फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजअबोल सुरांना मिळाली ‘स्वरांजली’ची साथ

अबोल सुरांना मिळाली ‘स्वरांजली’ची साथ

Advertisements

गरजू कलावंतांना दिला मदतीचा हात
नागपूर,ता. २३ मार्च: गेल्या मार्च २०२० पासून देशात कराेना विषाणूच्या महामारीच्या कारणाने ’लॉक डाऊन आणि अनलॉकचा’ खेळ सातत्याने या देशात सुरु आहे,अनेक गोष्टींवर माय-बाप सरकारकडून आपत्ती व्यवस्थापन व साथरोग कायद्याअंतर्गत निर्बंध लादण्यात आले,याचा सर्वात जास्त फटका हातवर पोट असणा-या नागरिकांना बसला.संपूर्ण वर्षभर सांस्कृतिक कार्यक्रम तसेच लग्नसराईवर बंधने टाकण्यात आल्याने कलावंत जग पार उधवस्त झालं.

जी काही जमा पूंजी होती ती केव्हाचीच संपली.यानंतर वेळ आली ती इतरांसमोर हात पसरण्याची,देणा-यांची दानत संपली तर स्वत:च्या जीवावर काही कलाकार हे उदार होऊ लागले.काहींनी नैराश्‍यातून स्वत:चं अायुष्य संपविण्याचा प्रयत्न ही केला.अश्‍यावेळी ‘ऑस्कर सांस्कृतिक संगील कलावंत अकादमी’ त्यांच्या मदतीसाठी धाऊन आली,ऑस्करच्या या माणूसकीच्या उपक्रमाला नुकतीच ‘स्वरांजली’ची ही कौतुकास्पद साथ मिळाली.

स्वरांजलीने पुढाकार घेऊन गरजू कलावंतांना नुकतेच धान्याच्या किट वाटपाचा उपक्रम राबविला.हताश,निराश कलावंतांच्या अबोल झालेल्या सुरांना मदत आणि माणूसकीचा हात देऊन त्यांच्या चेह-यावर हास्य फूलविण्याचे काम केले आणि अबोल झालेले सूर हे अलगद झंकारले.

गेल्या वर्षी नागपूर शहरातील अनेक स्वयंसेवी संस्थांनी रेशन किट वाटून कलावंतांच्या अडचणीत साथ देण्याचा प्रयत्न केला मात्र लॉक डाऊन ही माय-बाप सरकारसाठी ’हनुमंतांच्या शेपटीसारखी लांबच लाब’होत राहीली आणि कलांवतंच नव्हे तर शहरातील अनेक लहान लहान व्यवसायी,हॉकर्स,मजूर,चहा-नाश्‍ता टपरीवाले,सलून व्यवसायी,शिंपी,गल्लो गल्ली प्रेसची दूकान चालविणारे,फूल विक्रेते,कॅटरिन व्यवसायावर उदर निर्वाह करणारे इ.उधवस्त होत गेले.

सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी ही तर पुन्हा ३१ मार्च २०२१ पर्यंत माननीय पालकमंत्री महोदय नितीन राऊत यांनी वाढवली.करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावासाठी जनतेवरच खापर फोडून सभागृह आणि सांस्कृतिक कार्यक्रम बंद ठेवले,कार्यक्रमांवर ज्यांचा उदरनिर्वाह आहे ते शेकडो कलावंत कुठे जातील?कसे जगतील?काय खातील?कुटुंबाचे भरणपोषण कसे करतील?या माणूसकीच्या प्रश्‍नाशी दिल्लीतील मोदीपासून तर गल्लीतील नगरसेवकांना काही एक घेणे देणे नसल्याचेच चित्र उमटले होते.

अश्‍यावेळी समाजातील स्वरांजलीसारखी संस्था जेव्हा स्वाभिमानी कलावंतांच्या पाठीशी उभी राहते तेव्हा नकळत कलावंतांचे ‘कर तिथे जुळतात’.पोटाच्या भूकेला करोना नाही कळत,संसर्ग नाही कळत,त्या भूकेला कळते ती फक्त पेटलेली आग,अन्न नाही मिळालं तर तो उसळलेला आगडोंब माणसाची विवेकबुद्धिही जाळून टाकत असतो.उपाशी माणसाला वाटतं जगच नष्ट करावं. मात्र हे जग माणूसकीने भरलेल्या काही लोकांचेही आहे हे ही विसरता येत नाही.

गरजू आणि गरीब माणूस त्याचा राग प्रशासनावर,राजकीय नेत्यांवर,न्याय व्यवस्थेवर काढू शकत नाही.मग असा माणूस हतबल होतो,नैराश्‍यात जातो,अश्‍यावेळी त्याला आधार हवा असतो.ऑस्करने तो आधार ऑकेस्ट्रा जगतातल्या कलावंतांना मिळवून दिला.तुम्ही एकटे नाही आहात,संघटना तुमच्यासोबत आहे,हा आशावाद पेरला.

महत प्रयासाने या संघटनेने आपल्या गरजू कलावंतांच्या मदतीसाठी समाजातील दानशूर संस्थांकडे धाव घेतली.अश्‍यावेळी ’स्वरांजली’ गरजू कलावंतांच्या मदतीसाठी पुढे सरसावली,जिथे नागपूर शहातील मोठमोठया राजकीय नेत्यांची दानत संपली तिथे स्वरांजलीसारखे ‘दिपस्तंभ’ अद्यापही प्रज्वलित असल्याचे हे आदर्शवत उदाहरण आहे.

स्वरांजली ग्रूपच्या प्रणिता गाेयल,वैशाली जैस्वाल तसेच अनिता खेमूका यांनी तातडीने पुढाकार घेऊन ऑस्करच्या सभासदांना धान्याच्या किट वाटप केल्या.कलाकार हा साधक असतो,याचक नाही ,मात्र मायबाप सरकारने या कलावंतांना आज याचकाच्या रांगेत नेऊन बसवले, अश्‍यावेळी त्यांच्या साधनेचे मोल स्वरांजलीसारख्या स्वयंसेवी संस्थेला कळले आणि मदतीसाठी त्यांचे हात सरसावले.

कलावंतांचं संवेदनशील मन यासाठी कायम स्वरांजली संस्थेप्रति ऋणी राहील असे ऑस्करचे अध्यक्ष् पी.कूमार यांनी खास ‘सत्ताधीश’कडे सांगितले.

या सर्व उपक्रमासाठी उपाध्यक्ष् प्रशांत खडसे,कोषाध्यक्ष् संदीप मेश्राम,सचिव रिनेश जाने,सहसचिव चंद्रशेखर शामकुवंर,सदस्य राजेश गजभिये,राजू व्यास तसेच संगीता गांवडे यांनी अथक परिश्रम घेतले.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या