Homeब्रेकिंग न्यूजनिष्क़ाळजीपणाचा कळस: बारा बालकांना पोलियो ड्राप्स ऐवजी पाजले सेनिटायझर!

निष्क़ाळजीपणाचा कळस: बारा बालकांना पोलियो ड्राप्स ऐवजी पाजले सेनिटायझर!

यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील घटना

नागपूर,ता. १ फेब्रुवारी: सरकारी रुग्णालयातील शासकीय निष्काळजीपणाची मनोवृत्ती ही रुग्णांच्या जीवासाठीच नव्हे तर तान्ह्या निरागस बालकांसाठीही किती जीवघेणी होऊ शकते याचा प्रत्यय नुकताच भंडारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात आला असताना त्यातून कोणताही बोध न घेता पुन्हा याच बेफिकिर मनोवृत्तीचे बळी यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्याअंतर्गत,घाटंजी भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत कापसी-कोपरी येथील बारा बालकांना आला.

या केंद्रात बारा बालकांना पल्स पोलियो ऐवजी चक्क सेनिटायझर पाजण्यात आले,मुलांची प्रकृती बिघडताच हा गंभीर प्रकार उघडकीस आला,दरम्यान सदर बालकांना यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.आता पुन्हा या गंभीर घटनेच्या चौकशीचा फार्स सुरु झाला असून या घटनेला जवाबदार कर्मचा-यांवर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

नुकतेच रविवार दि.३१ जानेवारी रोजी संपूर्ण भारतात केंद्रिय पातळीवरील १ ते ५ वय दरम्यान बालकांना पल्स पोलियोचे डोज पाजण्याचा उपक्रम पार पडला मात्र पुरोगामी महाराष्ट्रात लहान,निरागस बालकांचा जीव हा कदाचित शासकीय यंत्रणेला सर्वाधिक स्वस्त वाटत असावा,अशी आता शंका येत आहे.‘पोलिओ रविवार’ पाळण्यात आला असून २ फेब्रुवारीपर्यंत आरोग्य विभागातर्फे घरभेटीतून डोज न घेतलेल्या बालकांना डोज पाजण्याचा अभियान राबविण्यात येत आहे.

गरिब,गरजू पालक आपल्या निरागस बालकांना फार विश्‍वासाने शासकीय कर्मचा-यांच्या हवाली करतात मात्र त्या जीवांचे मोल समजून घेण्याची पात्रताच या शासकीय यंत्रणेला नाही,म्हणूनच खासगी रुग्णालयावरील डॉक्टर्सवर ९० टक्के पालकांचा विश्‍वास का आहे?हे अश्‍या घटनांवरुन सिद्ध होतं.एक ही बालक पोलिओ डोजपासून वंचित राहू नये,याची काळजी घेण्याची सूचनाही आरोग्य विभागाच्या अधिका-यांनी दिल्या मात्र पोलिओ ड्राप्स पाजण्याचे प्रशिक्ष् ण या कर्मचा-यांना देण्यात आले होते का?हा प्रश्‍न अनुत्तरीत राहतो.

१२ जानेवारी रोजी मध्यरात्री २ च्या सुमारास भंडारा येथील जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांच्या कक्षात आग लागली व या घटनेत दहा नवजात बालके होरपळून मृत्यूूमुखी पडली होती.यातील अनेक बालकांना दुस-या दिवशी सुटी मिळणार होती,त्यांचे माय-बाप आपल्या लेकरांना घरी घेऊन जाणार व बारसं साजरं करणार असे स्वप्न रंगवित असतानाच सरकारी मनोवृत्तीने घात केला.रात्र पाळीतील दोन्ही परिचारिका या चक्क शेजारच्या कक्षात झोपी गेल्या,एका परिचारिकेला त्या कक्षातून बाहेर पडणारा काळाशार धूर दारातून बाहेर पडताना दिसला आणि एकच गदारोळ झाला मात्र तोपर्यंत फार उशिर झाला होता,तोपर्यंत नवजात कक्षातील दहा बालके एकसाथ होरपळून मृत्यूमुखी पडली होती,या अक्ष म्य हलगर्जीपणाची शिक्ष्ा मायबाप सरकारकडून फक्त कर्तव्यावर असणारे डॉक्टर्स व परिचारिकांना निलंबित करण्यापूरतीच मर्यादित राहीली.सरकारने एकाही डॉक्टर व कर्मचा-यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला नाही.याचाच अर्थ सरकारी रुग्णालयात उपचार घेणा-या निरागस जिवांचे मोल सरकारच्या लेखी काहीच नसते,असेच आता म्हणावे लागेल.
यवतमाळची घटना ही भंडारा जिल्ह्यातील घटनेची पुनरावृत्ती असल्याचा संताप आज साेशल मिडीयावर चांगलाच उमटला.निर्लज्जपणाची हद्द झाल्याचे पोस्ट फेसबूकवर झळकलेत.

