फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूज#Delhi electionदिल्लीतही महाराष्ट्राची पुर्नरावृत्ती:बोगस मतदान भाजपला तारणार

#Delhi electionदिल्लीतही महाराष्ट्राची पुर्नरावृत्ती:बोगस मतदान भाजपला तारणार

Advertisements

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता.७ फेब्रुवरी २०२५: दिल्ली विधान सभेच्या निवडणूकीसाठी नुकतेच ५ फेब्रुवरी रोजी मतदान पार पडले व यानंतर लगेचच जितके पण एग्झिट पोल प्रसिद्ध झाले त्यात कुठेही केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष विजयी होताना दिसून पडत नाही, तर भारतीय जनता पक्षाची बहूमताची सत्ता येत असल्याचा दावा केला जात आहे.या एग्झिट पोलचे आकलन यावर सोशल मिडीयावर चांगलेच वाकयुद्ध छेडले गेले असून, अनेक निवडणूकतज्ज्ञ यांनी जाहीरपणे आपली नाराजी व महाराष्ट्राच्या निवडणूकीच्या पुर्नरावृत्तीची आशंका व्यक्त केली आहे.देशभरातील या निवडणूकतज्ज्ञांच्या मनातील शंका ही कितपत खरी ठरते याचा निकाल उद्या ८ तारखेला मतमोजणीनंतर लागणारच आहे.आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दिल्ली निवडणूकांवर माध्यमांना प्रतिक्रिया देताना , उद्या निकालानंतर दिल्लीत राहूल गांधी यांचा काँग्रेस पक्ष नावालाही उरणार नसल्याचा दावा केला आहे.महत्वाचे म्हणजे राहूल गांधी यांनी संसदेत महाराष्ट्रातील निवडणूकीत ७० लाख अचानक वाढलेले मतदार यावर वारंवार भाष्य केले,या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी उपरोक्त विधान केले.

एग्झिट पोल्सनुसार आम आदमी पक्षाला ३२ ते ३७,भाजप ३५ ते ४० काँग्रेसला २ ते ३ जागा तर इतरांना शून्य जागा मिळणार असल्याचा दावा करण्यात आला.केजरीवाल यांनी प्रत्येक मतदारसंघात पाच ते सात हजार मतांच्या फेरफारीचा आरोप केला आहे.प्रत्येक मतदारसंघात किमान ५ हजार मतदारांची नावे डिलिट करण्यात आली असून  त्या ठिकाणी नव्या मतदारांची नावे टाकण्यात आली,असा सरळ आरोप केजरीवाल करतात.परिणामी,हरियाणा व महाराष्ट्र मॉडेलप्रमाणेच दिल्लीच्या निवडणूका भाजपने लढल्या का?याचे उत्तर निवडणूकतज्ज्ञ डिजिटल माध्यमांमध्ये देताना आढळतात.मतदार यादीतील घोळ यामुळेच दिल्लीतील निवडणूकीत जय-पराजयाचा उद्या निकाल लागणार असल्याचा दावा ते करतात.

निवडणूकतज्ज्ञ सांगतात की दिल्लीतील आकडे हे उद्या त्यांना स्तंभित करतील ज्यांनी मतदान केले!जमिनीस्तरावर ज्याप्रमाणे मतदारांची मानसिकता दिसून पडते त्या स्वरुपात अलीकडे ईव्हीएम मशीनमधून निकाल निघत नाहीत!दिल्लीतील ही तिसरी अशी निवडणूक असेल जी जमिनीस्तरावरील वास्तवाशी मेळ खाणारी नसेल.मतदानापासून ते मतमोजणीपर्यंत भारताचा निवडणूक आयोग मतदानाची टक्केवारी वारंवार वाढवत असते,हल्ली निवडणूक कुठे चालल्या तर मुख्य निवडणूक अायुक्त राजीवकुमार यांच्या घराकडे जाताना दिसून पडतात,लोकशाही जिवंत ठेवणा-या मतदारांच्या विश्‍वासाकडे नाही,अशी सरळ टिका निवडणूकतज्ज्ञ करतात.जमिनीस्तरावर केलेल्या सर्वेक्षणातून कुठेही दिल्लीत भाजपला इतकी मोठी लीड मिळताना दिसून पडली नाही मात्र,झाडून पुसुन सर्व एग्झिट पोल्स हे भाजपच्या र्निभेळ बहूमताचा दावा करताना दिसून पडतेय,यावरुन दिल्लीतील निवडणूकीचाही अंदाज येतो,असे ते सांगतात.

