अविनाश पार्डीकर यांची पक्ष कार्यालयात तोडफोड
इतर पक्षातून आलेल्यांना एबी फॉर्म देताना उमेदवारांची तपासणी शहराध्यक्षांनी केली का?निष्ठावंताचा सवाल
प्रभागातील तिकीट वाटपात माझा सहभाग नाही:अनिल अहिरकर
नागपूर,ता.३० डिसेंबर २०२५: महापालिका निवडणूक नागपूरात सर्वच राजकीय पक्षांसाठी नेहमीसारखीच आव्हानात्मक झाली असली तरी यंदा निष्ठावंतांच्या संतापाचा उद्रेग हा मर्यादा ओलांडणारा ठरत आहे.राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रभाग क्र.५ चे संगठन सचिव अविनाश पार्डीकर यांनी पक्ष कार्यालयात उमेदवारी न मिळाल्याने तोडफोड करीत टी.व्ही व टेबलच्या काचा फोडण्याचे कृत्य आज केले.निष्ठावंत कार्यकर्त्यांना तिकीट न देता धनदांडग्यांना पाच लाख रुपयात एबी फॉर्म देण्यात आल्याचा खळबळजनक आरोप पार्डीकर यांनी माध्यमकर्मींकडे केला.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर लढण्याचे कालच जाहीर केले होते. सोबतच एबी फॉर्म सुद्धा वाटप करण्यास सुरुवात केली होती. आज महाविकास आघाडी आणि भाजप महायुती तुटल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यालयात इच्छुकांची चांगलीच गर्दी वाढली. भाजपने तिकिट कापलेल्या इच्छुकांनाही राष्ट्रवादीने एबी फॉर्म दिले. त्यामुळे आधी आश्वासन देऊन डावललेले कार्यकर्ते नाराज झाले. त्यापैकी एकाने कार्यालयात जाऊन आरडाओरड केली आणि टीव्ही फोडला. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यालयात शहराचे कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर यांच्यासह काही पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पक्षश्रेष्ठी पाच-पाच लाख रुपये घेऊन एबी फॉर्म वाटत असल्याचा गंभीर आरोप पार्डीकर यांनी केला.
आज दूपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता.सकाळी ६ वाजताच बजरंगसिंग परिहारच्या घरी मला बोलावण्यात आले.माझी व्हिडीयो रेकॉडिंगची जुनी सवय आहे त्यामुळे परिहारच्या मुलाने मला आपला मोबाईल काढून दूसरीकडे ठेऊन देण्यास सांगितले. यानंतर मला ‘तेरे पास कितना पैसा है?पैसा होगा तो ही एबी फॉर्म मिलेगा’असे सांगितले.यावर मी २०१७ पासून पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे,मला याच मेरिटवर उमेदवारी द्या,माझ्याकडे पैसा नाही बी फॉर्म खरेदी करण्याकरिता,मला उमेदवारी मिळेल यासाठी मी गेल्या नऊ वर्षांपासून ,पक्षासाठी झटत असल्याचे उत्तर मी त्याला दिले.असे पार्डीकर यांनी माध्यमकर्मींना सांगितले.
महेंद्र गुप्ता हा भाजपचा कार्यकर्ता आहे,त्याला भाजपमध्ये उमेदवारी मिळाली नाही तर त्याने अजित पवार गटाकडे माझ्या समोरच पैसे देऊन उमेदवारी मिळवली!असा गंभीर आरोप माध्यमांसमोर पार्डीकर यांनी केला.यावर पक्षाचे शहराध्यक्ष अनिल अहिरकर व कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर यांची काय भूमिका आहे?असा सवाल केला असता,त्यांच्याकडे पक्षाने जवाबदारी सोपवली आहे मात्र,त्यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून आपलीच एक चमू तयार केली असल्याचे पार्डीकर म्हणाले.कोणाकडून किती वसूली करायची हे ते ठरवतात,असा गंभीर आरोप करीत,पक्ष निवडणूकीसाठी जो निधी पक्षाकडून येतो, त्यावर देखील हेच डल्ला मारतात,असा थेट आरोप त्यांनी केला.
गरीब कार्यकर्त्याला स्वत:च्याच निधीतून निवडणूक लढावी लागते.पक्षाकडून आलेल्या पैसा त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही.माझे सोडा पण प्रभाग क्र २६ मधून राहूल कांबळे हा वीस वर्ष जुना कार्यकर्ता आहे.त्याला देखील अहिरकर आणि शिवणकरांनी तिकीट नाकारली.तो मानसिक धक्क्यात असून नुसता रडून राहीला आहे.मला तिकीट नाही भेटली तरी चालते पण कांबळेला दय्ायला हवी होती,माझा हा देखील संताप होता,असे पार्डीकर म्हणाले.
