Homeब्रेकिंग न्यूजपोलिस आयुक्तांचा हा ‘दावा’खरा, फडणवीस खोटे!

पोलिस आयुक्तांचा हा ‘दावा’खरा, फडणवीस खोटे!

दंगलीच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समुदायाचा दावा

दंगलीसाठी बजरंग दलच दोषी:मजारवरची चादर लाथेने तुडवली

दंगलीत बाहेरचे तत्व म्हणजे हिंदू पण असू शकतात: मुस्लिम समुदायाची शंका
महिला पोलिससोबत कोणतीही विनयभंगाची घटना घडलीच नाही
आम्ही औरंगजेबच्या मुद्दाकडे लक्ष न दिल्यानेच बजरंग दलाकडून ‘पूर्वनियाेजित’ जाळपोळ!
नागपूर,ता.२० मार्च २०२५: सोमवारी तारिख १७ मार्च रोजी रात्री आठ नंतर महाल भागात जे काही घडले ते अतिशय निंदनीय असून आम्ही त्या घटनेची निंदा करतो,ही दंगल घडायलाच नको होती,मात्र ही दंगल घडण्यास सर्वस्वी बजरंग दल व विश्‍व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते व पदाधिकारी जबाबदार असून, त्यांनी ताजुद्दीन बाबांच्या मजारीवर श्रद्धेने जी हिरवी चादर चढवली जाते ज्यावर मोहम्मद पैगंबरसाठी‘सुरे आलम के लिये रहमत भेज रहे है’ असा सारखा पवित्र आशय नोंदवला आ,हे त्या चादरीला जाळत लाथेने तुडवले,परिणामी हा व्हिडीयो सर्वदूर पसरला व जनक्षोभ उसळला,याचा फायदा काही असामाजिक तत्वाने घेतला व दंगल पेटवली,दंगल शांत झाल्यावर पोलिसांनी जे कोंबिंग ऑपरेशन राबवले त्यात मुस्लिम भागातील अशा मुलांना देखील पकडले जे रमजानची नमाज अता करुन मजिदीतून नुकतेच घरी आले होते,त्यांना फक्त चौकशीसाठी नेण्यात आले मात्र,आता त्यांच्यावर एनएसए सारखी गंभीर कलम लावली,इतकंच नव्हे तर त्यांच्यावर ५७ गुन्हे दाखल केले, असा आरोप प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत महाल येथील सुशिक्षित मुस्लिम समुदायातील शिष्टमंडळाने केला.
पोलिसांनी ज्यांना घरातून उचलले त्यात अनेक डॉक्टर,वकील,इंजिनियर मुले असून त्यांचा त्या दंगलीशी कोणताही संबंध नसल्याचे ते सांगतात.आमचा औरंगजेबशी काहीही संबंध नसून, विश्‍व हिंदू परिषद किवा बजरंग दलाला औरंगजेबविषयी जी काही आंदोलने करायची आहे त्या विषयी आमचा आक्षेप नाही,तो त्यांचा अधिकार आहे,मात्र,आमच्या पवित्र आयत लिहलेली हिरवी चादर लाथेने तुडवणे हे अतिशय निंदनीय कृत्य असून,औरंगजेबच्या मुद्दाकडे मुस्लिम समुदाय लक्ष देत नसल्यानेच बजरंग दलाने आमचे आस्थेचे प्रतीक जाळून ‘पूर्वनियोजित’दंगल भडकवली,असा सरळ आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आरिफ काजी यांनी केला.
दोन महिन्यांपासून विधान भवनात औरंगजेब गाजत आहे,राणेंच्या जिभेवर औरंगजेब गाजत आहे मात्र,कोणताही मुस्लिम हा लक्ष देत नाही आहे.मुस्लिम औरंगजेब मुद्दावर भडकत नाही हे बघून त्याला भडकावण्यासाठी ‘चादर ’आणली,हा कट आहे,पूर्वनियोजित कट,असा आरोप आरिफ काजी यांनी केला.या कटाचा पर्दाफाश झाला पाहिजे,माध्यमांनी हे वास्तव समोर आणायला हवे,असे आवाहन त्यांनी केले.अनिस अहमद किवा कुरैशी यांच्या आमदारकीच्या काळातील मध्य नागपूरची शांतता धोक्यात आली आहे असा आरोप करीत,रामचंद्र दुबे यांच्यासारख्या बुद्धीवंत देखील मानतात की ‘कट’शिजला आहे!दुबे यांना कुराणाची चांगली जाण आहे,नेहमी ते आमच्याशी कुराणाबाबत बौद्धिक चर्चा करतात.त्यांना काल मी फोन केला व त्यांच्या नजरेसमोर त्याच कुरणातील आयत असणारी चादर जाळण्यात आली,याविषयी विचारले असता,त्यांच्या लहान भावाने,ते बजरंग दलाच्या या कृत्याने ‘लज्जित’असल्याचे सांगितले,असा दावा आरिफ काजी यांनी केला.