दिल्लीत जो काँग्रेस पक्ष गेल्या २७ वर्षांपासून पूर्णत:गायब झाला होता, किमान १५ ते १६ जागांवर काँग्रेस पक्ष जिवंत होताना दिसला,असा दावा ते करतात.जो मतदार आप पक्षाकडून रुसला आहे त्याने या निवडणूकीत काँग्रेसला जवळ केले.त्यामुळे आप पक्षाचा विजयाचा खेळ काँग्रेस खराब करेल यात शंका नाही.यात भाजपची फार मोठी कमाल नाही मात्र,सत्ता पक्षावर नाराज मतदार हा आप पक्षा ऐवजी यंदा काँग्रेसला मत देताना दिसून पडला.एकेकाळी ही मते काँग्रेसचीच होती,आप पक्षाने काँग्रेसचीच पारंपारिक मते घेऊन दोन वेळा दिल्लीत सत्ता स्थापन केली,आता काँग्रेसने परत आपली पारंपारिक मते मिळवण्याचा चांगला प्रयत्न केला असल्याचे निवडणूकतज्ज्ञ सांगतात.यंदा किमान १५ ते १६ जागांवर काँग्रेसच्या बूथवर मतदारांचा उत्साह दिसून पडला.एकेकाळी काँग्रेसच्या निवडणूक मतदानाच्या बूथवरुन मतदाराच गायब झाले होते,हे विशेष!जो प्रकार आप पक्षाने गुजरात,पंजाबमध्ये काँग्रेससोबत केला,त्याचा वचपा दिल्लीतील निवडणूकीत काँग्रेस घेताना दिसून पडतेय,असा दावा ते करतात.दिल्लीतील निवडणूक प्रचारात राहूल गांधी यांनी भाजपापेक्षाही सर्वाधिक टिका केली ती अरविंद केजरीवाल यांच्या कारभारावर,हे ही विसरता येत नाही.

ज्याप्रकारे मतदानादरम्यान केजरीवालांना पोलिसांनी केलेली अटक,मुख्यमंत्री आतिशी रात्रभर पोलिस ठाण्यात चकरा मारत राहीली,मनीष सिसोदियाची पोलिसांसोबत गल्लीतील भांडणे होत होती हा सर्व प्रकार ‘विजयाचा हरियाणा मॉडेल’याचीच पुर्नरावृत्ती असल्याचे ते मानतात.ऑक्टोबर २०२४ मध्ये हरियाणात भाजपची तिस-यांदा सत्ता येत आहे हे जमिनीस्तरावर कोणीही मान्य करीत नव्हते.ना मतदार ना जाणकार मात्र,तरीही चमत्कार घडला.मध्यप्रदेश,छत्तीसगढ,हरियाणा आणि महाराष्ट्राचा निवडणूक परिणाम हा मतदारांसह आम जनतेला मानसिक ‘धक्का’देणारा होता.त्यामुळेच मोदी,शहा आणि राजीवकुमार यांच्या तिकडीसमोर मोठमोठे निवडणूकतज्ज्ञ हे निकालांबात सपशेल खोटे ठरत आहेत.२०१३ च्या दिल्लीच्या विधान सभेच्या मतदानानंतर ९ पैकी फक्त १ एग्झिट पोल असं होतं जे वास्तवाच्या जवळपास होतं,खरं नव्हतं मात्र जवळपास होतं,२०१५ च्या मतदानानंतर तर प्रसिद्ध झालेले  सगळेच्या सगळे एग्झिट पोल्स हे खोटे ठरले व २०२० च्या एग्झिट पोलनंतर ही १२ पैकी १ खरं ठरले ११ सपशेल खोटे ठरले होते.
गेल्या वर्षी लोकसभेच्या मे महिन्यात झालेल्या निवडणूकीत एका ही एग्झिट पोलने मोदी यांना ३७० पेक्षा कमी जागा दाखवल्या नव्हत्या!प्रत्यक्ष निकाल काय आला?एग्झिट पोल्स म्हणजे संभावित निकाल असतो,मात्र सत्ताधारी पक्षासाठी मतदारांची मानसिकता तयार करण्याचे काम हल्ली एग्झिट पोल्स करताना दिसून पडतात,असा गंभीर आरोप निवडणूकतज्ज्ञ करतात.हरियाणामध्ये भाजपचे संपूर्ण मंत्रीमंडळ हरले होते.१२ पैकी १० मंत्र्यांना मतदारांनी घरी बसवले.मात्र,तरीही निवडणूक भाजपच जिंकली.याचे कारण डेटा मेन्यूपलेशन (माहिती हाताळणे)असल्याचा गंभीर आरोप ते करतात.

