
नागपूर,ता.९ मे २०२२: आज सोमवर दि.९ मे हा दिवस बेलतरोडी वस्तीसाठी नियतीने दिलेला जबर हादराच ठरला. सकाळी सव्वा दहाच्या सुमारास वस्तीतील एका घरातील एका सिलेंडरचा स्फोट झाला अन् बघता-बघता आगीने रौद्र रुप धारण केले यानंतर मात्र एका पाठोपाठ सिलेंडर्सच्या स्फोटाची मालिकाच सुरु झाली तर सायंकाळी सव्वा सात वाजता यशवंत स्टेडियम येथील जायका फर्निचरच्या दूकानाला आग लागल्याची घटना घडली.
एनएमआरडी अंतर्गत येणा-या बेलतरोडी परिसरात सकाळी १० वाजून १९ मिनिटांनी पहील्या सिलेंडरचा स्फोट झाला.कानठाल्या बसवणारा आवाज येताच वस्तीतील नागरिकांनी आपल्या बालबच्च्यांसोबत सुरक्षीत ठिकाणी धाव घेतली.संपूर्ण वस्ती हाती काहीही न घेता वस्तीच्या बाहेर मोकळ्या मैदानात एकत्रित झाली.यानंतर एका पाठोपाठ तब्बल १६ ते १७ सिलेंडर्स यांनीही पेट घेतला.ही संख्या वीसच्या वर असल्याचे सांगितली जात आहे. एवढ्या भीषण आणि रौद्र आगीत मात्र सुदैवाने कोणतीही जिवित हानी झाली नाही.घटनेची माहिती मिळताच मनपाच्या अग्निशमन गाड्यांनी घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले मात्र तोपर्यंत या आगीची झळ ९२ घरांना बसली होती.यात ७७ घरे पूर्णपणे आगीच्या स्वाधीन झाली तर १५ घरांना अंशत: नुकसान झाले.या आगीमध्ये ३७५ नागरिक बाधित झाले असून घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री नितीन राऊत,जिल्हाधिकारी आर.विमला,माजी उर्जामंंत्री चंद्रशेखर बावणकुळे तसेच पोलिसांचे वरीष्ठ अधिकारी यांनी घटनास्थळ गाठले.
आगीचे वृत्त पसरताच वस्तीतील अनेक नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टिकोणातून आपापल्या घरातील गॅस सिलेंडर्स हे आधीच मोकळ्या मैदानात घेऊन आले.संपूर्ण वस्ती ही लांब उभी होऊन आगीच्या रौद्र ज्वाला बघत हताश उभी होती.एका नंतर एक अश्या सिलेंडर्सच्या स्फोटामुळे ह्दयाचाही थरकाप उडत होता.अनेकांनी आज या अग्निकांडाचे असंख्य व्हिडीयोज सोशल मिडीयावर व्हायरल केले.यात सिलेंडर्सच्या स्फोटांचा आवाज मनाचा थरकाप उडवणारा होता.आगीवर नियंत्रण मिळवल्या नंतर मात्र वस्तीचे दृष्य हे अतिशय भीषण होते.लोकांच्या घरातील छप्पर कायमचे राख झाले होते.पोटाची भूक भागवण्यासाठी साठवलेले धान्यही जळून खाक झाले होते.अनेकांचे पैसे,दागिने राखेमध्ये परिवर्तित झाले होते.अनेकांच्या दूचाक्याही आगीची भेट चढले होते.चार चाकीही या दृष्याला अपवाद नव्हती.उधवस्त घरे आणि निराश डोळे अशीच दृष्ये या ठिकाणी सर्वत्र उमटली होती.अग्निशमन दलाने आग विझवल्यानंतर ही अनेकांच्या घरातील वस्तूंमधून धूर निघत होता.वस्तीतील वीज खांबे हे देखील जळाले होते.शंभरच्या वर घरे काही तासात उधवस्त झाली!
ज्यांची घरे सिमेंटची होती त्यांची सिलिंग तेवढी वाचली,सामान,पैसा अडका मात्र आगीच्या भक्ष्यस्थानी चढले होते.माय माऊल्या आग विझल्यावर आपापल्या घराकडे धाव घेताना दिसत होत्या,काय वाचले काय जळाले?याचा शोध घेत होत्या.नियतीने एकच दिलासा आज या वस्तीतील लोकांना दिला तो म्हणजे एवढी भीषण आग लागल्यावरही एक ही जिवित हानि झाली नाही,सगळे चिल्लेपिल्ले, बच्चे कंपनी ही सुखरुप होती.लांब,दूर उभी राहून आगीचं भीषण रुप बघत होती.डोक्यावर छत नाही आणि खायला अन्न नाही,हातात पैसा नाही समोर डोंगरा एवढे संकट उभे राहील्याची गा-हाणी शासकीय व राजकीय मंडळींकडे मांडली जात होती.पुन्हा शून्यातून आयुष्याला सुरवात करने हे कायम गरीबांच्याच नशीबी येतं हे नियतीने पुन्हा एकदा सिद्ध केलं.
