Advertisements

‘रिमझिम गिरे सावन…’

पाऊस आला की गाणं आठवतं…मनात फेर धरतं…कानात रुंजी घालतं ते एव्हरग्रीन गाणं आहे,महान संगीतकार आर.डी.बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं,‘रिमझिम गिरे सावन…सुलग सुलग जाये मन’.
नुकतेच २७ जून रोजी पंचना दा यांचा वाढदिवस होता. पंचम दा नी अनेक गीतांना आपल्या कल्पकतेचा जादुई स्पर्श देऊन अजरामर केले.
पाऊस आला अन…तो समाज माध्यमांवरही कोसळला…त्यातील या गीतावर एक सुंदर लेख सापडला.‘सत्ताधीश’ने खास आपल्या वाचकांसाठी तो पुर्नलिखित केला.
पाऊस..पडद्यावरचा…अन् मनातलाही…
अभिताभचा ‘मंझील’सिनेमा अनेकांनी पाहिला नसकन.पण ‘रिमझिम गिरे सावन’,हे गाणं ऐकलं नसेल असा रसिक विरळाच.
पासवाळा सुरु झाला की कुठूनतरी हे गाणं मनात रुंजी घालू लागतं.पहिला पाऊस पडला की मातीला जसा सुगंध येतो,तसाच या गाण्याचा सुगंध मनभर दरवळू लागतो.
हे गाणं लता बाई आणि किशोर कुमार दोघांच्या आवाजात वेगवेगळं ध्वनिमुद्रीत झालं आहे.श्रोत्यांच्या मनात किशोर दा यांनी गायलेलं गाणं जास्त लोकप्रिय आहे.चित्रहार,छायागीत,रेडियो,ऑकेस्ट्रा…सर्वत्र तेच ऐकत आपण मोठे झालो.त्यामुळे लताचं Version अनेकांना खरं तर माहितीच नसतं.
किशोर यांचं Version म्हणजे पावसातला निवांत फेरफेटका,तर लता Version म्हणजे त्याच पावसात पहिल्यांदा प्रेमात पडलेल्या मनाची धडधड.प्रत्येक रोमाँटिक माणसाचं एखादं ‘ह्दयातलं गाणं’असतं…’रिमझिम गिरे सावन’अगदी तसंच आहे.
दिग्दर्शक बासू चॅटर्जी यांनी हे गाणं पूर्णपणे ख-या पावसात आणि मुंबईच्या रस्त्यांवर चित्रित केलं आहे,आज पाहताना ते सहज वाटतं,पण त्या काळात चर्चगेट,हुतात्मा चौक,मरीन ड्राईव्हसारख्या गजबजलेल्या ठिकाणी कोणताही मोठा सेट न उभारता असं चित्रकरण करणं हे मोठं धाडस होतं.
तेव्हा अमिताभ सुपरस्टार नव्हता,तर मौशमी चॅटर्जी मात्र माेठी स्टार होती.तरीही शेकडो लोकांमध्ये,काळ्या छत्रींच्या गर्दीत हे गाणं इतक्या नैसर्गिकपणे चित्रित झालं आहे की ते पाहताना अापणही त्या पावसाचा एक भाग बनून जातो.हुतात्मा चौकात काळ्या छत्र्यांच्या समुद्रातून दोघं रस्ता ओलांडतात,तेव्हा पिवळा टी-शर्ट घालून गर्दी सांभाळणारे स्वत:बासूदा क्षणभर दिसतात.
या गाण्यात छोट्या छोट्या गोष्टी नोंद घेण्यासारख्या आहेत.
अमिताभ आणि मौशमी आकंठ प्रेमात आहेत.दोघेही जगापासून बेखबर फिरत आहेत.अमिताभ सूट घालून भिजतोय.हे प्रथमदर्शनी विचित्र वाटतं. पण ज्यांनी ‘मंझिल’पाहिलाय त्यांना माहिती आहे की तो मित्राचा सूट घालून मुलाखतीला गेलेला असतो आणि त्यानंतर थेट तिच्याबरोबर फिरायला निघतो.त्यामुळे हा सूट केवळ पोशाख राहत नाही,तो वस्तूस्थितीचा भाग बनतो.
पूर्ण गाण्यात अमिताभ आपल्या प्रतिमेच्या अगदी विरुद्ध दिसतो.मौशमीशी मनमोकळ्या गप्पा मारणारा,तिच्यासोबत पाण्यात उड्या मारणारा,रस्त्यातलं पाणी उडवत चालणारा,शेवटी बाकावर तिला अलगद जवळ घेत बसणारा असा लाजरा,निरागस प्रेमवीर अमिताभ दुस-या कोणत्याच चित्रपटात फारसा दिसत नाही.
आणि मौशमी..
