फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeसांस्कृतिक / मनोरंजनकार्यकर्ताचा होतो घात....

कार्यकर्ताचा होतो घात….

Advertisements
‘रायबा ईमानदार’चित्रपटाने पुढा-यांना दिला गंभीर इशारा

चित्रपटानंतर महिलांना कोसळले अश्रू!
स्थानिक कलावंतांचा दर्जेदार अभिनय:सिनेमेटोग्राफीने गाठला उच्चांक
सात दिवसानंतर देखील ‘मराठी’ चित्रपटाला तूफान गर्दी:विविध गावांमधील प्रेक्षकांची झुंबड
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता.१८ सप्टेंबर २०२५: सावनेरचे कवी प्रा.डॉ.विलास डोईफोडे यांची पक्ष कार्यकर्त्यावर एक गाजलेली कविता आहे.‘राजकारणात हवा पाहून तिवा मांडत होतो,निव्वळ स्वार्थाच्या दूनियेत मी हिंडत होतो,सतरंज्या उचलल्या कधी लाचारी पत्करत होतो,पक्षासाठी शिव्या शापही पचवत होतो,साहेबांचा निरोप बेरात्री तरी..कामाला तत्पर होतो,त्यांचे झेंडे काढून यांचे बांधत होतो,कधी फुस कधी नात्यांत भांडणे लावीत होतो,पक्षात माझं थोडं थोडं प्रस्थ वाढवीत होतो,सभेला  चिक्कार गर्दीची जबाबदरी घेत होतो,आमिषं दाखवून बाया माणसं डोहारत होतो,नेत्यांचे शुभेच्छा फलक चौका चौकात टांगत होतो,निवडणूकीच्या काळात देहभान विसरत होतो,कुणाच्या तोंडाला फासलं काळं कधी राड्यात होतो,म्हणून मी साहेबांच्या एकदम मर्जीतला होतो,अशाच एका मामल्यात अडकून गजाआड होतो,अखेर बापानेच जामीन केला असा मी कार्यकर्ता होतो..!कार्यकर्त्याची हीच व्यथा निर्माता व लेखक सचिन घोडे यांनी अतिशय समर्पकपणे ‘रायबा ईमानदार’या मराठी चित्रपटात अगदी चपखळ मांडली आहे.
संपूर्ण चित्रपटच ‘कार्यकर्त्याचा होतो घात’या एकाच भावनेत गुंफला गेला असून, आपल्या साहेबांच्या राजकीय जीवनासाठी कोणतीही अपेक्षा न ठेवता अतिशय प्रामाणिकपणे झटणा-या,याच गुणांमुळे राजकारणाच्या पहील्याच तालुकाध्यक्ष होणाच्या पायरीत झालेला विश्‍वासघात,पुन्हा या कार्यकर्त्याचे सावरणे,झटने,पुन्हा ग्राम पंचायतीच्या निवडणूकीत उमेदवारीचे मिळालेले आश्‍वासन,साहेबांनी दिलेला शब्द,पुन्हा जातीवादातून कापलेले त्याचे तिकीट,व अखेरेचे त्याचे भावनिकरित्या कोसळणे या सर्वांचे मर्मभेदी चित्रण ‘रायबा ईमानदार’मध्ये साधले गेले आहे.
श्री श्री फिल्मस निर्मित’रायबा ईमानदार’ चित्रपटाचे दिग्दर्शन सय्यद अख्तर यांनी केले असून,ज्येष्ठ अभिनेते दिपक शिर्के,संजय खापरे,प्रणाली राऊत,नरेश गडेकर,विनोद राऊत,नितीन पात्रीकर यांच्या सहजसुंदर अभिनयाने हा चित्रपट सजला आहे.कार्यकर्त्याची घुसमट संजय खापरे यांनी उत्कृष्टरित्या साकारली आहे.साहेबांचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून त्याची वेदना,त्याचे हरणे,त्याचे उदास होणे,साहेबांचा फोन आल्यावर त्याचे आनंदी होणे,साहेबांचा आदेश शिरोधार्य मानत घरादारावर तुळशीपत्र ठेऊन गावेच्या गावे पिंजून काढने,साहेबांसाठी गर्दी जमवणे,कार्यक्रम आयोजित करणे,पदरातला पैसा खर्च करणे,कर्जबाजारी होणे,एकुलत्या एक मुलाच्या शाळेची फी साठी  देखील पुन्हा कर्जबाजारी होणे,प्रपंचासाठी पत्नीचे दागिने गहाण टाकत राहणे,ते कधीही सोडवू न शकणे तरी देखील, एक दिवस साहेबच त्याचे व त्याच्या कुटूंबियाचे भविष्य उज्जवल करतील ही आपल्या साहेबांवरची श्रद्धा अढळ ठेवणे या सर्व भावभावनांची गुंफण संजय खापरे यांनी आपल्या सहजसुंदर अभिनयातून अगदी दमदारपणे गुंफली आहे,त्यामुळेच चित्रपटाचा अंत पाहिल्यानंतर भावूक मनाच्या अनेक महिला प्रेक्षक यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहताना आढळतात!
