फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजजुगार...राजकारण आणि महाराष्ट्र

जुगार…राजकारण आणि महाराष्ट्र

Advertisements

नागपूर,ता.२१ नोव्हेंबर २०२३: भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांचा एक फोटो ट्टीट करीत १९ नोव्हेंबर रोजी चायनाच्या मकाऊ येथील केसिनोमध्ये एका रात्री साढे पाच तासात तब्बल साढे तीन कोटी जुगारात हरल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी केला आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राचे राजकीय वातावरण आरोप-प्रत्यारोपात ढवळून निघाले.या वेळी विषय मात्र चक्क ‘जुगार’हा होता आणि आजच्या आधुनिक काळात ही निदान महाराष्ट्रासारख्या राज्यात जुगार खेळणे ही वाईट बाब व सामाजिक दृष्टया तेवढीच निषेधार्ह्य बाब समजली जात असल्याने,संपूर्ण राज्याचे लक्ष या आरोप-प्रत्यारोपातील सत्य-असत्यतेकडे लागले.

खासदार संजय राऊत यांनी बावणकुळे यांचे जुगार संबंधातील आणखी २७ फोटो व ५ व्हिडीयो असल्याचे सांगून खळबळ उडवून दिली.बावणकुळे यांनीही फोटो व ठिकाण नाकारले नाही मात्र आरोप मात्र नाकारले.हा फोटो ते मकाऊ येथे कसिनो असणा-या रेस्टारेंटमध्ये आपल्या कुटूंबियांसोबत असताना कोणीतरी घेतला असल्याचा खुलासा त्यांनी केला.हा कसिनो व रेस्टारेंट एकाच ग्राऊंड फ्लोरवर असल्याचे ते सांगतात.

यावर बावणकुळे यांचे कुटूंबिय हे चीनी आहेत का?असा प्रश्‍न संजय राऊत यांनी केला कारण ट्टीट केलेल्या फोटोमध्ये बावणकुळे यांच्या आजूबाजूला सगळी चीनी मंडळीच दिसून पडत असल्यामुळे, राऊत यांनी माझ्याकडील ते २७ फोटोज व ५ व्हिडीयोज व्हायरल केल्यावर भाजपला आपली दूकानदारी बंद करावी लागेल,असा इशारा दिला.आमच्यावर हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार असल्यामुळे मी कोणावरही व्यक्तीगत टिका करीत नसल्याची पुश्‍ती ही त्यांनी जोडली.

याच राऊतांनी मुख्यमंत्री कार्यालयातून तुरुंगातील काही अट्टल गुन्हेगारांशी संपर्क केला जात असल्याचा आरोप केला होता,यामुळे राऊतांना मुंबई पोलिसांनी नोटीस देखील पाठवली होती.याच राऊतांनी विधिमंडळातील शिंदे गटाला ‘चोरमंडळ’संबोधले असता विधानसभा अध्यक्षांनीही राऊतांना नोटीस बजावून ४८ तासात आपली भूमिका मांडण्यास सांगितले होते.भाजप नेते किरीट सोमय्यांनी १०० कोटींचा टॉयलेट घोटाळ्याचा आरोप करीत सोमय्या यांच्या कुटुंबीयांकडून चालविण्यात येणा-या युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मिरा-भाईंदर महानगरपालिका आणि अन्य ठिकाणी जवळपास १०० कोटीं रुपयांचा टॉयलेट घोटाळा करण्यात आल्याचा आरोप राऊत यांनी केला होता.सोमय्या हे आयएनएस विक्रांत बोटीच्या घोटाळ्यातील आरोपी असल्याचे ते म्हणाले होते.भ्रष्टाचाराविषयी कणव असणा-या फडणवीस यांनी विक्रांत घोटाळ्यावरही काही तरी बोलले पाहिजे अशी मागणी करील एरवी भाजपच्या नेत्यांची राष्ट्रभक्ती उचंबळून येत असते अशी टिका ही त्यांनी केली होती.शरद पवार यांच्यावर टिका करणारे १४ ट्टीटस फडणवीसांनी केले होते,एखादे ट्टीट विक्रांत घोटाळ्याबाबत ही करायला हवे होते.उद्या दाऊद इब्राहिम पाकिस्तानात बसून दहशतवादाविरोधात बोलायला लागला तर त्याच्यावर कोण विश्‍वास ठेवेल?अशी तुलना राऊत यांनी सोमय्या यांची दाऊद सोबत केली होती.

