अखिल विश्व भारती को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या २१४ प्लॉटधारक पिडीतांचा आरोप
तळेगाव-दाभाडे योजनेतील मौजा नारा येथील भूखंड: नागपूर सुधार प्रन्यासचा आणखी एक भ्रष्ट व्यवहार उजागर
भूखंड लाटणा-या गुंडांसोबत नासुप्र अधिका-यांची मिलीभगत
जरीपटका पोलिस ठाण्यातील अधिका-यांवर केले पत्रकार परिषदेत गंभीर आरोप
पिडीत महिलेला बसवून ठेवले पोलिस ठाण्यात, पोलिस अधिकारी आरोपींसोबत कक्षात!
मनपा,नासुप्र स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सामान्यांना त्रास देणारा:न्यायालयाच्या आदेशानांही जुमानत नाही!
ज्येष्ठ नागरिकांना वारंवार मारहाण: महावितरणने वीज ही कापली,घरातून टाकतात गडर लाईन,प्लॉट धारकांचे रस्ते ही केले बंद!
पत्रकार परिषदेत पिडीतांचे अश्रू अनावर!
नागपूर,ता.२० फेब्रुवरी २०२५: अखिल विश्व भारती को-ऑपरेटिव्ह सोसायटी खसरा क्र. १३०/८,३६/१ च्या एकूण २१४ प्लॉटधारक,खसरा क्र. १३०/८,३६/१ हे मौजा नारीचे रहीवाशी आहेत.या प्लॉटवर काही प्लॉटधारकांनी घरे बांधली व मागील ३० वर्षांपासून राहत आहेत.मात्र,आता काही गुंड प्रवृत्तीचे लोकं हा १६०० चौ.फूटांचा भूखंड हडपण्यासाठी नागपूर सुधार प्रन्यासचे तसेच जरीपटका पोलिस ठाण्यातील काही भ्रष्ट पोलिस अधिका-यांच्या सहकार्याने, मूळ प्लॉट धारकांना धमकावून त्या ठिकाणाहून हूसकावून लावत असल्याचा गंभीर आरोप अखिल विश्व भारती को-ऑपरेटिव्ह सोसायटीतील पिडीत कमलजीत सिंग यांनी आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.
आमच्या प्लॉट्सवर कब्जा करण्यासाठी ‘मानव सेवा’ या बोगस संस्थेच्या नावाने खोटे नकाशे व कागदपत्रे बनवून त्या आधारावर भ्रष्ट अधिका-यांना हाताशी धरुन आम्हाला खोटे पाडण्याचा प्रयत्न त्यांनी केला मात्र,न्यायालयाने त्यांचा मुद्दा अमान्य करुन अखिल विश्व भारती को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या प्लॉट धारकांचा दावा या भूखंडावर मान्य केला.१९८० ते १९९३ दरम्यान नासुप्रने आमच्या हाऊसिंग सोसायटीच्या प्लॉट धारकांची रजिस्ट्री करुन दिली.२००२ मध्ये बोगस संस्थेने बोगस नावाने या भूखंडावर दावा केला मात्र,१९९७ तसेच २०१७ मध्ये न्यायालयाने आमचा दावा मान्य केला.या भूखंडावर ९९ टक्के अनुसूचित जातीचे प्लॉटधारक असल्याचे सिंग यांनी सांगितले.महत्वाचे म्हणजे माहितीच्या अधिकारात मानव सेवा संस्थेविषयी कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नाहीत,असे सिंग यांनी सांगितले.
नासुप्रने जिल्हाधिकारी यांना केलेल्या पत्र व्यवहारात या भूखंडाचा व्यवहार आमच्या सोसायटीसोबत झाला असल्याचे मान्य केले आहे तरी देखील,नासुप्रचे काही अतिशय भ्रष्ट अधिकारी व सभापती देखील न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना करुन, या भूखंडावर खोटे दस्तावेज लाऊन दावा करणा-यांची साथ देऊन या भू-माफियांना प्लॉटचे नकाशे मंजूर करुन त्यांना विविध नागरी सुविधा पुरविण्यात पुढाकार घेत असल्याचा आरोप सिंग यांनी केला.
