नागपूर ग्रामीणचा मूड: काटोल,सावनेर,रामटेकमध्ये भाजपला फटका!
कामठीत बावणकुळे ठाण मांडून: काँग्रेसचे सुरेश भोयर यांची तगडी लढत
हिंगणात बरोबरीचा रंगला सामना
उमरेडमध्ये सर्वाधिक ६७ .३७ टक्के मतदान कोणाचे पारडे जड करणार?
डॉ.ममता खांडेकर
( Senior Journalist)
नागपूर,ता.२० नोव्हेंबर २०२४:सावनेर-कळमेश्वर मधील कळमेश्वर हा काँग्रेसचे कद्दावर नेते व माजी आमदार व मंत्री सुनील केदार यांचा पट्टा समजला जात नाही,कळमेश्वरमध्ये सर्वाधिक मतदान हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ.आशिष देशमुख यांच्या बाजूने वळलेले दिसून पडले मात्र,हा पट्टा सोडताच पुढील पाटणसावंगीपासून संपूर्ण पट्टा हा केदार यांच्या समर्थकांचा व नातेवाईकांचा असल्याने प्रत्येक बूथवर केदार यांच्या पत्नी अनुजा केदार लीड घेताना दिसत होत्या.‘सत्ताधीश’ने येथील मतदारांशी संवाद साधला असता ‘राजा तो राजा होता है’हे वाक्य ऐकू आले.राजा हा कधीही पराभूत होत नसतो,असा दावा अनेक मतदारांनी केला.
कळमेश्वर येथे आशिष देशमुख यांच्या बाजूने कौले दिलेल्या मतदारांनी सावनेरमध्ये विकास हा ‘दोन नंबर’चा झाला असल्याची टिका केली.अनुजा केदार या चांगल्या महिला आहेत मात्र,राजकारणात यायला नको होते,असा देखील ‘सूर’उमटला होता.गेल्या पंचवीस वर्षात सावनेरचा काहीच विकास झाला नाही,यंदा ‘परिवर्तन’घडेल.असा दावा त्यांनी केला.येथील नगर परिषद उच्च माध्यमिक विद्यालयात त्याच वेळी निवडणूक आयोगाचे पर्यवेक्षक वीरेंद्र सिंग यांनी भेट दिली व मतदान केंद्राचा आढावा घेतला.या मतदारसंघात प्रहार संघटना व त्याचे उमेदवार डॉ.प्रणय चांदेकर यांचेही नाव मात्र मतदारांना माहिती होते.मात्र,खरी लढत ही काँग्रेस व भाजपमध्येच रंगली.
सावनेरमधील मतदान केंद्रावर फेरफटका मारला असता,आशिष देशमुख यांनी तगडी लढत दिली असल्याचे स्पष्ट झाले.अनेक मतदारांनी ‘परिवर्तन’घडणार असल्याचा दावा केला असला तरी बहूमत हे केदार यांच्याच बाजूने झूकलेले आढळले.सायंकाळी चार पर्यंत या मतदारसंघात मतदान संथ गतीने होत होते.गावक-यांशी संवाद साधला असता,अनेक मतदार घरीच असल्याचे त्यांनी सांगितले.जाेपर्यंत त्यांना घरी जाऊन कोणी बोलवत नाही,ते घराबाहेर निघत नाही,ग्रामीण भागातील हे चमत्कारिक वास्तव देखील या मतदारसंघात दिसून पडले!
सावनेर-कळमेश्वर मतदारसंघात ‘परिवर्तनाची’केवळ ‘हवा’निर्माण करण्यात आली असल्याचे येथल मतदार सांगतात.वास्तवतेत पैसे वाटपाची ‘लोकचळवळ’या ही मतदार संघात चर्चिली गेली,इतकंच की कार्यकर्त्यांनी पैसा एका पक्षाकडून घेतला व तो दुस-या पक्षाकडे वळता केला!