एकीकडे नागपूरचे पोलिस आयुक्त यांनी ही दंगल पूर्वनियोजित नव्हती असे विधान माध्यमांसमोर ऑन कॅमरा केले.दूसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधी मंडळात नागपूरातील दंगल ही ‘पूर्वनियोजत’होती असे विधान करतात.पोलिस आयुक्त डॉ.रविंद्र सिंगल हे घटनास्थळी उपस्थित होते.पोलिस आयुक्त हे एक जबाबदार अधिकारी असून संपूर्ण शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे काम ज्यांच्यावर आहे,त्यांचे विधान हे खरे मानायचे नाही का?असा सवाल ते करतात.कोण खोटं बोलत आहे हे आता तुम्हीच ठरवा,अशी पुश्‍ती त्यांनी जोडली.
काल पोलिस आयुक्त यांनी हे देखील सांगितले की दंगलीत बाहेरचे असामाजिक तत्व नव्हते मात्र, आज गुन्हे शाखेचे उपायुक्त यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की,दंगलीत बाहेरचे देखील असामाजिक तत्वे होती,पोलिस विभागाच्या दोन वरिष्ठ अधिका-यांच्या मतांमध्येच एवढ्या संवेदनशील घटनेला घेऊन मतभेद दिसून पडतात,यावर प्रश्‍न विचारला असता,बाहेरचे याचा अर्थ दंगल करणारे हे त्या भागातील नसून,बाहेरच्या भागातून महालात आले होते,असे डॉ.अवेस हसन यांनी सांगितले.त्या भागातील मुस्लिम पुरुष व मुले हे त्या वेळी नमाज अता करीत होते.हे गरजेचे नाही की कोणी तोंडावर कापड बांधून ,डोक्यावर टोपी घालून हातात दगड घेऊन तोडफोड करीत आहे तर ते मुस्लिम समुदायाचेच असतील,अनेक असे व्हिडीयो आहेत ज्यात तोडफोड करणा-यांच्या हातात लाल व भगव्या रंगाचे दोरे बांधलेले दिसत आहे,मुस्लिम हे हातात दोरे बांधत नाही,असा सरळ दावा डॉ.अवेस हसन यांनी केला.मग ते कोण होते?तेच होते जे दंगल घडवण्यासाठी ‘बाहेरुन’आले,असा आरोप त्यांनी केला.
महालच्या विविध भागातून आता पोलिसांनी अनेक मुलांना उचलून डांबले आहे व त्यांच्यावर कठोर कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले आहे मात्र,ज्या वेळी ती हिंसा रसत्यांवर घडत होती त्यावेळी तुमच्यासारखे सुशिक्षित व शांतताप्रिय वर्ग रस्त्यावर उतरुन दंगलखोरांना जाळपोळ करण्यापासून थांबवले का नाही,पोलिसांवरसुद्धा दगडफेक होत होती,पोलिस जखमी होत होते,आज पत्रकार परिषद घेऊन त्यांची बाजू का मांडत आहात?असा प्रश्‍न केला असता,आम्ही रात्री आठ ते दहा दरम्यान मजिदीत नमाज अता करीत होतो,असे डॉ.अवेस हुसेन म्हणाले.यानंतर मी स्वत: पोलिस आयुक्तांसोबत दंगलग्रस्त भागात फिरत होतो.मी तिथेच होतो,बाहेरच होतो,माझं घर तिथेच आहे,बाहेर सगळ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असे ॲड.शाहजाह यांनी सांगितले.

