Advertisements

कामठीतील भूगांवातील तीन एकर झुडपी जंगलची जमीन ‘वैशाली गान ‘फाऊंडेशनला

अवंतिका लेकुरवाळे यांचा घणाघाती आरोप
देशातील एकमेव आश्चर्य: तहकुब ग्रामसभेत केला प्रस्ताव पारित!
‘वोट चोरी’ नंतर सत्ताधा-यांची ’भूंखड चोरी’ सुरुच:करणार तीव्र आंदोलन
नागपूर,ता.१६ सप्टेंबर २०२५: मौजा भूगांव,सर्वे क्र.८,आराजी १.७२ हे.आरचा सात बारा हा महाराष्ट्र सरकार झुडपी जंगल या नावाने असून,या पैकी तब्बल तीन ऐकर जागा सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,दुय्यम निबंधक अधिकारी यांच्या सहाय्याने, वैशाली गान फाऊंडेशन या खासगी कंपनीच्या नावे तीस वर्षांच्या लीजवर देण्यात आल्याचा आरोप आज डिजिटल माध्यमांसमोर जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या माजी सभापती तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीच्या सचिव प्रा. अवंतिका लुकरवाळे यांनी केला.याप्रसंगी त्यांनी माध्यमकर्मींना या संपूर्ण गैरव्यवहारातील घोटाळ्याची कागदपत्रे देत,येत्या सात दिवसात हा नियमबार्ह्य व भ्रष्ट व्यवहार रद्द न झाल्यास संपूर्ण गावक-यांसह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.महत्वाचे म्हणजे जिल्हाचे पालकमंत्री व कामठी मतदारसंघाचे भाजपचे आमदार,राज्याचे महसलू मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्याच मतदारसंघातच शासनाला महसूल मिळवून देणा-या भूखंडाची चोरी होत असून,बावणकुळे यांनी शासनाचे हे नुकसान ताबडतोब थांबवावे असे आवाहन त्यांनी केले.
ही तीन एकर जागा मोठ्या नेत्याच्या सांगण्यावरुन भाजप पक्षाचे भूगांव ग्रामपंचायतचे सरपंच नितेश घुबडे,ग्रामविकास अधिकारी फूलचंद आंबिलढूके,ग्रामपंचायतीचे सदस्य जितेंद्र मेहरकुळे,दर्शन कुंभले,संजय गायधने,संजय वंजारी,रुपाली महाकाळकर,अनिता आंबिलढुके तसेच कामठीच्या दुय्यम निबंधक कार्यालयातील दुय्यम निबंधक श्रेणी १ चे अधिकारी यांच्या संगममताने खासगी कंपनीच्या घश्यात घालण्यात आली आल्याचा आरोप याप्रसंगी त्यांनी केला.या सर्वांनी पदाचा दुरुपयोग करुन,कोणतेही अधिकार नसताना,केवळ पैशांच्या लालसेपोटी शासनाची झुडपी जंगलाची तीन एकर जागा बिनधास्त ‘वैशाली गान फाऊंडेशन’या खासगी कंपनीला दिली असल्याचे त्या सांगतात.
महत्वाचे म्हणजे ग्रामसभा तहकुब असताना सरपंच नितेश घुबडे आणि ग्रामविकास अधिकारी राजेंद्र गाडगे यांनी तहकूब असलेली ग्रामसभा ३० नोव्हेंबर २०२३ रोजी भूगांवात मुक्तेश्वर मंदिराच्या प्रांगणात घेऊन खोट्या उपस्थितांच्या खोट्या सह्या केल्या तसेच काही उपस्थित लोकांच्या व अधिका-यांच्या सह्या घेतल्या.त्यातही एक मेख ठेवली व या सभेत वैशाली गान फाऊंडेशनला ३० वर्षांच्या लिजवर झुडपी जंगल म्हणून नोंद असलेल्या तीन एकर जागा देत असल्याचा उल्लेख न करता ठराव क्रं.१४(७)मंजूर केला!
जागेच्या मागणीच्या अर्जातील विषय हा विषय सूचीमध्ये नसताना व त्या विषयाची गावात दवंडी न देता ग्रामपंचायत सदस्य व अधिका-यांना हाताशी धरुन राजकीय दबावतंत्राचा वापर करुन, नियमबाह्यरित्या ठराव पारित करण्यात आला असल्याचा धक्कादायक आरोप याप्रसंगी अवंतिका लेकुरवाळे यांनी केला.
