Advertisements

गृहमंत्र्यांच्या शहरात यूट्यूबरचा ‘राजकीय’पाठबळातून उन्मतपणा
नागपूर,ता.२५ जुलै २०२४: देशाच्या तसेच राज्याच्या राजकारणाचा स्तर सूडबुद्धीतून किती निम्न पातळीवर आला आहे हे अवघ्या देशाने लोकसभेच्या निवडणूक काळात अनुभवला मात्र,त्याहीपेक्षा चिंतेची बाब म्हणजे डिजिटल माध्यमे लीलया हाताळणा-या यूट्यूबर्सचा जो सुळसुळाट अलीकडे सर्वदूर दिसून पडतो,त्यांच्या वागणूकीची ’रिच’राजकीय श्रेष्ठींच्या आर्शिवादाने कुठपर्यंत पोहोचली,याचा अनुभव नागपूरातील एका महिला पत्रकाराला काल सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास महानगरपालिकेतील मनपा आयुक्त कक्षा मागील पाेर्चमध्ये आला.
नागपूरात पुन्हा एकदा २० जुलै राेजी कोसळणा-या पावसामुळे नागपूरकरांचे जनजीवन अस्मानी व सुल्तानी संकटात जे ढवळून निघाले,त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण खापर हे पुन्हा एकदा मनपावर फोडण्यात आले.परिणामी,नागपूरकरांचे व सोबतच न्यायालयाचे सातत्याने अतिशय कटू बोल एेकणा-या मनपा आयुक्तांनी, काल मनपा मुख्यालयात पत्रकारांसाेबत संवाद साधला.यावेळी पहील्या रांगेतील पाच ते सहा खुर्च्यांवर सिटीझन युट्यूबर्सची चौकडी प्राधान्यक्रमाने बसली होती.इतकंच नव्हे तर नागपूरकरांच्या जनजीवनाशी निगडीत अतिशय संवेदनशील विषयांवर प्रश्नांची सरबत्ती, वरिष्ठ पत्रकारांद्वारे आयुक्तांवर होत असताना,हे सिटीझन यूट्यूबर्स शहरातील स्टीलच्या कच-यापेट्यांविषयी आयुक्तांसोबत बाेलले!आम्हाला आमचे कॉफीचे कप्स कचरापेटीत सरळ टाकता येत नसल्याची तक्रार त्यांनी केली!यावरुन या तथाकथित सिटीझन यूट्यूबर्सची शहरातील ‘सिटीझन्स’प्रतिची संवेदना दिसून पडली.इतकंच नव्हे तर रस्ते आणि जीवघेणे खड्ड्यांवर आयुक्तांसोबत चर्चा होत असताना,आयुक्तांची ‘रि’उचलून शहरात सगळे रस्ते हे मनपाचे नाहीत तर तुम्ही प्रत्येक रस्त्यावर त्या-त्या स्थानिक विकास संस्थांचे फलक का लावत नाही?असा चमत्कारिक प्रश्न केला.
पत्रकारिता ही संवेदनशील असते त्यात उथळपणाला स्थान नाही,असा आजपर्यंतचा समज होता मात्र,त्या तरुणाईकड बघता,आपापले ‘रिच’वाढवण्यासाठी हे कोणत्या स्तरापर्यंतची संवेदनशून्यता जपतात,याची प्रचिती उपस्थित पत्रकरांना आली.परिणामी,एका महिला पत्रकारांने आयुक्तांना उद्देशून सरळ,आक्षेप नोंदवित विंनती केली,पुढील वेळीपासून सिटीझन यूट्यूबर्ससोबत वेगळा संवाद ठेवावा व पत्रकारांसोबत पत्रकार परिषद वेगळी ठेवावी.आयुक्त डॉ.अभिजित चौधरी यांनी हसून,मान डोलवित हा मुद्दा बखुबीने टाळला.यावेळी त्या महिला पत्रकाराने कोणाचेही नाव घेतले नाही.
पत्रकार परिषद संपल्यानंतर आयुक्त कक्षाच्या मागील पोर्चमध्ये त्यातील एका सिटीझन यूट्यूबरने त्या महिला पत्रकाराला सरळ धमकी देत,आता तुमचाही व्हीडीयो मी कसा व्हायरल करतो,तुम्ही बघाच!असा इशारा दिला.त्याच्यासोबत एका पाश्चिमात्य मालकाची ‘टाईम’ टू ‘टाईम’प्रसिद्ध होणा-या प्रसिद्धी माध्यमातील खासगी आकाशवाणी फेम ’आर जे’नी त्याहून उद्दामपणाचा कळस गाठून त्या महिला पत्रकराला,’तुम्हारी कितनी रिच है?’असा प्रश्न केला.यावर,मला रिच,लाईक्स कळत नाही फक्त पत्रकारिता आणि त्यातील संवेदनशीलता कळते बेटा,असे उत्तर त्यांचे वय बघता,त्या महिला पत्रकाराने त्यांना दिले.तुम्ही पत्रकार परिषदेत आमच्या बसण्यावर आक्षेप कसा घेतला?आम्हाला पण अधिकार आहे,असे बोलून ते दोघे आणखी उद्दामपणे त्या महिला पत्रकाराशी वाद घालू लागले.त्यांची देहबोली आणि शब्द हे फार आक्षेपार्ह्य होते.
