नागपूर,ता.१८ नोव्हेंबर २०२४:काँग्रेसचे दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघाचे उमेदवार प्रफूल्ल गुडधे पाटील यांनी प्रचार सभेत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर हा खळबळजनक आरोप केला की त्यांना दक्षिण-पश्चिममधून भाजपच्या तिकीटावर लढण्याची ऑफर मिळाली असून, मंत्री पदाचे देखील आमिष दाखविण्यात आले आहे.त्यांच्या या आरोपावर ‘सत्ताधीश’ने खास त्यांना ऑन-कॅमरा विचारले असता,या आरोपात तथ्य असल्याचे त्यांनी सांगितले.
२००९ मध्ये पण मला अश्या पद्धतीची ऑफर होती,बनवारीलाल पुरोहित व योगानंद काळे,अप्पा कुलकर्णी हे तीन लोकं, ही ऑफर घेऊन आले होते,असे ते सांगतात.मात्र,माझा लढा हा विचारधारेचा आहे पदाचा नाही,सत्तेचा नाही असे ते सांगतात.यानंतर २०१४ मध्ये देखील हीच ऑफर मला देण्यात आली.२०१९ मध्ये ही पुन्हा मला हीच विचारणा करण्यात आली.अगदी अलीकडे या निवडणूकीत देखील हीच ऑफर देण्यात आली.
इतकंच नव्हे तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष असणारे चंद्रशेखर बावणकुळे हे ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघातून विधान परिषदेत गेले,विधान परिषदेत जाण्यासाठी त्या निवडणूकीची देखील मला ऑफर देण्यात आली होती.
आता २०२४ मध्ये देखील भाजपकडून दक्षिण-पश्चिममधून भाजपकडून लढण्याची ऑफर मला कोणी दिली?हे ज्याप्रकारे २०१४ मध्ये ही ऑफर घेऊन कोण आले होते,हे सांगितले.पुढे वेळप्रसंगी मी २०२४ मध्ये मला ही ऑफर कोणी दिली हे देखील उघडपणे सांगील,असे ते सांगतात.
या निवडणूकीकडे कसे बघता,जनतेचा कौल कसा वाटतोय?असा प्रश्न केला असता,ही निवडणूक जनता लढत असल्याचे त्यांनी सांगितले.ही निवडणूक संवैधानिक अधिकारांची व न्याय,हक्काची लढाई आहे.ज्या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रात सुरु आहे ते महाराष्ट्राच्या सुसंस्कृत जनतेला आवडलं नसल्याचे ते सांगतात.फोडाफोडीचं राजकारण,भ्रष्टाचाराचं राजकारण आणि नागरिकांना इतकं कमकुवत करणारे राजकारण जनतेलाच पसंद नाही.निवडणूकीच्या तोंडावर ज्या काही योजना या सरकारने आणल्या ते फक्त आमिष आहे,हे जनतेला देखील माहिती आहे.शिक्षण,आरोग्य,रोजगार यांचा बोजवारा वाजला असून सर्वसामान्य जनता आता या सरकारच्या कारभाराला त्रासलेली आहे.या वेळी निश्चितच जनताच दक्षिण-पश्चिममध्ये बदल करतील,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मागच्या वर्षी २३ सप्टेंबर २०२३ रोजी तसेच याच वर्षी २० जुलै रोजी नागपूरात अतिवृष्टिने जो हाहाकार केला,मतदारसंघात फेरफटका मारताना अजूनही त्यासंबधीचा रोष जनतेमधला गेलेला नाही,सरकार धावून आली नाही,शहरातील नेते धावून आले नाही,असा त्यांचा आरोप आहे,याकडे लक्ष वेधले असताना,हे अगदी खरे असल्याचे प्रफूल्ल गुडधे पाटील सांगतात. शहरभर सिमेंट-काँक्रिटचे रस्ते बनवत असताना पावसाच्या पाण्याचा निचरा होईल याचे कुठलेही नियोजन केले नाही,हे रस्ते फक्त ‘विकासा’च्या नावावर करण्यात आले असून सिमेंट-काँक्रिटच्या रस्त्यांमध्ये फार मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप त्यांनी केला.जवळ-जवळ तीस-तीस टक्क्यांपर्यंत कंत्राटदारांकडून कमिशन घेण्यात आले आहे. दक्षिण-पश्चिम नागपूरचेच रस्ते बघा,ज्या सिमेंटच्या रस्त्यांची हमी ते ५० वर्ष टिकेल,अशी घेत होते एका वर्षात ते उखडलेले मी पाहिले आहे.त्यामुळे शहरात थोडा जरी पाऊस पडला तर लोकांच्या घरात पाणी तुंबत आहे,लोकांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे,असे त्यांनी सांगितले.
