फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजयाला ‘राजकारण’असे नाव...

याला ‘राजकारण’असे नाव…

Advertisements

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता.२१ नोव्हेंबर: कालच विधान सभा-२०२४ च्या निवडणूकीचा धूराळा खाली बसला मात्र,त्या धुराळ्यात महाराष्ट्र राज्याची सुसंस्कृती पार धूमिळ झालेली संपूर्ण महाराष्ट्राने बघितली,सत्तेसाठी या पूर्वी पण साम,दाम,दंड,भेदाची ‘नीती’ वापरली जात होती,यंदा मात्र त्या नीतीला ‘अनीती’ची इतकी बटबटीत किनार होती की,सुजाण मतदारांनाही राजकारणाची किळस वाटली.हतबल झालेल्या जनतेने पैशांचा ‘महापूर’ नव्हे तर ‘महासमुद्रांचे’ पाट महाराष्ट्रात ठिकठिकाणी वाहताना पाहीले,अनेक व्हिडीयो व्हायरल ही झाले,एकेका मतदारसंघात राजकीय पक्षाकडून दीड-दोनशे काेटी रुपये जणू दीड-दोनशे रुपये वाटल्या सारखे भासत होते. महाराष्ट्राच्या राजधानीपासून तर उपराजधानीपर्यंतचे पैसे वाटपाचे व्हिडीयोज बघून राज्यातील जनता थक्क झाली!केवळ सत्ताधारी-विरोधकांमधीलच ही स्पर्धा नसून एकाच पक्षातील दोन मोठ्या नेत्यांमध्ये शह-काटशहचे राजकारण जनतेला या निवडणूकीत बघायला मिळाले जे २०१९ च्या निवडणूकीत एकदिलाने पक्षासाठी लढले होते..मग ती राजधानी मुंबई असो किवा उपराजधानी नागपूर.
मतदानासारख्या संवैधानिक कर्तव्याची विटंबना करणारे ‘मतदार’,मग तो ‘हूजूर ‘असो किवा ‘मजूर’त्यांच्या या लोभाला तर व्यक्त करण्यास शब्दच नाहीत.महाराष्ट्रात ६५ टक्के मतदान झाल्याची शाबासकी स्वत:ला देत असताना, सत्ता टिकवण्यासाठी किवा सत्ता हिसकवण्यासाठी पैशांचा जो पाट महाराष्ट्रात वाहला आहे,त्याचे ‘अंकगणित’समजून घेण्यासाठी आता परग्रहावरुनच तज्ज्ञ बोलवावा लागेल.
केंद्रिय व राज्य यंत्रणांनी आचारसंहितेदरम्यान ६६० कोटींची मालमत्ता जप्त केली असून नागपूरात ३९ कोटींचे साहित्य जप्त करण्यात आले.हा आकडा देखील महाराष्ट्राच्या बुद्धीजीवींना ‘दरिया में खसखस’सारखा वाटत असून ,प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी तर लक्ष्मी इतकी चंचल झाली होती की प्रत्येक ठिकाणी तिचे दर्शन होत होते!यावरुन या वेळी या निवडणूकीत किती हजार किवा लाख कोटींची राजकीय ‘उलाढाल’झाली याचा अंदाज येतो.
मतदानाच्या ऐन एक दिवस आधी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी करुन मुंबईतील विरार येथे एका हॉटलमध्ये तब्बल चार तास तावडे यांना जायबंद करुन ठेवल्याचे दृष्य संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने बघितले.पाच कोटींची रक्कम त्यांनी वाटपासाठी आणल्याचा आरोप बविआचे अध्यक्ष ठाकरे यांनी केला.वाड्याहून परतत असताना मी केवळ कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी गेलो असा खुलासा तावडे यांनी केला.या नाट्यमय घडामोडीनंतर बविआचे ठाकरे व तावडे एकाच कारमध्ये हॉटेलमध्ये जेवायला गेले!मग पाच कोटींची रक्कम २७ लाख सापडले,इतकी झाली,पुढे त्याचे ही काय झाले हे राज्यातील जनतेला कळलेच नाही.
भाजपच्याच नेत्याकडून मला तावडे विरार येथील हॉटेलमध्ये पैसे वाटत असल्याची ‘टिप’मिळाली असल्याचा दावा बविआचे ठाकरे यांनी करताच,संपूर्ण सोशल मिडीयावर फडणवीस यांच्याकडे अंगुलीनिर्देश झाला.दोनच दिवसांपूर्वी एका वृत्त वाहिनीला मुलाखत देताना तावडे यांनी राजस्थान,मध्यप्रदेशात प्रस्थापित चेहरा डावलून कार्यकर्त्याना मुख्यमंत्री पद मिळाले तसे महाराष्ट्रात ही घडू शकते,एवढे बोलताच त्यांच्यावर राजकारण ‘उलटले!’महाराष्ट्रात फडणवीसांशिवाय भाजपमधील कोणताही चेहरा मुख्यमंत्री म्हणून चालणार नाही,असा त्याचा अर्थ गृहीत धरल्या जात आहे.मात्र,यातील राजकारण व कुरघोडीचा भाग सोडला तरी झालेले ‘लक्ष्मीदर्शन’जनता कधीही विसरु शकणार नाही.