न्यायालयाच्या आदेशात नासुप्रच्या सभापतींच्या कारभारावर देखील कठोर तोशेरे ओढण्यात आले आहे.ते या भूखंडाच्या बाबतीत न्यायालयीन लढा हरले आहेत असे सांगत, तळेगाव-दाभाडे योजनेअंतर्गत या भूखंडांवर ५०० चौ.फूटांपेक्षा जास्त प्लॉट्स पडू शकत नाही तरी देखील त्यांच्या आर्शिवादाने दोन ते तीन हजार चौ.फूटांवर मोठमोठ्या इमारती उभारल्या जात आहेत.मुख्यमंत्र्यांच्या शहरात कायद्यांची पायमल्ली होत असून या भूखंडावर अवैध इमारती उभारल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
२०१७ मध्ये न्यायमूर्ती पी.पी.नायगांवकर यांनी १५ डिसेंबर २०१७ रोजी मालकी हक्क तसेच डिग्री ही अखिल विश्व भारती हाऊसिंग सोसायटीची असल्याचा निर्णय दिला.याशिवाय या भूखंडावरील प्लॉट क्र.९९,१० व ३९ वरील प्लॉट धारकांची मालकी देखील वेळोवेळी पार पडलेल्या न्यायालीयन लढ्यात न्यायालयाने मान्य केली,याचा अर्थ संपूर्ण २१४ प्लॉट धारकांचा दावा या भूखंडावर मान्य होतो मात्र,नासुप्रने एकाच भूखंडावर भू-माफियांना मदत करण्यासाठी एकाच मुलाचे चार-चार बाप बनवले असल्याचा संताप सिंग व्यक्त करतात.
आता,उर्वरित रिकाम्या प्लॉट्सवर अवैध इमारतींची निर्मिती होत असून आमच्या राहत्या घराचे रस्ते बंद करण्यात आलेत.महावितरणने आमची वीज बंद केली,आम्ही सौर उर्जेवर काम चालवित आहोत,आमच्या घराच्या आतून भू-माफिया व गुंड जबरीने गडर लाईन काढत आहेत,आम्ही वयाने अतिशय ज्येष्ठ असून भू-माफियाचे गुंड हे आमच्या अंगावर धावून येतात, एका ज्येष्ठ नागरिकाला,गुंडशाहीला विरोध केल्याने जबर मारहाण करण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव त्यांनी मांडले.पत्रकार परिषदेत आनंद महादेवराव वासनिक नावाच्या गृहस्थांनी सांगितले की माझ्या नावाची १९९० पासून रजिस्ट्री असताना दुस-याच वासनिक नावाच्या माणसाला माझा प्लॉट विकण्यात आला!मी कुठे न्याय मागावा?

आम्ही वारंवार जरीपटका पोलिस ठाण्यात तक्रारी करतो,२००७ पासून आजपर्यंत ५० ते ५५
तक्रारी केल्या आहेत.मात्र,आमच्या तक्रारीची दखल घेऊन आरोपींविरुद्ध जरीपटका पोलिस ठाण्याचे डीसीपी गुन्हा दाखल करीत नाही!न्यायालयाच्या निर्णयांनंतर देखील आमचीच कागदपत्रे बोगस असल्याचे ते सांगतात.मूळात पोलिस ठाण्यातील अधिकारी किवा कर्मचारी हे किती शिकले असतात?असा सवाल करीत,आमच्या हाऊसिंग सोसायटीतील प्रत्येक प्लॉटधारक हा उच्च शिक्षीत आहे,तरी देखील गुंडांच्या इशा-यावर आमच्यावरच ॲट्रासिटीचे गुन्हे जरीपटका पोलिसांनी दाखल केले?असा संताप सिंग यांनी व्यक्त केला.पोलिस आयुक्त जनतेच्या प्रश्नांवर सुनावणी घेतात मात्र,त्यांच्या दरबारात ही आमचा प्रश्न सुटला नाही कारण,ते आमचे निवेदन डीसीपीला देतात,डीसीपी झोनच्या अधिका-याला आणि तिथून पुन्हा नागरिकांचे आवेदन त्याच पोलिस ठाण्यात येतात ज्यांच्याकडून त्यांना न्याय मिळत नाही!असे वास्तव सिंग यांनी मांडले.
आमच्यावरील अन्यायविरुद्ध आम्ही पंतप्रधान कार्यालयाला लिहले,त्यांनी आमच्या तक्रारीची तातडीने दखल घेत महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना उचित कारवाईचे निर्देश दिले. हे पत्र आमच्या सोसायटीचे मुखत्यारपत्र धारक एन.एम.सहारे यांना प्राप्त झाले.गृह मंत्रालयाने देखील पोलिस महासंचालकाला पत्र दिले,त्यांनी पोलिस आयुक्तांना पत्र दिले,या संपूर्ण पत्र व्यवहारात आमच्यासारखे ज्येष्ठ नागरिक असलेल्या पिडीतांना कुठलाही न्याय मिळाला नाही,असे सांगत, आम्ही दररोज आमच्या हक्काच्या भूंखडावर होणारे ‘प्रशासकीय’अतिक्रमण बघत आहोत,उभारल्या जाणा-या अनाधिकृत इमारतींंमुळे आमचे घराचे हक्काचे रस्ते देखील ‘विकल्या‘गेले असल्याचे वास्तव ते मांडतात.

