Advertisements

‘हे’प्रस्ताव झाले पारित
‘समान‘सन्मानासाठी लढा होणार आणखी तीव्र:संघटनेचा इशारा
पत्रकार भवन,प्रेस क्लब,पीआर एजन्सी व जिल्हा माहिती आधिकारी यांचा निषेध
नागपूर,ता.१३ सप्टेंबर २०२५:भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे नुकतेच नागपूरात येऊन गेले.नागपूरातील पत्रकारांशी ते प्रेस क्लब येथे संवाद साधणार असल्याचा मॅसेज भाजपच्या व्हॉट्स ॲप ग्रूपवर जनसंपर्क पदाधिकारी यांनी टाकला मात्र,अवघ्या काही वेळातच तो मॅसेज डिलिट केला व ही चर्चात्मक बैठक पुढे ढकलण्यात आल्याचा मॅसेज टाकण्यात आला.मात्र,नागपूरातील काही ‘पारंपारिक’संपादक व वरिष्ठ पत्रकार यांच्यासोबत प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांच्या पुढाकाराने ही बैठक पार पडली व त्याचे फोटोज भाजपच्याच अनेक पदाधिका-यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर व्हायरल केले.यामुळे,प्रेस क्लबच्या अध्यक्षांनी हेतुपुरस्सर डिजिटल माध्यम प्रतिनिधींना इतक्या महत्वपूर्ण राजकीय संवादापासून दूर ठेवले असल्याचा संताप डिजिटल माध्यमांकर्मींमध्ये पसरला.दर वेळी मुंबईतून विविध राजकीय पक्षाचे मोठे नेते नागपूरात आल्यावर प्रेस क्लबचे अध्यक्ष नागपूरातील ‘निवडक’पत्रकार व संपादकांसोबत त्यांची चर्चात्मक बैठक आयोजित करतात मात्र,शहरातील डिजिटल माध्यमकर्मींना अश्या बैठकीतून दूर ठेवल्या जातं.परिणामी,आज शनिवार दिनांक १३ सप्टेंबर २०२५ रोजी रवि भवनात डिजिटल मिडीया व न्यूज पोर्टल संघटनेतर्फे नागपूर प्रेस कल्ब व पत्रकार भवनाच्या पदाधिका-यांचा निषेध करण्यात आला.
यापूर्वी देखील राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे प्रफूल्ल पटेल यांच्या सोबत प्रेस क्लबमध्ये संवादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता त्यावेळी देखील डिजिटल माध्यमाला त्या कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आले होते.काँग्रेस नेत्या अलका लांबा यांच्या वेळी देखील हाच अनुभव डिजिटल माध्यकर्मींनी घेतला.परिणामी,इतर माध्यमांच्या पत्रकारांसारख्याच ‘समान’सन्मानासाठीचा लढा पुकारण्यात आला असून, संघटनेचे अध्यक्ष भीमराव लोणारे यांच्या अध्यक्षतेखाली विविध ठराव पारित करण्यात आले. या पुढे डिजिटल व न्यूज पोर्टलच्या माध्यमकर्मींतर्फे नागपूर प्रेस क्लब व पत्रकार भवनाचा ‘कायमचा’ बायकॉट करण्यात आला असून, लवकरच नागपूर शहरात प्राईम लोकेशनवर फक्त डिजिटल माध्यमांसाठी स्वत:चे वेगळे पत्रकार कार्यालय थाटण्याचा ऐलान संघटनेचे अध्यक्ष लोणारे यांनी केला.नागपूर शहराला डिजिटल हब बनविण्याची घोषणा त्यांनी केली.
यासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांना देखील संघटनेतर्फे निवेदन दिले जाणार असून,प्रेस क्लबसारखेच अर्थसहाय्य डिजिटल व पोर्टल कार्यालयासाठी करावे,असे अावाहन लोणारे यांनी केले.या माध्यमात सर्वाधिक गरीब,गरजू व मध्यमवर्गीय यूट्यूबर्स असून अर्थाजनांची खरी गरज आम्हाला असते,असे ते म्हणाले.स्वत: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल हॉटेल सेंटर पॉईटंमध्ये ॲग्रो व्हीजनच्या पत्रक़ार परिषदेत हे मान्य केले की,आजच्या काळात वृत्तपत्रे व इलेक्ट्रोनिक माध्यमांपेक्षा डिजिटल माध्यम,यूट्यूर्बस व न्यूज पोर्टल हे अधिक प्रभावी आहेत.मात्र,असे असले तरी राजकीय स्तरावरील तसेच नेते मंडळीच्या जाहीरातींचा रतीब फक्त वृत्तपत्र व वृत्त वाहीन्यांवर कोसळताना दिसतो.या पुढे डिजिटल माध्यमांसाठी देखील विविध राजकीय पक्षांनी एक ठराविक रक्कम निर्धारित करावी व जाहीरात देण्यास सुरवात करावी,अशी मागणी त्यांनी केली.
डिजिटल माध्यमांसाठी केंद्रीयस्तरावर २०२१ पासूनच धोरण निश्चितीसाठी पावले उचलली जात आहे मात्र,अद्याप धोरण नसल्याने सर्वाधिक गळचेपी याच माध्यमकर्मींची होत असल्याचे संघटनचे सचिव विजय खवसे यांनी सांगितले.
याप्रसंगी नागपूरच्या काही पीआर एजंसीज यांच्या दुटप्पी धोरणावर देखील प्रखर प्रहार करण्यात आला.या पुढे काही ठराविक पीआर एजंसीज यांच्या पत्रकार परिषदेत डिजिटल माध्यमकर्मी जाणार नसल्याचा ठराव देखील याप्रसंगी पारित करण्यात आला.यात प्रामुख्याने मंजुषा जोशी(स्केवअर मिडीया सोल्यूशन) तरुण निर्बाण यांच्या(सेव्हन हिल्स एडवर्डटाईझिंग एंजसी) व सुधीर मंगरुळकर यांच्या पत्रकार परिषदांवर बहिष्कार घालण्यात आला.काही पीआर एजंसी हे उपस्थित पत्रकारांच्या सह्या व ई-मेल घेतात व पत्रकार परिषद अायोजित करणा-या कंपनी किवा व्यक्तिंकडून त्यांच्या नावाने भेटवस्तू किवा ‘पाकिटे’उकळतात,मात्र,ख-या पत्रकारांपर्यंत ते पोहोचवत नाहीत,असा सरळ आरोप याप्रसंगी काही माध्यमकर्मींनी केला.पीआर एजंसी जेव्हा त्यांना गरज असते तेव्हा फोन करुन बोलवतात मात्र,मुंबई,पुण्याहून कोणी मोठे कलावंत किवा मोठे राजकीय नेते नागपूरात आल्यास डिजिटल माध्यकर्मींना डावलतात,असा देखील आरोप झाला.
यासोबतच जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांच्या डिजिटल माध्यमकर्मीसाेबतच्या सातत्याने भेदभावपूर्ण नीतीचा देखील निषेध करण्यात आला.रापतवार हे इतर माध्यमकर्मींच्या तुलनेत ते,जेव्हापासून नागपूरात रुजू झाले तेव्हापासून डिजिटल माध्यमकर्मीसाेबत सातत्याने भेदभाव करीत असल्याचा सूर बैठकीत उमटला.यासोबतच ‘आमची नजर तुमच्यावर आहे‘असे धमकीवजा सूरात बोलत असल्याची तक्रार काही डिजिटल माध्यमकर्मींनी याप्रसंगी केली.शासनाच्या अध्यादेशानुसार नागपूर शहरातील विविध माध्यमांमध्ये सरकारविषयीची टिका यावर नजर ठेवण्याचे कार्य, जिल्हा माहिती अधिकारी करीत असतात.हे त्यांचे शासकीय काम आहे मात्र,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधान देशात लागू केला त्यात अभिव्यकती स्वातंत्र्याची गळचेपी सरकार व शासनाच्या दबावात होऊ देणार नाही,अशी ठाम भूमिका बैठकीत घेण्यात आली.नेपाल हे ज्वलंत उदाहरण आहे.डिजिटल माध्यमांवर बंदी आणल्यानंतर त्या देशात जे घडले याचा बोध भारत सरकार व महाराष्ट्र सरकारनेही घ्यावा,असा सूर याप्रसंगी उमटला.
