

अक्षयदानचे पाचवे पुष्प
नागपूर,दि.१८ मे: ‘कराग्रे वसते लक्ष्मी’ असे म्हणून सकाळी उठल्यानंतर करांचे दर्शन घेण्याची आपल्याकडे प्रथा आहे. आपल्या डाव्या व उजव्या हातांमध्ये लक्ष्मीचा, ईश्वराचा वास असतो. त्यांचे आशीर्वाद ग्रहण करण्याच्या उद्देशाने आपण दोन्ही हात चेहे-यावरून फिरवत असतो. तळहातावर असलेल्या हस्तरेषा आपल्या जीवनात महत्वाची भूमिका बजावत असतात. त्या आपले भविष्य ठरवत असतात, मार्गदर्शन करतात, असे मत मालेगावचे हस्तरेषातज्ञ प्रा. अशोक पोफळे यांनी व्यक्त केले.पत्रभेटच्या ‘अक्षयदान’ या उपक्रमाच्या पाचव्या दिवशी ‘हस्तरेषा शास्त्र, एक परिपूर्ण शास्त्र‘ या विषयावर मालेगावचे प्रा. अशोक पोफळे बोलत होते.
प्रा. पोफळे यांनी सुरूवातीला अंगठा, तर्जनी, मध्यमा, अनामिका, करंगळी या हाताच्या बोटाच्या उंचवट्यांबद्दल माहिती दिली. त्या उंचवट्यांच्या आधारे संबंधित व्यक्तीच्या स्वभावामध्ये काय वैशिष्ट्ये असतात याची माहिती दिली. विवाह रेषा, हृदय रेषा, मस्तक रेषा, धन रेषा, लाईन ऑफ परकशन, तळाहातावरील अशा इतर रेषांचीही त्यांनी माहिती दिली.
समाजातील विवाह संस्थेचे स्थैर्य हे विवाह रेषेवर अवलंबून असते. विवाह आणि विवाहोत्तर परिस्थितीत जोडप्याला अपत्य का होत नाही, हे देखील हाताच्या रेषांवरून कळते. विवाहाचे स्थैर्य, विवाहासंबंधीची सर्व माहिती आपल्याला आपले तळहात देतात, असे ते म्हणाले. हृदयरेषा ही हृदयाची स्पंदने, हृदयाचे विकार, दृष्टीदोषाबद्दलची माहिती देते, असे ते म्हणाले.
हाताच्या रेषांवरून तुमचा व्यवसाय, नोकरीबद्दल तर कळतेच शिवाय, तुम्ही कवी, शीघ्र कवी, लेखक आहात की मिलिटरीमध्ये याचीही माहिती मिळते. धन रेषा द्रव्यार्जनाबद्दलची तुमची क्षमताही सांगत असतात.
या कार्यक्रमाला प. पू. सद्गुरूदास महाराजयांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन स्मिता काटेकर यांनी केले.
….
गुरुवारी समारोप-
मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या विद्यादानाच्या ‘अक्षयदान’ उपक्रमाचा समारोप गुरूवार, २० मे रोजी होत आहे. अमरावतीचे प्रकाश मुळे सायंकाळी ७ वाजता ‘ज्योतिषशास्त्र’ विषयावर मार्गदर्शन करतील. तत्पूर्वी, बुधवार, १९ रोजी डॉ. राजन केळकर यांचे ‘तिथीप्रवेश व वर्षफल’ विषयावर व्याख्यान होणार आहे.




आमचे चॅनल subscribe करा