सायंकाळी ५ वाजे पर्यंत सावनेरमध्ये ६४.२३ टक्के मतदान झाले होते.
सावनेर मतदारसंघात भाजपच्या आशिष देशमुख यांनी अनुजा केदार यांना तगडी टक्कर दिली असली तरी विजयाचा कल हा अनुजा केदार यांच्याकडे झुकलेला स्पष्टपणे आढळला.येत्या २३ नोव्हेंबर रोजीच मतदारांनी दिलेला अधिकृत कौल स्पष्ट होऊ शकेल.
(रामटेक)
रामटेक मतदारसंघ महाविकासआघाडीत शिवसेना उद्धव ठाकरेंना सुटल्यामुळे येथे काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला,त्यामुळे महायुतीतील शिंदे गटाचे उमेदवार व दोन टर्मचे रामटेकमधील माजी आमदार आशिष जयसवाल व मुळक यांच्यात थेट लढत झाली.आज ‘सत्ताधीश’ने रामटेकमधील मतदारसंघाचा आढावा घेतला असता,सर्वदूर ‘बॅट’चीच चर्चा ऐकू आली.मुळक यांनी उमेदवारी अर्ज भरतानाच जयसवाल यांच्या मनात धडकी भरली होती,इतकी प्रचंड गर्दी त्यांच्या रॅलीत होती.महत्वाचे म्हणजे नागपूर ग्रामीण जिल्हा हा सुनील केदार यांनी सुरवातीपासून बांधून ठेवला आहे.मुळक यांना केदार यांनी उघडपणे पाठींबा दिला असून,केदार यांचे समर्थक व रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे यांनी सभा घेऊन मुळक यांचा उघडपणे प्रचार ही केला.
परिणामी,आघाडीतील उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार विशाल बरबटे हे प्रचंड अडचणीत आले.त्यांनी नागपूरात पत्रकार परिषद घेऊन आघाडीचा धर्म देखील आठवणीत आणण्याचा सल्ला काँग्रेसला दिला मात्र,त्याचा कोणताही उपयोग झाला नाही.ठाकरे गटाचेच कार्यकर्ते व पदाधिकारी मूळक यांच्या प्रचारात रमले असल्याचे चित्र उमटले होते.रामटेकमध्ये खासदार(श्यामकुमार बर्वे)पंजाचा आहे तर आमदार देखील पंजाचाच हवा,असे देखील मत अनेकांचे होते.याशिवाय रामटेकमधील कर्मचा-यांनी मोठ्या प्रमाणात यंदा देखील सुनील केदार यांच्यामुळे त्यांनी समर्थन दिलेल्या मूळक यांच्या ‘बॅट‘वर शिक्कामोर्तब केले.१०१९ च्या लढतीतील गज्जू यादव यांना मिळालेल्या एकूण मतांपैकीही पंचवीस ते तीस हजार मते ‘बॅट’कडे यंदा वळती झाल्याने मूळक यांचा विजय सोपा झाला आहे.तर दुसरीकडे भाजपचे २०१९ चे उमेदवार व आमदार जर्नादन रेड्डी यांचे तिकीट कापून ही जागा शिंदे गटासाठी सोडल्याने ते देखील जयसवाल यांच्यावर नाराज होते.रेड्डी यांचे पक्षातून निलंबन देखील झाले आहे.परिणामी,भाजपचा कार्यकर्ता पूर्णत:ताकतीनिशी जयसवाल यांच्या पाठीशी उभा असल्याचे दिसून पडले नाही,असे देखील येथील मतदार सांगतात.
