Advertisements

पदवीधरची सल भरुन निघणार!
प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर संदीप जोशी यांची आमदारकीवर उमटणार माेहोर
विधान परिषदेसाठी झाली नावाची घोषणा
१६ महिन्यांसाठीच राहतील आमदार:नशीबाची पुन्हा थट्टाच
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता.१६ मार्च २०२५: बरोबर पाच वर्षांपूर्वी १ डिसेंबर २०२० रोजी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पार पडली होती.भारतीय जनता पक्षाकडून तत्कालीन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून त्यांचा नागपूरातील दक्ष्ण-पश्चिम निवडणूक मतदारसंघ इमाने-इतबारे सांभाळणारे अत्यंत विश्वासू समजले जाणारे संदीप जोशी यांना उमेदवारी देण्यात आली होती तर काँग्रेसतर्फे ॲड.अभिजित वंजारी यांना मैदानात उतरवण्यात आले.भाजपाच्या विरोधासाठी, वैचारिक मतभेद असणारेही त्यावेळी एकत्रित आले होते.ती निवडणूक केवळ पक्षांची राहीली नव्हती तर पक्षांच्या अस्मितेची झाली होती व प्रत्येक कार्यकर्ता जाेमाने कामाला लागला होता.वंजारीसाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमधील क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार बैठकांवर बैठका घेत होते,त्या निवडणूकीत जोशी यांचा १८ हजार ९१० मतांनी पराभव झाला व भाजपचा हा परंपरागत मतदारसंघत धक्कादायकरित्या भाजपच्या हातातून निसटला होता.आता भारत निवडणूक आयोगाने राज्याच्या विधान परिषदेच्या पाच जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक जाहीर केली असून भाजपने ज्या तीन नावांची घोषणा केली त्यात एक नाव संदीप जोशी यांचे आहे.
विधान परिषदेचा आमदार हाेण्यासाठी संदीप जोशी यांना तब्बल पाच वर्षांंची प्रतिक्षा करावी लागली असून, जोशी यांना विधीमंडळात पोहोचण्यासाठी एक प्रदीर्घ प्रतिक्षेचा काळ लोटला आहे यात दुमत नाही.पदवीधरसाठी १ डिसेंबर रोजी मतदान झाले होते मात्र,मतमोजणीचा निकाल लागण्यासाठी ३२ तास प्रतिक्षा करावी लागली होती.वंजारी यांनी ६१ हजार ७०१ मते मिळवली होती तर संदीप जोशी यांना देखील लक्षणीय अशी ४२ हजार ७९१ मते मिळाली होती.ओबीसींची मते खेचण्यात केदार यांना लाभलेले यश,भाजपची अंतर्गत गुटबाजी यावरही जोशी यांच्या पराभवाचे खापर फोडल्या गेले होते.
पदवीधर निवडणूकीसाठी पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या गोटातले मानले जाणारे प्रा.अनिल सोले यांनाच उमेदवारी मिळेल अस कयास होता.गडकरी यांनी या निवडणूकीच्या आधी सोले यांना पुन्हा कामाला लागण्याची सूचना देखील केली होती,त्यामुळे पुन्हा एकदा पदवीधर मतदारसंघातून सोले हेच विधान परिषदेत जातील,या आशेने सोले यांनी पुन्हा एकदा संपूर्ण नागपूर विभाग पिंजून काढला होता.मात्र,फडणवीस यांच्या आग्रहातून जोशी यांना उमेदवारी जाहीर झाली.परिणामी,सोले व जोशी यांच्यातील नाराजी व खूर्चीची रस्सीखेच, भट सभागृहातील भाषणप्रसंगी देखील उपस्थितांनी अनुभवली होती.गडकरी यांचे याच सभेत एक विधान देखील त्यावेळी चांगलेच गाजले होते.‘जनताच मजा उतरवते’त्यांचे हे शब्द कोणाला उद्दृत करीत होते?याची चर्चा तात्काळ सभागृहात रंगली होती.सोले यांच्या नावाची एक बनावट पोस्ट देखील त्यावेळी चांगलीच व्हायरल झाली होती,ज्याची तक्रार सोले यांनी सायबर विभागाकडे केली होती.