नवी दिल्लीतील केजरीवाल यांच्या मतदारसंघातून साढे आठ हजार मतदारांची नावे मतदार यादीतून गायब करण्यात आल्याचा आरोप झाला.मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे धृतराष्ट्र बनून बसले.कोणी कापले,का कापले,कसे कापले जेव्हा की ते सर्व मतदार हे तेथील मूळ रहीवाशी होते,यावर राजीव कुमार यांनी तोंड उघडलेच नाही!याशिवाय एकेका आमदारच्या नोकरांच्या खोल्यांमध्ये ३०-४० मतदारांची नावे मतदार यादीत घुसडण्याचा खेळ करण्यात आला.यालाच डेटा मेन्यूपलेशन म्हणतात.
भाजपची कोणतीही निवडणूक लढण्याची एक स्ट्रेटेजी असते.हरियाणा सारख्या लहानशा प्रदेशात भाजपचे दीड लाख पन्ना प्रमुख होते.एकेका पन्ना प्रमुखाकडे ६० मतदारांची जबाबदारी सोपविण्यात आली होती.हे पन्ना प्रमुख त्याच गल्लीत राहातात जिथे हे ६० मतदार राहतात.त्यामुळे या पन्ना प्रमुखांना कोणता मतदार कोणत्या पक्षाला मत देतो,याची त्यांना अचूक माहिती असते.या माहितीच्या आधारावर जे मतदार दुस-या राजकीय पक्षाला मत देतात त्या मतदारांची नावे युक्तीने मतदार यादीतून कापली जाते!यानंतर नवीन बोगस मतदारांची नावे मतदार यादीत टाकली जातात.हाच सगळा खेळ एआय सारख्या अद्यावत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने खेळला जातो.मागील २०,३०,५० वर्षात प्रत्येक बूथचं पोलिंग पॅटर्न या तंत्रज्ञानातून अभ्यासला जातो.याच पद्धतीने निवडणूका राज्य दर राज्य जिंकल्या जातात त्यामुळे आता देशातील मोठातल्या मोठे निवडणूकतज्ज्ञ देखील जय-पराजयाचे आकलन करण्यास हतबल झाले असल्याचे ते सांगतात.

दिल्लीतील निवडणूकांमध्येही डेटा मॅन्यूपलेशन,एग्झिट पोल्सच्या माध्यमातून मतदारांची मानसिकता तयार करने याशिवाय धनबळाच्या जोरावर निवडणूका जिंकणे हे घडणार असल्याचा दावा ते करतात.१ जून २०२४ रोजी लोकसभेच्या निवडणूकीचे एग्झिट पोल्स आले यात मोदी यांना पूर्ण बहूमतासह सव्वा तीनशे व ३६० च्या वर जागा मिळणार असल्याचा दावा करण्यात आला होता.४ जून रोजी प्रत्यक्ष निकाल लागले आणि शेअर मार्केट धाडकन कोसळले!१ जून ते ४ जून दरम्यान २५ लाख कोटी रुपये गुंतवणूकदारांचे एका झटक्यात बुडाले!हा पैसा कोणाकडे गेला?असा सवाल ते करतात.
हरियाणाच्या निवडणूकीशी दिल्लीच्या निवडणूकीची तुलना होऊ शकत नाही कारण हरियाणामध्ये भाजपची तिस-यांदा सत्ता येत असल्याचे एकाही एग्झिट पोलने दाखवले नाही.फक्त एक अपवाद सोडून ते म्हणजे भाजपचे नेते नायबसिंग सैनी.मतमोजणीच्या फक्त एका तासा आधी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सैनी म्हणतात ‘हमने चुनाव की तयारी पूरी कर ली है,चिंता मत किजिये सारी व्यवस्था कर ली है!’निकालात तीच भाजपच्या विजयाची व्यवस्था उजागर झाली!हरियाणातील ४८ जागांवर भाजपचं कोणी नाव घेणारे संपूर्ण निवडणूकीत सापडले नव्हते,त्या राज्यात भाजप पूर्ण बहूमताने विजयी झाली!