सुनील केदार हे उघडपणे उद्धव सेनेचे विशाल बरबटे यांच्या बाजूने न राहता मुळक यांच्या पाठीशी उभे राहील्याने केदार हा ‘विंचू’असल्याची शेळकी टिका उद्धव ठाकरे गटाचे नेते भरत जाधव यांनी केला तर जयसवाल यांनी उद्धव ठाकरेंना धोका देऊन शिंदेंना जवळ केल्यानेच ठाकरे यांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी बंडखोराला साथ दिल्याचे समर्थन केदार यांनी केले होते.रामटेकमध्ये ‘मशाल’विझवण्याचे काम ‘बॅट’ने लीलया केले.रामटेकमधील सर्वात मोठे मतदान केंद्र असलेल्या समर्थ हायस्कूलमधील मतदान केंद्रात मतदारांच्या लांबच लांब रांगा हे काय सूचित करतात?हे २३ नोव्हेंबर रोजी उघड होईल मात्र,प्रचार संपण्याच्या शेवटच्या दिवशी आशिष जयसवाल यांनी जी ‘भगवा रॅली’काढली त्याला ही उदंड प्रतिसाद रामटेकमध्ये मिळाला आहे,हे विसरता येत नाही.महत्वाचे म्हणजे त्या भगवा रॅलीत कोणतेही निमंत्रण नसताना उस्फूर्तपणे १५ ते १६ हजार नागरिक सहभागी झाले होते.परिणामी,जयसवाल यांचे समर्थक जयसवाल यांच्या विजयाचा दावा करीत आहेत.मात्र,सभा आणि रॅलीत दिसणारी गर्दी मतांमध्ये परिवर्तित हाेतेच,असे दिसून पडत नाही.
थोडक्यात,रामटेकमधील वस्त्यांमध्ये विजयासाठी एकीकडे संपूर्ण नीतीमूल्यांची पातळी सोडून,दमदाटी ,बळ व प्रचंड धनशक्तीच्या जोरावर रामटेकवासियांना एका विशिष्ट पक्षाच्या उमेदवाराला मत देण्यासाठी बाध्य करण्यात आले ते बघता दूसरीकडे सुसंस्कृतपणे निवडणूक लढणारे मुळक यांच्याकडे मतदारांचा आणखी कल वाढलेला दिसून पडला.या धमकीचा,पैसे वाटपाचे व्हिडीयो सर्वच व्हॉट्स ॲप ग्रूप्सवर चांगलेच व्हायरल झाले.
रामटेकमध्ये सायंकाळी ५ वा.पर्यंत रेकॉर्डतोड ६५.५९ टक्के मतदान झाले असून,रामटेकमधून ‘बॅट’निर्विवादपणे विजयाचा छक्का मारणार आहे,असा दावा केल्यास वावगे ठरणार नाही.
काटोल-
नागपूर जिल्ह्यातील आणखी एक मजेदार लढत ही माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख तसेच भाजपचे चरणसिंग ठाकूर यांच्यात दिसून पडली.येथील मतदार सांगतात,सलील देशमुख निर्विवादपणे उमेदवारी अर्ज भरल्यापासूनच पहील्या क्रमांकावर होते.या ठिकाणी भाजप वर्सेस सलील देशमुख अशी लढत होती,उमेदवार चरणसिंग ठाकूर यांच्यासेबत देशमुखांची लढत नव्हतीच.याच मतदारसंघात काटोलचे प्रतिनिधित्व करणारे दिवंगत श्रीकांत जिचकार यांचे सुपुत्र याज्ञवलक्य जिचकार यांनी देखील निवडणूकीत अपक्ष लढा देत रंगत भरली.जिचकार यांना १० ते १२ हजार मते सहज मिळण्यचा दावा केला जात आहे.अर्थात ही मते राष्ट्रवादीच्या कोट्यातूनच जाणार हे स्पष्ट आहे.
