

सेवादल महिला महाविद्यालयात ‘ विज्ञान दिवस ‘ साजरा
नागपूर,ता.२ मार्च: मानवाने केलेल्या वैज्ञानिक व तांत्रिक क्षेत्रातील दैदिप्यमान प्रगतीचा गौरव करतानाच पर्यावरण क्षेत्रात झालेल्या अवनतीचा आढावा घेणे ही काळाची गरज आहे असे सुप्रसिद्ध पर्यावरण तज्ञ आणि कार्यकर्ते कौस्तव चॅटर्जी, संस्थापक, ग्रीन विजील फाऊंडेशन, नागपूर यांनी सेवादल महिला महाविद्यालयाच्या सांस्कृतिक समिती आणि विज्ञान मंडळातर्फे दिनांक २८ फेब्रवारी २०२१ रोजी राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या निमित्ताने ऑनलाईन व्याख्यानात प्रमुख पाहूणे म्हणून मत प्रदर्शित केले.
याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, विज्ञानाने मानवी जीवन अधिकाधिक सुखकर केले मात्र त्याच्या अतिरेकी वर्तनाने निसर्ग आणि अन्य जीव सृष्टीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केले.पर्यावरण संवर्धनासाठी विविध आंतरराष्ट्रीय परिषद आणि करार झालेले असतानाही प्रत्यक्षात मात्र त्याची अंमलबजावणी करण्यास सर्वच राष्ट्रे उदासीन असल्याने, शाश्वत विकासा ऐवजी भौतिक विकासावर भर दिला जातोय. त्यामुळे निसर्ग आणि मानव यांच्यात सहजीवनाएेवजी दुरावा निर्माण झाला असून मानव स्वतःला निसर्ग सृष्टीचा मालक समजण्याची चूक करतोय अशी खंत त्यांनी या प्रसंगी व्यक्त केली.
यावेळी विज्ञान दिनाच्या निमित्ताने विज्ञान आणि पर्यावरण यांची मानवी जीवनातील सांगड यावर त्यांनी प्रकाश टाकला. विज्ञानाचा अतिरेक आणि पर्यावरणाची होणारी अपरिमित हानी अंतिमतः मानवाच्या अस्तित्वाला घातक ठरेल, असा इशारा ही त्यांनी दिला. संपूर्ण जगाला वेठीस धरणारे कोविड-१९ हे याचे कसे ज्वलंत उदाहरण होय हे त्यांनी स्पष्ट केले. अंतिमतः मानवाने स्वतच्या इच्छा आणि गरजा यात भेद करून त्यानुरूप आचरण केल्यास ही पृथ्वी सगळ्या जीव सृष्टीला पूरक ठरेल आणि विज्ञान आणि पर्यावरण यात संतुलन साधले जाईल जे मानव आणि सर्वच जीव सृष्टीला हितकारक ठरेल असे आवाहन केले.
गुगल मीट या आभासी मंचावर आयोजित कार्यक्रमात सेवादल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय शेंडे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रविण चरडे प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रा. सीमा निंबर्ते यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. महाविद्यालयीन प्राध्यापक आणि विद्यार्थीनींनी मोठ्या संख्येने या उपक्रमात आपला सहभाग नोंदविला.




आमचे चॅनल subscribe करा