दूकानदारांचाही पराकोटीचा रोष असून त्यांना कोणताही मोबदला अतिवृष्टिमुळे झालेल्या नुकसानीचा मिळालेला नाही,याशिवाय पर्यावरणवाद्यांनी तर ‘ग्रीन नागपूर’नावाने व्हॉट्स ॲप ग्रूपच्या माध्यमातून एक चळवळच चालवली आहे,याकडे लक्ष वेधले असता,ग्रीन नागपूरसोबत भारतीय जनता पक्षाचा तर काहीच संबंध नाही, त्यांचा संबंध फक्त पैशांशी आणि सत्तेशी आहे अशी टिका करीत,यांना फक्त सत्ता हवी,कुठल्याही किमतीत.अगदी पर्यावरणाचे नुकसान करुन देखील त्यांना सत्ता हवी आहे आणि पैसा हवा आहे.विकासाच्या नावावर,सौंदर्यीकरणाच्या नावावर पैसा लृटणे व त्याच पैशांच्या माध्यमातून निवडणूका लढणे हे काम त्यांचे राहीले आहे,अशी टिका ते व्यक्त करतात.
दक्षिण-पश्चिम मतदारसंघाचे आमदार झाल्यानंतर काय बदल घडवाल या मतदारसंघात?असा प्रश्न केला असता,लोकांना जो हवा असेल तोच बदल घडवणार,नागरिकांवर ‘विकास’लादणार नाही,असा टोला त्यांनी हाणला.
याप्रसंगी महागाईवर बोलताना,२०१४ मध्ये मोदी सरकार येण्या पूर्वी काँग्रेसच्या कार्यकाळात गॅस सिलेंडरचे दर ४१० रुपये होते ते २०२४ मध्ये ८५० रुपये झाले आहे,पेट्रोल ५७ रुपयांवरुन १०४ रुपये लिटर,डिझेल ५७ रुपयांवरुन ९२ रुपये लिटर,खाद्यतेल ७० रुपयांवरुन १७० रुपये लिटर,मीठाचा पुडा १० रुपयांवरुन २५ रुपये,साखर २८ रुपयांवरुन ४८ रुपये एवढी महाग झाली असून मोदी सरकारच्या जीएसटीने तर शेतकरी व सर्वसामान्यांचे कंबरडेच मोडले असल्याचे ते सांगतात.शेती अवजारांवर १२ टक्के जीएसटी,ट्रॅक्टरवर १२ टक्के,शालेय साहित्यावर १८ टक्के,तूपावर १२ टक्के जीएसटी लागू केला.दूसरीकडे श्रीमंतांच्या हेलिकॉप्टरवर ५ टक्के,विमानावर ५ टक्के,हिरा खरेदीवर दीड टक्के,क्रूझ जहाजांजवर फक्त ५ टक्के जीएसटी लावला.जे इंग्रजांना जमले नाही ते त्यांच्या वारसदारांनी करुन दाखवले,अशी जळजळीत टिका ते करतात.
भ्रष्ट युतीच्या महाभ्रष्टाचाराची लूट ही ५०,००,००,००,००,००० एवढी असल्याचा आरोप त्यांनी केला.
