फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजकोविड लाटेत पालक गमावलेले बालक व महिलांना आधार देण्यासाठी मिशन ‘वात्सल्य योजना’तयार

कोविड लाटेत पालक गमावलेले बालक व महिलांना आधार देण्यासाठी मिशन ‘वात्सल्य योजना’तयार

Advertisements

–जिल्हाधिकारी विमला आर.

एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात

जिल्हा कृती दलाचा आढावा

नागपूर, दि. ३० नोव्हेंबर: आयुष्यात प्रेमापेक्षा आधार महत्वाचा असतो. कोविड महामारीच्या लाटेत एक व दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना व विधवा महिलांना आधार देण्यासाठी मिशन वात्सल्य योजना तयार करण्यात आली आहे. स्वप्नाची प्रचितीपूर्ण होण्या अगोदरच बालक अनाथ झाले. या भांबावलेल्या मुलांना सहकार्य करुन मदत करणे गरजेचे आहे. यासोबतच बालकांना व महिलांना सहकार्य, समुपदेशन व त्यांना विविध योजनाची माहिती देवून त्यांचा लाभ मिळवून देणे आवश्यक आहे. प्रत्येक अधिकाऱ्यांनी एका बालकाच्या पालकत्वाची जबाबदारी सांभाळावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विमला आर. यांनी केले.

महिला व बाल विकास विभाग, विपला फाउंडेशन व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या संयुक्त विद्यमाने मिशन वात्सल्य योजनेंतर्गत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन रवी भवन येथील सभागृहात करण्यात आले होते, त्यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. महिला व बाल विकास उपायुक्त रवी पाटील, बाल कल्याण मंडळाचे अध्यक्ष राजीव थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेद्र पातुरकर, पोलीस अपर आयुक्त कंकाळे, पोलीस उप अधीक्षक पुरंदरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भागवत तांबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलाकर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. अपर्णा कोल्हे, विपला फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक अनिरुध्द पाटील, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यावेळी उपस्थित होते.

दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना शासनातर्फे ५ लाखाचे सानुग्रह अनुदान त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. त्यासोबतच पी.एम. केअर मधून १० लाखाची मदत लवकरच त्यांना देण्यात येणार आहे. या कामात सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी समन्वयातून कार्यवाही करावी. जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना दुरदृष्य प्रणालीद्वारे आदेश देवून सर्व तहसीलदारांनी संबंधित अधिकाऱ्यांशी तालुकास्तरावर आठवड्यातून एकदा बैठक घेवून नियमित आढावा घ्यावा व अहवाल सादर करावा, अशा सूचना विमला आर. यांनी दिल्या.

६८ बालकांची पी.एम. केअर मध्ये नोंदणी करण्यात आली. तसेच बालकांच्या नावे खाते उघडण्यात येवून ५२ बालकांच्या खात्यात ५ लाखाचा धनादेश जमा करण्यात आला आहे. ३२ बालकांचे पोस्ट विभागात खाते उघडण्यात आली असून २४ प्रकरणांची कार्यवाही सुरु आहे,असे त्यांनी सांगितले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाद्वारे मालमत्तेविषयी प्रकरणात मार्गदर्शन करण्यात येत आहे. १६१ बालकांना शुल्क माफ प्रमाणपत्र देण्यात आले असून खाजगी शाळांबाबत शिक्षण विभागातर्फे कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

६३ अनाथ प्रमाणपत्र देण्यात आले असून ४४ बालकांना रहिवासी प्रमाणपत्र देण्यात आले आहे. ३ वर्षाखालील बालकांचे रहिवासी प्रमाणपत्र देण्यासाठी प्राधान्याने कार्यवाही सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

कोविड महामारीतील पती गमावलेल्या ५४४ महिलांना संजय गांधी निराधार योजनेंतर्गत मदत देण्यात आली असून कौशल्य विभागातर्फे त्यांना प्रशिक्षण देवून रोजगारक्षम बनविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. शिधापत्रिका, उत्पन्नाचा दाखला, जन्म-मृत्यु दाखला आदी वाटप करण्यात आले आहे. यासह अजूनही जिल्ह्यात जे बालक आहेत त्यांचा शोध घेवून त्यांच्या पाल्यांचे समुपदेशन करुन प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

अनिरुध्द पाटील यांनी प्रास्ताविकात मिशन वात्सल्य योजनेबाबत माहिती देतांना अमरावतीतून या योजनेची सुरुवात झाली असून अंमलबजावणी नागपूर येथून होत असल्याचे सांगितले. संवाद, सुविधा व समन्वय यांच्या आधारावरच या योजनेची संकल्पना आखली आहे.

राज्यात ६३७ मुलांपैकी ४०० मुलांना ५ लाखाचे अनुदान बँकेत जमा करण्यात आले असून या अनाथ व विधवा महिलांना सहकार्याची आवश्यकता आहे, ती त्वरेने पुर्ण करण्याचे योजनेत अभिप्रेत आहे. सहयाद्री फाउंडेशन, जिल्हा कृती दल व जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे त्यांना मदत करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांचे सामाजिक तपासणी अहवाल तयार करणे चालू असून त्यांना समुपदेशन करुन १ हजार ४१८ बाल संगोपन योजनेद्वारे निधीचे वाटप करण्यात येत आहे. जिल्हा कृती दलाअंतर्गत शिक्षण विभागाद्वारे मुलांच्या फिबाबत शाळांना निर्देश देण्यात आले असून महिलांना कौशल्य विकास विभागातर्फे प्रशिक्षण देण्याची तयारी करण्यात येत असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अपर्णा कोल्हे यांनी सांगितले.

या कार्यशाळेस जिल्हा परिवीक्षा अधिकारी चंद्रकांत बोंडे, परिवीक्षा अधिकारी धनंजय उभाळ, संरक्षण अधिकारी साधना हटवार, विनोद भेंडे तसेच महिला बाल विकास विभाग, जिल्हा कृती दल समितीचे सर्व सदस्य व मिशन वात्सल्य समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या