कोणत्याही जाती,धर्म,पंथ,भाषा,प्रांत विरोधात वृत्त प्रसारित करु नये याची काळजी घेण्याची सूचना सचिव विजय खवसे यांनी केली.सध्या देशातील ९० टक्के वृत्त माध्यमे ही सरकार व उद्योगपतींना विकल्या गेली आहेत,त्यामुळे जनतेपर्यंत ‘सत्य’पोहचू शकत नाही.डिजिटल माध्यमे हे अलीकडच्या काळात एक अतिशय प्रभावी माध्यम म्हणून प्रत्येकाच्या मोबाईलवर उपलब्ध असल्याचे ते म्हणाले.
इतर माध्यमांच्या पत्रकारांसाठी अनेकदा समोर बसलेल्या डिजिटल माध्यमकर्मीला उठवल्या जातं.जे खूप अवमानकारक असतं.अशी देखील तक्रार नोंदवण्यात आली.आम्हाला देखील बरोबरीचा हक्क व सन्मान हवा,सन्मान देऊ शकणार नसले तरी चालेल किमान अपमान तर करु नका,अशी मागणी करण्यात आली.आमचे देखील ६-६ लाखांपर्यंत सबस्क्राईबर्स आहेत,या मागे आमचे देखील खूप परिश्रम असतात.डिजिटल माध्यमांसमोर अनेक आव्हाने असतात,ती पार करीत आम्ही यश मिळवत असतो.असे असताना आम्हाला दुय्यम वागणूक दिली जाते.सगळे डिजिटल माध्यमकर्मी हे प्रेस क्लबमध्ये फक्त खाण्यापिण्यासाठी जात नाहीत,याचा विचार व्हायला हवा हाेता,असा देखील सूर उमटला.अनेकदा वृत्त पत्रकार हे आमची ओळख पत्रकार परिषद घेणा-यांना हे ‘यूट्यूबवाले’अशी करुन देतात,यातून आमचा अपमान करणे हाच त्यांचा हेतू असतो,परिणामी,एकविसाव्या शतकातील तिसरे दशक सुरु आहे तरी देखील लाखाेंचे सबस्क्राईबर असून सुद्धा, युटूयूबर म्हणून आम्हाला ‘हीन’वागणूक मिळते.अशी खंत व्यक्त करण्यात आली.
मूळात प्रेस क्लब चालतं कोणामुळे?असा सवाल करीत, वृत्तपत्रातील अवघे दोघे-तिघे जण प्रेस क्लबमध्ये येतात.प्रत्येक नोंदणीच्या मागे प्रेस क्लब ७ हजार रुपये घेतात.याशिवाय चहा-नाश्ताचे दर देखील खूप जास्त आहे.एका दिवसात चार-चार पत्रकार परिषदा असतात,प्रेस क्लबला यातून अमाप कमाई होते,मात्र,आम्ही प्रेस कल्बच्या भरवश्यावर आपले कुटूंब चालवित नाही,प्रेस क्लबच्या अध्यक्षांना लोकशाही देशात प्रश्न विचारण्याची मुभा नाही,काही अडचणीचा प्रश्न विचारल्यास सरळ प्रेस क्लब व पत्रकार भवनात आम्हाला बंदी घातली जाते.ही सरळ-सरळ हूकूमशाही आहे.अशी हूकूमशाही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी असून मुळीच समर्थनीय नाही.परिणामी,नागपूर शहरात डिजिटल माध्यम व न्यूज पोर्टलसाठी वेगळे कार्यालय असणे गरजेचे आहे,जिथे ख-या अर्थाने पत्रकारिता ‘जिवंत’ राहू शकेल,अशी मागणी पुढे आली.