गेल्या पंचवीस वर्षांपासून अनिल देशमुख कोटोलचे प्रतिनिधित्व करीत असून २०१४ मध्ये ते त्यांचेच पुतणे आशिष देशमुख यांच्याकडून अपघाताने पराभूत झाले होते मात्र,यानंतर काटोलच्या मतदारांनी आपली चूक सुधारली व २०१९ मध्ये भरघोस मतांनी अनिल देशमुखांना पुन्हा विधानसभेत पाठवले.यंदा देखील राष्ट्रवादी पवार गटातर्फे काटोलसाठी अनिल देशमुखांना उमेदवारी मिळाली होती मात्र,त्यांनी पुत्र सलीलची उमेदवारी घोषित केली.
येथील मतदारांसोबत संवाद साधताना ही घरचीच गोष्ट असून अनिल देशमुख असो किवा सलील देशमुख,त्यांच्या समर्थक मतदारांना याचा कोणताही फरक पडला नव्हता.सलील यांच्यासाठी अनिल देशमुखांसारंखाच सन्मान काटोलमधील मतदारांनामध्ये आढळला.
चरणसिंग ठाकूर यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर १८ नोव्हेंबरपर्यंत चांगली प्रतिमा जपली,त्यांच्या बाजूने जनमत ही तयार झाले होते मात्र,अचानक अनिल देशमुखांच्या कारवर दगडफेकीची घटना घडली.अर्थात ही दगडफेकक ‘प्रायोजित’असल्याचा आरोप भाजपने केला.सुरवातीपासून पहील्या स्थानावर सलील देशमुख असताना देखील अशी दगडफेक करुन जखमी होण्याची कोणती गरज अनिल देशमुखांना होती?याचे कोडे कोणालाही उलगडता आले नाही.मात्र,काटोल पोलिस ठाण्यात या घटने विरोधात तक्रार नोंदवण्यासाठी १० ते १२ हजार लोकांची गर्दी,ही खूप काही सूचित करणारी ठरली.
या घटनेनंतर अनिल देशमुखांचे कार्यकर्ते हे ईष्येने कामाला लागले.त्यातच काल दिवसभर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना वसईतील एका हॉटेलमध्ये पाच कोटी रुपये वाटत असताना रंगेहाथ बहूजन विकास आघाडीचे संयोजक ठाकरे यांनी पकडले,किमान चार तास ती संपूर्ण धाड व वादविवाद महाराष्ट्रातील नागरिकांनी बघितला,काटोलमध्ये या घटनेविषयी देखील अनेकांच्या मनात भाजपविषयीची चीड जाणवली.त्याचा फटका चरणसिंग ठाकूर यांना बसणे स्वाभाविक होते.
थोडक्यात,काटोल हा देशमुखांचा पारंपारिक गड राहीला आहे.त्यांना सहज पराभूत करणे शक्य नाही.आज दुपारी ३ वाजे पर्यंत काटोलमध्ये ४३ टक्के मतदान झाले होते,ते सांयकाळी ५ वा.अचानक वाढून ४९.४३ टक्क्यांवर पोहोचले.यातच सलील देशमुख यांच्या विजयाचे गुपित दडले असल्याची चर्चा ऐकू आली.या शेवटच्या दोन तासात मोठ्या प्रमाणात मजूर वर्गाने मतदान केले असून हा वर्ग कधीही कोणत्याही पक्षाच्या प्रचार रॅली किवा सभेचा भाग राहीलेला नाही तरी देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात तो मतदानासाठी हजर राहीला,हेच मतदान सलील देशमुखांना आमदार म्हणून विधान सभेत पाठवण्यासाठी कारणीभूत ठरणार असल्याचे येथील जाणकार सांगतात.अर्थात,या निवडणूकीत विजयासाठी मोठ्या प्रमाणात ‘पैशांचा महापूर‘वाहीला आहे,असा आरोप विरोधक करतात.
