विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्ष पदी अवाङ्मयीन रबर स्टॅम नकोच
डॉ.श्रीपाद भालचंद्र जोशींचे गडकरींना खुले पत्र
नागपूर,ता.२३ जानेवरी २०२६: विदर्भ साहित्य संघाच्या होवू घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भात आपल्या नावाचा गैरवापर होत असल्याचे व आपण एका अवाङ्मयीन राजकीय नेतृत्व असलेल्या व विदर्भ साहित्य संघात कधीही सक्रिय नसलेल्या एका सदस्याला सरळ संस्थेच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितले असा समज तथाकथीत उमेदवाराच्याच वतीनं पसरविण्यात येत आहे,ते कृपया आपल्या निदर्शनास आणून देत आहे.असे गिरीश गांधी यांचे नाव न घेता ज्येष्ठ साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ.श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लिहलेल्या खुल्या पत्रात ‘परखड’ आगपाखड केली.
अश्याप्रकारे आपल्या नावाचा वापर होणे,होऊ देणे हे माझ्यासारख्या या संस्थेत सुमारे तीस वर्ष उपाध्यक्ष राहिलेल्या, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा अध्यक्ष राहिलेल्या व आपण कधीच या संस्थेत तोवर असा हस्तक्षेप केल्याचा अनुभव नसलेल्यासाठी फारच क्लेशदायक आहे.
आपण विदर्भ साहित्य संघाच्या कार्यासाठी आम्हाला निरपेक्ष भावनेनेच यथोचित सहकार्य नेहमीच केल्याचा आमचा अनुभव असल्याने असे काही ऐकले तरी आम्हाला ते विश्वसनीय वाटत नाही.म्हणूनच थेट आपणास संपर्क साधून यात कितपत तथ्य आहे याची खात्री करून घेण्यासाठी कृपया हे पत्र लिहित आहे.
यात खरोखरच तथ्य असेल तर मात्र ते जनमानसात सुस्थापित आपल्या प्रतिमेला देखील बाधक ठरणारे आहे.त्यामुळे तसे काही असल्यास कृपया आपण त्याचा विदर्भ साहित्य संघ या शंभर वर्षांची वाङ्मयीन परंपरा असलेल्या संस्थेच्या हितासाठी पुनर्विचार करावा व या संस्थेच्या अध्यक्षपदी वाङ्मयीन प्रतिष्ठा, प्रतिमा सुस्थापित असणारी, दिशादर्शक व्यक्तिमत्त्व असणारीच वाङ्मयीन व्यक्तीच असावी असा आग्रह धरावा अशी विनंती आहे.या विनंतीचा कृपया सकारात्मक विचार करण्याचे आवाहन त्यांनी केले.
आपल्या नावाचा असा वापर होण्यावर एका प्रमुख दैनिकाच्या संपादकांच्या स्तंभ लेखनातून उमटलेली तीव्र संतापजनक प्रतिक्रिया तसेच दुसऱ्या एका दैनिकातून देखील उमटलेली तशीच प्रतिक्रिया या दोन्ही तद्वतच ‘सत्ताधीश’ या ऑनलाइन न्यूज वेबसाईटवर उमटलेली तीव्र प्रतिक्रिया हे सारे कृपया आपल्या अवलोकनार्थ सोबत पाठवत आहे.ते कृपया थोडी सवड काढून आपण गांभीर्याने स्वतः बघावे अशी विनंती आहे.
विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीत सदस्यांनी अभूतपूर्व उत्साहाने भाग घेतला ही आनंदाची बाब आहे.ही जशी ऐतिहासिक घटना प्रथमच घडते आहे तसेच त्याचवेळी विदर्भ साहित्य संघांच्या विद्यमान कार्यकारी मंडळातील सदस्यांपैकी, त्यांच्या अपेक्षेप्रमाणे संस्था गेली पाच वर्षे चालवली गेली नाही या नाराजीमुळे या निवडणुकीत विद्यमान अध्यक्षाच्या नेतृत्वाखाली आपली उमेदवारी देण्याचे मोठ्या संख्येने नाकारणे व एका सदस्याने दुसऱ्या पॅनेलमधून उमेदवार म्हणून उभे राहण्याचा निर्णय घेतला,असे मोठ्या संख्येने कार्यकारी मंडळ सदस्यांनी या मार्गाने आपली नाराजी, विद्यमान अध्यक्ष, सरचिटणीस यांच्या स्वकेंद्रित कार्यपद्धतीबाबत असंतोष व्यक्त करणे ही देखील घटना प्रथमच घडते आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर सदस्यांची निवडणुकीत उमेदवारी जाहीर होणे ही विद्यमान अध्यक्ष, पदाधिकारी यांनी संस्था सदस्यांपासून जी पूर्णपणे तोडली व स्वकेंद्रित केली त्याची प्रतिक्रिया आहे.