केदार यांचे अचूक नियोजन व बहूजन समजावादी पक्षाने उमेदवारच न दिल्याने मत विभाजन झालेच नाही व जोशी यांना याचा फटका बसला होता.१ लाख ३२ हजार ९२३ मतदारांनी मतदान केले होते.नागपूर,भंडारा,गोंदिया,वर्धा,चंद्रपूर व गडचिरोली विभागात ६६ ते ७२ टक्क्यांपर्यंत मतदान झाले होते.एकूण ६३.३८ टक्के मतदान झाले होते.गोंदियामध्ये तर स्वत: राष्ट्रवादीचे खासदार प्रफूल्ल पटेल यांनी जबाबदारी सांभाळली होती.पूर्व विदर्भात काँग्रेसचे नाना पटोले व प्रफूल्ल पटेल यांनी प्रचाराचा धडाका लावला होता.चंद्रपूर येथे वंजारी यांच्यासाठी तत्कालीन मदत व पुर्नवसनमंत्री विजय वडेट्टीवारांनी सभा घेतली.सर्व जिल्ह्यातील अनेक शिक्षण संस्थांना जोशी यांच्या विरोधात एका मंचावर आणण्याची किमया महाविकासआघाडीतील नेत्यांनी लिलया साधली होती.गृहमंत्री अनिल देशमुख,उर्जामंत्री नितीन राऊत यांनी देखील वंजारी यांच्या विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
ग्रामीण भागात पदवीधरांची लाभलेली साथ आणि सवर्ण जोशी यांच्या विरोधात ओबीसी फॅक्टर अत्यंत प्रभावीपणे चालल्याने, पहिल्या तीन फे-यातच काँग्रेसचे वंजारी यांनी आघाडी घेतली होती व भाजपचे संघटन गडगडल्याची नांदी ठरली होती.पदवीधर मतदारसंघ हा सुरवातीपासून जनसंघ व नंतर भाजपचा गड मानला जात होता.पाच दशकात एकदाही प्रतिस्पर्ध्यांना आघाडी घेता आली नव्हती.त्यावेळी देखील भाजपचे जोशी हे पहील्या पसंतीतच बाजी मारतील असा दावा केला जात होता.मात्र,पदवीधर मतदारांनी वंजारी यांच्या पारड्यात टाकलेली भरघोस मते यामुळे मतमोजणी केंद्रातील वातावरणाचा नूरच पालटला.काँग्रेससह महाविकासआघाडीच्या गोटात उत्साह संचारला तर भाजपच्या समर्थकांची संख्या रोडावू लागली.वंजारी यांना ग्रामीण भागाची मिळालेली साथ,ओबीसी फॅक्टर यासोबतच तत्कालीन नागपूरातील मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या गच्छंती मागे जोशी यांचा हात असल्याचा सोशल मिडीयावर झालेला प्रचार तसेच गडकरी यांची या निवडणूकीत साथ नसणे अशी अनेक कारणे त्यावेळी चर्चिली गेली होती.भाजपचा गड कोणी उधवस्त केला,कुणाला खिंडीत गाठले यावर कार्यकर्त्यांमध्ये अनेक दिवस चर्वितचर्वण होत राहीले.माझ्या नावातच ‘जीत’असल्याची वल्गना वंजारी यांनी यानंतर केली होती.