छायाचित्र : दिल्लीतील निवडणूकीबाबत २०२० चा एग्झिट पोल!)

हरियाणात भाजपने ज्या दुष्यंत चौटालाच्या पक्षासोबत युती केली त्या पक्षाचे नाव घेणारे देखील आता हरियाणात सापडत नाही,एक ही जागा युतीतील या पक्षाला मिळाली नाही!हरियाणात भाजपचे १२ पैकी १० मंत्री हरले तरी देखील हरियाणात भाजप सत्तेत आली.देशातील मतदारांनी हे समजून घ्यायला हवे की हरियाणा ही भाजपसाठी ‘टेस्क़ केस’होती.याचीच यशस्वी पुर्नरावृत्ती भाजपने महाराष्ट्रात केली.जितकी मते साढे चार वर्षात वाढली नव्हती ती लोकसभेच्या निवडणूकीनंतर अवघ्या साढे चार महिन्यात महाराष्ट्रात मतदारांची वाढली!विरोधक दावा करतात ७० लाख नवी मते भाजपने मतदारयादीत घुसवली.निकाल मान्य नसताना हरियाणातील जनता ही जर रस्त्यावर उतरली असती तर महाराष्ट्रात तोच खेळ भाजपला सहज खेळणे शक्य झाले नसते मात्र,असे घडले नाही अशी खंत तज्ज्ञ व्यक्त करतात.महाराष्ट्रात देखील सत्ताधारी भाजपच्या विरोधात प्रचंड जनक्षोभ होता.याचा सर्व्हे देखील झाला होता.भाजपला देखील याची जाणीव होती.त्यामुळे महाराष्ट्रात भाजपच्या १३६ जागा येणे,यावर साक्षात ब्रम्हदेव देखील विश्‍वास ठेवीत नाही,असा दावा निवडणूकतज्ज्ञ करतात.
थोडक्यात,सत्ताधारी पक्षाचा निवडणूक जिंकण्याचा जो पॅटर्न सेट झाला आहे,निवडणूक आयोगाची जी हतबलता आहे ,उद्योगपतींचा गडगंज पैसा निवडणूकीत जो ओतला जात आहे ते बघता भारतात कोणत्याही राज्यात या पुढे निष्पक्ष निवडणूका होऊ शकत नाही,असा आरोप निवडणूकतज्ज्ञ करतात.ही इतर राजकीय पक्ष व अपक्ष उमेदवारांसाठी धाेक्याची घंटा आहे.दिल्लीतील संपूर्ण ७० जागांवर भाजपने मतांचे मॅन्यूपलेशन केले नसून ३० ते ४० जागांवर त्यांना हे करता आलं.या जागांची ते आधी अभ्यासपूर्ण रेकी करतात व निवडणूकीच्या दोन वर्षा आधीच त्या जागांवर काम करण्यास सुरुवात करतात.नवी दिल्लीत पश्‍चिमी दिल्लीतून दहा ते पंधरा हजार मतांची अदलाबदल झाली.ही मते उत्तरप्रदेश,बिहारमधून स्थानांतरीत झाली आहे.भाजपचे दिल्लीतील आमदार हे सर्वाधिक याच राज्यातून येतात.कोण चौकशी करणार?चौकशी करणारेच सत्तेत बसले आहेत.यांचीच पोलिस आहे,निवडणूक आयोग आहे,या देशाची लोकशाही अतिशय सुनियोजित पद्धतीने हायजॅक केली जात असल्याचा आरोप देखील डिजिटल माध्यमाध्यमांमध्ये ऐकू येतो.मुखात मात्र,संविधान ते डॉ.आंबेडकर या सर्वांशी गोष्ट असते.जोपर्यंत मोदी-शाह सत्तेत आहेत तोपर्यंत भारतात निष्पक्ष निवडणूका आता जनतेने विसरुन जावे,असा दावा ते करतात.