सर्वसाधारण माणूस राजकारणात आल्यानंतर कार्यकर्ता झाल्यानंतर कशाप्रकारे,भरडला जातो,समाजातील काही स्वार्थी,संधीसाधू मनाेवृत्तीच्या माणसांमुळे कश्‍याप्रकारे हळूहळू उधवस्त होतो.अंर्तमुख होतो व एक दिवस अपेक्षांचे हे ओझे घेऊनच जगाचा निरोप घेतो,चित्रपटातील ही कथा सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या घरात घडणारीच कथा आहे.लेखक सचिन घोडे यांनी  कार्यकर्ता म्हणून जणू त्यांना आलेले अनुभवच या चित्रपटात मांडल्याची प्रचिती येते.
प्रभावी कथानक,दमदार अभिनय आणि संगीतकार भूपेश सवाई,छायालेखण पवन पिपरोदे या सर्वांच्या सहयोगातून एक अप्रतिम कलाकृती ‘रायबा ईमानदार’चित्रपटाच्या निमित्ताने विदर्भाच्या अस्सल मातीत साकारली गेली आहे,प्रेक्षक याचा देखील अभिमान बाळगताना दिसतात.शाम या रायबाच्या मित्राची भूमिका बाळू इंगळे (ज्यूनियर मकरंद अनासपुरे)यांनी साकारली असून,संपूर्ण चित्रपटात मकरंद अनासपूरेंची नक्कल ही प्रेक्षकांच्या पचनी पडली नाही.इंगळे यांना देखील सहज अभिनय करता आला असता,ही उणिव प्रकर्षाने जाणवते.शिल्पा शाहीर हीची लावणी व इतर गाणी यांची भट्टी जोरदार जमली आहे.शिल्पा शाहीर या गुणी लावणीसाम्राज्ञीला पडद्यावर बघून, इथपर्यंत पोहोचण्यासाठी तिच्या दशकांच्या संघर्षाचे चीज झाले,अशी भावना उचंबळून येते.पश्‍चिम महाराष्ट्राच्या कोणत्याही लावणीसाम्राज्ञीला सहज लाजवेल इतकी अप्रतिम लावणी ‘चहा पाण्याला पावणं बोलवा ना..’’या गीतावर या अस्सल नागपूरकर व वैदर्भिय लावणीसाम्राज्ञीने साकारली आहे.गायिका वैशाली सामंतचा लावणीतील ठसकेबाज आवाज आज देखील तितकाच कर्णप्रिय आणि मधूर वाटतो.

आजच्या काळात राजकारणाचा बाजच पूर्णत: बदलला आहे.कार्यकर्ता मात्र अजूनही तसाच व तेवढाच ‘प्रामाणिक’आहे.मात्र,या प्रामाणिकपणाची परतफेड जेव्हा साहेब त्याला कोणतंतरी महत्वाचं पद देऊन करु इच्छितात तेव्हा त्या पदासाठी आसुसलेली ‘माणूस नावाची गिधाडे’ कश्‍याप्रकारे त्या प्रामाणिक कार्यकर्त्याच्या तोंडा जवळ आलेला घास हिसकतात,कट कारस्थान करतात याचे मन विर्दीर्ण करणारे चित्रण या चित्रपटात आहे. कार्यकर्ताच नव्हे तर त्याचे संपूर्ण कुटूंबच गलिच्छ,संधीसाधू राजकारणामुळे कश्‍याप्रकारे भरडला जातो,याचे भावस्पर्शी चित्रण या चित्रपटात बघायला मिळतं.

या चित्रपटाचे आणखी एक आकर्षण म्हणजे प्रणाली राऊत यांचा  दमदार अभिनय.रायबाच्या प्रत्येक घुसमटी मागे तिचीही होणारी घुसमट ही प्रेक्षक अगदी आतून अनुभवतो.तालुकाध्यक्षासाठी रायबाचे नाव भर सभेत घोषित करण्याचा शब्द साहेब(दिपक शिर्के) रायबाला देतात मात्र,सभेत दुस-याचे जंगम(नरेश गडेकर)नाव घोषित करण्यात आल्यावर रायबाचा चेहरा हा बघण्यासारखा होतो,त्याच्यासाठी तो मानसिक धक्का असतो,आपल्या साहेबांवरची अढळ निष्ठा कुठेतरी ढासळतेय का?या विचाराने तो अस्वस्थ होतो,त्यावेळी गर्दीत बसलेल्या त्याच्या पत्नीचे बोलके डोळे त्याच्या या अस्वस्थतेवर रोखलेले असतात,डोळ्यात दाटून आलेले पाणी ती ढासळू देत नाही.हे दृष्य मन हेलावून टाकणारे होते.