फडणवीस यांना देखील कट्टर समर्थक असलेले माजी महापौर संदीप जोशी यांच्या पराभवाने जबर धक्का बसला होता.याशिवाय आघाडीतील पक्षांची एकजूट महाराष्ट्रात काय चमत्कार घडवू शकते याचा देखील चांगलाच अंदाज आला होता.राज्यातील सत्तांतरानंतरची ही पहिलीच निवडणूक होती.फडणवीस यांच्याच होम टाऊनमध्ये असलेल्या या निवडणूकीकडे संपूर्ण राज्याचेच लक्ष लागले होते.नागपूरात कुठल्याही परिस्थितीत फडणवीस यांचा उमेदवार पाडणार असा चंगच आघाडीतील नेत्यांनी बांधला होता.गडकरी यांचा शब्द डावलल्या गेल्यामुळे गडकरी समर्थक हे देखील पक्षाच्या या लढ्यापासून अलिप्तच होते.परिणामी,जोशी यांना २०२० मध्ये कशाप्रकारे आमदारकीने हूलकावणी दिली होती,हे अद्यापही नागपूरकर विसरले नाहीत.
जोशी यांचा महापौर पदाचा कार्यकाळ देखील असाच ‘कमनशीबीचा’म्हटल्या जातो.१८ नोव्हेंबर २०१९ रोजी जोशी यांनी निवड महापौर पदासाठी झाली मात्र त्यांना फक्त सव्वा वर्षांचाच कार्यकाळ मिळणार होता.उर्वरित सव्वा वर्षांसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते व हिंदी भाषिकांमध्ये फायरब्रॅण्ड म्हणून ओळखले जाणारे दयाशंकर तिवारी यांच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडणार होती व पुढे ते सव्वा वर्षांसाठी महापौर देखील झाले.पक्षांतर्गत नाराजी टाळण्यासाठी भाजपने अमलात आणलेला महापौर पदाचा ‘फिफ्टी-फिफ्टी’फॉर्म्युल्यामुळे देखील संदीप जोशी यांना एवढ्या कमी काळात आपला ठसा उमटवता आला नाही.त्यात मार्च २०२० पासून जगभरात करोनाचे थैमान माजले,लॉक डाऊन सुरु झाला,लोकप्रतिनिधींच्या निर्णयांना व धोरणांना अगदी राष्ट्रीय पातळीवरुनच चाप बसला.‘दुष्काळात तेरावा महिना’या उक्तीप्रमाणे त्याचवेळी नागपूर मनपात वादग्रस्त सनदी अधिकारी तुकाराम मुंढे आयुक्त पदी विराजमान झाले.आघाडीतील राष्ट्रावादीच्या जयंत पाटील यांच्यासोबत मुंढे यांचा हास्यविनोदाचे छायाचित्र चांगलेच व्हायरल झाले होते.फडणवीस यांच्या नागपूर शहरात भाजपची सत्ता असलेल्या मनपात ‘भाजपची कशी जिरवतोय’असा अर्थ त्यातून ध्वनित होत होता.
परिणामी,मुंढे व जोशी यांच्यात अनेक बाबींमध्ये वारंवार खटके उडत असे.प्रोटोकॉलनुसार आयुक्त हे रुजू झाल्यावर महापौरांच्या कक्षात भेट देतात मात्र,मुंढे यांनी ते टाळले.सत्ताधा-यांच्या अनेक निर्णयांना त्यांनी रोखून धरले.पाणी दरवाढ विरोधात भाजपने आयुक्तांच्या कक्षासमोरच जोरदार आंदोलन केले होते.कोरोना काळात रुग्णांची होणारी ससेहोलपट याविषयी महापौर संदीप जोशी यांनी मनपा प्रशासनाच्या दाव्यांची शहनिशा करण्यासाठी समिती देखील गठीत केली होती.तुकारम मुंढेच्या काळात नागपूर हे सातत्याने ‘रेड झोन’मध्ये राहीले.मात्र,शहरातील व्यापा-यांविषयी घेतलेली कठोर भूमिका मुंढेंच्या अंगलगट आली.जोखिमेच्या नसलेल्या व्यापार उद्दीमांना देखील नोंदणीची सक्ती तसेच दर वर्षी पुर्ननोंदणीची सूचना मुंढे यांनी केल्याने व्यापारी वर्ग संतापला.त्यांनी गडकरी यांची भेट घेतली.तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गडकरी यांचे राजकारणा पलीकडे मधुर संबंध बघता अवघ्या ७ महिन्यातच मुंढे यांची नागपूरातून उचलबांगडी झाली.बारा वर्षांच्या नोकरीत मुंढे यांची ही तेरावी बदली होती,हे विशेष!