धारावी अदानी घोटाळा १ लाख कोटींचा,एमएमआरडीए निविदा घोटाळा १६,००० हजार कोटींचा,जलयुक्त शिवार घोटाळा १०,००० कोटींचा,रुग्णवाहिका घोटाळा ८,००० कोटींचा,निवडणूक रोखे घोटाळा ६,०६० कोटींचा,मुंबई रस्ते काँक्रिटीकरण घोटाळा ६,००० कोटींचा,सार्वजनिक आरोग्य विभागाचा घोटाळा ३,२०० कोटींचा,तलाठी घोटाळा यामुळे ८ लाख ६२ हजार उमेदवारांवर परिणाम झाल्याचा आरोप ते करतात.
याशिवाय आमदार खरेदी,नगरसेवक खरेदी,वरिष्ठ अधिका-यांच्या बदल्यांचे रेटकार्ड,जिल्हा सिव्हिल सर्जन बदली,एक्साईज इन्सपेक्टर परीक्षेचा पेपर,तलाठी पेपर,कनिष्ठ अभियंता पद,गट ‘ड‘सरकारी नोकरीचे रेट कार्डचे दर देखील प्रफूल्ल गुडधे पाटील हे आपल्या जाहीरनाम्यातील नमूद करतात.
महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यातील आदिवासींचा वनहक्क नाकारला तसेच २ लाख आदिवासी शेतक-यांच्या जमिनी हडपल्या,सरकारने निधी न दिल्याने २०२३ मध्ये अनुसूचित जातीच्या १.५ लाख विद्यार्थ्यांना दहावी नंतरची शिष्यवृत्ती नाकारण्यात आली,अटल सेतू व मुंबई कोस्टल रोडला तडे गेेले असून ३१,००० कोटींचे प्रकल्प भ्रष्टाचाराने बरबटले. २०,४०२ पदे डॉक्टर्सची अद्याप रिक्त आहेत.२०२३-२४ च्या अर्थसंकल्पात गरीब रुग्णांच्या औषध पुरवठासाठी केवळ ७ टक्के बजेट खर्च,संपूर्ण राज्यात रुग्णांचे हाल,हिंसेमध्ये ३५ टक्क्यांनी वाढ,भाजप आमदाराचा पोलिस ठाण्यातच गोळीबाराची घटना अद्याप राज्यातील नागरिक विसरले नाहीत.
अम्ली पदार्थांच्या तस्करीत महाराष्ट्र दुस-या क्रमांकावर आहे.अपयशी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात दररोज १२९ महिलांविरोधात गुन्हे घडले,बालकांवरील गुन्ह्यात महाराष्ट्र २०,७६२ गुन्ह्यांसह देशात पहिला तर आमदारांना आलिशान गाड्या देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची ‘निर्भया’ फंडातूनच चोरी,शिंदे-फडणवीसांच्या कार्यकाळात २०,००० शेतक-यांच्या आत्महत्या,दररोज ७ शेतक-यांचा आत्महत्या,जलयुक्त शिवारावर दहा हजार कोटींचा खर्च करुन देखील शेतकरी सिंचनापासून वंचित,त्यांच्या डोळ्यातच अश्रूंचे सिंचन, भ्रष्ट युती सरकारने फक्त आपले खिसे भरले.आरोग्य व्यवस्था मोडकलीस आणली,१ लाख लोकांच्या मागे केवळ ८० डॉक्टर्स आहेत,एवढंच नव्हे तर‘ छत्रपती शिवाजी महाराजांची मोदींशी तुलना हा तर महाराजांचा सन्मान’असे शिवद्रोही विधान करणा-या राज्यपालांना अद्याप महाराष्ट्रातील जनता विसरली नाही.महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेकडून मिळणा-या १०० रुपयांच्या करातून फक्त ७ रुपयांची महाराष्ट्राला भीक मिळते,माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजमाता जिजाऊ,सावित्रीबाई फुले आणि शिवरायांचा अपमान केला त्यावेळी भाजप नेत्यांनी हसून-हसून टाळ्या वाजवून दाद दिली.
‘राष्ट्र धर्म बुडवला,गुजरात चरणी अर्पण केला,हे महायुतीचे महापाप’ याचा हिशेब दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील मतदारच घेतील,असा इशारा ते देतात.
…………………..