फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजसरकार उनकी है तो क्या हूआ...सिस्टम तो हमारा है!

सरकार उनकी है तो क्या हूआ…सिस्टम तो हमारा है!

Advertisements

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर चित्रपटातील संवाद खरा

(भाग-१)

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता. २६ जून २०२२:बहूचर्चित ‘काश्‍मीर फाईल्स’चित्रपटात पल्लवी जोशी या अभिनेत्रीच्या तोंडी एक संवाद आहे ‘सरकार उनकी है तो क्या हूआ,सिस्टम तो हमारा है’चित्रपटातील नायकाला काश्‍मीरमधील आपल्या सहका-यांची भेट घेण्यास जाण्यासाठी सांगतांना हा संवाद तिच्या तोंडी होता,नायकाला प्रश्‍न पडतो त्या राज्यात सरकार तर विरोधी पक्षाची आहे मग मला सरकारच्या विरोधकांपर्यंत सहज पोहोचण्यासाठी कोण मदत करणार?महाराष्ट्रात आज राजकीय पटलावर जे काही सत्तानाट्य सुरु आहे ते बघता चित्रपटातील हा संवाद किती चपखलपणे या नाट्यावर बसतो याची प्रचिती येते.

फडणवीस यांच्या हातातोंडाशी आलेली सत्ता विधान सभेच्या निवडणूकीनंतर नोव्हेंबर २०१९ मध्ये ज्याप्रकारे निसटली,विचारधारांशी तडजोड स्वीकारत तीन पक्षांनी ज्या प्रकारे एकत्रित येऊन सत्ता स्थापन केली ते बघता, महाराष्ट्रातील जनतेलाही ही खात्री होती ‘सरकार भले ही आघाडी की हो…..सिस्टम में फडणवीस इन्ही की लॉबी काम करती रेहेगी!’आणि प्रत्यक्षात तेच घडले.

२१ जून या जागतिक संगीत दिनी व जागतिक योग दिनी महाराष्ट्रात जे काही घडले,हा दिवस महाराष्ट्राच्या जनतेला पुन्हा अडीच वर्षे पूर्वीचा भूतकाळ आठवून देणाराच ठरला.सत्तेच्या संगीत खूर्चीसाठी, बंडखोरीचा झालेला योग, हा ‘योगायोग’ २१ जून रोजी विधान परिषद निवडणूकीचा निकाल घोषित होताच फक्त ‘सिस्टिममुळे’कश्‍याप्रकारे जुळून आला,याचे आता चर्वितचर्वण सर्वच स्तरावर सुरु झाले आहे.

सत्तेसाठी सज्ज व्हा!
राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीच्या अवघ्या दोन महिन्यांपूर्वी ११ मार्च २०२२ रोजी फडणवीस यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना, उत्तरप्रदेशसह चार राज्यांच्या विधानसभा निवडणूकांत सामान्य नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवला असल्याचे सांगितले.या विजयाने हुरळून न जाता मुंबई महापालिका निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी आणि महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे,असे आवाहनच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. गोव्यातील यशाबद्दल अभिनंदन करण्यासाठी मुंबईत भाजपच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या सत्काराप्रसंगी त्यांनी वरील उद् गार उदृत केले.

मात्र सरकारचे मंत्रालय असणा-या मुंबई शहरातच फडणवीस यांच्या बेधडकपणे केलेल्या या अावहानाला गांर्भीयाने न घेतल्याने व जुनाट ‘सिस्टिमवरच’विश्‍वास ठेवल्याने त्याचे परिणाम आज अश्‍यारितीने आघाडी सरकारवर उभे ठाकले .एवढ्या आत्मविश्‍वासाने फडणवीस यांनी अवघ्या दोन महिन्यांपूर्वी मुंबईत उघडपणे कार्यकर्त्यांना योग्य तो संदेश दिला मात्र आघाडी सरकार,धुरंधर मंत्री,मुरलेले नेते हे ‘सिस्टिम’मुळे तसेच गाफिल राहीलेत आणि आज सरकार वाचविण्याच्या कसरतीत त्यांना उतरावे लागले.

घराणेशाहीवर ‘सूचक’ टिका-
राज्या पुढे ‘घराणेशाहीचे’ मोठे संकट उभे राहिले असून पिढ्यानपिढ्या एकाच घराण्याने पक्ष चालविणे लोकशाहीसाठी घातक आहे.त्यामुळे भ्रष्टाचाराला खतपाणी मिळत असून, येणा-या काळात मुंबईला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी आणि प्रायव्हेट लिमिटेड पक्षाला हटविण्यासाठी कार्यकर्त्यांनी संघर्षाला तयार राहावे,असा सूचक इशारा देत मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक ही घराणेशाहीचा पराभव करणारी ठरेल,असा विश्‍वासही त्यांनी उघडपणे भाजपाच्या स्थापनादिनानिमित्त मुंबईतच वसंतस्मृति कार्यालयात एका कार्यक्रमानिमित्त व्यक्त केला होता मात्र तरीही आघाडी सरकार विशेषत:‘घराणेशाही’जोपासणारी शिवसेना आपल्या ‘सिस्टिमवरील’विश्‍वासामुळे गाफिलच राहीली आणि त्यांचे एक मंत्री तब्बल ४० आमदार घेऊन रफूचक्कर झालेत….!

१२५ तासांचे रेकॉर्डिंग-
नुकतेच मार्चमध्ये पार पडलेल्या अधिवेशनात विधानसभेत फडणवीस यांनी तिन्ही पक्ष मिळून त्यांच्या विरोधात कश्‍याप्रकारे कटकारस्थान रचत आहे,याचा पुरावा म्हणून एका रेकॉर्डिंगचे संभाषण सभागृहाला ऐकवले.तब्बल १२५ तासांची रेकॉर्डींग त्यांच्याकडे असून यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या शरद पवार यांचेही नाव समाेर आले असल्याचा दावा त्यांनी केला.१२५ तासांचे रेकॉर्डिंग मिळवणे ही निश्‍चितच कौतुकास्पद बाब असल्याचे शरद पवार यांनीही माध्यमांकडे ९ मार्च २०२२ रोजी कबूल केले होते मात्र या आरोपात तथ्य नसल्याचेही ते म्हणाले.या घटनेवरुन ‘सिस्टिममध्ये’फडणवीस यांची पेठ किती खोलवर रुजली आहे,हे सांगण्यास कोण्या तज्ज्ञाची गरज नाही.

केंद्र व राज्यातील गृहखात्यांची त-हा-
त्याच मुर्हूतावर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री भाजप नेत्यांबाबत ‘सॉफ्ट’ म्हणजेच बोटचेपी भूमिका घेत असल्याचा दावा शिवसेनेने केला.हा विषय उद्धव ठाकरेंनी थेट शरद पवारांच्या दरबारीही नेला.एकीकडे केंद्रातील गृहखाते केंद्रिय यंत्रणांच्या मार्फत शिवसेनेच्या नेत्यांवर, थेट मुख्यमंत्री यांचे साडभाऊ यांच्यावर ईडीची कारवाई करीत असताना राज्यातील गृहखाते भाजप नेत्यांवरील कारवाईबाबत नरमाईचे धोरण स्वीकारत असल्याचा आरोप करीत राहीली,फडणवीस काळातील ‘सिस्टिममुळेच’कोणत्याही विभागाच्या कोणत्याही अधिका-यांमध्ये माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरोधात कारवाई सुरु करण्याची ताबच नसल्यामुळे,तीन पक्षांची सरकार असूनही ‘सिस्टिमसमोर’ते ही हतबल झालेले आढळून आलेत.

(क्रमश:)

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या