फडणवीस आणि संजय राऊत यांच्यातील शाब्दिक वाद हा तर महाराष्ट्रातील जनतेच्या अंगवळणीच पडला असून,आघाडी सत्तेच्या काळात हा वाद चांगलाच शिगेला पोहोचला होता.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील निवासस्थानी जाऊन हनुमान चालीसा पठणाची केलेली तयारी यावरुन संजय राऊत यांनी शिवसैनिकांच्या नादाला लागल्यास २० फूट खाली गाडण्याची भाषा उच्चारली होती.आमच्या नादाला लागण्याची इच्छाच असल्यास आधी गोव-या श्‍मशानात नेऊन ठेवण्याचा व नंतर मैदानात येण्याचा गर्भित इशारा देत,आम्ही शिवसैनिक जन्मत: माजोरडे असतो,आमचा माज तुम्ही बघाल असे राऊत बरगळले होते.यावर फडणवीस यांनी राणा दाम्पत्याला राष्ट्रीय नेते करण्याचा विडा शिवसेनेने उचलला असल्याची टिका केली होती.त्यांच्या विरोधात इतकी माणसे जमा करने,हल्ला करने हे योग्य नसल्याचे फडणवीस म्हणाले होते.मोहित कंबोजवर ४००-५०० जण चालून येतात,पोलिसांची मदत असल्याने हा प्रकार होतो,कंबोज यांच्याकडे तलवार,बंदूक,ॲसिड असल्याचे राऊतांचे म्हणने हास्यासपद असल्याचे सीसीटीव्ही फूटेजवरुन स्पष्ट झाले.पोलिसांचा चुकीचा वापर आघाडी सरकार करीत असल्याचा आरोप त्यावेळी फडणवीस यांनी केला होता.एप्रिल २०२२ मधील या वादाचा उत्तरार्ध आज राऊत आणि कंबोज यांच्यात रंगलेला दिसून पडला आणि बावणकुळे यांच्याबाबत आणखी २७ फोटोज आणि ५ व्हिडीयो असल्यास राऊतांनी ते दाखवावे आणि आपला मर्दपणा सिद्ध करावा,असे आव्हान कंबाेज यांनी या वादात उडी घेत आज केले.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमशी संबंधित युसूफ लकडावाला याच्याकडून खासदार नवनीत राणा यांनी कर्ज घेतल्याचे पुरावे देऊन राणा यांच्या चौकशीचा आग्रह संजय राऊत यांनी धरला होता.तेव्हा माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्यापासून तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार,माजी मुख्यमंत्री विलासरावदेशमुख,संजय राऊत यांचेही लकडावाला यांच्याशी संबंध असल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी करुन नव्या वादाला तोंड फोडले होते.लकडावाला याचे मातोश्रीवर येणे-जाणे होते,असा पलटवार कंबोज यांनी केला.राणा दाम्पत्याने लकडावालाकडून घर विकत घेतले होते,हा आर्थिक व्यवहार असल्याची पाठराखण कंबोज यांनी राणा दाम्पत्याची केली होती.

राजधानी दिल्लीत हनुमान जयंतीनिमित्त दोन समुदायामध्ये हिंसाचार उसळल्याची घटना घडली होती.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही असाच हिंसाचार घडविण्याचे षडयंत्र होते,असा आरोप राऊत यांनी केला होता.महाराष्ट्रात ही हनुमान चालीसा,भोंग्यांच्या निमित्ताने तणाव आणि दंगेसदृश्‍य वातावरण निर्माण करण्याचा कट रचण्यात आला मात्र राज्याचे पोलिस आणि नागरिकांनी तो उधळून लावला असल्याचे राऊत यांनी वर्तवले यावर संजय राऊत हे ‘फ्रस्टेटेड’ व्यक्ती असल्याची टिका फडणवीस यांनी केली होती.ते दिवसभर काहीही बोलत असतात,त्यांच्या विधानांवर काय प्रतिक्रिया द्यायची?असे फडणवीस उत्तरले होते.

बावणकुळे यांच्याही संदर्भात फडणवीस यांनी  यावर प्रतिक्रिया देताना,बावणकुळे यांचा अर्धवट फोटो ट्टीट करुन राऊतांनी आपल्या विकृत मानसिकतेचा परिचय दिल्याची जहाल टिका केली.

बावणकुळे हे आपल्या कुटूंबियांसह तिथे थांबले होते मात्र जाणीवपूर्वक अर्धवट फोटो ट्वीट करण्यात आला,महाराष्ट्रात अशी विकृती बंद केली पाहिजे,संपवली पाहिजे,असा संताप फडणवीसांनी व्यक्त केला.