यंदा पक्षाने जवळपास एकशे वीस तिकीटा पैकी वीस तिकीटा कार्यकर्त्यांना दिल्या ते पण पैसेवाले होते त्यांनाच पक्षाकडून तिकीट मिळाली.इतर शंभर तिकीटा या अजित पवार पक्षाकडून नागपूरच्या पक्षश्रेष्ठींनी नुसत्या काँग्रेस,भाजपमधून आलेल्यांना विकल्या आहेत,असा गंभीर आरोप पार्डीकर यांनी केला.
मात्र,इतर पक्षाकडून जो कोणी आला त्याच्या राजकीय लालसेची,हेतूची,नागपूरकर जनतेप्रति जवाबदेहीची कोणतीही तपासणी करण्याचे सौजन्य नागपूरातील पक्षश्रेष्ठींनी दाखवले नाही,त्यामुळे तोडफोडीची घटना तर घडणारच,असे समर्थन अनेक निष्ठावंत या घटनेनंतर कार्यकर्त्यांनी केली.
कार्यकर्त्यांचा रोष स्वाभाविक:अनिल अहिरकर
कोणत्याही निवडणूकीत एखाद्याला तिकीट नाही मिळाली तर त्यांचा रोष हा स्वाभाविक असतो.पार्डीकर यांना तिकीट न मिळाल्याने त्यांनी आज पक्ष कार्यालयात तोडफोड केली.एबी फॉर्म पाच-पाच लाख रुपये घेऊन विकण्यात आल्याचा आरोप निराधार आहे.तसेही त्याच्या प्रभागात परिहार यांनाच तिकीट वाटपाचे अधिकार देण्यात आले हाेते.आभा पांडे व तानाजी वनवे यांना देखील त्यांच्या-त्यांच्या प्रभागात त्यांच्यासोबत आणखी कोणत्या तीन उमेदवारांना उमेदवारी दय्ावी,निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे त्यामुळे शहरातील पक्षश्रेष्ठींवरील आरोप निराधार ठरतात.पार्डीकर याने एकाही उमेदवाराकडून पैसे घेतल्याचे सिद्ध करावे,पुरवा द्यावा.आम्ही पोलिस ठाण्यात पार्डीकरच्या विरोधात कोणतीही लिखित तक्रार नोंदवली नाही.
(बातमीशी संबंधित व्हिडीयो Sattadheesh official युट्यूब चॅनलवर उपलब्ध)
……………………………..
तळटीप:-
नागपूरकर जनतेवर थेट परिणाम करणा-या महानगरपालिकेची निवडणूक शहरातील सत्ताधारी व विरोधी पक्ष हे कोणत्या भूमिकेतून लढवित आहे,याचा किळसवाणा प्रत्यय नागपूरकरांना विविध घटनांमधून येत आहे.गेल्या पंधरा वर्षात मनपात भाजपची एकहाती सत्ता आहे मात्र,विरोधी पक्ष म्हणून सत्ताधा-यांना जाब विचारणे,त्यांच्या धोरणांची चिरफाड करुन जनतेला सजग करणे इत्यादी लोकशाहीला अभिप्रेत धोरणच नागपूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातच पूर्णत: संपुष्टात आल्याचे दिसून पडत आहे.नागपूरात पर्यावरणाची प्रचंड प्रमाणात नासाडी झाली आहे.लाखो झाडांची कत्तल विविध प्रकल्पांच्या नावाखाली झाली असून अवैध,अनियमित बांधकाम,दिल्लीच्या धर्तीवर पोहोचलेले नागपूरातील वायू प्रदूषण,राजकीय-अराजकीय भू-माफियांचा हैदोस,महिलांविरोधात होणारे जघन्य अपराध,अम्ली पदार्थांची तस्करी रोखण्यात आलेले अपयश,अवघ्या ४५० पोलिस भरतीच्या जागेसाठी साढे चार लाखांच्या वर अालेले बेरोजगारांचे अर्ज,भाजपने मनपात सत्तेत आल्या बरोबर पाण्याचे केलेलेे खासगीकरण,पाण्याचे वाढते दर,जबरीने लादलेले स्मार्ट मीटर व वीज ग्राहकांची होणारी अवास्तव लृट,गगनाला भिडलेली महागांई,नागपूरात मनपाच्या पुढाकारातून नागपूरच्या नकाशातून गायब झालेले तलाव,उद्याने,मैदाने इत्यादी धोरणांवर नागपूरातील सर्वच राजकीय पक्ष मौन आहे.निवडणूका या राजकीय पक्षांसाठी फक्त पैशा कमविण्याचे तसेच भविष्यात सत्तेत आल्यावरही पैसाच कमविण्याच्या ध्येयापूरते मर्यादित राहताना दिसत असेल, तर मतदारांनी अशा पक्षांना मतदान करताना शंभर वेळा विचार करणे गरजेचे आहे.
………………………..
–