आजच देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२१-२२ चा अर्थसंकल्प सादर केला,त्याची सुरवातच त्यांनी आरोग्य आणि कल्याण योजनांपासून केली.गेल्या वर्षी आरोग्यासाठी ६९ हजार कोटींचा प्रावधान ठेवण्यात आला होता,करोनाने डोळे उघडल्यामुळे भारतासारख्या देशात आरोग्य आणि कल्याण योजनांची किती निकडीची गरज आहे,हे माय-बाप सरकारच्याही चांगल्याने लक्षात आले.परिणामी या वर्षी १३५ टक्के आरोग्यवरील खर्चात वाढ करण्यात आली.याशिवाय ‘आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजना’ही नवी योजना विद्यमानात सुरु असलेल्या राष्ट्रीय स्वस्थ मिशन योजने व्यतिरिक्त आण्यात आली.या योजनेत ग्रामीण व जिल्हा पातळीवरीर आरोग्य क्ष्ेत्रात अनेक चांगल्या उपक्रमांची जंत्रीच अर्थमंत्र्यांनी संसदेत वाचली मात्र  तरीही प्रश्‍न अनुत्तरीत राहतो,कितीही चांगल्या व जनकल्याणकारी योजना माय-बाप सरकारने आणल्या तरी त्या प्रभावीपणे लागू करणारी माणसे कशी आहेत?कोण आहेत?भंडारा तसेच आजच्या यवतमाळ शासकीय रुग्णालयातील लहान बालकांसोबतच्या घडलेल्या दूर्देवी घटना,या प्रश्‍नाचे उत्तर मागत आहेत!

पोलियो ड्राप्स पाजणा-यांना साधा फिक्क़ट गुलाबी रंग ही कळू नये?
सर्वात महत्वाचे म्हणजे पोलियो ड्राप्सचा रंग हा फिक्कट गुलाबी असून ते ३ ते ५ एम.एलमध्ये उपलब्ध आहेत,सेनिटायझर अद्याप तरी संपूर्ण जगात ३ ते ५ एम.एलमध्ये उपलब्ध नाहीत,मग पोलियो ड्राप्स पाजणारे आरोग्य कर्मचारी हे झोपेत होते का?विशेष म्हणजे पोलियो ड्राप्सच्या बाटलीवर ठलक अक्ष् राने Vacine Vial Moniter हे शब्द लिहलेले असतात,मग या बालकांना पोलियो ड्राप्स पाजणारे आरोग्य कर्मचारी हे अशिक्ष्ति होते का?ज्यांना साधे लिहता-वाचता येत नाही,अश्‍या कर्मचा-यांना कश्‍याच्या आधारावर सरकारी नोकरी मिळते?असा संताप देखील आज नेटीझन्सनी सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर व्यक्त केला. निष्पाप बालकांचा जीव घेण्यासाठीच या सरकारी आरोग्य कर्मचा-यांना ७० हजार ते एक लाखाच्या दरम्यान पगार मिळताे का?जनतेच्या घामाच्या पैश्‍यातून सरकारी नोकर पोसले जातात,बेपरवाईने नोकरी करणा-या अश्‍या आरोग्य कर्मचारी व अधिका-यांना किमान आता तरी जनतेच्या जीवाशी थेट संबंध येणा-या आरोग्य विभागापासून दूर ठेवण्यात यावे,अशी अपेक्षाही आज त्या आभासी भिंतीवर(फेसबूक) चांगलीच उमटली.

गरीब,गरजू पालक फार विश्‍वासाने आपलं काळीज या बेमुरव्वत आरोग्य कर्मचा-यांच्या व अधिका-यांच्या हातात सोपवतात.आपल्या काळजाच्या तुकड्याला चांगले आरोग्य लाभावे,अशी आशा बाळगतात मात्र ‘दो बूंद जिंदगी के’ ऐवजी ‘दो बूंद सेनिटायझर के’सारख्या घटना निष्पाप,अज्ञानी बालकांसोबत घडतात तेव्हा संपूर्ण समाजमन हळहळतं व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करतं.मात्र या ही घटनेत चौकशीचा फास लावल्या जाईल व दोन-चार कर्मचा-यांना निलंबित करुन पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’वृत्तीनेच सरकारी कारभार चालत राहील,हे आता समस्त भारतीयांनाही चांगल्याने माहिती झाले आहे.

Latest बातम्या