हे ही नव्हते थोडके,दुस-याच दिवशी बिटकॉइन प्रकरणात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आवाजातील एक तथाकथित ऑडियो क्लिप व्हायरल करीत एक सनदी अधिका-याने संशयाचा व चरित्रहननाचा धुराळा उडवून दिला!कृत्रिम बुद्धीमत्तेच्या(एआय) मदतीने हुबेहुब माझा आवाज काढत ही ऑडियो क्लिप तयार करण्यात आली आहे,असा आरोप सुळे यांनी केला.सायबर गुन्हे शाखेकडे त्यांनी तक्रार देखील दाखल केली.साढे तीनशे कोटी निवडणूकी पूर्वी त्यांना तातडीने हवे असल्याची मागणी त्या ऑडियो क्लिपमध्ये होती.
त्या पूर्वी १८ नाेव्हेंबर रोजी रात्री त्यांच्या काटोल मतदारसंघातील एका सभेतून परतत असताना माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेकीतून ते गंभीर जखमी झाल्याच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला! मतदानाच्या दोनच दिवसाआधी अश्‍या स्वरुपाचा ‘हिंसाचार’सुज्ञ जनतेला कदापि मान्य नव्हता.सत्ताधा-यांनी या घटनेला ‘सलीम-जावेदचा मेलोड्रामा’करार देऊन घटनेचे गांर्भीय कमी करण्याचा प्रयत्न केला.हा हल्ला अनिल देशमुखांनी त्यांचा मुलगा सलील देशमुखांना निवडणूकीत जिंकण्यासाठी ‘प्रायोजित‘केला असल्याचा दावा सत्ताधा-यांनी केला.मात्र,हल्ला प्रायोजित असो किवा नसो,अश्‍या स्वरुपाचे राजकारण लोकशाहीवरील जनतेचा विश्‍वासघात करणारा मात्र निश्‍चितच होता,यात शंका नाही.
महाराष्ट्रात वरिष्ठस्तरावर अश्‍या त-हेने महाराष्ट्राच्या जनतेने कधीही न बघितलेले राजकारणाचे ‘निम्नस्तरीकरण’ सुरु असतानाच ,उपराजधानीत देखील मतदानाच्या दिवशी पैशांचे पाकिटं सापडण्याच्या घटनांची लोकशाहीसाठी ‘लज्जास्पद‘श्रृंखला उमटली होती.मध्य नागपूरात भाजपचे प्रवीण दटके व काँग्रेसचे बंटी शेळके यांच्या चुरशीची लढत सुरु असतानाच शेळके यांच्या बांग्लादेश भागातील कार्यालयात पैसे वाटप करीत असतानाचा व्हिडीयो व्हायरल झाला. भाजप-काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्येही तूफान राडा झाला.निवडणूकीत पराभूत होत असल्याने भाजपनेच कार्यालयात कोणी नसल्याची संधी साधून पैशांची पाकिटे टाकली,असा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला.आमच्याकडे पैसाच नाही तर वाटणार कुठून?असा सवाल ते करतात.(खासगीत.. बंटी भाऊंकडे इनकमिंग असते आऊट गोईंग कधीच नसते,असा सूर पंटर ऐकवतात तर बूथ कार्यकर्त्यांना अगदी मतदानाच्या दिवसापर्यंत पैसे न दिल्याने त्यांचे पैसे वाटप होत होते,असे देखील एक सूत्र सांगतो)
विदर्भ असो किवा पश्‍चिम महाराष्ट्र,या निवडणूकीत पैसे आणि मद्य यांचा भरपूर वापर करण्यात आला असून, मतदानाला स्वत:च्या बाजूने वळवण्याच्या शेकडो घटना समोर आल्या.राज्यातील हेवीव्हेट मंत्री सुधीर मुनगंटीवार लढत असलेल्या बल्लारपूर मतदारसंघात अंदाजे दीडशे कोटी उधळल्या गेल्याची चर्चा आहे.हिंगणा मतदारसंघात देखील भाजपचे उमेदवार समीर मेघे व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार रमेश बंग यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तूफान राडा झाला.बावणकुळे यांच्या कामठीत पैसे वाटल्याचा संशयावरुन तनाव निर्माण झाला होता.कॉंग्रेस व भाजपचे कार्यकर्ते यांच्या वादात पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला.रामटेकमध्ये देखील शिंदे गटाचे उमेदवार आशिष जयसवाल यांच्या समर्थकांवर पैसे वाटपाचे आरोप आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केले व अनेक व्हिडीयो सोशल मिडीयावर व्हायरल केले.
