

मायबाप सरकारने कार्यक्रम सुरु करावे: विदर्भ लाईट ओनर्स असोसिएशनची मागणी
नागपूर,ता. १२ मार्च: गेल्या एक वर्षापासून मार्च महिन्यात देशभरातच लॉक डाऊन लागला,तेव्हापासून सर्व प्रकारच्या सणसमारंभ,लग्नसराई,सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी आली,आमच्या जवळ जी काही थोडी बहूत जमा पूंजी होती ती खर्च झाली,एवढंच नव्हे तर डोक्यावर कर्ज ही झाले आहे,नोव्हेंबर नंतर काही प्रमाणात कार्यक्रम सुरु झाले मात्र पुन्हा पंधरा दिवसांपूर्वी माय बाप सरकारने सर्व प्रकारच्या लग्न सराई वर १५ मार्च पर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमावंर बंदी आणली,आम्ही आशेवर होतो १५ मार्चनंतर पुन्हा बंदी हटेल,कार्यक्रम सुरु होतील मात्र पालकमंत्री नितीन राऊत यांनी १५ मार्च ते २१ मार्चपर्यंत सरसकट कडक संचारबंदी लागू केली आणि आता आमची हिंमत संपली,आम्ही आता खूप निराश झालो,पैसा नाही,उत्पन्न नाही महत्वाचे म्हणजे सरकारकडे करोनावर लॉक डाऊन आणि कार्यक्रमांवरील बंदीशिवाय गेल्या एका वर्षापासून काहीच उपाय देखील नाही,त्यामुळे आता आमच्या सारख्या कला क्ष्ेत्रातील माणसांवर उपाशी मरण्याची वेळ आली आहे,आम्ही गरिबांपेक्षा ही गरीब झालो आहोत,अशी दाहक व्यथा विदर्भ लाईट ओनर्स असोसिएशन,नागपूरचे अध्यक्ष् शंकर माळोदे यांनी पत्रकार भवन येथे आयोजित पत्र परिषदेत आज व्यक्त केली.
याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष् बाबा पदम,प्रकाश मुळे,सचिव किशोर बत्तासे,सह सचिव विशाल यादव,विशाल वाघमारे,कोषाध्यक्ष् मिथून मित्रा आदी उपस्थित होते.गेल्या एका वर्षामध्ये सरकारकडे का व्यथा मांडली नाही?या प्रश्नावर बोलताना माळोदे यांनी सांगिले की आम्हाला माय-बाप सरकारवर पूर्ण विश्वास होता,सरकार या महामारीवर नक्कीच काही तरी उपाय शोधेल आणि पुन्हा सगळे व्यव्हार सुरळीत होतील अशी आम्हाला आशा होती मात्र असे घडले नाही उलट दर वेळी सरकार आणि प्रशासन बंदी वर बंदी घालत आहे,याशिवाय प्रकाश व्यवस्थपकांची कोणतीही कायदेशीर संस्था नव्हती,त्यामुळे आधी आम्ही आमच्या संस्थेची नोंदणी केली,आमच्याकडे सरकारसोबत बोलण्यास नेतृत्व नव्हते,आम्ही कला क्ष्ेत्रातील खूप सामान्य आणि तेवढीच स्वाभिमानी माणसे आहोत,आम्ही इतरांसारखे रस्त्यावर उतरुन नारेबाजी किवा सरकारविरुद्ध आंदोलन नाही करु शकत.गेल्या वर्षभरात आम्ही आमच्या जगण्या-मरण्याच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी ५ ते ६ निवेदने सर्व स्तरावर दिली आहेत,महापौर,जिल्हाधिकारी,विभागीय आयुक्त,मनपा आयुक्त एवढंच नव्हे तर आमच्या कलाकारांच्या इतर संघटनांनी मुख्यमंत्री यांच्या सचिवांना देखील निवेदन सुपुर्द केले मात्र आम्हाला फक्त आश्वासनाशिवाय सरकारकडून काहीही मिळाले नाही आणि आश्वासनाने पोट भरत नाही,आता आमची पण सहनशीलता संपली आहे,आम्ही सरकारच्या भरवश्यावर होतो,आज ही आम्हाला पालकमंत्री नितीन राऊत,महापौर दयाशंकर तिवारी आदी मान्यवरांकडून लवकरच मार्ग काढू असे फक्त आश्वासनच मिळाले असल्याचे माळोदे यांनी सांगितले.