कामठी-
कामठीमध्ये सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५३.४५ टक्के मतदान झाले होते.या मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे लढत असून त्यांच्या विरोधात सुनील केदार यांचेच आणखी एक खंदे समर्थक सुरेश भोयर तगडी लढत देत आहे.सुरवातीला एकतर्फी वाटत असणारी ही लढत उत्तरार्धात चांगलीच तुल्यबळ झाली.आज या मतदारसंघाचा फेरफटका मारला असता,कामठीतील मुस्लिमबहूल भागातील शंभर टक्के मुस्लिम मतदारांनी ‘पंजाला’ मत दिल्याचे नेहमीसारखेच वास्तव समारे आले तर आंबेडकरी मते देखील मोठ्या प्रमाणात ‘पंजा‘कडे वळली असल्याचे दिसून आले.
चार दिवसांपूर्वी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांची कामठीत बावणकुळे यांच्या प्रचारासाठी सभा झाली होती,सभेत मोहन यादव तसेच बावणकुळे यांच्या गळ्यात आंबेडकरी अनुयायांनी‘नीळा‘दुपट्टा टाकला.एक क्षण ही तो गळ्यात न ठेवता,मुख्यमंत्री यादव व बावणकुळे यांनी गळ्यातून काढला व कार्यकर्त्यांच्या हाती दिला,हे दृष्य मैदानातील सर्व आंबेडकरी जनसमुदायाने बघितले व त्यांच्या मनात तीव्र संताप निर्माण झाला,परिणामी,कामठीतील आंबेडकरी मते देखील मोठ्या प्रमाणात सुरेश भोयर यांच्या खात्यात गेल्याने कामठीत बावणकुळे यांच्या समोर ‘विजयाचे’मोठे ‘धर्म संकट’निर्माण झाले आहे.
कामठीत वंचितने दिलेला उमेदवार वंचितच्याच कार्यकर्त्यांना पंसद नसल्याने ते भोयर यांच्या प्रचार रॅलीत फिरताना दिसून पडले.लोकसभेच्या निवडणूकीत देखील भाजपला कामठी मतदारसंघातून कमी मते पडली होती,तर २०१९ च्या विधानसभेच्या निवडणूकीत देखील सुरेश भोयर यांना दहा हजारपेक्षा ही कमी मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. या सर्व गोष्टींच्या अनुषंगाने कामठीतील लढत ही बावणकुळे यांच्यासाठी ‘एकतर्फी’नसून तगडी लढत यंदा देखील सुरेश भोयर देत आहेत.परिणामी,बावककुळे मागील दहा दिवसांपासून कामठीतच ठाण मांडून बसलेले दिसून पडले.
कामठीतील यादव समाजाला भाजपकडे वळते करण्यासाठी यादव समाजाच्या व्हॉट्स ॲप ग्रूपमध्ये मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांची सभा असल्याची माहिती प्रसारित करण्यात आली.मोठ्या प्रमाणात यादव समाजातील लोक त्या सभेत हजर होते मात्र,अवघे काही जण सोडता यादव समाज भाजपच्या पाठीमागे गेल्या नसल्याचा दावा केला जातो.याच सभेत मुख्यमंत्री मोहन यादव व बावणकुळेंनी गळ्यातील नीळा दुपट्टा लगेच काढून टाकल्याचा व्हिडीयो देखील चांगलाच व्हायरल झाल्याने कामठीतील आंबेडकरी समाज देखील भाजपापासून दुरावला गेला.
