राज्य अल्पसंख्यांक आयोगाने एक अहवाल तयार केला असून तो मुख्यमंत्री व केंद्रीयस्तरावर पाठवला जाईल.याच अहवालात एकूण आठ पिडीता या सगळ्या मुस्लिम समुदायातील असून यातील सहा मुलींची छायाचित्रे व दोघींचे अश्लील व्हिडीयो व्हायरल झाली आहेत.त्या परतवाडा व अचलपूर येथील असून त्यातील एक नागपूरची आहे.राणा यांनी केलेल्या १८० पिडीत मुलींचा आकडा आणला कुठून?असा सवाल प्यारे खान यांनी केला.
मुख्य आरोपी अयान अहमद व त्याच्या तीन मित्रांद्वारे अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हीडीयो व छायाचित्रे समाज माध्यमांवर व्हायरल केल्यानंतर पोलीसांनी त्यांना जेरबंद केले. या घटनेनंतर अचलपूर नगर परिषदेचे पथक बुधवारी जेसीबी आणि बुलडोजर घेऊन अयान अहमद याच्या घरासमोर दाखल झाले.घराचे सर्वेक्षण केल्यानंतर काही भाग हा अतिक्रमित असल्याचे समोर आल्याने ,नोटीस बजावल्यानंतर बुलडोजर कारवाई करुन घराच्या बाजूला अतिक्रमण करुन निर्माण करण्यात आलेला लोखंडी जिना आणि अतिक्रमित बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले.या बुलडोजर कारवाईकडे तुम्ही कसे बघता?असा प्रश्न केला असता,अतिक्रमण तोडण्यासंबंधीची कारवाई हे स्थानिक प्रशासनाचे काम आहे.ते अतिक्रमण अधिकृत आहे की अनाधिकृत हे प्रशासन ठरवत असतो,अल्पसंख्यांक आयोग यात हस्तक्षेप करीत नाही,असे उत्तर त्यांनी दिले.
मुंबई येथील मुंब्रा शहरातील नगरसेविका सहर शेखवर खोट्या कागदपत्रांच्या आधारावर जात प्रमाणपत्र सादर करुन निवडणूक लढवण्याचा आराेप होत आहे,यासाठी सहर शेखला नोटीस पाठवण्यात आली आहे,मुस्लिम धर्मियांमध्ये तर जात नसतेच मग या घटनेकडे कसे बघता?असा सवाल केला असता ,आपल्याकडे न्याय व्यवस्था व कायदे आहेत त्यानुसारच कारवाई होत असते.कोणत्याही समाजाचा किंवा धर्माचा व्यक्ति असू देत त्याला या देशाच्या कायदानुसारच काम करने गरजेचे आहे.कोणी हिंदू आहे म्हणून त्याच्यावर कारवाई होणार नाही किंवा कोणी मुस्लिम आहे तर त्याच्यावर कारवाई होऊ नये,असं या देशात घडत नाही,जे कायद्यात आहे,तेच सर्वांवर लागू आहे,असे उत्तर त्यांनी दिले.
(बातमीशी संबंधित व्हिडीयो sattadheesh official युट्यूब चॅनलवर उपलब्ध)
Advertisements
