श्रीयंत्रावरुन चक्क लिंगपिसाट खरातशी जोडला संबंध!

डिजिटल व प्रसार माध्यमांनीही सोडले ताळतंत्र!
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता. १६ मे २०२६: हिंदू धर्मात श्री यंत्र (Shree Yantra) हे अत्यंत शक्तीशाली,पवित्र आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते.याला ‘यंत्रराज’(यंत्रांचा राजा)देखील संबोधले जाते.हे देवी लक्ष्मी आणि त्रिपुर सुंदरीचे निवासस्थान मानले जाते.हे यंत्र नकारात्मक उर्जा नष्ट करुन सकारात्मक उर्जा वाढवते,ज्यामुळे वास्तूदोष दूर होतात आणि कौटूंबिक तसेच व्यवसायिक शांतता लाभते.असे हे यंत्र नागपूरात माध्यम जगतात कालपासून खूप चर्चेत आले असून याची वार्ता अगदी राज्याची राजधानी मुंबईपर्यंत पोहोचली व तेथील राजकीय व माध्यम जगतात चर्चेचा विषय बनले.मात्र,ही चर्चा नकारात्मक असून जगभर आपल्या काळ्या कृत्याने गाजणारा नाशिकचा लिंगपिसाट अशोक खरात याच्यासोबत या पवित्र यंत्राचा संबंध जोडून यासंबंधीचे वृत्त काल डिजिटल माध्यमात तसेच आज काही प्रसार माध्यमात प्रसिद्ध झाले.
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या गणेशपेठ येथील पक्ष कार्यालयाच्या प्रवेश द्वारावर हे श्रीयंत्र लावण्यात आले असल्याचे खोटे वृत्त कालपासून चर्चेत आले. या राजकीय पक्षाच्या संबंधित पदाधिका-यांकडून कोणतीही माहिती न घेता,याच श्रीयंत्राचा, लिंगपिसाट भोंदूबाबाच्या काळ्या कारनाम्याचा संबंध जोडण्यात आला!इतकंच नव्हे तर ही केवळ ’श्रद्धा’आहे की खरात सारख्या भोंदूगिरीचे छूपे समर्थन?असा अकल्पनीय प्रश्न देखील नागपूरातील माध्यम जगतात उपस्थित करण्यात आला.ज्या ‘यंत्राचा’आधार घेऊन खरातने अनेकांचे लैंगिक व आर्थिक शोषण केले त्याच यंत्राचे प्रदर्शन पक्षाच्या अधिकृत कार्यालयावर कशासाठी?असा अविश्वसनीय सवाल ही विचारण्यात आला!
या ही पुढे जाऊन ,खरात व राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकरांचा घटनाक्रमही या श्रीयंत्राचा आधार घेऊन बातम्यांमध्ये रंगविण्यात आला.चाकणकर,राष्ट्रवादी व नागपूरातील पक्ष कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरील श्रीयंत्राच्या योगायोग जुळवून, बातमीला खमंग फोडणी देखील देण्यात आली.ही वस्तूनिष्ठ पत्रकारितेतील मूल्याची सर्वात निम्नस्तरावील घसरण होती….!
याशिवाय अजित पवार व आर.आर.पाटील यांच्यासारख्या नेत्यांचा उल्लेख देखील बातमीत करण्यात आला, ज्यांनी राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यासाठी लढा दिला.मूळात ‘श्रीयंत्र’हे कोणत्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे यंत्र नाही.या यंत्राची पवित्र स्पंदने, उर्जा व लहरी आहेत ज्यांचा परिणाम फक्त सात्विकतेत व सकारात्मक्तेत होतो.या यंत्राचा व लैंगिक,आर्थिक शोषणाचा कोणताही संबंध नसताना,अशा प्रकाचा संबंध जोडून केवळ ऐकीव माहितीच्या आधारावर बातमी प्रसिद्ध करण्यात आली,हेच पत्रकार हिंदू धर्म सोडून इतर कोणत्याही धर्माविषयी,त्यांच्या धार्मिक चिन्हांविषयी एक अक्षर ही प्रसिद्ध करण्यास मात्र धजावत नाहीत,हे विशेष.
गणेशपेठ येथील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या या पक्ष कार्यालयाचे उद् घाटन स्वत:दिवंगत अजित पवार यांनी १५ डिसेंबर २०२४ रोजी केले होते.हे कार्यालय विठोबा इंडस्ट्रीजचे मालक यांचे असून पक्षातर्फे दीड लाख रुपये भाडेतत्वावर घेण्यात आले आहे.मूळात हे यंत्र पक्षाच्या प्रवेशद्वारावर नसून या मजल्याच्या मध्यभागी आहे.एका बाजूला सॉफ्टवेअरची कंपनी असून यंत्राच्या दूस-या बाजूला पक्षाचे कार्यालय आहे.हे यंत्र मध्यभागी आहे,पक्षाच्या प्रवेशद्वारावर नाही.
त्यामुळे या यंत्राचा सरळ संबंध एखाद्या राजकीय पक्षासोबत जोडून,त्याही पुढे जाऊन लैंगिक शोषणासाठी सध्या चर्चेत असणा-या अशोक खरातसोबत या पवित्र यंत्राचा संबंध जोडणे,हे अश्या स्वरुपाची बातमी प्रसिद्ध करणा-या पत्रकारांच्या बुद्धीमत्तेची ‘दिवाळखोरी’दर्शवते,असा संताप आता व्यक्त होत आहे!
काही पत्रकारांना हाताशी धरुन पक्षाच्याच एका पदाधिका-याने, पक्षाची प्रतिमा मलीन करण्यासाठी असे बदनामीकारक वृत्त प्रसारित केल्याचा आरोप होत आहे.हे सत्य असल्यास,नागपूरात वस्तूनिष्ठ,निष्पक्ष पत्रकारिता किती रसातळात गेली आहे,याचे हे ज्वलंत उदाहरण ठरेल.
ज्यावेळी पत्रकारिता कोणाच्यातरी हातचे बाहूले होते त्यावेळी पत्रकारितेचं मरण हे अटळ असतं.निष्पक्ष पत्रकारितेत ,कोणत्याही राजकीय,आर्थिक किंवा वैयक्तिक दबाव न आणता,पूर्ण सत्य,पारदर्शकता आणि वस्तुनिष्ठतेसह(Objectivity)आपल्या वाचकांसमोर माहिती मांडणे हेच अपेक्षीत असून,लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मिरवणा-या पत्रकारितेत कोणत्याही विशिष्ट व्यक्ती,पक्ष किंवा धर्माचे समर्थन अपेक्षीत नसतं.
याहून महत्वाचे म्हणजे पुराव्यांवर आधारित आणि खात्रीशीर माहिती हा पत्रकारितेचा आत्मा असून.वरील बातमीत तोच पूर्णपणे हरवला असल्याचे दृष्टिक्षेपात येतं.त्यामुळेच ‘सत्ताधीश’ला या वृत्ताची दखल घेणे क्रमप्राप्त ठरले.
………………………………..
Advertisements