२० जुलै रोजी शहरात पावसाने त्राही-त्राही माजवली असता,एका पर्यावरणाच्या व्हॉटस ॲप ग्रूपवर इन्सटावरील एक पोस्ट एका महिला पर्यावरणप्रेमीनी फॉरवर्ड केली.शहरातील शेकडो भागातील पाण्याचा कहर दाखविणारे व्हिडीयोज एकत्रित करुन तो इन्सटावर पोस्ट करण्यात आला होता.परिणामी,त्या ग्रूपमधील महिला पत्रकाराने त्या यूट्यूबरचा मोबाईल क्रमांक त्या महिला पर्यावरणप्रेमीला मागितला व तिने तो पाठवला.महिला पत्रकाराने त्या यूट्यूबरसोबत संवाद साधत,ते व्हिडीयो पत्रकारांसाठी मिळू शकतील का?अशी विचारणा केली होती.यावर त्या यूट्यूबरने,खूप व्हिडीयोज असल्याने पाठवू शकणार नाही,प्रयत्न करतो असे उत्तर दिले.मात्र,त्याने पाठवले नाही.हा त्याचा वैयक्तिक अधिकार ही होता.त्या यूट्यूबरचा मोबाईल क्रमांक सेव्ह केल्याने त्याचा डीपी महिला पत्रकाराला दिसला होता.तोच यूट्यूबर चक्क पत्रकारांसाठी असणा-या पत्रकार परिषदेत दिसल्याने तिला आश्चर्य वाटलं.
परंतू,पत्रकार परिषदेचे संपूर्ण गांर्भीय ते यूट्यूबर्स ज्या पद्धतीने घालवित होते,ते बघता
महिला पत्रकाराने आयुक्तांकडे आक्षेप नोंदवला. महिला पत्रकारासोबत वाद घालताना त्या युट्यूबरने,तुम्ही पत्रकार लोक आमच्यावर आक्षेप घेता व आम्हालाच भीकेत व्हीडीयोज मागता,असे असभ्य शब्द वापरले.व्हिडीयोज देणे न देणे याचा कुठेही पत्रकारितेशी संबंध येत नाही,तो भाग वेगळा असल्याचे महिला पत्रकार म्हणाली.मात्र,‘मूर्ती लहान पण किर्ती महान’असणा-या त्या आर.जे नी महिला पत्रकाराच्या मनात लज्जा उत्पन्न होईल,असे हातवारे करीत ‘चल,चल निकल यहा से’असे वाक्य उच्चारले.(हा संपूर्ण घटनाक्रम आयुक्तांच्या पोर्चमधील सीसीटीव्ही कॅम-यामध्ये कैद झाला आहे).
मूळात,त्यांच्यात एखाद्या महिला पत्रकाराला तिचा व्हीडीयो व्हायरल करण्याची व बघून घेण्याची धमकी देण्याचे धाडस त्यांचे २५-२६ वर्षांचे वय बघता आले कुठून?याचा शोध महिला पत्रकाराने घेतला असता तो यूट्यूबर मनपाचाच ठेकेदार असून नागपूरकर जनतेच्या कराच्या महिनाकाठी पाच-पाच लाख रुपयांची लयलृट त्याच्यावर मनपा प्रशासनाने(कोणाच्या सांगण्यावरुन?हा भाग वेगळा)मुक्त हस्ताने सोशल मिडीयावर मनपाच्या कामांची प्रसिद्धी करण्याकरिता केली असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले!असा मनपाचा ठेकेदार असणा-याला एका यूट्यूबरला शहरातील विविध माध्यमातील पत्रकारांसोबत त्याच्या चमूसह बोलविण्या मागे, मनपाच्या जनसंपर्क विभागाच्या प्रमुखाचा काय हेतू होता?त्यांच्या माध्यमातून ‘चमकोगिरी‘अपेक्षीत होती की आयुक्तांच्या कार्यशैलीवर पांघरुण घालण्याचा त्यांचा मानस होता?कारण त्या यूट्यूबर्सनी त्यांच्या डिजिटल माध्यमांवर टाकेलेले आयुक्तांसोबतचे छायाचित्रे व त्यांचे कॉफीचे कप्स कचरापेटीत सरळ जात नसल्यासारख्या संवादांना भरपूर लाईक्स मिळालेले आढळले!नागरिकांच्या घरात दोन-दोन दिवस पाणी तुंबले असताना व तीन मृत्यू झाले असताना,त्यांना रस्त्यावरील गायी म्हतवाचा विषय वाटला होता!