याप्रसंगी बोलताना मौलवी यांनी सांगितले की,नागपूरची फिजा ही बंधूभावाची आहे.आपापसात हिंदू-मुस्लिम असे भांडण असते तर आतापर्यंत किती दंगली झाल्या असत्या.नागपूरात कधीही हिंदू-मुस्लिम दंगल घडली नाही.आम्ही नेहमीच आपल्या शहराला शांततेच्या वातावरणात ठेवले आहे आणि पुढे देखील आम्हाला असेच वातावरण ठेवायचे आहे.अचानक एक घटना घडली,आमच्या धार्मिक भावना दूखावणारी ती घटना होती त्याची प्रतिक्रिया उमटली,या घटनेला ‘पूर्वनियोजित’असे म्हणू शकत नाही असे मौलवी म्हणाले.प्रसार-प्रचार माध्यमातून सरकारपर्यंत आमचा आवाज पोहोचवा,आपण कसे या वातावरणाला पुन्हा सामान्य करु शकतो.
याप्रसंगी मुस्लिम समुदायातील शिष्टमंडळाने हिरवी चादर दाखवली जी बजरंग दलाकडून जाळण्यात आली.ज्यावर कुराणची आयत होती.बजरंग दलाने जे कृत्य केले त्यांना अटक होऊन दोन तासात जामीन ही मिळतो मात्र,आमच्या मुलांना अटक करुन नेले,त्यांच्यावर कठोर कलमा लावल्या,त्यांना जामीन देखील मिळू शकत नाही,ज्यांच्यामुळे ही दंगल घडली त्यांना अटक झाली नाही,ते सरेंडर झाले व जामीन देखील मिळाला,हा पक्षपात होत असल्याचा आरोप डॉ.अवेस हसन यांनी केला.
मध्य नागपूरातून मी पाच वेळा निवडणूका लढली व जिंकली,माझ्या आधी आसिफ कुरैशी यांचे वडील शौकत कुरैशी मध्य नागपूरातून आमदार होते. १९९० पासून माझ्या आमदारकीच्या काळापासून मी कधीही हिंदू-मुस्लिम दंगल अनुभवली नाही.मी किंवा मंचावरील कोणीही आज औरंगजेबसाठी माध्यमा समोर आलो नाही,डॉ.अवेस यांनी जी हिरवी चादर तुम्हाला दाखवली आहे त्यावर कुराण शरीफची आयते लिहली आहेत,त्यात पैगंबरांचे आभार मानले की तू आम्हाला दोन वेळेची रोटी दिली आहे,तुझे आभार,या चादरीवर दूसरे काही नाही लिहले आहे.संपूर्ण महाराष्ट्रात विश्‍व हिंदू परिषद व बजरंग दल औरंगजेबविरुद्ध आंदोलन करत आहेत मात्र,नागपूरात त्यांनी औरंगजेबच्या पुतळ्याला जी हजरत बाबा ताजुद्दीनची हिरवी चादर गुंडाळली,ती जाळली,लाथेने तुडवली,हा सर्वात मोठा गुन्हा बजरंग दल व विश्‍व हिंदू परिषदेने केला असल्याचे अनिस अहमद म्हणाले. त्यांना अटक झाली,लगेच कोर्टातून जामीन मिळाला,ते सुटले आणि ते घरी देखील आले.हा पक्षपात नाही आहे का?असा सवाल करीत,जे आयटी अभियंते आहेत त्यांना महालातील घराच्या चौथ्या मजल्यावरुन पोलिसांनी धरले.जी शिकलेली मुले रात्री १० वाजता नमाज अता करुन १० वाजून ५ मिनिटांने घरी पोहोचली त्यांना पोलिसांनी दंगलीच्या आरोपात पकडले.मजिदीच्या व्हीडियोमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की ती मुले नमाज अता करुन बाहेर पडली आहे.
आता तर सरकारने त्यांच्यावर एनएसए लावला आहे.एकीकडे बजरंग दल व विश्‍व हिंदू परिषदेच्या पदाधिका-यांना काही तासात सोडून देता व मुस्लिम समुदायातील सुशिक्षित मुले,मोठमोठ्या पदावर असलेली मुले यांच्यावर एनएसए लावला, ज्या कायद्यात एक वर्ष जामीन देखील मिळत नाही.आम्ही सगळे उच्चशिक्षित असून आम्हाला कोणालाही हिंदू-मुस्लिम भांडणे नको आहे.आम्ही ज्या भागात राहातो त्या भागात आजूबाजूला हिंदू लोक राहतात.दिवाळी-होळी,सुख-दु:खात आम्ही नेहमी आपल्या हिंदू बांधवांसोबत सुख-दु:ख वाटून घेतो.जे घडले ते घडायला नको होते.जे हे सांगतात की दंगल ‘पूर्वनियोजित ’होती,हे खरं नाही आहे.आज इंजिनिअर,डॉक्टर,आय आय टी,आर्किटेक्ट झालेल्या मुलांवर पोलिसांनी ५७ गुन्हे दाखल केले आहे.यात अल्पवयीन मुले देखील आहेत.निरपराध मुलांवर पोलिसांनी अन्याय करु नये,अशी मागणी अनिस अहमद यांनी केली.