महत्वाचे म्हणजे बेसा,बेलतरोडी,नरसाळा भागात बावणकुळेंसह त्यांच्या संपूर्ण कुटूंबियांनी दारोदारी जाऊन भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले.बावणकुळे स्वत: दुचाकी घेऊन गल्लोगल्ली फिरलेत.ते दहा वर्षे आमदार होते,उर्जा मंत्री होते,पालकमंत्री होते मात्र,कामठीचा कोणताही विकास त्यांनी केला नसल्याचे मतदार सांगतात.कुटूंबियांसोबत वेळ घालावयला एक ही बगिचा किवा खेळाचे एक ही मैदान कामठीत नाही.वीस वर्षापासून ते जिल्हा परिषदेपासून राजकारणात आहेत मात्र,कामठीचा कोणताही विकास त्यांनी केला नसल्याची नाराजीही दिसून पडली.कामठीतील तरुणांसाठी कोणत्याही रोजगाराच्या संधी निर्माण केल्या नाही तर दूसरीकडे महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडल्याची साफ नाराजी दिसून पडली.कामठीतील अनेक महिला या आठ हजार पगारात बिस्क़िट फॅक्टरीत काम करतात ज्यांचे चार हजार रुपये कारखान्यात जाण्या-येण्यातच खर्च होतात.अनेक युवा हे हल्दीराममध्ये ७ हजार पगारात काम करतात ज्यांचे अडीच हजार रुपये ऑटोमध्ये खर्च होतात.मुलांचे पालनपोषण,शिक्षण या जिवनावश्यक बाबींकडे पालकमंत्री बावणकुळेंनी लक्ष दिले नसल्याची नाराजी व्यक्त करीत कामठीतील किमान ५० हजार युवा बेरोजगार असल्याचा आरोप ही ऐकू आला.
बावणकुळेंनी कामठीत विकास कार्य केले असते तर त्यांच्या कार्यकर्त्यांनीच त्यांना निवडून आणले असते,मात्र आज आपल्या संपूर्ण कुटूंबियांसह घरोघरी फिरण्याची वेळ त्यांच्यावर आली असून,भोयर हे किमान वीस हजार मतांनी विजयी होतील,असे अनेक मतदारांनी मत व्यक्त केले.
२३ नोव्हेंबर रोजी, कामठीत स्पष्टपणे मुस्लिम व इतर धर्मिय यांच्यात विभागली गेलेली मते कोणाचा
मार्ग विधानसभेत जाण्यास प्रशस्त करतात,हे तेव्हाच कळेल.फक्त ५ ३.४५ टक्के झालेले मतदान हे प्रस्थापित उमेदवाराच्या विरोधात देखील असू शकतात,असे येथील जाणकार सांगतात.
हिंगणा-
नागपूर जिल्ह्यातील आणखी एक महत्वाची लढत हिंगणा मतदारसंघात भाजपचे समीर मेघे व राष्ट्रवादी शरद पवार यांचे खास समजले जाणारे रमेश बंग यांच्या हाेत असून आज दिवसभर या मतदारसंघात ब-याच घडामोडी घडल्या.विजयासाठी साम,दाम,दंड,भेदाची पुरजोर नीती या मतदारसंघात अवलंबविण्यात आली.मेघे यांच्याच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना,कर्मचारी व पदाधिका-यांना तसेच मेघे यांच्या रुग्णालयातील स्टाफ,डॉक्टर्स,कर्मचारी यांना मोठ्या प्रमाणात हिंगणा मतदारसंघात मतदार बनविण्यात आल्याचा आरोप माजी आमदार घोडमारे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता.याशिवाय मेघे यांच्याच महाविद्यालयात सर्वाधिक मतदानकेंद्र निवडणूक आयोगाने दिले असल्याने त्याचा देखील प्रभाव मतदारांवर पाडला जातो,असा आरोप करीत याविरुद्ध निवडणूक आयोगाकडे दाद मागण्यात आली मात्र,ती धुडकावून लावित निवडणूक आयोगाने मेघे यांच्या महाविद्यालयातील ही मतदान केंद्रे कायम ठेवली.