पक्षाचा निर्णय,त्यात साहेब काय करणार?पुढे कधी तरी साहेब माझ्यासाठी नक्कीच काही तरी करतील,ही आशा रायबाला पुन्हा तारते.मात्र,बेदरकार झालेल्या गलिच्छ राजकारणाच्या चिखलात त्याच्या भावना वारंवार तुडवल्या जातात.त्याच्या विश्‍वासाचा पुन्हा घात होतो.ग्राम पंचायत निवडणूकीत उमेदवार म्हणून रायबाचेच नाव घोषित होणार असताना पुन्हा पडद्या मागून जोशी आणि परब नावाचे साहेबांचे कजाग स्वीय सहाय्यक जंगम(नरेश गडेकर)ला हाताशी धरुन पुन्हा राजकारण खेळतात.रायबा,जंगम व पक्षाचा आणखी एक मोठा नेता प्रकाश शर्माच्या पत्नी सुहासिनी शर्मा या तीन संभावित उमेदवारांची नावे घोषित होतात,त्यापैकी एका नावाची घोषणा स्वत: साहेब करणार असतात मात्र,वरुन शिक्कामोर्तब करुन आलेले नाव बघून ते हतबल होतात व स्वीय सहायकालाच नाव घोषित करण्याची सूचना करतात.शर्मा यांच्या पत्नीचे नाव घोषित होतं अन् रायबा …आतून कोसळतो.
‘तू जे गावोगावी उन्हा तान्हात,उपाशी राहून,हिंडून जी पाच हजार  नवी नावे मतदारयादीत जोडली त्यात सर्वाधिक मतदार हे शर्मा यांच्या जातीच्या मतदारांची असल्याने…तुझे नाव कापल्या गेले…!’साहेबांचे हे शब्द रायबाच्या तळपल्या जखमेवर फूंकर घालण्या ऐवजी अंगार पेटवून जातात.हे दू:ख या कार्यकर्त्याला आयुष्यातूनच उठवून जातं.मोठा झालेला रायबाचा मुलगा अनंत हा विद्यापीठाच्या निवडणूकीत उभा राहत असल्याचे आईला सांगतो,विद्यापीठाच्या साहेबांनी दिलेल्या आश्‍वासनाबाबत आईला सांगून तो घरातून बाहेर पडतो त्यावेळी…..साहेब,त्यांची आश्‍वासने,निवडणूका…विश्‍वासघाताचे घाव आणि आयुष्येच कोळमडणे या अनुभवातून गेलेल्या रायबाच्या विधवा पत्नीचा आर्त स्वर मुलाला थांबविण्याचा निष्फळ प्रयत्न करतो अन् ….चित्रपटाचा शेवट होतो.‘पुढा-याचा शब्द पाळतो..दिलेली जबाबवदारी पाळतो’हे पार्श्वभूमीवर वाजणारे गीत प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात.
हा शेवट चित्रपटातून बाहेर पडणा-या प्रेक्षकांच्या मनात इमानदार कार्यकर्तावर होणारा अन्याय व पैसे घेऊन देण्यात येणारी उमेदावारी याविषयी चिड निर्माण करतात.अशा उमेदवाराला येणा-या निवडणूकीत मत देणार नाही,असा ठाम निर्धार माध्यमकर्मींकडे ते बेधडक व्यक्त करतात.
‘नि:स्वार्थ अखंड सेवा फाऊंडेशन’तर्फे सचिन घोडे गेल्या अनेक दशकांपासून विविध सामाजिक उपक्रम गावपातळीवर राबवित आहेत.नागपूरातील पिपळाफाटा,गणेशधाम,हुडकेश्‍वर,नरसाळा,विहीरगाव इत्यादी भागात विविध जाती,धर्माच्या महापुरुषांच्या जयंती निमित्त स्वच्छतेच्या कार्यक्रमासह,हजारो वृक्षांचे वृक्षारोपण,फळ वाटप,दिव्यांगासाठीचे उपक्रम,रक्तदान शिबिरे,शेतकरी,महिलांच्या उत्थानासाठीचे उपक्रम,अारोग्य शिबिरे,विविध शासकीय याेजनांचा लाभ गावक-यांपर्यंत पोहोचवणे इत्यादीसाठी सचिन घोडे यांनी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेऊन काम केले,नागपूर शहराच्या  उपनगर व ग्रामीण भागात आपल्या फाऊंडेशनच्या मदतीतून घोडे यांनी घरोघरी जणू राजकीय पक्षासाठी कार्यकर्ताच तयार केला.गेल्या दीड दशकांपासून घोडे यांच्या विविध सामाजिक उपक्रमांची दखल सर्व प्रसार व प्रचार माध्यमांना देखील घ्यावी लागत असते.हा चित्रपट काढण्या मागे एक कार्यकर्ता म्हणून त्यांची झालेली राजकीय घुसमट,विश्‍वासघात अनेक प्रश्‍ने निर्माण करुन जातात.