सोशल मिडिया इंफ्लूएंसर यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘देवगिरी’ बंगल्यावर मागील वर्षी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.त्या उपक्रमाचे शेकडो छायाचित्र या ‘एक्टीव्ह’यूथ आणि नागपूर शहराच्या या ‘सोशल’ कैवा-याने आपल्या फेसबूक व इतर डिजिटल माध्यमांवर पोस्ट केलेली आढळते.इतकंच नव्हे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तेही सत्कार स्वीकारतानाचे छायाचित्र या इंफ्लूएंसरच्या डिजिटल माध्यमांवर झळकतात.काँग्रेसच्या एका आमदाराने देखील निवडणूकीत या इंफ्लूएंसरच्या डिजिटल माध्यमांची मदत, प्रसिद्धीसाठी घेतली असल्याची माहिती समोर आली आहे.अश्याप्रकारे डिजिटल ‘कष्टाचा’सर्वात शॉर्टकट रस्ता या ठेकेदार कम इंफ्लूएंसरला माहिती असल्यानेच ,त्याने त्या महिला पत्रकाराच्या पत्रकारितेचीच खिल्ली उडवित तिला तिचे एकूण‘रिच’विचारले. आधी आर.जे.नी मग या सिटीझन यूट्यूबरनी!फडणवीस पासून तर एकनाथ शिंदेंसारखा राजकीय वरदहस्त गृहीत धरुन,त्या महिला पत्रकाराला तिचा व्हिडीयो व्हायरल करण्याची धमकी देण्या इतपत त्याची मजल गेली,हे कशाचे गमक म्हणावे?

(छायाचित्र : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या देवगिरी बंगल्यावर इंफ्लूएंर्सस यांचा झालेला सत्कार)
नुकतेच केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दैनिक ‘सकाळ’चे ज्येष्ठ संपादक श्रीराम पवार यांना ‘डॉ.गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्कार’प्रदान करण्यात आला.सत्काराला उत्तर देताना श्रीराम पवारांनी,पत्रकारिता जगविणे ही समाजाची जबाबदारी असल्याचे म्हटले.विचारांची फाळणी आपल्या देशासाठी घातक असल्याचे सांगून,माध्यमांविषयी आज फार चांगले बोलले जात नसल्याची खंत व्यक्त केली.वर्तमानपत्रात न्याय व अन्याया करणा-यांमध्ये,न्याय देण्याची ताकत पत्रकारितेत असली पाहिजे,म्हणून पत्रकाराने भूमिका घेणे गरजेचे असल्याचे सांगितले.भूमिका घेण्याचे स्वातंत्र्य त्या पत्रकारामध्ये असले पाहिजे असे सांगून पत्रकारिता जगविणे ही समाजाची जबाबदारी असल्याचे विशद केले.
याच पार्श्वभूमीवर,आयुक्तांच्या पत्रकार परिषदेत त्या महिला पत्रकाराने,पत्रकार म्हणून तिची एक न्याय भूमिका मांडली होती.ती भूमिका समजून घेण्याइतपत ‘परिपक्वता’ व ‘समज’ त्या दोन्ही ‘महानुभवांमध्ये’ नसल्यानेच त्यांनी दिलेली धमकी व केलेले अतिशय असभ्य वर्तन, याविरोधात पोलिसात तक्रार नमूद करण्याचे तिने टाळले.येत्या मनपाच्या निवडणूकीत त्या इंफ्लूएंसरने तो भाजपच्या तिकीटावर नगरसेवकाची निवडणूक लढविणार असल्याची वल्गना त्याने अनेकांकडे केल्याची माहिती आहे.परिणामी,आज जो फक्त इंफ्लूएंसर असताना इतका उन्मत्त आहे,पुढे ज्या ‘कंगाल’ मनपाने त्याच्यावर पाच-पाच लाखांची लयलृट केली व ज्याला मनपाला लृटण्याचे संपूर्ण फंडे आधीच माहिती आहे,त्यालाच नगरसेवकाची खुर्ची मिळाल्यास मनपाचे व सामन्य नागपूरकरांचे काय होणार?हे सांगायला कुण्या ज्योतिषाची गरज नाही.आपल्या लाखांच्यावर ‘रिच’च्या भरवश्यावर मनपाची निवडणूक जिंकणे त्याला सोपे वाटत असले तरी सामान्य मतदार हा ‘आभासी’जगतावर भाळून मतदान करीत नाही,निदान भारताची लोकशाही इतकी प्रकल्भ निश्चितच झाली आहे,हे लोकसभेच्या निवडणूकीतून भाजपाला देखील कळले असेल,अशी अपेक्षा करता येईल.
……………………………………
Advertisements

Advertisements

Advertisements
