फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजअग्निशमन विभागाच्या तात्पुरत्या स्थगितीचे गौडबंगाल!

अग्निशमन विभागाच्या तात्पुरत्या स्थगितीचे गौडबंगाल!

Advertisements

इतवारी:‘आगीशी‘ खेळ कोणावर बेतणार?(भाग-३)

(छायाचित्र : इतवारीतील दाटीवाटीच्या लोहा ओळीतील एका ऑईल पेंटच्या दूकानाला लागलेली आग, बघता बघता संपूर्ण इमारतीलाच आगीने असे कवेत घेतले होते!)

नागपूर,ता.१२ ऑगस्ट २०२४: इतवारी भागातील दाटीवाटीच्या  खापरे माेहल्ला भागातील तीन मजली इमारतीला लागलेली आग,त्यात झालेला १७ वर्षीय अनुष्काचा र्दूर्देवी मृत्यू,या घटनेने जुन्या आगीच्या घटनांना अनायास उजाळा दिला अन् याच खापरेपूरा मोहल्ल्यातील १३ ऑगस्ट १९९९ रोजी ,लाल इमली गल्लीतील अभिषेक नॉवेल्टीच्या, चार मजली इमारतीला लागलेली आग,याची चर्चा येथील रहीवाश्‍यांनी केली.तीन नल चौकातील अतिशय दाटीवाटीच्या गल्लीत तब्बल २६ वर्षांपूर्वी देखील याच भागात आगीचे असेच तांडव या भागातील रहीवाश्‍यांनी व व्यापारी वर्गाने अनुभवला होते मात्र,अडीच दशकांचा काळ लोटूनही प्रशासनाने नागरिकांच्या जिवितेच्या सुरक्षेसाठी कोणत्याही ठोस व प्रभावी उपाययोजना अमलात आणल्याची उदाहरणे नाहीत,किंबहूना त्यात वर्षागणिक आणखी भरच पडत गेलेली आढळते.
९ डिसेंबर २०१३ रोजी जागनाथ बुधवारीतील केमिकल गोदामाला लागलेली आग,५ डिसेंबर २०१३ रोजी सेवासदन चौकातील नागरिक जिल्हा सहकारी बँकमध्ये लागलेली संशयास्पद आग,८ डिसेंबर रोजी अक्षय्य तृतीयेच्या दिवशीच कसारपूरा येथील पूजा स्टील कंपनीच्या वरच्या मजल्यांना लागलेली आग,त्याही पूर्वी २२ एप्रिल २००९ रोजी बोरा मज्सिद गल्लीतील बरसाना कॉस्मेटिक ॲण्ड जनरल स्टोअर्सला लागलेली आग,इतवारीतील टांगा स्टॅण्ड या ठिकाणी अनिल सेल्स या दूकानाला१३ जून २००९ रोजी लागलेली आग,ज्यामध्ये तीन हजार वर्ग फूटाचे गोदाम संपूर्ण जळून खाक झाले होते,जुना भंडारा रोडवरील तीन नल चौकात १७ ऑक्टोबर २०११ रोजी पाच मजले पेटून उठले ज्यात कारपेट,रबर फोम,लेदर फोम,वेलवेट आणि ते चिपकवणारे सोल्यूशन्सच्या डब्बे आगीत स्वाहा झाले.अब्दूल मलीक यांची ती दूकान होती,महत्वाचे म्हणजे सकाळी ७.३० वा.या पाच मजली इमारतीला आग लागली जी रात्रीच्या १०.३० वाजता विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं होतं!
१ जून २०१९ रोजी गंजीपेठच्या औषध मार्केट(दवा बाजार)ला भीषण आग लागली.एका ओळीने एका नंतर एक दूकाने आगीच्या भक्ष्यस्थानी चढत गेली.तत्पूर्वी २२ एप्रिल २०१७ रोजी जुना भंडारा रोडवरील बाबा भाई बर्तनवाले दूकानाला लागलेली आग,इतवारी भागातील या संपूर्ण आगीचा इतिहास काय सूचित करतो?न्यायालयाने या आगींच्या घटना लक्षात घेऊन स्वत:हून ३ ऑगस्ट २०१८ रोजी जनहित याचिका दाखल करुन घेतली,हे विशेष!न्यायमूर्ती रवि देशपांडे व ए.एस.चांदूरकर यांच्या खंडपीठाने राज्य सरकार,महानगरपालिका,जिल्हाधिकारी यांच्यासह सर्व संबंधित प्राधिकरणांना नोटीस बजावल्या.

(छायाचित्र : २०१८ मध्ये तीन नल चौक भंडारा रोडवरील मछीसाथ येथील एका सहकारी बँकच्या बहूमजली इमारतीला लागलेली आग.तिस-या माळ्यावरील गोदामाम मोठ्या प्रमाणात फोम,लेदर,कारपेट,फोन चिपकवणारे सोल्यूशन्स इ.सामग्री ठेवण्यात आली होती!)