रात्री अडीच वाजता मी स्वत: पोलिस ठाण्यात होतो.पोलिस मला ओळखायलाही तयार नव्हते.एका पोलिसवाल्याने मला सांगितले की,आम्ही तुमच्यावर अन्याय करतोय हे आम्हाला माहिती आहे,रमजानचा महिना आहे,तुम्ही तर पाणी देखील पित नाही,याची जाणीव त्या पोलिसवाल्याला देखील होती,असे अनिस अहमद म्हणाले.आम्ही रमजानमध्ये खोटं बोलणार नाही.बाबा ताजुद्दीनला तर हिंदू बांधव हे जास्त मानतात,अजमेर शरिफवर हिंदू बांधव मोठ्या प्रमाणात आस्थेने जातात.त्यांची चादर जाळण्याचा कोणताही अधिकार बजरंग दलाला नव्हता.अल्पवयीन मुले ज्यांना काहीही कळत नाही त्यांनी ते पसरवले.पोलिसांनी तर ५०० मुलांना अटक केली.५०० ची संख्या पोलिसांकडे कुठून आली.महाराष्ट्र सरकार नागपूरच्या पोलिसांवर का दबाव टाकतेय?
याप्रसंगी बोलताना,महिला पोलिसाचा विनयभंग यावर देखील मुस्लिम शिष्टमंडळाने आक्षेप घेतला.सगळ्या महिला पोलिस या फव्वारा चौकात जमा होत्या,दंगलीच्या ठिकाणी नव्हत्या,असा दावा डॉ.अवेस हसन यांनी केला.पोलिस उपायुक्तांवर कु-हाडीने वार झालाच नाही असे देखील ते म्हणाले.मी स्वत: डॉक्टर आहे,कु-हाडीचा घाव ओळखतो,अशी पुश्‍ती त्यांनी जोडली.दगडफेक झाली हे आम्ही मान्य करतो मात्र,नंतर वेगवेगळे खोटे आरोप पोलिसांवर दबाव टाकून केल्या जात असल्याचे ते म्हणाले.
आम्हाला खूप चांगला पोलिस आयुक्त मिळाला आहे,असे अनिस अहमद म्हणाले.पोलिस आयुक्तांचे सर्व बयाण बघा,ते माध्यमांसमोर खरं बोलत आहेत.आम्ही लवकरच राज्यपाल यांची भेट घेणार आहे.आम्हाला लवकरात लवकर हा मसला सोडवायचा आहे,असे अनिस अहमद यांनी सांगितले.संचारबंदी लवकरात लवकर हटवा.शाळा,महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे,परिक्षेचे दिवस आहेत.रुग्णांचे हाल होत आहे.संचारबंदी हटवा,लागेल तर इंटरनेट बंद करा.जे रिकामटेकडे व्हॉट्स ॲपवर बसतात त्यांना चाप बसेल,असे ते म्हणाले.हिंदू असो किवा मुस्लिम,संचारबंदीमुळे त्यांची दूकानदारी बंद आहे,त्यांच्या रोजी-रोटीचा प्रश्‍न आहे.हंसापुरतीत हिंदू बांधवांची दूकाने आहेत आणि मोमिनपु-यातील सगळे मुस्लिम त्या हिंदू बांधवांकडून खरेदी करतो.संचारबंदी उठली तर लोग कामद्यंदाला लागतील,त्यांना रिकामटेकड्या गोष्टींसाठी वेळ राहणार नाही.जे झाले ते घडले आता सरकारने लकवरात लवकर नागपूर शहरासाठी ‘शांतता समिती’ गठीत करावी,असे आवाहन त्यांनी केले.पोलिस आयुक्तांकडे देखील आम्ही ही मागणी केली आहे.याशिवाय ज्यांच्या गाड्या जाळण्यात आल्या,सरकारने त्यांना तातडीने मदत करावी,अशी मागणी त्यांनी केली.
पत्रकार परिषदेत रिजवान अंसारी,जावेद अख्तर,जमाल अलझमझम,फैजल तावलेकल,फारुख रहमान कुरैशी आदी उपस्थित होते.
(बातमीशी संबंधित सर्व व्हिडीयो Sattadheesh official you tube वर उपलब्ध)

Latest बातम्या