जोशी यांनी महापौर पदाच्या आपल्या अल्पकाळात देखील काही चांगले व स्तुत्य उपक्रम शहरात राबवण्याचा प्रयत्न केला.त्यात,मुख्यमंत्री यांच्या धर्तीवर ‘महापौर सहाय्यता निधी’असो किवा ‘वॉक ॲण्ड टॉक विथ मेअर’उपक्रम असो.शहरातील अनेक उद्यानात पहाटेच महापौर जात असून, वॉकिंग व जॉगिंगसाठी आलेल्या पहाटपक्ष्यांकडून शहरातील समस्या समजून घेत असे.याशिवाय त्यांनी संपूर्ण झोन कार्यालय व मनपा मुख्यालयात ‘सजेशन बॉक्स‘ठेवले.त्यात प्रतिक्रियांचा चांगलाच पाऊस पडत असते.शहरातील ८७ पेट्रोलपंपावरील स्वच्छता गृहे महिलांसाठी खुली करण्याचे आदेश दिले.यासंबधीचे फलकच मनपाद्वारे सर्व पेट्रोलपंपांवर लावण्यात आले.महापौर निधीतून ३२ सुलभ शौचालयांचे भूमीपूजन करण्यात आले.भंगारातील दोन बसेसचे, प्रसाधनगृहात रुपांतर करुन ’ती शौचालय’असे नामकरण करण्यात आले.‘झेप’या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेेक स्तुत्य उपक्रम राबवले.अवघ्या दहा रुपयात गेल्या काही वर्षांपासून मेडीकल रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी पंडित दिनदयाल थालीचा उपक्रम याचे देखील बरेच कौतूक होत असतं.गडकरी यांचा ’खासदार क्रीडा महोत्सवाची’ सगळी धुरा गेल्या अनेक वर्षांपासून जोशी हे आपल्या खांद्यावर यशस्वीपणे पेलवत आहेत.
मात्र,करोनाचा अतिशय जीवघेणा काळ त्यात राज्यात भाजपची सत्ता नसणे,त्यात तुकराम मुंढे यांच्यासारखा करारी आयुक्त मानगुटीवर येऊन बसणे,या सर्व बाबींमुळे संदीप जोशी यांचा महापौर पदाचा कार्यकाळ कधी संपला हे नागपूरकरांना देखील कळले नाही!
मार्च २०२० नंतर मनपाची एक ही सभा पार पडली नसल्याने नगरसेवकांच्या दबावातून महापौर जोशी यांनी भट सभागृहात मनपाची आमसभा जून २०२० मध्ये पार पाडली.या सभेत दटके,दयाशंकर तिवारी,अविनाश ठाकरे यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी मुंढे यांच्या एककल्ली कारभारातून कठोर टिका केली.विरोधी पक्षातील ग्वालबंशी नावाच्या नगरसेवकाने सभेत मुद्दा मांडताना,‘ते एक तुकाराम होते आणि हे एक तुकाराम आहे’असे वाक्य उच्चारताच मुंढे भर सभेतून तावातावाने निघून गेले आणि संपूर्ण सभागृह अवाक झाले! त्यांची ही वर्तवणूक प्रोटोकॉलला धरुन नव्हती.परिणामी,मुंढे निघून गेल्यावर महापौरांवर, मुंढे यांच्या विरोधात राज्य शासनाकडे कठोर कारवाईची मागणी करण्याची सूचना भाजपच्या सर्व नेत्यांनी केली मात्र,जोशी यांनी आपल्या सामोपचाराच्या स्वभावातून, मुंढे यांना सभेत परत बोलावू,एक संधी देऊ अशी पाठराखण केली होती.मुंढे यांचा हा ‘आततायीपणा’ मुंबईतील त्यांच्या सत्ताधारी ’आकांना‘देखील रुचला नसल्याने मुंढे हे काही काळाने सभागृहात परतले!