दिल्लीत आप पक्षाशी मुस्लिम मतदार प्रचंड नाराज असल्याचे काही निवडणूकतज्ज्ञ सांगतात.दिल्लीतील १५ ते १६ जागांवर मुस्लिम मत ही काँग्रेसला गेली कारण शाहीन बाग प्रकरणात जेव्हा बुलडोजर चालले त्यावेळी मुख्यमंत्री केजरीवाल हे ’मौन’बाळगून होते.याशिवाय २०२० मध्ये देशात करोनाची सुरवात झाली त्यावेळी मर्कजमधून तो पसरला,केजरीवालांचे हे विधान देखील लाखो मकर्ज अनुयायांना दुखावणारा होता.तसेच केजरीवाल यांचा ‘सौम्य हिंदूवाद’हा देखील फॅक्टर मुस्लिम मतदारांना केजरीवाल यांच्या विरुद्ध एकजूट करुन गेला.जलपुरामध्ये तर केजरीवालच्या विरोधात नारे लागले की ‘मर्कज के दुश्‍मन मुर्दाबाद’मनिष सिसोदिया यांनी जलपुरामधून निवडणूक लढली असून हा तर त्यांचा मतदारसंघही नव्हता.मनिष सिसोदिया यांनी निवडणूकीत चुकीची देखील कबुली दिली असती तर निकाल काही वेगळा असता.मुस्लिमांनी प्रयत्न केला की त्यांचे मत धर्मनिरपेक्ष पक्षांकडे गेले पाहिजे त्यामुळेच काँग्रेसला एक ते दोन जागा सहज जिंकता येईल,असा दावा त्यांनी केला.हज कमेटी,वक्फ बोर्ड इत्यादी असे अनेक मुद्दे आहेत ज्यावर केजरीवाल ‘खामोश’होते.
मात्र,असे असले तरी केजरीवाल यांनी ज्या अनेक लोककल्याणकारी योजना तीन टर्ममध्ये दिल्लीत राबवल्या,त्या ही नजरेआड करता येणार नाही असे तज्ज्ञ सांगतात.दिल्लीतील हा गरीब व निम्न मध्यम वर्ग हा आज ही केजरीवाल यांच्या मागे ठामपणे उभा असल्याचे सांगितले जाते.१०० यूनिटपर्यंतचे वीज बिल माफ,महिलांना मोफत बस प्रवास,मोहल्ला क्लिनिकद्वारे गरीबांच्या आवाक्यात आरोग्य सुविधा आणने,पाण्याचे बिल माफ,महिला,तरुण,बेरोजगारांना थेट आर्थिक मदत,शिक्षण क्षेत्रात सुधारणा  इ.यासारख्या योजनांवर तेथील हा गरीब व निम्न मध्यवर्गीय मतदार हा पाणी फेरु इच्छित नाही.त्यामुळे धार्मिक आधारावर मतांची कितपत विभागणी होईल,याचा खरा अदांज उद्याच स्पष्ट होईल.
हे देखील खरे आहे,भाजपने महिलांच्या खात्यात २५०० हजार रुपये तसेच इतर अनेक मोफत योजनांची सरबत्ती दिल्लीतील निवडणूकी प्रचारात केली मात्र,हरियाणात देखील याच घोषणेनंतर ही ऑक्टोबर पासून आता फेब्रुवारी महिना आला तरी अद्याप महिलांच्या खात्यात २५०० रुपये थेट बँकेत जमा करण्याची याेजना हरियाणात सुरु झाली नाही!त्यामुळे आहे त्याचा लोभ सोडून भाजपच्या उसणवारी योजनांच्या माेहात दिल्लीतील मतदार अडकू इच्छिणार नाही,असे जाणकार सांगतात.
उद्या दिनांक ८ फेब्रुवरी रोजी दिल्ली निवडणूकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असून, पुन्हा एकदा एग्झिट पोल्सची पोल खुलणार का?की निवडणूक तज्ज्ञ यांचे भाकीत खरे ठरणार?याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे,हे मात्र खरे.
……………………………

 

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या