गोरगाव येथील पत्राचाळ पुर्नविकास प्रकल्पातील गैरव्यवहार प्रकरणामध्ये सक्तवसुली संचालनालयाने(ईडी) मनी लाँड्ररिंग प्रतिबंधक कायद्यानुसार राऊट यांना अटक करुन तुरुंगात डांबले होते. नोव्हेंबर २०२२ मध्ये तुरुंगातून जामीनावर बाहेर पडल्यावर पत्र परिषदेत राऊत हे नेहमीप्रमाणे फडणवीसांवर तोफ डागतील अशी अपेक्षा असताना, त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चक्क कौतुक केले होते.फडणवीस यांनी काही चांगले निर्णय घेतले आहे.विशेषत:गरिबांना घरे देण्याचा फडणवीसांचा निर्णय महत्वाचा असल्याचे राऊत म्हणाले.त्यांचा बदललेला सूर बघून अनेकांना आश्‍चर्याचा धक्का बसला होता.

राजकीय नेत्यांसोबतचच्या राजकारणाच्या या खेळीत भाजपच्या कार्यकर्त्यांमध्येही सोशल मिडीयावर बावणकुळे एपिसोडबाबत नोंद उमटली नसती तर नवलच.कोणत्याही कसिनोमध्ये जुगारातील हरलेल्या रकमेचीही नोंद हायलाईट होत असते ,ती नोंद या फोटोमध्ये का दिसत नाही?निदान त्या कसिनोमधील एका रात्रीत साढे तीन कोटी रुपये हरल्याची पावती तरी राऊतांनी दाखवावी,अशी मागणी करण्यात आली.राजकारण वेगळे व वैयक्तिक राजकीय हल्लाबोल वेगळे,२७ फोटो व ५ व्हिडीयो आता राऊतांनी दाखवावेच असे आव्हान केले जात आहे.त्यांच्या जवळ असते तर त्यांनी कोणाची वाट बघितली असती का?अशी शंका उपस्थित केली जात आहे.फक्त बदनाम करने आणि खळबळ माजवणे हाच या मागील हेतू सिद्ध झाल्याचा आरोप केला जात आहे.

तर दूसरीकडे २०१९ च्या विधानसभेच्या निवडणूकीत जो पक्ष २७ हजार कोटी रुपये सहज खर्च करुन जातो त्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांसाठी साढे तीन कोटींची रक्कम ही फार शुल्लक असल्याचा बोचरा विनोद ही समाज माध्यमात उमटला.एआय तंत्रज्ञानातून फेक इमेज निर्माण करण्यात आल्याचा पलटवार ही झाला.

दोन्ही बाजूने ज्या पद्धतीने ज्याप्रकारे वार-पलटवाराचे राजकारण गेल्या दोन दिवसांपासून राजकीय पटलावर खेळल्या जात आहे ते बघून पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंना महाराष्ट्रातील ‘पप्पू‘ संबोधित करतानाच फडणवीस यांच्या धर्मपत्नीवर झालेली खालच्या स्तरावरील चिखलफेकीच्या देखील आठवणीची उजळणी या प्रकरणामुळे अनायास झाली.टार्गेट फिक्स करुन ऐकरी भाषेत भाजप व शिवसेना उद्धव ठाकरे गट अश्‍या दोन्ही कडील राजकारण्यांनी ‘भूंकण्याचा’नवाच प्रकार राज्यातील जनतेला दाखवला असल्याची जहाल टिका देखील समाज माध्यमांवर वाचायला मिळतेय.

नशीब,जुगाराचा हा प्रकार भारतात नव्हे तर चीनमध्ये घडला, नाही तर बावणकुळे यांच्या चौकशीसाठी रान पेटवण्यात आले असते,आंदोलने घडली असती.समृद्धी महामार्गावर मध्यरात्री खासगी बस पेटली,२५ निरपराध प्रवासी होरपळून ठार झाले,त्याच दिवशी राज्यपालांच्या निवासी नव्याने शपथविधीचा सोहळा पार पडतो,हे महाराष्ट्रातच घडू शकतं……!या राज्यात काहीही घडू शकतं….!

बावणकुळेंचा हा असा फोटो राऊतांनी ट्टीट करताच भाजपकडून आदित्य ठाकरेंचा एक फोटो ट्टिट करण्यात आला .यात ते अभिनेते फरहान अख्तर व सुप्रसिद्ध फूटबॉलपटू डेविड बॅकहम यांच्या मागे उभे असून हातात मद्याचा प्याला असल्याचा आरोप करीत यात कोणत्या ब्रॉण्डची व्हिसकी आहे?अशी विचारणा करण्यात आली.यावर देशाचे पंतप्रधान मोदी हे परदेशात गेल्यावर जी ब्रॉण्ड घेतात तीच व्हिसकी असल्याचा पटलवार राऊत यांनी केला.