नागपूर शहरात इतवारीसारख्या अतिशय दाटीवाटीच्या गल्लीबोळ्यात चार-चार,सात-सात मजली इमारती सहज चढून जातात,मनपाचे सतरंजीपुरा झोनचे अधिकारी फक्त नोटीस जारी करतात,मात्र,कारवाई काहीच होत नाही.मनपाच्याच झोनने इतवारीतील १,२७९ इमारतींना ‘धोकादायक’घोषित केले आहे.६० एफआयआर दाखल झाले आहेत.८२५ इमारतींच्या मालकांना वीज-पाणी कापण्याच्या नोटीस जारी केल्या,कारवाई काय?तर शून्य!७२ इमारतींच्या मालकांना त्यांच्या जीर्ण झालेल्या इमारतींना ‘सील‘करण्याच्या नोटीस निघाल्या,झोन कार्यालयातील अधिका-यांनी यासाठी ‘खास‘ठेकेदार ठेवले असून,ते नोटीस जारी झालेल्या अश्‍या इमारतींच्या मालकांशी ‘संवाद’साधतात,अनेक इमारतींचे सील बंद केले जाते,उघडले जातात,वीज-पाणी कापली जाते,पुन्हा सुरु करुन दिले जातात,अनेक इमारतींना ‘अस्थायी‘नोटीस बजावल्या जातात,नंतर ठेकेदाराशी बोलणी झाल्यानंतर त्याच धोकादायक इमारतींबाबत कधीच ‘स्थायी’नोटीस बजावलीच जात नाही,असे सरकारी अनुभव येथील अनेक रहीवाश्‍यांनी खास ‘सत्ताधीश’कडे व्यक्त केले.
यात ही अग्निशमन विभागाची तात्पुरती स्थगितीचे गौडबंगाल,या प्रक्रियेवर तर एखादा लोकप्रशासन अभ्यासक्रमाचा विद्यार्थी पीएच.डी(आचार्य पदवी)मिळवू शकतो,अशी मिश्‍किल मात्र तितकीच मार्मिक कोटी ते करतात!इतवारी भागात कुठेही फिरा,शेकडो धोकादायक इमारती अन् त्या इमारतीतील व्यवसाय अविरत सुरु असतो,कोणत्याही जीर्ण,धाेकादायक इमारतींच्या दर्शनीस्थळी झोनचे अधिकारी नोटीस चिपकवत नाही!जेणेकरुन त्या ठिकाणी येणा-या नागपूरकर ग्राहकांच्या जिवितेची सुरक्षीतता कायम राहील.मनपा प्रशासन,झोनल अधिकारी तसेच अग्निशमन विभागाच्या अधिका-यांना इतवारीतील नागरिक,व्यापारी वर्ग तसेच नागपूरकर ग्राहकांच्या जिवितेची कोणतीही काळजी नसून,हे असंच चालत राहणार,दशकानुदशके असेच चालत आहे,कायद्याचा बडगा उगारल्याशिवाय ते वठणीवर येणार नाहीत,एखाद्या तरुण अनुष्काचा जीव धूराने गुदमरुन किवा आगीत होरपळून असाच जात राहील,येणा-या काळात तो तर वाचवायचा असेल तर कायदेशीर मार्गानेच जाणे अपरिहार्य असल्याचे ते सांगतात.
नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाने शहरातील बहूमजली इमारतीतील अग्नि सुरक्षेला घेऊन मुंबई महानगरपालिकेचा अग्निशमन विभाग गंभीर नसल्याची टिपण्णी केली आहे.न्यायालयाने अग्निशमन विभागाच्या मुख्य अधिका-याला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहे.न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या.अमित बोरकर यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले.या जनहित याचिकेत याचिकाकर्त्याचे म्हणने आहे, की अग्निशमन विभागाने अश्‍या इमारतीच्या निर्माणाचे प्रस्ताव स्वीकारु नये जिथे अग्निशमन दलाचे फायर इंजिन व फायर टैंकर यांचा प्रवेश कठीण असेल.जर अश्‍या इमारतीमध्ये आग लागली तर अग्निशमन दलाला वेळेवर आगीच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी बराच वेळ खर्ची पडतो.शहरात दररोज आगीच्या घटना घडत आहेत,ज्यामध्ये लोकांचे प्राण जात आहेत.राज्य सरकारने २००८ मध्ये २६/११ च्या आंतकवादी घटनेनंतर विशेष सुरक्षा नियमांचा मसुदा तयार केला होता मात्र,अद्याप इतक्या वर्षांनंतर देखील त्यावर अंमलबजावणी झाली नसल्याकडे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले,हे विशेष!
जे राज्याच्या राजधानीत मुंबईत घडत आहेत तेच राज्याच्या उपराजधानी नागपूरात देखील घडत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सांगतात.आपल्या ढिसाळ आणि बेपर्वा वृत्तीतून राज्यकर्ते,धोरणकर्ते आणि प्रशासन केवळ इतवारीलाच नव्हे तर संपूर्ण शहर व राज्यालाच आगीच्या ज्वालेत ढकलू पाहत असल्याची जहाल टिका देखील ते करतात!
परिणामी,करोना काळात मागे पडलेली जनहित याचिका पुन्हा पुढे आणण्याची प्रक्रिया येथील काही जागरुक सामाजिक कार्यकर्त्यांनी सुरु केली असून ,इतवारीतील सर्व अवैध इमारतींवर बडगा,अतिक्रमण पाडणे,अग्निशम यंत्रे बसवणे,जीर्ण इमारती पाडणे,ग्राहकांच्या जीवावर उदार झालेल्या दाटीवाटीच्या गल्लीबोळांचा विस्तार करणे,त्या सुरक्षीत करने इत्यादी बाबींसाठी तपशीलवार यादी न्यायालयात सादर करणार असल्याची माहिती ते देतात.
……………………….
(समाप्त)
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या