

खालावणा-या विद्यापीठाच्या स्तराची दखल घेतली गेली पाहिजे
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता.२३ नोव्हेंबर २०२२: येत्या काळात शैक्षणिक क्षेत्रात बरेच बदल होणार असून अनेक महाविद्यालयांना ‘स्वायत्ता’ प्राप्त होणार आहे.अश्यावेळी विद्यापीठ तसेच महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थी हिताच्या अनुषंगाने मध्यम मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे स्मिता वंजारी यांनी सांगितले.नागपूर विद्यापीठाच्या निवडणूकीत व्यवस्थापन प्रवर्गातून महाआघाडीच्या उमेदवार स्मिता वंजारी २०० पैकी १४० मते घेऊन विजयी झाल्या.या अनुषंगाने खास ‘सत्ताधीश’ने त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी उपरोक्त विधान केले.
स्मिता वंजारी यांनी शिक्षण मंचाच्या उमेदवार काजोल रोटेले यांचा दारुण पराभव केला असून रोटेले यांना फक्त ५६ मते प्राप्त होऊ शकली.या विजयानंतर मेहनतीचं फळ मिळालं असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.व्यवस्थापन प्रवर्गात मत मिळवणं हे कठीण असतं,एवढ्या मर्यादित मतदारांमधून विजय खेचून आणने कठीण अाहे, फक्त २१२ मतदार होते व २०० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.त्यातही विरोधी पक्षाच्या उमेदवार यांनी प्रचारात कोणतीही कमतरता ठेवली नव्हती.‘फोनाफोनी’मध्येही अग्रक्रम होताच,मात्र,तरीही मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेऊन मतदान केल्याचे त्यांनी सांगितले.
सिनेटचे प्रतिनिधीत्व करीत असतानाही मी विद्यार्थी हिताचे अनेक प्रश्न अधिसभेत उपस्थित केले असल्याचे त्या सांगतात.विद्यापीठ कर्मचा-यांची पदोन्नती,वेतन श्रेणी,प्रत्येक महाविद्यालयात एनसीसी व एनएसएस सारखे उपक्रम, विद्यार्थी जीवनातच शिस्त निर्माण होण्यास गरजेचे असल्याचा मुद्दा ही मी उपस्थित केला असल्याचे त्यांनी सांगितले.स्मिता वंजारी यांनी विद्यापीठाला एक मास्टर प्लान बनवायला देखील सांगितला होता ज्याच्यामध्ये शंभर कोटी रुपये राज्य शासनाकडे मागण्यात यावे अशी विनंती केली होती,याशिवाय सीएसआर फंडींग जो विद्यापीठाला मिळतो त्या सीएसआर फंडींगचं काय झालं?तो कसा वापरला?याशिवाय माजी पालकमंत्री नितीन राऊत यांनी २५ लाखांचा फंड डॉ.बाबासाहेब आंबेडकर सिरीजसाठी दिले होते त्याचं काय झालं इत्यादी अनेक महत्वाची प्रश्ने अधिसभेत उपस्थित केली.
आता तर आणखी जबाबदारीचे पद मिळाल्याने जबाबदारीत वाढ झाली असून माझ्याकडे जे विषय येतील ते पूर्णत:सोडवण्याचा प्रयत्न असणार असल्याचे त्या सांगतात.
राज्यस्तरीय नवीन शैक्षणिक धोरणांमुळे विद्यापीठ व महाविद्यालयीन स्तरावर अनेक बदल होणार असून मध्यम मार्ग काढून समस्या सोडविण्यावर भर असणार आहे.अनेक महाविद्यालयांना स्वायत्ता मिळणार असल्याने कला,वाणिज्य शाखेतील विद्यार्थी व या शाखेच्या महाविद्यालयांच्या अडचणी वाढणार असल्याने, लहान महाविद्यालयांचे कोणतेही नुकसान होऊ नये यासाठी अश्या महाविद्यालयांचे क्लस्टर होऊ शकेल का,विद्यार्थी ,कर्मचारी व शिक्षणाचे नुकसान होणार नाही यासाठी पुढाकार घेणार असल्याचे त्या म्हणाल्या.

(छायाचित्र: नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन प्रवर्गातून महाआघाडीच्या विजयी उमेदवार स्मिता वंजारी,आ.अभिजित वंजारी व आघाडीचे नेते व इतर उमेदवार)
विद्यापीठात सुरु असलेल्या सध्याच्या ‘वादंगा‘विषयी छेडले असता,विद्यापीठाचा स्तर अलीकडे खूपच खालावलेला दिसत असल्याची खंत त्या व्यक्त करतात.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला एक गौरवशाली इतिहास राहीला आहे.अनेक स्कॉलर्स यांनी या विद्यापीठाची गरिमा वाढवली आहे. नामवंत व प्रतिथयश कुलगुरुंनी खूप चांगली धोरणे विद्यापीठाच्या विकासाठी राबवली आहे.हल्ली मात्र विद्यापीठस्तरावर ‘राजकीय’ दबावाचे वातावरण आढळून येतं.
महिला प्राध्यापिका,विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषण,विनयभंगसारख्या आरोप-प्रत्यारोपापर्यंतच्या तक्रारी, निदान विद्यापीठसारख्या शैक्षणिक क्षेत्रात तरी घडू नये.यामुळे फक्त विदर्भ किवा राज्यात नव्हे तर देश-विदेशात विद्यापीठाच्या प्रतिमेवर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे त्या म्हणाल्या.
बोलू नये पण,अश्या घडामोडींमुळे खरंच महिला म्हणून तरी फार वाईट वाटत असल्याचे त्या सांगतात.विद्यापीठ हे शिक्षणाचे माहेरघरच असतात आणि अश्या पवित्र व नीतीमुल्यांवर चालणा-या शिक्षण क्षेत्रात गलिच्छ व बदनामीकारक काही घडणे हे दूर्देवी असल्याचे त्या म्हणाल्या.विद्यापीठात फक्त विद्यार्थी आणि शिक्षक हिताचाच विचार रुजावा,कार्यान्वित व्हावा,कोणत्याही प्रकारच्या दबावतंत्रांपासून विद्यापीठाला तरी मुक्त ठेवण्याचा ‘सूचक’सल्ला ही देऊन त्या मोकळ्या होतात.
विद्यापीठ,शैक्षणिक क्षेत्र व राजकारण या सर्वस्वी वेगळ्या बाबी आहेत.आमदार ॲड.अभिजित वंजारी यांनी रातुम विद्यापीठाच्या शंभराव्या दीक्षांत समारंभाच्या अनुषंगाने राज्य सरकारकडून शंभर कोटींचे अनुदान मंजूर करुन आणले होते.त्यातील पन्नास लाख रुपयांचे अनुदान विद्यापीठाला प्राप्त ही झाले होते मात्र विद्यापीठाने ते राज्य सरकारला परत केले!तो पैसा विद्यार्थी हिताच्या विविध योजनांसाठी सहज राबविता आला असता मात्र दूर्देवाने असे घडले नाही,अशी खंत ही त्यांनी व्यक्त केली.
थोडक्यात, पुढील काळात विद्यापीठस्तरावर अनेक समस्या उद भवणार आहेत विनाअनुदानित महाविद्यालयांसाठी व विद्यार्थ्यांसाठी, या संदर्भात अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत,ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार.




आमचे चॅनल subscribe करा