जोशी हे महापालिकेत दोनवेळा स्थायी समितीचे सभापती राहीले आहेत.त्यानंतर ते सत्ता पक्ष नेते व महापौर देखील झाले.त्यांचे वडील दिवंगत दिवाकर जोशी हे देखील शिक्षक मतदार संघातून विधान परिषदेत आमदार राहीले आहेत.आता प्रदीर्घ काळानंतर संदीप जोशी यांना देखील आमदार होण्याची संधी प्राप्त झाली आहे.पदवीधरच्या पराभवानंतर देखील फडणवीस यांच्याशी एकनिष्ठ असलेले जोशी यांना नागपूरातील ‘देवगिरी‘बंगल्यात जनतेची गा-हाणी ऐकण्यासाठी फडणवीस यांचे मानद सचिव पद त्यांना बहाल करण्यात आले होते.फडणवीस यांना प्रत्यक्ष न भेटू शकणारी जनता यांनी संदीप जोशींकडे आपापल्या समस्या व तक्रारींचा पाऊस पाडला.
नागपूर शहरातील भाजपचे आणखी एक कद्दावर नेते व आमदार प्रवीण दटके यांची या आधीच विधान परिषदेत वर्णी लागली मात्र,नुकतेच मध्य नागपूरातून ते विधान सभेत गेल्याने त्यांची जागा रिक्त झाली.परिणामी येत्या २७ मार्च रोजी होणा-या पोटनिवडणूकीसाठी भाजपतर्फे तीन नावे घोषित करण्यात आली.त्यात संजय केनेकर,दादाराव केचे व संदीप जोशी यांची नावे घोषित झाली आहे.विधान सभेच्या पाच रिक्त जागेत तीन भाजप,एक राष्ट्रवादी अजित पवार गट व एक शिंदे गटाला जागा मिळणार आहे.मात्र,संदीप जोशी यांना अवघ्या १६ महिन्यांचीच आमदारकी मिळणार असून प्रवीण दटके यांचा कार्यकाळ १३ मे २०२६ रोजी संपणार.एवढाच कार्यकाळ संदीप जोशी यांच्या वाट्याला आला आहे.दुसरीकडे अजित पवार यांच्या आमदाराला तब्बल साढे पाच वर्षांसाठी विधान सभेची आमदारकी मिळणार आहे!परिणामी,या ही बाबतीत जोशी यांच्या ‘भाग्या’वर चर्चा झडत आहे.
थोडक्यात,‘जात‘ बघून त्या नेत्याच्या मागे एकवटणारे राजकारण ज्या महाराष्ट्रात गेल्या काही दशकात खोलवर रुजलं ,ते बघता जोशी यांना विधी मंडळात पोहोचायला बराच काळखंड लागला हे नाकारता येत नाही.म्हणूनच एकदा पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेत त्यांनी माझं आडनाव ‘जोशी‘नसतं तर आमदार होण्याची संधी ब-याच आधी मिळाली असती,अशी खंत व्यक्त करण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती हे देखील तितकंच खरं.२०२० मध्ये पदवीधर साठी आमदार अभिजित वंजारी यांच्या विजयासाठी सुनील केदार मैदानात उतरले होते,तो पराभव पुसून काढत आता संदीप जोशींसाठी पुन्हा एकदा फडणवीस मैदानात उतरल्याचे दिसून पडत आहे.
…………………………………
Advertisements

Advertisements

Advertisements