आश्वासनाची पूर्तता न झाल्यास पुढचे पाऊल काय असणार? याप्रश्नावर बोलताना लकी खान यांनी आम्ही आता सोमवार किवा मंगळवार पासून संविधान चौकात आमरण उपोषणावर बसू असे सांगितले.आम्हाला उपोषणाची परवानगी नाकारल्या गेल्यास नागपूर शहरातील सर्व कलाकार हे सहकुटुंब आपापल्या घरासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आम्ही ओनर्स असलो तरी आमच्यावर अनेक कुटुंबे निर्भर असल्याचे लकी खान म्हणाले.आम्हीच घरी बसलो आहोत तर त्यांना काय खाऊ घालणार?सरकारने आम्हाला ‘लावारीस’ सोडले असले तरी त्यांना आम्ही लावारीस नाही सोडू शकत!आम्ही कर्ज काढून काढून त्यांच्या घरी रेशन पोहोचवले.एप्रिल,मे,जून हे आमच्या कमाईचा सीझन असतो,यासाठी आमच्या सारखे अनेक जण जानेवारी,फेब्रुवरीमध्ये कर्ज ही काढतात,ते कर्ज आता कश्याच्या भरवश्यावर फेडायचे?
पालकमंत्री यांना वाटतं करोनाचा संसर्ग पसरला नाही पाहिजे हे आम्ही ही मान्य करतो मात्र मुंबई,पुण्यात सर्व मंगल कार्यालय उघडे आहेत,नागपूरच्या कलाकारांची काेणतीच ‘कॅटेगिरी’पालकमंत्र्यांच्या आणि प्रशासनाच्या नजरेत नाही का?आम्ही माणसे नाहीत का?आम्हाला पोट नाही का?नुकतेच एका ठिकाणी सेक्स रॅकटमध्ये पोलीसांनी पकडलेल्या तरुणीने सांगितले की ती पूर्वी कपड्यांच्या दूकानात सन्मानाने नोकरी करीत होती,तिच्यावर लॉक डाऊनच्या काळात कर्ज झालं,कुटुंबियांना पोसण्यासाठी ती देह व्यापारात उतरली!तिच्या या परिस्थितीला जवाबदार कोण?असा ज्वलंत प्रश्न उपस्थित करीत कोण चूकतंय?जनता की प्रशासन?प्रशासन सांगते जनतेमुळे करोना पसरतोय जनता म्हणते प्रशासनाची चूक आहे!चूक कोणाचीही असो ‘भूगत तो आम जनता रही है’असे ते म्हणाले.कला क्ष्ेत्राशी जुळलेले लाखो कुटुंबिय कुठे जातील?कोणाला भीक मागतील?
आम्ही आज जिल्हाधिकारी आणि मनपा प्रशासनाला निवेदन दिले आहे कार्यक्रम आणि लग्न सराई सुरु करावी.आम्ही सगळे नियम पाळायला तयार आहोत.पुण्यात मंगल कार्यालयवाले हे १०० लोकांची यादीच प्रशासनाला पाठवतात,प्रशासनाची दोन माणसे दारावर उभी राहून येणा-या लोकांचे आधार कार्ड तपासतात,अशी व्यवस्था प्रशासनाने नागपूरात ही करावी मात्र सरसकट करोना पसरतोय या सबबीखाली कार्यक्रम आणि लग्न सराईच बंद करावी हे योग्य नसल्याचे लकी खान म्हणाले.
पत्र परिषदेत बोलताना किशोर बत्तासे म्हणाले की,लग्न समारंभ,रंगमंचावरील काम,संगीताचे कार्यक्रम ,धार्मिक कार्यक्रम हे गेल्या एका वर्षापासून बंद आहे,या सर्व कार्यक्रमांवर लाखो कुटुंब निर्भर आहेत याची सरकारला व प्रशासनाला जाणीव नाही का?जो पर्यंत या सर्व कार्यक्रमांवर बंदी होती आम्ही ती मान्य ही केली,सरकार व प्रशासनाला सहकार्य ही केले,आम्ही मनापासून सरकारने लादलेला लॉक डाऊन स्वीकारला मात्र आता अश्या प्रकारच्या कार्यक्रम बंदीची गरज आहे असे आम्हाला वाटत नाही,आता करोनापेक्ष्ा ही जास्त भिती ही, आपल्या मूलाबाळांसोबत उपाशी मरण्याची वाटते!नोव्हेंबर पासून सरकारने लॉक डाऊन उघडला तरी अनेक बंधनासोबत उघडला.लग्न समारंभात फक्त ५० लोकांनाच परवानगी दिली यामुळे देखील कलाकारांचे खूप नुकसान झाले.ज्या कामासाठी आम्हाला पाच हजार रुपये मिळायचे आमची बारगेनिंग पॉवर फक्त हजार रुपयांवर आली!