एकेकाळी बिहारचे नाव देशात बदनाम होते.निदान ते गुन्हेगारी प्रकारात बदनाम होते.आपापल्या तथाकथित स्वाभिमानासाठी सरळ कट्टे काढून ठोकून देण्यात देशात बिहार प्रथम क्रमांकावर होता.येथे तर….विकून खालल्याचाच… सूर उमटला.राज्यातला शेतकरी हा दिवसा मायबाप सरकार वीज उपलब्ध करुन देत नसल्याने रात्री उठून वीज पंपाने वर्षानुवर्ष शेत ओलित करतोय,दूसरीकडे एका राष्ट्रीय पक्षाचा प्रदेशाध्यक्ष हा एका रात्रीत साढे तीन कोटी रुपये जुगारात हरताना दिसून पडतो तेव्हा आपण कोणाला निवडून देतोय आणि कोणाच्या हातात राज्य सोपवले आहे?याचा विचार महाराष्ट्रातील जनतेनेच केलेला बरा!असा अनाहूत सल्ला आता दिला जात आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा देखील असाच एक आक्षेपार्ह्य फोटो भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काही काळा पूर्वी ट्टीट केला होता.यावरही बराच वाद निर्माण झाला होता.मात्र,एका ललनाने पटोले यांच्यासोबतचा फोटो चक्क आपल्या प्रोफाईलवर ठेवल्याने यावर ही बरेच विनोद,आता राजकीय आणि पत्रकारितेच्या वर्तुळात चर्चिले जात आहे.पटोले यांनी देखील बावणकुळे यांच्या बाबतच्या या घटनेची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.एकीकडे महाराष्ट्र दुष्काळाची परिस्थिती उमटली असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांचा अश्‍या प्रकारचा फोटो व्हायरल होत आहे,ही गंभीर बाब असून याची चौकशी झाली पाहिजे,अशी मागणी नानांनी केली.

थोडक्यात चांगली,सुसंस्कृत माणसे राजकारणात का उतरत नाही?याचे उत्तरच राजकारणाचा हा स्तर जनतेला देतोय.बावणकुळे यांच्या पत्नीचा पुतणा असलेल्या सूरज तातोडेचा एक व्हिडीयो अद्यापही समाज माध्यमात फिरत असतो ज्यामध्ये ‘कोटी‘ ला किलोमीटरची उपमा बहाल करुन कोणत्या कंत्राटदारांकडून किती किलोमीटरची वसुली करायची आहे?याचे आदेश साहेबांकडून येत असल्याचा आरोप तातोडे करताना दिसून पडतोय!एकेका कंत्राटदाराकडून ३१४,३१६ किलोमीटरची वसुली केल्याची कबुली देखील या व्हिडीयोमध्ये आहे….!मग साढे तीन कोटी जुगारात हरणे या रकमेचे मोल काय!

या वादात मात्र अजित पवार कुठेही दिसून पडत नाहीत. राष्ट्रवादीचे अजित पवार यांची देखील बरीच चर्चा समाज माध्यमात रंगली.एकमेव अपवाद सोडल्यास (शेतक-यांच्या सिंचनासाठी धरणात मूत्रविसर्जन करायचे का?)त्यांनी कधीही आपली प्रतिमा राज्यातील जनतेत बोलभांडपणातून डागाळू दिली नाही.आक्रस्ताळेपणाला आक्रमकता मानून नेते मंडळी जे बरळत असतात ते जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून निश्य‍चितच त्यांना प्रस्तापित करीत नाही.यश हे पचवता आले पाहिजे असा सल्ला देत,अखेर अजित पवार हे कोणाच्या तालमीत तयार झाले आहेत,हे महत्वाचे.आपल्या त्या मिश्‍किलीत केलेल्या विधानासाठी अजित पवार आज देखील पश्‍चाताप व्यक्त करताना दिसून पडतात,हे विशेष.

प्रेस क्लब मध्ये अनौपचारिक चर्चेत एकदा बावनकुळे यांनी सांगितले होते,मोदी कोणत्याही चुका माफ करू शकतात मात्र विश्वासघात नाही! ऑन द रेकॉर्ड किंवा ऑफ द रेकॉर्ड सांगतोय उध्दव ठाकरे आणि भाजप ची युती आता कधीही शक्य नाही…!या वादाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची सत्तेपासून दूर झाल्याची व भाजपसोबत पुनर्रयुतीची शक्यता कायमची मावळल्यानेच चिखलफेकीच्या राजकारणाला ऊत आल्याची खासगीत चर्चा आहे.

थोडक्यात जुगार..राजकारण आणि महाराष्ट्र राज्य हे अजून काही काळ तरी समाज माध्यमांमध्ये चर्चेचा आणि हेटाळणीचा विषय असणार आहे,हे मात्र निश्‍चित.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या