तसेच संस्थेच्या अध्यक्षपदासाठी,संस्थेत कधीच सक्रिय नसलेल्या,अवाङ्मयीन,राजकारणी व्यक्तीने आपल्याला चक्क नितीन गडकरी यांनी उमेदवारी जाहीर करण्यास सांगितल्याचे जे पसरवले तसेच या द्वारे नितीन गडकरी यांनी संस्थेत हस्तक्षेप करण्याचे आवाहन देखील करत संस्थेचा जो राजकीय आखाडा करण्याचा प्रयत्न केला ते देखील या संस्थेच्या १०० वर्षाच्या इतिहासात प्रथमच घडले आहे.
कसलाही विधिनिषेध न बाळगता विदर्भ साहित्य संघ आपल्या बाजूने खेचण्यासाठी एकीकडे संस्थेचे वाङ्मयीन नेतृत्व करण्यास अक्षम आणि असमर्थ असलेले व साडेतीन वर्षांत आपले कोणतेही कर्तृत्व सिद्ध न करू शकलेले व आयत्या मिळालेल्या अध्यक्षपदाचा संस्थेच्या कार्य विस्तारासाठी,शाखा विस्तार ,शाखांचे पुनरूज्जीवन,सदस्यांशी संवाद,शाखांशी संवाद,संस्थेचे कार्य समर्थपणे पुढे नेणे या बाबत कोणतीही प्रभावी उपाययोजना न करू शकलेले, सदस्यांचा विश्वास कमावण्यात असमर्थ,अक्षम ठरलेले ,कल्पकताशून्य विद्यमान अध्यक्ष व त्यांचे चार दोन समर्थक पुनः जे प्रयत्न अध्यक्षस्थानी तेच असण्यासाठी करत आहेत व दुसरीकडे संस्था राजकारण्यांच्या दावणीला बांधण्यासाठी जे पुढे सरसावले आहेत,त्याचीही संतापजनक प्रतिक्रिया याचा विरोध म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणावर सदस्यांनी अध्यक्ष व कार्यकारी मंडळ सदस्य पदांसाठी अर्ज प्रथमच भरले जाणे यातून उमटली आहे.
एका प्रख्यात दैनिकाने तर ‘ गांधी, तुम्ही सुद्धा ‘ शीर्षकाने आपल्या ‘ लोकजागर’ या स्तंभात, या प्रकारावर सडकून टीका केली आहे.या अवाङ्मयीन राजकीय नेतृत्वाने शंभर वर्षे वयाच्या या साहित्य संस्थेच्या अध्यक्षपदाची अभिलाषा बाळगणे व त्यांना अध्यक्षपदी बघणे सदस्यांना मुळीच नको आहे.
लोकवाहिनी या दैनिकातून अविनाश पाठक यांनी देखील तेच सांगितले आहे.
लोकांच्या या भावनेचा आदर करून त्यांनी खरे तर तातडीने आपली उमेदवारी मागे घेणे अथवा आपण त्यांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितले असल्यास आता तो त्वरीत मागे घेण्यास सांगणे हेच संस्थेच्या व त्यांचीही अन्य क्षेत्रातील आजवरची प्रतिमा यथायोग्यरित्या सुरक्षित राखण्यासाठी आवश्यक आहे ही त्यांच्या हितचिंतकांचीही भावना आहे.
ती लाथाडून ते आपली उमेदवारी कायमच ठेवणार असतील तर,प्रतिक्रिया त्यांना तसे करायला सांगणारे नितीन गडकरी आहेत असे जे तेच सांगताहेत, त्या नितीन गडकरी यांच्याही जनमानसातील प्रतिमेला बाधा आणणारे आहे.त्यामुळे ना.नितीन गडकरींनी तरी त्या उमेदवाराला उमेदवारी अर्ज नितीन गडकरी यांनी भरायला सांगितलेला नाही हे जाहीर करायला सांगावे अथवा तुम्ही स्वतः तरी ते करावे अशी विनंती आहे.
अन्यथा नितीन गडकरी यांच्याकडेही लोकांचा रोष वळू शकतो.आपण एक समंजस,विवेकी नेतृत्व म्हणून ज्ञात असल्याने आपण हे यथाशीघ्र कराल व आमचाही त्यायोगे आपल्याबद्दलचा आदर द्विगुणित कराल अशी अपेक्षा निश्चितच आहे.
थोडक्यात,आता गडकरी जोशी यांच्या खुल्या पत्राला काय प्रतिसाद व प्रतिउत्तर देतात,याकडे समस्त साहित्यिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
………………………………………………………….
Advertisements

Advertisements

Advertisements