पिंपरी-चिंचवडमधीलदेखील अनेक वस्त्यांमध्ये प्रत्येक मता मागे साढे पाच हजार रुपयांची ‘कमाई‘ झाल्याचे घरकाम करणा-या मोलकरणींनीच ‘उघड गुपित‘सांगितले.इतकंच नव्हे तर विरोधी पक्षाकडून देखील तीन हजार रुपयांची ‘कमाई‘झाली मात्र,मत साढे पाच हजार देणा-या पक्षाला केले,असे देखील अतिशय प्रामाणिकपणे त्या सांगत्या झाल्या!
एका मता साठी साढे आठ हजार रुपये प्रत्येकी दिले गेले असतील,याचा अर्थ साक्षात ‘कुबेरांनी’महाराष्ट्राच्या निवडणूकीत जणू आपला खजिनाच रिता केल्याचा भास होतो.
आता मत ‘खरेदी’करणा-यांचे आणि आपले बहूमोल मत ‘विकणा-यांचे ’लक्ष शनिवार दिनांक २३ नोव्हेंबर कडे लागले असून,विजयी होणारे,आम्हाला जनतेचा पाठींबा होता,विरोधकांना कसे नाकारण्यात आले, असे सांगतील तर पैशांसाठी आपले मत विकणारे, त्यांच्या आयुष्याशी निगडीत धोरणांबाबत पुढील पाच वर्षे मायबाप सरकारला कोणतीही दुषणे देण्याचा अधिकार गमावून बसल्याने ,महागाई असो किवा शोषण,अत्याचार,सहन करण्याशिवाय कोणाताही पर्याय त्यांच्याजवळ नसणार आहे.
यालाच ‘राजकारण’असे नाव आहे.इतकंच की यंदाची निवडणूक सुसंस्कृत महाराष्ट्र पहिल्यांदाच  पैशांच्या जोरावर जिंकताना आणि हरताना बघणार आहे.या निवडणूकीत जनतेचे ‘मत’उमटलेले नसून विकत घेतलेले ‘मत’सरकार कोणाची निर्धारित करणार आहे.याशिवाय वाद विवाद,भांडणे,हिंसा,कुरघोडी,खालच्या पातळीवरील शिविगाळ(वर्धात खदखद पॅटर्नचे उद्गगाते क-हाळे मास्तर’मारहाण प्रकरण)या सर्वांचे मन विषण्ण करणा-या घटना देखील अनुभवल्या आहेत.महाराष्ट्राचा ‘बिहार’कधी व कसा झाला?याचे उत्तर कालपासून महाराष्ट्राचा सुजाण व सुज्ञ मतदार शोधत आहे.हे उत्तर मतपेटीतून त्यांना गवसेल का?हा येणारा काळच सांगेल.
निवडणूकीत दीडशे कोटी आपल्या मतदारसंघात ‘सढळ’ हाताने खर्च करणारा पुढील पाच वर्षात किमान दीड हजार लाख कोटी तरी कमावण्याचा प्रयत्न करणारच,हे सुज्ञास सांगणे न लगे. म्हणूनच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या ग्रामगीतेत मतदानाची महत्ता सांगणा-या ओव्या लिहून ठेवल्या होत्या.किमान त्या तरी वाचण्याची तसदी आपले बहूमोल मत विकणा-या मतदारांनी घेतली असती तर आज महाराष्ट्राची दिशा ही ‘दूर्दशा’यात परिवर्तित झाली नसती!
भवितव्य गांव अथवा राष्ट्राचें ।
आपुल्या मतावरीच साचें ।
एकेक मत लाख मोलाचें ।
ओळखावें याचें महिमान ॥९५॥
मत हें दुधारी तलवार ।
उपयोग न केला बरोबर ।
तरि आपलाचि उलटतो वार ।
आपणावर शेवटीं ॥९६॥
दुर्जन होतील शिरजोर ।
आपुल्या मताचा मिळतां आधार ।
सर्व गांवास करितील जर्जर ।
 न देतां सत्पात्रीं मतदान ॥९७॥
मतदान नव्हे करमणूक ।
निवडणूक नव्हे बाजार-चुणूक ।
निवडणूक ही संधि अचूक ।
भवितव्याची ॥९८॥
निवडणूक जणुं स्वयंवर ।
ज्या हातीं देणें जीवनाचे बागडोर ।
त्यासि लावावी कसोटी सुंदर ।
 सावधपणें ॥९९॥
तैसेंचि आहे निवडणुकीचें ।
कामचि पाहावें सगळयांनी त्यांचें ।
ज्याचें काम अधिक मोलाचें ।
तोचि निवडावा मुख्य ऐसा ॥१०२॥
………………………….
(वाचा उद्याच्या बातमीत…
एग्जिट पोलची पोलखोल)
व मध्यम वर्गीयांपेक्षा निम्न वर्गीयांच्या मतदानावर स्तुतीगान गात असताना,पैशांनी विकल्या गेलेली मते’याकडे प्रचार-प्रचार माध्यमे डोळेझाक करीत असल्याचे दिसून पडतंय.
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या