जिल्हाधिकारी यांनी शासकीय देय मदत तातडीने पोहचविण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.नागपूर उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी यांनी घटनास्थळी तळ ठोकून पोलिसांसोबत मदत कार्यात लक्ष घातले.
मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांच्या नेतृत्वात स्टेशन ऑफिसर तुषार बाराहाते,राजेंद्र शिरकीरवार, भगवान वाघ,सुनील डोकरे व चमूने अथक प्रयत्नातून आगीवर नियंत्रण मिळवले.
दुपारी दीडच्या सुमारास पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी पुन्हा एकदा घटनास्थळ गाठून पाहणी केली.या आगीच्या घटनेची पोलिसस्तरावर चौकशी केली जात असून शासनस्तरावर देय मदतीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी या अग्निकांडात प्रभावित नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल,असे आश्वासन दिले..
बेलतरोडी महाकाली नगर येथील सिलेंडर स्फोट झालेलेल्या घटनास्थळी माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी देखील भेट दिली.स्थानिक नागरिकांशी चर्चा केली.या वेळी आमदार टेकचंद सावरकर,बेसा बेलतरोडी ग्रामपंचायतचे उपसरपंच जितेंद्र चांदूरकर,भाजप ग्रामीण नेते हरीश कांगाली व इतर स्थानिक अधिकारी,नेते उपस्थित होते.
यशवंत स्टेडियमही वाचले-
ऐन मे महिन्यात वैशाख वणवा पेटला असताना महावितरणचे वीज खांबे हे देखील चांगलेच भाजून निघत असावे त्यामुळेच कदाचित सायंकाळी सव्वा सात वाजता यशवंत स्टेडियम येथील नाग नदीच्या काठाजवळील जायका फर्निचर दूकानातील डीपीने अचानक पेट घेतला.आधी या दूकाना जवळील वीजेच्या खांब्यामध्ये स्पार्क झाला,त्यामुळे वीजेचे पॉवर अनियंत्रित झाल्याने वीज खांब्या जवळील दूकानातील डीपीनेही पेट घेतला.दूकानात आगीवर नियंत्रण ठेवणा-या यंत्राद्वारे दूकानातील कर्मचारी वारंवार आगीवर फव्वारणी करीत होते मात्र आगीवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही उलट ती अधिकाधिक वाढत होती.
दूकानाला सर्व दूर काच लागल्यामुळे लगेचच दूकानाच्या आत काळाशार धूर दाटला.कर्मचा-यांनी दूकानातील फर्निचर वाचवण्याचा निर्णय घेतला व फर्निचर बाहेर काढल्या जाऊ लागले तोपर्यंत दूकानाच्या आतील डीपी जवळील पीओपीनेही पेट घेतला होता.
खबरदारी म्हणून आजूबाजूच्या दूकानदारांना आपापले वीजेचे मीटर त्वरित बंद करण्यासाठी नागरिकांची ओरड झाली,अनेकांनी ती लगेच बंद करुन ऐन कामाच्या वेळी दूकानात अंधार केला,एका ट्रॅवल्सवाल्याने मात्र नकार दिला कारण प्रवाश्यांची बुकींग सुरु होती.नागरिकांनी समजावल्यानंतर त्यानेही मग आपल्या दूकानातील वीज मिटर बंद केले.
घटनास्थळी आधी वीज कर्मचारी पोहोचले,त्यांनाही आगीचे रुप पाहता दूकानाची वीज बंद करने शक्य नव्हते परिणामी संगम चाळ या संपूर्ण वस्तीचीच वीज काही काळासाठी बंद करण्यात आली.धंतोली पोलिसांनीही घटनास्थळ गाठले.
मात्र अग्निशमन गाडी यायला चांगलाच उशिर झाला.घटनास्थळी अग्निशमन बंब पोहोयाचला तब्बल अर्धा तास लागला!गणेशपेठेतून यशवंत स्टेडिमयपर्यंंत पोहोचायला दहा मिनिटांचाही अवधी लागत नाही,माहीती कळवल्यावर अर्धा तासाने जर अग्निशमन बंब पोहोचत असेल तर आग काय अर्धा तास वाट बघणार आहे का?की जळण्यास व जाळण्यास थांबणार आहे?पाच मिनिटात किती तरी दूकाने बेचिराख झाली असती,अर्धा तासात तर संपूर्ण स्टेडियम आगीने कवेत घेतले असते,मग आले असते का?असा संताप नागरिकांनी व्यक्त केला.
अग्निशमन बंब येण्याआधीच जायका फनिचर्स दूकानाची काच फोडावी लागली व फोडलेल्या काचेतून बाहेरुन आग विझवण्याचा प्रयत्न नागरिकांनी केला.आगीत दूकान मालकाचे अतिशय महागाचे काचेची दारे व पीओपी व डीपीचे चांगलेच नुकसान झाले.




आमचे चॅनल subscribe करा