ती फक्त सुंदर दिसत नाही,ती आनंदी दिसते.तिचं हसणं,त्याच्याकडे नकळत पाहणं,पावसात केस सावरणं,त्याच्या हातावर प्रेमाने मारलेली ती हलकी चापटी…अभिनय आणि वास्तव यांच्यातली रेषाच पुसुन टाकतात…ती अनेकांची fantasy Queen असेल,पण या गाण्यात तिचं खरं सौंदर्य तिच्या सहजपणात आहे.
एक प्रसंग विशेष आवडतो.अमिताभ मोठमोठी पावलं टाकत चालताेय आणि त्याच्याशी पावलं जुळवताना मौशमीची धावपळ उडते.ती त्याच्या हातावर हलकीशी चापट मारते…जणू,‘अरे जरा हळू चाल ना!’,हे शब्द उच्चारल्याशिवाय व्यक्त करते.इतका छोटा क्षण..पण इतकाच खराखुरा.
पूर्ण गाण्यात मौशमी अनवाणी फिरते.बहूधा पासवात चपला त्रासदायक ठरत असाव्यात.पण त्यामुळे तिची प्रत्येक पावलं अधिक नैसर्गिक वाटतात.
मरीन ड्राइव्हवरचा तो प्रसंग अप्रतिम.अमिताभ रस्त्याखालून चालतोय आणि मौशमी कठड्यावरुन त्याचा हात धरुन चालतेय.(तरीही दोघे जवळजवळ एकाच उंचीचे दिसतात!)मग तो तिला कमरेत उचलून अलगद खाली घेतो.किती साधा क्षण…पण किती सुंदर!नंतर मौशमीने एका मुलाखतीत सांगितलं होतं की तिला अमिताभने सरळ उचलून घ्यावं असं वाटत होतं,पण त्याच्या संकोची स्वभावामुळे बासुदांनी हा मधला मार्ग काढला असावा.
कपिल शर्माच्या कार्यक्रमात मौशमीने या गाण्याच्या चित्रीकरणाच्या अनेक आठवणी सांगितल्या होत्या.एक शॉट झाला की दोघं कारमध्ये बसून जवळच्या रेस्टॉरंटमध्ये चहा प्यायला जात आणि पुन्हा येऊन पावसात भिजत.दिवसभर भिजल्यामुळे तिच्या हिरव्या शिफॉन साडीचा रंग अक्षरश: अंगावर उतरला होता,असं ती हसत हसत सांगत होती.
या गाण्याचं Cenemetography म्हणजे स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे.के.के.महाजन यांनी पावसाला फक्त Background म्हणून टिपलेलं नाही.त्यांनी त्याला एक ‘पात्र’बनवलं आहे.नैसर्गिक प्रकाश.धूसर वातावरण,ओले रस्ते,दूरवर दिसणा-या इमारती…कुठेही कृत्रिम ग्लॅमर नाही.त्यामुळे हे गाणं आजही ताजं वाटतं.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॅमरा त्यांच्याकडे बघत नाही.तो त्याच्या बरोबर चालतो.कधी त्यांच्या मागे,कधी बाजूला,कधी पावसात त्यांच्याबरोबर भिजत…म्हणून आपण प्रेक्षक राहत नाही..त्यांच्या प्रेमप्रवासाचा सोबती बनतो.
मरीन ड्राइव्हवर आदळणा-या लाटा,उंच उडणारे पाण्याचे फवारे,पुलाच्या पलीकडे चालणारे ते दोघं,मध्येच फ्रेममध्ये येणारी बेस्ट बस,पावसात स्कूटरवरुन जाणारं जोडपं..हे सगळं कॅमे-याने इतकं सहज टिपलं आहे की,जणू मुंबई शहरच या प्रेमकथेत एक ‘सहकलाकार’ बनून जातं.
खरं सांगायचं तर या गाण्याचं सगळं Row Footage आज उपलब्ध असतं तर,‘ Making of Rimzhim Gire Sawan’या नावाचा माहितीपट बनवण्यासाठी Netflix किंवा Prime Video ने कदाचित या काळच्या चित्रपटाच्या कमाईपेक्षा जास्त पैसे मोजले असते!
आता याच्या संगीताविषयी थोडं…
लता Version एवढं प्रभावी होण्यामागे फक्त लताचा स्वर नाही,पंचमने दिलेली Treatment हे त्याचं मोठं कारण आहे.
गाण्याची सुरवात ज्या हलक्या गिटार Prelude ने होते,ती म्हणजे जणू आकाशातून पहिले थेंब अलगद जमीनीवर उतरतात.त्यानंतर हळूहळू येणा-या Violins म्हणजे ढगांची गर्दी .गाणं सुरु होण्यापूर्वीच पावसाचा मूड तयार होतो.