(छायाचित्र : चाळीस वर्षांपूर्वी ज्या अखिल विश्व भारती हाऊसिंग सोसायटीतील डॉ.काळे यांच्या नावाने रजिस्ट्री झाली त्याच प्लॉटवर जबरीने कब्जा करुन सय्यद अली सिद्दीकी नावाचा फलक फहीम अंसारी व उमेद अंसारी यांनी लावला असून जो पत्ता त्यात दर्शवला आहे त्या पत्त्यावर सय्यद अली सिद्दीकी नावाने कोणीही राहत नाही!)
पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्या जनता दरबारातही आम्ही आमची कैफियत मांडली,त्यांच्याकडून नासुप्रच्या अधिका-यांना पत्र ही गेले मात्र,कोणतीही कारवाई झाली नाही.यामुळे ९ फेब्रुवरी २०२५ पासून आम्ही सर्व ज्येष्ठ प्लॉट धारकांनी १५ दिवसांचे महामानव कॉलनी उर्फ आर्य नगर,समता नगर रोड,मनमीते रेस्टॉरेन्ट जवळ,मौजा नारी साेसायटीच्या फाटकाजवळ साखळी उपोषण केले मात्र,याची देखील कोणतीही दखल नासुप्र अधिकारी व जरीपटका पोलिसांनी घेतली नाही.
जरीपटका पोलिस ठाण्यातील डीसीपी कदम यांना दोरजे मॅडम यांनी सूचना करुन आमचे प्रश्न सोडवण्याचे आदेश दिले होते मात्र,कदम यांनी आम्हा पिडीतांना बाहेर बसवले व आरोपींना एक तास स्वत:च्या कक्षात घेऊन बसले,असा गंभीर आरोप पत्रकार परिषदेत ऑन कॅमरा पिडीतांनी केला.आमचा पूर्ण लढा हा भू-माफिया आणि त्यांच्याशी संगनमत करणा-या नासुप्र अधिकारी व जरीपटका पोलिस ठाण्यातील भ्रष्ट अधिकारी यांच्या विरोधात असून आता नागपूरकर जनतेच्या दरबारात न्यायासाठी पत्रकार परिषद घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत पिडीतांनी फहीम अंसारी,उमेर अंसारी,सय्यद जावेद इकबाल,हबीब मिर्जा,प्रवीण इंदुरकुमार बलानी,सुधीर मेश्राम,रंजना वासनिक व नरेंद्र बांबोर्डे यांच्याकडून होणा-या छळाविषयी व मारहाणीविषयी आपली कैफियत मांडली.
नासुप्र म्हणते चुकुन आर.एल दिले !
२१४ प्लॉट धारकांकडे अधिकृत रजिस्ट्री असून फक्त आखीव पत्रिकेत नाव नसल्याचा फायदा नासुप्रच्या भ्रष्ट अधिका-यांनी घेतला व बोगस नावाने दावा करणा-या संस्थेच्या सदस्यांना आर.एल दिले.यावर आक्षेप घेतला असता नासुप्रचे अधिकारी यांनी चुकून २२ लोकांना आर.एल देण्यात आल्याचे सांगत या पुढे बोगस संस्थेच्या सदस्यांना आर.एल.देणार नसल्याचे सांगितले तरी देखील पुढे एकूण ९७ लोकांच्या नावे आर.एल करुन देण्यात आले!मौजा नारी,खसर क्र. १३०/८,३६/१ येथील रिकामे भूखंड हे भूखंड माफियांसाठी तसेच नासुप्रच्या भ्रष्ट अधिका-यांसाठी पैसे कमावण्याचे कुरण झाले असून,गृहखाते ज्यांच्याकडे आहे त्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याच शहरातील ज्येष्ठ नागरिकांवर होणारा अन्याय तातडीने दूर करुन जरीपटका पोलिस ठाण्याच्या भ्रष्ट पोलिसांचा कारभार सुधारावा,अशी मागणी त्यांनी केली.
बातमीशी संबंधित सर्व व्हिडीयोज Sattadheesh official youtube चॅनलवर उपलब्ध)
……………….