एकीकडे बाजार,मॉल्स सुरु आहेत या ठिकाणी ५० पेक्ष्ा जास्त लोकांची गर्दी होत नाही का?मग लग्न समारंभात व सांस्कृतिक कार्यक्रमात ५० लोकांचीच ‘चमत्कारीक’अट कशासाठी?आमची मागणी आहे ही संख्या किमान २०० तरी करावी.सरकारसाठी लॉक डाऊन किवा कार्यक्रम बंदी हे फक्त ‘उपक्रम’असतीलही मात्र यावर लाखो कुटुंब निर्भर आहेत,कॅटरिनवाले, डेकोरेशनवाले,गायक, वादक कलावंत,बॅक स्टेज आर्टिस्ट,एवढंच नव्हे तर कॅटरिनसाठी उपलब्ध करुन देणारे भाजीवाले देखील उधवस्त झालेत,याची सरकारला जाणीव आहे का?सरकारच्या लॉक डाऊनमुळे या देशाचा फक्त मध्यमवर्गीय भरडला जातोय,संचार बंदी व कार्यक्रम बंदीचा सर्वाधिक त्रास हा मध्यमवर्गीयांना झाला आहे,पगार घेणारे सरकारी नोकर यांना किती ही लॉक डाऊन लागले तरी काहीही फरक पडत नाही मात्र आमच्या सारखे कलावंत,व्यवसायिक यांचे काय?आमच्या बँकेत कामच नाही तर कुठून पैसे जमा होणार आहे?नका आमच्या बँकेत पैसा जमा करु मात्र वीज बिलाचे काय?ते तर भरमसाठ येत आहे,नाही भरले तर विज कापली जात आहे,पेट्रोलचे भाव,गॅस सिलेंडरचे भाव गगनाला भिडले आहे,यात सरकारने सूट दिली का?एकीकडे सरकार ‘घरी बसा’म्हणतेय दूसरीकडे ‘बिले भरा’सांगतेय,कशी भरणार बिले?असा प्रश्न बत्तासे यांनी उपस्थित केला.जगण्याची नुसती थट्टा झाली असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला.
मिथून मित्रा यांनी बंगाल,केरळमध्ये करोना नाही का?असे विचारत फक्त नागपूरातच करोना आहे का?असा सवाल उपस्थित केला.पुणे,मुंबईत सर्व नाट्यगृहे,सांस्कृतिक कार्यक्रम नियम व अटींसह सुरु आहेत मग नागपूरात का नाही?राजकारण्यांच्या रॅली,अांदोलनातून कराेना नाही पसरत का?मग कार्यक्रमांवरच निर्भर असणा-या लाखो कुटुंबियांनी कोणाकडे बघावे?सरकारचे लक्ष् फक्त श्रीमंत उद्योगपती आणि गरीब वर्गाकडे आहे,त्यांना रेशनचं धान्य ही मिळतं,मध्यमवर्गीयांचे काय?सर्वाधिक करांचा भरणा या देशातील मध्यमवर्गीय सरकारला करतं,ऊस गोड लागला तर मूळासकट खायचा नसतो हे सरकारला कळत नाही का?मध्यमवर्गीयांना किती नोचून खाणार?त्यांना सूट नाही सवलत ही नाही!आमची जमापूंजी संपली,आता आम्ही खूप गरीब झालो आहोत,फक्त गरीबच नाही तर कर्ज बाजारी झालो आहोत.मंडप डेकाेरेशन,कॅटरिन असोसिएशन सर्वांनी शासनाला निवेदन देऊन झाले,सरकारने आता काही तरी मार्ग अामच्या समस्यांवर काढला पाहिजे,अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

आज जवळपास शहरातील दीडशे कलावंतांनी सकाळी १० वा. ‘मी कलाकार’असे बॅनर घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात साखळी आंदोलन केले.जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांना निवेदन देऊन मनपा मुख्यालयात महापौर दयाशंकर तिवारी यांना निवेदन सोपविण्यात आले.
यात प्रामुख्याने शहरातील कलावंतांची संस्था ‘ऑस्कर सांस्कृतिक कला अकादमीच्या’कलावंतांनी सहभाग नोंदवला.




आमचे चॅनल subscribe करा