दुय्यम निंबधक श्रेणी १ चे अधिकारी यांनी सुद्धा सरकारी जमीन लीज वर देण्यासाठी व हा अवैध दस्त नोंदणीकृत करण्यासाठी पदाचा दुरुपयोग केला.सदर लीज दस्त नोंदणी क्र.११८४/२०२४ दिनांक ७ फेब्रुवारी २०२४ राेजी करण्यासाठी, सर्व नियमांचे उल्लंघन करण्यात आले.ही नोंदणी करताना कोणतेही शासकीय आदेश,महसूल व वन विभागकडील नाहरकत प्रमाणपत्र तसेच आदेश नसून देखील हा संपूर्ण ‘काळा’व्यवहार पार पडला.
ही जमीन बावणकुळे ज्या मंत्रालयाचे प्रतिनिधित्व करतात त्या महसूल विभाग तसेच वन विभागाची आहे.परिणामी,दुस-याच्या अधिकार क्षेत्रातील जमीन विना परवानगी लीज नोंदणीकृत करुन देणे, हा पदाचा व अधिकाराचा दुरुपयोग आहे.तहकूब ग्रामसभेत उपस्थित गावक-यांना कोणतीही माहिती नसताना खोट्या सह्या, सरपंच नितेश घुबडे,व इतर सदस्यांनी घेतल्या.परिणामी हे सर्व दोषी असून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा याप्रसंगी अवंतिका लेकुरवाळे यांनी दिला.
सत्ताधीशांनी सत्तेचा दुरुपयोग करुन राज्यभरातच भूखंडाचे श्रीखंड लाटत असून ‘वोट चाेरी’नंतर ‘भूखंड चोरी’चा सपाटा लावला असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला.या पूर्वी देखील आसलवाडा येथील ७० एकरचा शासकीय तलाव विकण्याचा घाट घालण्यात आला होता.तसा करारच करण्यात आला.तो डाव आम्ही हाणून पाडला व ४० वर्षांनंतर तलावाची जागा जिल्हा परिषद नागपूरच्या नावाने करुन दिल्याचे त्यांनी सांगितले.या पूर्वी तरोडी(बु)गावातील ग्रामपंचायतीची जागाच एका मोठ्या व्यवसायिकाने अश्याच प्रकारे गिळंकृत केली होती.त्यावरुन बावणकुळे यांच्या मतदारसंघ असलेल्या कामठी तालुक्यात कश्याप्रकारे भूमाफिया सक्रिय आहेत याची प्रचिती येते.इतकंच नव्हे तर कुही तालुक्यातील शेतक-यांची जमीनी एका मोठ्या नेत्याच्या नावावर करण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केला.
नियमबार्ह्यरित्या शासकीय महसूल बुडविणा-या,झुडपी जंगल संदर्भात सर्वोच्च न्यालयाच्या आदेशाची अवहेलना करणा-या तसेच खासगी कंपनीला भ्रष्ट कारभारातून लाभ पोहोचविणा-या सर्व दोषींना तातडीने पदच्यूत करुन त्यांच्या विरुद्ध मौदा पोलिस ठाण्यात कायदेशीर गुन्हा दाखल करण्यास बावणकुळे यांनी पुढाकार घ्यावा,अशी मागणी लेकुरवाळे यांनी केली.
यासंबंधी उपविभागीय अधिकारी मौदा,वनपरिक्षेत्र अधिकारी सेमिनरी हिल्स नागपूर,तहसीलदार कामठी,विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांना तातडीने ही लीज रद्द करण्यासाठी निवेदन दिले असल्याचे त्यांनी सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सातत्याने सेवा सप्ताहाचे निमित्त करुन निवेदन स्वीकरण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप त्यांनी केला.येत्या सात दिवसात ही लीज रद्द न झाल्यास समस्त गावकरी हे ग्राम पंचायतीचे काम चालु देणार नाही व तीव्र आंदोलन करतील,असा इशारा त्यांनी दिला.
(बातमीशी संबंधित सर्व व्हिीडीयोज Sattadheesh official युट्यूब चॅनलवर उपलब्ध)
………….
Advertisements

Advertisements

Advertisements