त्याच केंद्रात मोठ्या प्रमाणात आज सुटी घोषित केली असताना देखील विद्यार्थी मतदान करीत असल्याचे लक्षात येताच,बंग यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना ओळखपत्र मागितले तसेच हूसकावून लावले.हे व्हिडीयो देखील तूफान व्हायरल झाले.हिंगणा मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५५.७९ टक्के मतदान झालेे असून,मेघे यांच्या विजयाची हमी दिली जात आहे.यावेळी राजकारणात मुरलेले रमेश बंग यांच्या उमेदवारीमुळे समीर मेघे यांना ही निवडणूक सोपी नव्हती.या ही मतदारसंघात पैशांचा महापूर वाहील्याची चर्चा चांगलीच रंगली.हिंगणा मतदारसंघाची निवडणूक एकतर्फी झाली नसून,तगडी लढत भाजप व राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये दिसून पडली.
२०१९ च्या निवडणूकीत विजय घोडमारे यांना ७५ हजार मते मिळाली होती तर समीर मेघे यांना १ लाख २१ हजार मते मिळाली होती मात्र,यातील ५२ हजार ८०० हजार मते ही ‘बोगस’असल्याचा आरोप घोडमारे यांनी केला होता.मेघे यांची महाविद्यालये,रुग्णालयातील प्रत्येक कर्मचा-याला किमान १०० मतदार बनवण्याचे टार्गेट देण्यात आले असून त्या मागे एक मेघे चिपकून देणे,यानंतर हजार-हजार बोगस मतदारांची नावे खोट्या आय-डी बनवून मतदारयादीत समाविष्ट करण्यात आली,असे करुन किमान ५५ हजार ८०० बोगस मतदार सर्व मतदारसंघातून शोधून दिल्याचा आरोप घोडमारे यांनी केला होता.
आज देखील मोठ्या प्रमाणात बोगस मतदानासाठी विद्यार्थी मतदान केंद्रांवर आले होते.यात विद्यार्थ्यांची काही चूक नाही,त्यांना गुण मिळणार नाही या भीतीने ते मतदानासाठी येतात मात्र,ओळखपत्र जुळत नसल्याने त्यांना पळून जावे लागले.आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आज मेघे यांची डाळ शिजू दिली नाही,मेघे यांच्यावर हिंगण्यातील शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात नाराज असल्याचे दिसून पडले.
येत्या २३ नोव्हेंबर रोजी राजकारणात मुरलेले राष्ट्रवादीचे रमेश बंग बाजी मारतात की पुन्हा एकदा बोगस मतदारांच्या जीवावर उदार होऊन मेघे विजयाची माळ गळ्यात घालतात,हे दिसून पडेल.
उमरेड-
उमरेडमध्ये भाजपतर्फे सुधीर पारवे यांना उमेदवारी देण्यात आली असूनउमरेडमध्ये तिहेरी लढत दिसून पडत आहे.काँग्रेसकडून संजय मेश्राम दंड थोपटून आहेत तर भाजपचे बंडखोर प्रमोद घरडे रिंगणात आहेत.हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे.पारवे हे दोनवेळा आमदार राहीले आहेत. तर दुस-यांदा निवडणूक लढवित असलेले काँग्रेसचे संजय मेश्राम यांच्याही पाठीमागे केदार यांचा वरदहस्त आहे.मूळक यांचे देखील पाठबळ मेश्राम यांना लाभले आहे.
मूळक यांचे काँग्रेसमधून निलंबन झाल्यानंतरही त्यांनी मेश्राम यांच्यासाठी उमरेडमध्ये सभा घेतल्या.सुधीर पारवे यांना राजू पारवे यांची बंडखोरी शमविण्यात यश आले असून पक्ष संघटनेची ताकत त्यांच्या पाठीशी आहे.या तिहेरी लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले असून उमरेडमध्ये नागपूर जिल्ह्यातील सर्वाधिक इतके ६७.३७ टक्के मतदान झाले आहे.वाढलेले हे मतदान कोणाची धाकधूक वाढवतात,याचा उलगडा येत्या २३ नोव्हेंबर रोजीच होऊ शकेल.
‘सत्ताधीश’ला उमरेड मतदारसंघात प्रत्यक्ष जाता न आल्याने तेथील मतदारांचा कौल कळू शकला नाही.