या गाण्यात पंचमदानी तबला किंवा ढोलकचा गाजावाजा केलेला नाही.हलका Rhythm, Guitar bass आणि Strings यांच्या आधारावर त्याने अशी लय तयार केली आहे की संपूर्ण गाणं चालत नाही…तरंगत राहतं.ते कुठेही धावत नाही.ते प्रेमात पडलेल्या दोन माणसांच्या निवांत पावलांसारखं पुढे सरकत राहतं.
लोकं त्याला उगाच,‘Lord Burmam‘म्हणत नाहीत.
अन्…लता दिदिंच्या गायकीबद्दल काय बोलावं?तिथे शब्दच अपुरे पडतात.
‘सुलग…सुलग..जाए मन…’म्हणताना त्या शब्दाला दिलेला हलकासा दाब…आतल्या आत सुलगणा-या प्रेमाची जाणीव करुन देतो.‘लगी कैसी ये अगन…’मध्ये त्या आवाजाला उगाच उंच नेत नाहीत,उलट तो अधिक अंतर्मुख होतो.त्यामुळे हे गाणं उत्कट कमी आणि जिव्हाळ्याचं अधिक वाटतं.इंटरल्युडमध्ये त्यांनी घेतलेली ती,‘ला..ला…लालाला’तान!त्या काही सेकंदांत शब्द नसतात,पण प्रेमाचा संपूर्ण अर्थ व्यक्त होतो.इतकं समजून उमजून गायलय लताने हे गाणं की प्रत्येकवेळी ऐकताना आपण दिग्मुढ होऊन जातो.
शेवटी,कवी योगेश यांच्या शब्दांबद्दल काय बोलावं?
ते गाण्यात दोन प्रेमिकांच्या प्रेमाचं वर्णन करत नाही,ते प्रेमात पडल्यावर बदललेल्या मनाचं वर्णन करतात…!
‘पहले भी यूँ तो बरसे थे बादल…’
हो..पाऊस आधीही पडत होता,
‘पहले भी यूॅ ं तो भीगा था आँचल…’
पावसात अंगं आधीही भिजत हाेते पण…
पण…
‘अब के बरस क्यों सजन…सुलग सुलग जाये मन?
हा प्रश्न पावसाला नाही,स्वत:च्या मनाला आहे.
प्रेमात पडल्यावर जग बदलत नाही…
बदलतो तो जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन.
‘इस बार सावन दहका हूआ है…’
काय सुंदर विरोधाभास!सावन म्हणजे थंडावा,पण इथे तो दहकतो आहे.पाऊस पडतोय,पण मनात आग लागली आहे.प्रेमाच्या पहिल्या स्पर्शाचं याहून सुंदर रुपक क्वचितच सापडेल.
गाण्यातला प्रत्येक शब्द पासवाच्या थेंबासारखा टपोरा आहे..म्हणूनच पाच दशकानंतरही हे गाणं तितकंच ताजं वाटतं.
या गाण्याची Fantasy फक्त मला किंवा तुम्हालाच नाही,तर हजारो लोकांना साद घालते.काही वर्षांपूर्वी इनामदार नावाच्या एका मराठी जोडप्याने हे गाणं Recreate केलं होतं.तो व्हिडीयो अनेकांनी पाहिला असेल.ज्येष्ठांनाही आपण एकदा अमिताभ-मौशमी होऊन पावसात भिजांव असं वाटावं,यातच या गाण्याचं Evergreen appeal दडलं आहे.
गाण्याच्या शेवटी त्या बाकावर बसलेले अमिताभ आणि मौशमी…
एकमेकांना बिलगून…
सभोवताली मुसळधार पाऊस…
संवाद नाहीत…
फक्त संगीत…
त्या एका फ्रेममध्ये प्रेमाचं संपूर्ण व्याकरण सामावलं आहे.
काही गाणी आपण ऐकतो.
काही गाणी आपण पाहतो.
पण काही गाणी आपण जगतो.
‘रिमझिम गिरे सावन’हे माझ्यासाठी तिस-या प्रकारचं गाणं आहे.
या गाण्यात प्रेमाची पार्श्वभूमी नाही…
इथे पाऊसच प्रेमाची भाषा आहे.
प्रत्येक थेंब हा एक शब्द आहे.
पावसाची प्रत्येक सर हे एक वाक्य आहे.
आणि संपूर्ण गाणं म्हणजे पावसाने लिहिलेली एक प्रेमकविता.
या गाण्याच्या अखंड प्रेमात आहे मी…
हा पडद्यावरचा जितका पाऊस आहे तितकाच मनातला देखील आहे…
गाणं पाहा..कदाचित परत हा लेख वाचताना हा लेख ही तुम्हाला अधिक ओला वाटेल…खरे सांगायचे तर लिहून होता होता तो देखील अगदी ओलाचिंब झालाय…
(साभार- हा लेख सुनील गोबुरे यांच्या फेसबूक पेजवरुन घेण्यात आला आहे)