

समरसता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पुण्यात सत्कार
नागपूर, २१ जून : नागपूर येथे २ आणि ३ जुलै २०२२ रोजी होणार्या १९व्या समरसता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सुप्रसिद्ध काव्यसमीक्षक प्रा. डॉ. अक्षयकुमार काळे यांचा सोमवारी पुणे येथे जाहीर सत्कार करण्यात आला. समरसता साहित्य परिषद, पुणे शाखा व इतर सामाजिक संस्थांतर्फे ’पुणे मराठी ग्रंथालय, नारायण पेठ, पुणे’ येथील सभागृहात १८ व्या समरसता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते त्यांना महात्मा फुले पगडी, शाल, श्रीफळ आणि समरसता-षटक-प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी मातंग साहित्य परिषद, साहित्य कला संवर्धन मंडळ, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे नगर वाचनालय, पुणे मराठी ग्रंथालय, आखिल भारतीय साहित्य परिषद, काव्यशिल्प, आणि समरसता साहित्य परिषद -पिंपरी चिंचवड शाखा यांच्यातर्फेही डॉ. अक्षयकुमार काळे यांचा सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना डॉ. अक्षयकुमार काळे म्हणाले, समरसता हे तत्त्व मी लहानपणापासून जगत आलो आहे. आमच्या वस्तीत अठरापगड जातींचे लोक राहत. त्यामुळे आपसुकच समरसतेची शिकवण मिळाली. शाहु, फुले, आंबेडकर, लोकहितवादी यांच्या विचारांचा प्रभाव माझ्यावर असल्यामुळे मी समरसता साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारले आहे. मी कुठल्याही पक्षाचा, कोणत्याही विचारधारेचा अनुयायी नसून मी एक मुक्त मानवतावादी विचारांचा समर्थक आहे. त्याच मानवतेच्या हितासाठी समरसतेचा विचार मांडता यावा म्हणून मी हा प्रस्ताव स्वीकारलेला आहे., असे ते म्हणाले.
डॉ. गिरीश प्रभुणे यांनी अध्यक्षीय भाषणातून डॉ. अक्षयकुमार काळे यांची वाटचाल म्हणजे जणू समरसतेचा ध्यासच आहे, असे सांगितले. कवी ग्रेसच्या सगळ्या भावभावनांचा आविष्कार डॉ. काळे यांनी केला आहे. त्यांनी समरसतेची खोलवरची जाणीव निर्माण करण्याचे काम आपल्या मांडणीतून केले. समरसतेची जाणीव पुन्हा एकदा घट्ट व्हायला हवी. समरसतेची वाटचाल करताना कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये. समरसतेचे मूल्य प्राचीन काळापासूनच चालत आले असल्याचे त्यांनी सांगितले. समरसता साहित्य परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ. श्यामा घोणसे यांनी प्रास्ताविक केले.




आमचे चॅनल subscribe करा