येणा-या काळात ग्रामपंचायती पासून तर महानगरपालिकेच्या निवडणूका आहेत.अश्‍यावेळी पक्षाप्रति समर्पित कार्यकर्त्याच्या विश्‍वासाचा बळी जाणे,पैशाच्या जोरावर राजकीय उपलब्धी शून्य असणारे धनदांडगे पैसे देऊन पक्षाचे तिकीट मिळवताना दिसतात त्यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली ‘लोकशाही’ ही नव्हतीच याची तीव्र प्रचिती येते आणि म्हणून हा चित्रपट बघून बाहेर पडणारा प्रेक्षक हा विविध राजकीय पक्षाला घोषणा देऊन सचेत करताना आढळतो,आमच्यावर पैसे घेऊन उमेदवार लादू नका.आमचे काम करणारा खरा कार्यकर्ता हाच आमचा उमेदवार असावा,यावेळी राजकीय पक्षांचा पैशांनी विकत घेतला जाणारा उन्माद खपवून घेतला जाणार नाही,जणू असा इशारा ते देतात.चित्रपटाच्या मध्यांतरामध्ये ‘त्याचा ही दिवस येईल,अख्खा गाव त्याच्यासोबत आहे,त्याला डावलले गेले यालाच राजकारण म्हणतात’अशी मायबाप रसिक प्रेक्षकांची प्रतिक्रिया कानावर आदळते.
‘राजकारणात कोणतेही पद मिळवायला वशिला किवा पैसे लागतात,पक्षाला फंडिंग नाही करु शकत तर पद ही नाही मिळत,आजन्म कार्यकर्तेच राहा,असे संवाद भाव खाऊन जातात’.मी पक्षाला पैसा दिला,पक्षाने मला पद दिलं झालं फिट्टमफाट‘हे पक्षाला पैसा देऊन तालुकाध्यक्ष झालेल्या जंगमच्या(नरेश गडेकर)तोंडी असलेले संवाद वास्तवतेला पूर्णत:नग्न करुन जाणारे भासतात.अनेक वर्षांनेतर मुरलेले नट नरेश गडेकर यांना पडद्यावर बघणे सुखद अनुभव ठरतो, त्यांच्या नकारात्मक भूमिकेत त्यांनी जीव ओतला आहे.
मतदार म्हणून मात्र,आपण कोणाला निवडून देत आहोत,याचे भान देखील प्रेक्षक मतदारांना हा चित्रपट करुन देण्यात यशस्वी होतो आणि हेच या चित्रपटाचे यश आहे.गावखेड्यातील ओबडधोबड रस्ते,वीज पोल,हापसी,तहसील कार्यालये,गावातील शाळा, घरांचे चित्रिकरण हे अस्सल वैदर्भिय अनुभूती देणारे असून चित्रपटगृहातील प्रेक्षक हे कोणाचे घर आहे,याची चर्चा करताना आढळतात.सिनेमेटोग्राफी हा या चित्रपटाचा आत्माच ठरतो.

(छायाचित्र :‘रायबा ईमानदार’बघण्यासाठी आलेले रसिक प्रेक्षक)
१२ सप्टेंबर रोजी हा चित्रपट सक्करदरा येथील संगम स्कायलाईट मॉलध्ये प्रदर्शित झाला आहे.आठ दिवस झाले या ‘मराठी’चित्रपटाला विविध ग्रामीण भागातून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.दररोज दुपारी १.२० वाजता या चित्रपटाचा प्रयोग संगम मॉलमध्ये होतो.अधिक माहिती ‘बूक माय शो ’मधून देखील मिळू शकते.मायबाप मराठी रसिक प्रेक्षकांनी एकदा तरी एका राजकीय कार्यकर्त्याची घुसमट आणि विश्‍वासघाताची ही मालिका अनुभवावी,विदर्भाच्या मातीत साकारलेल्या चित्रपटाला आणखी यश द्यावे,यासाठी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघावा असे आवाहन सचिन घोडे करतात.
(बातमीशी संबंधित व्हिडीयोज Sattadheesh official युट्यूब चॅनलवर उपलब्ध)
………………………………….
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या