प्रेस क्लबचा एकच एक अध्यक्ष वर्षानुवर्षे कसा राहू शकतो?असा सवाल करीत, धर्मादाय आयुक्तांनी डोळ्यावर झापडे पांघरली असल्याची टिका त्यांनी केली. श्रमिक पत्रकार संघात देखील तेच ते मुखंड निवडून येतात.पदसिद्ध होतात.निवडणूक कधी होते,सदस्य मतदान करतात का?हे काय चालले आहे नागपूर शहरात? वर्षानुवर्षे पत्रकारिता करुन देखील साधे सदस्य देखील केल्या जाता नाही.परिणामी,नागपूरात डिजिटल माध्यमांचा वेगळा व प्रतिष्ठित प्लॅटफार्म असणे गरजेचे आहे,अशी मागणी पुढे आली.
काही डिजिटलमाध्यमकर्मींवर खंडणीसारखे गुन्हे दाखल आहेत मात्र,त्याचा असा अर्थ नाही,सर्वच डिजिटल माध्यमकर्मी हे गुन्हेगार आहेत.तरी देखील सर्वांना सरसकट एकसारखी वागणूक दिली जाते,जी अन्यायपूर्ण आहे.‘आत्मसन्मान’हा प्रत्येकाला असतो.जो दूखावण्याचा अधिकार कोणालाही नाही.मग ते प्रेस क्लबचे अध्यक्ष असाे किवा राजकीय नेते.‘जो सन्मान करीत नाही त्यांचा बायकॉट झालाच पाहिजे’,अशी एकमुखी मागणी गगनभेदी आवाजात मान्य करण्यात आली.
संघटनेची बैठक ही दर महिन्याला घेण्यात येईल,असा ठराव देखील संमत झाला.काही माध्यमकर्मी स्वत:चा सन्मान स्वत:गमावतात,असे सांगून १००,५०० रुपयांसाठी बातमी प्रसिद्ध केली जाते.हा प्रकार थांबायला हवा.जाहीरातीवर कोणतेही बंधने नाहीत.प्रत्येक डिजिटल माध्यम त्यांच्या ओळखीतून जाहीराती मिळवू शकतो.संघटनेचा यात कोणताही हस्तक्षेप असणार नाही,असे सचिव विजय खवसे यांनी स्पष्ट केले.
यानंतर ‘हम जहां खडे होते है लाईन वही सें शुरु होनी चाहिये’संघटनेची ‘एकताच’ नागपूर शहरात डिजिटल माध्यमात क्रांती घडवून आणेल,असा विश्वास उपस्थित माध्यमकर्मींनी व्यक्त केला.नुकतेच व्हेरायटी चौकात ओबीसी आंदोलन शहर काँग्रेसतर्फे पार पडले.त्या वेळी मराठी प्रादेशिक वाहिन्यांचे प्रतिनिधी आपापले बूम लाऊन नुसते बसले होते.मात्र,माझे लाईव्ह कव्हरेज सुरु होताच मुद्दामून माझा कॅमरा खाली पाडण्यात आला!हा आता लोकांचा नाही सरकारचा मिडीया झाला आहे,असा आरोप करीत ’डरो नही, ललकारो’संघटनेकडून हीच अपेक्षा आहे,अशी अपेक्षा एका माध्यमकर्मीनी व्यक्त केली.ते आंदोलन काँग्रेसने फक्त मुख्य वृत्त वाहिन्यांसाठीच आयोजित केले होते का?असा सवाल त्यांनी केला.
आपली छवि आपल्याच हातात असते,चुकीच्या गोष्टींपासून दूर रहा.लोकांसमोर चांगला आदर्श ठेवा.असे घडले तरच राजकीय नेते,शासकीय अधिकारी यांची ताकद राहणार नाही आपल्याकडे बोट दाखवायची,असा सल्ला याप्रसंगी एका माध्यमकर्मीने दिला.
संघटनेचे आम्ही कोण आहोत?आमची भूमिका काय असणार?आमच्यासाठी संघटना काय करणार आहे?यावर पुढील बैठकीत चर्चा करण्याची मागणी करण्यात आली.‘पत्रकार वर्सेस पत्रकार’असा सामना निदान डिजिटल माध्यमकर्मींमध्ये रंगू नये,अशी अपेक्षा देखील व्यक्त करण्यात आली.
संघटनेने आजची बैठक घेऊन,सर्वांचे विचार ऐकून खूप चांगली सुरवात केली आहे.असे सांगून संघटनेचे अध्यक्ष भीमराव लोणारे यांचे आभार उपस्थितांनी मानले.आत्मसन्मानाच्या या लढ्यासाठी खूप चांगली संधी उपलब्ध करुन दिली.या पुढे ही ‘एकी’ कायम राखली गेली पाहिजे,असा सूर उमटला.
प्रास्ताविक अमित वानखेडे यांनी केले.काल फक्त या बैठकीचा मॅसेज व्हायरल झाला तरी अनेकांना धडकी भरली.आज ओसंडून वाहणा-या या सभागृहातील उपस्थिती निश्चितच शहरातील मोठ्या माध्यकर्मींना विचारप्रवण करेल,असे ते म्हणाले.संघटनेचे सचिव विजय खवसे यांनी डिजिटल माध्यमांनी कसे वागले पाहिजे,कश्या पद्धतीने काम केले पाहिजे.याची रुपरेषा आजच्या बैठकीत स्पष्ट झाल्याचे ते म्हणाले.प्रेस क्लब किवा पत्रकार भवनाच्या विरोधात ही बैठक नाही तर आजच्या बैठकीत पारित झालेले ठराव हे म्हत्वाचे आहेत.प्रत्येकाने आपापल्या चॅनलवर योग्य कंटेट दिल्यास जाहीराती या आपोआप येतात.लवकरच नागपूर शहरात आपला सर्वांचा एक डिजिटल प्लॅटफार्म देखील असेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.संघटनेतील सदस्यांना संकट काळात,अडीअडचणीत आर्थिक मदत करता येईल यासाठी विमासारखी योजना राबविली जाईल.या शिवाय डिजिटल क्षेत्रात येऊ बघणा-या नव्या दमाच्या युट्यूबर्ससाठी प्रगत प्रशिक्षण देण्याची देखील सोय करता येईल.यात एडिटिंगपासून अद्यावत तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाईल.यासाठी सर्वांनी मिळून आर्थिक भार उचलल्या जाईल,अशी भूमिका खवसे यांनी स्पष्ट केली.आधी आपण स्वत:चे माध्यम मजबूत करु.मग इतरांना त्यात निमंत्रण देऊ,बघा आमचे कार्य,त्यातून आपल्या माध्यमाकडे बघण्याचा दृष्टिकोण बदलेल,अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये लोणारे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.प्रेस क्लब व पत्रकार भवनातील पत्रकार परिषदांवर ‘कायमचा’बहीष्काराचा ठराव त्यांनी पारित केला.शहरातील भाजपच्या जनसंपर्क पदाधिका-यांनी देखील आत्मचिंतन करावे,अन्यथा भाजपच्या पत्रकार परिषदांवर देखील डिजिटल संघटना बहीष्कार घालेल,असा इशारा त्यांनी दिला.लवकरच संघटनेचा निर्णय व अपेक्षा लिखित स्वरुपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाच्या माध्यमातून दिले जाईल,असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
बैठकीत वरिष्ठ पत्रकार डॉ.ममता खांडेकर,पत्रकार नावेद,अमोल तुमसरे,सनी सहारे,प्रणव सातोकर,विकी सोनकुसळे,रमेश रामटेके,प्रतीक पांडे,राकेश गजभिये,शीतल नंदनवार,अशोक माटे,अमित वांद्रे,अमजद शेख,दिनेश घरडे,भीमराव वानखेडे,सचिन बैस,सतीश कडू,आसिफ खान,रितेश बाजपेयी,नितेश जंगाडे,प्रेम मुंदाफळे,श्रीकांत सहारे,निहाल पाटील,संजय पांडे,अनिल बागडे,संजना तितरमारे,ख्वाजा फकीर आदी यांनी आपले विचार मांडले.
(बातमीशी संबंधित व्हिडीयोज Sattadheesh 0fficial युट्यूब चॅनलवर उपलब्ध)
……………………………….
Advertisements

Advertisements

Advertisements
