वास्तू कलावंत प्रताप काशीकर यांची अप्रतिम संकल्पना
(१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन विशेष)
नागपूरातील गणेश मंडळांनी विश्वगुरु भारत मातेच्या मूर्तीचीही करावी प्रतिष्ठापना:काशीकर यांचे आवाहन
अनेकांना मिळेल रोजगार
डॉ.ममता खांडेकर
(संपादक’सत्ताधीश’)
नागपूर,ता.१५ ऑगस्ट २०२६: जानेवरी २०२५ मध्ये नागपूरातील दक्षिण अंबाझरी रोडवरील परसिस्टंट सभागृहात सुप्रसिद्ध भारतीय संगणक शास्त्रज्ञ डॉ.विजय भटकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.विज्ञान आणि अध्यात्माच्या संगोष्टीत भटकर यांनी स्वामी विवेकानंद यांचे शब्द विशद केले,‘ भारत अाधी विश्वगुरुच होता,तो पुन्हा विश्वगुरु बनेल आणि या वेळी तो पहील्यापेक्षा अधिक चमकदार विश्वगुरु बनेल’.भटकर यांचे शब्द श्रोत्यांमध्ये बसलेले वास्तू कलावंत प्रताप काशीकर यांच्या थेट काळजात उतरले.
यानंतर काशीकर यांनी विश्वगुरु भारत मातेच्या मूर्त रुपाचा ध्यास घेतला.अथक प्रयत्नानंतर या अवलिया कलावंताच्या हातून जे साकारले ते प्रत्येक भारतीयाच्या मनाला, त्या पारलौकिक शक्तीविषयी नतमस्तक करुन गेले.या विश्वगुरु भारत मातेच्या एका हातात पृथ्वीचा गोलक आहे.एका हातात भारताचा तिरंगा आहे.या मूर्तीचे तीन चेहरे हे महाकाली,महालक्ष्मी आणि देवी सरस्वतीची प्रतिमा असून ,श्वेत घोड्यावर ती स्वार झाली आहे.जणू या सृष्टिची निर्मिती,संरक्षण व विलयाची तीन दैवत ब्रम्हा,विष्णू व महेश यांची शक्ती एकाच रुपात एकवटली असावी असा भास निर्माण करणारी भारत मातेची ही मातृप्रतिमा आहे.शक्तीरुपात,मातृरुपात पुजली जाणारी.
काशीकर या संकल्पनेविषयी सांगतात,लॉर्ड मॅकोलेने पारंपारिक भारतीय शिक्षण पद्धतीवर केलेल्या प्रहारामुळे आपण देखील शाळा-महाविद्यालयांच्या उपक्रमांत फक्त देवी सरस्वतीचे पूजन करतो.मात्र,भारतीय संस्कृतीत देवी महाकाली व महालक्ष्मीचे महत्वं देखील अवर्णातीत आहे.त्यामुळेच विश्वगुरु भारत मातेच्या तीन चेह-यांमधील काळा चेहरा हा महाकालीचा आहे,दूसरा महालक्ष्मी व तिसरा देवी सरस्वतीचा आहे. दर वर्षी वसंत पंचमीला शाळांमध्ये या विश्वगुरु भारत मातेचं पूजन व्हायला हवे.बुद्धी सोबत धन,संरक्षण आणि शक्ती ही देखील तितकीच महत्वाची असल्याचे काशीकर सांगतात.
ही महाशक्ती पांढ-या घोड्यावर स्वार आहे.महत्वाचे म्हणजे या घोड्यालाही ‘पंख’आहेत.घोडा हा उर्जेचं प्रतीक असतो.आपण नेहमीच्या बोलचालीत ‘ Horse Power’हा शब्द वापरतो.आजच्या आधुनिक काळात ही उर्जा म्हणजे ’इंटरनेट’चे जागतिक जाळे आहे.आपली विश्वगुरु भारत माता पाश्चिमात्य जगाचे तंत्रज्ञानही या पंखाच्या माध्यमातून सोबत धारण करते. आजच्या काळात तंत्रज्ञानाला टाळून आपली देखील विश्वगुरु भारत माता वाहनावर आरुढ होऊ शकत नाही त्यामुळेच पांढ-या घोड्याला हे तंत्रज्ञानाचे पंख आहेत.तंत्रज्ञानावर आरुढ झालेली हीच भारत माता ‘विश्वशांती’ निर्माण करेल.
माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम नेहमी म्हणत असत,‘भारत ‘अणुशक्ती ’महासत्ता झाली तरच भारत महाशक्ती बनू शकते’.अश्वमेघ यज्ञात सिंह नाही पांढरा घोडा सोडल्या जातो.हा पांढरा घोडा जगासोबतच्या मैत्रीचं प्रतीक आहे.आज जगासोबत व्यापार,संवाद आणि मैत्री या तिन्ही गोष्टींची निकडीची गरज आहे.त्यामुळेच विचारपूर्वक विश्वगुरु भारत मातेच्या प्रतिकृतीत ही प्रतीके वापरली असल्याचे काशीकर सांगतात.
मी वास्तूशास्त्राचा विद्यार्थी असताना वीस वर्षांपूर्वी कर्क रोगाने माझ्या आईचे निधन झाले.तिला परत जिवंत बघण्याची ईच्छा सुप्त रुपात खूप आतमध्ये दडली होती.‘ Child gives Birth to a Mother’विठ्ठल कामतांनी नागपूरात हे वाक्य उद्धृत केले होते.शिवाजींमुळे जिजाऊ राजमाता झाल्याचे उदाहरण नवे नाही.
याशिवाय माझी विश्वगुरु भारत माता ही ‘कलकी’चं ही दर्शन घडवते.रामकृष्ण परमहंस म्हणायचे,‘कलकी आपल्या मध्येच अवतरला पाहिजे’.भारत मातेला विराट बनवायचे असेल तर भारतीय संस्कृतीला पुढे नेले पाहिजे.माझी ही प्रतिमा तुमच्या-माझ्यामधल्या भारतीय संस्कृतीचे प्रकटीकरण करते.ती ’शक्तीशाली’ शांतीचं प्रतीक आहे.
मी सर्वात आधी जी विश्वगुरु भारत मातेची प्रतिकृती तयार केली ती एक मुखी दत्त ,एक मुखी दूर्गा सारखी होती.या संकल्पनेची दिनदर्शिका रामनवमी प्रतिष्ठानातर्फे बडकस चौकात वितरीत करण्यात आली होती.५ हजार दिनदर्शिका अयोध्येत वाटण्यात आले. भगवान परशुराम शोभायात्रेत ‘अक्षय उर्जा’ ही संकल्पना होती त्यावेळी तीन मुखी भारत मातेची प्रतिकृती मी तयार केली होती.भारत माता आणि कलकी अवतार अश्या दोन वेगवेगळ्या मूर्ती मी तयार केल्या होत्या.
गोरक्षणमध्ये रामकथेसाठी परम पूज्य स्वामी गोविंद देव गिरी महाराज आले होते.त्यावेळी पृथ्वी हातात असलेली ही विश्वगुरु भारत मातेची मूर्ती तीन दिवस दारातच ठेवली होती मात्र,महाराजांचे लक्ष याकडे गेले नाही.अखेर रमेश मंत्री यांनी एक दिवस त्यांना व त्यांच्या ताफ्याला अडवले व ही मूर्ती फक्त एकदा बघून जाण्याची विनंती केली.आधी ते चिडले,रागावले मात्र,ही मूर्ती बघताच खूप आनंदी झाले.जसे यशोदेच्या हातात भगवान कृष्ण तसे विश्वगुरु भारत मातेच्या हातात पृथ्वी, ही संकल्पना त्यांना इतकी आवडली,त्यांनी अक्षरश: या मूर्तीच्या चरणांवर डोकं ठेवून नमस्कार केला.पहिल्यांदा या प्रतिकृतीला मिळालेली संतांची ती स्वीकृती होती.
नागपूरात देवी अहिल्याबाई होळकरांवर नाट्यमंचन होते.त्यासाठी
लोकसभेच्या माजी अध्यक्ष व भाजपच्या इंदाेरच्या माजी खासदार सुमित्रा महाजन नागपूरला आल्या होत्या.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कार्यक्रमात पोहोचायला उशिर होता,त्या वेळी मी ही मूर्ती महाजन यांना दाखवली.तातडीने त्यांनी मला इंदाेर येथे भेटायला बोलावले.माझी आर्थिक परिस्थिती नव्हती मात्र,कोणी चारचाकी,कोणी वाहन चालक तर कोणी तरी पेट्रोलचा खर्च उचलला व सुमित्रा महाजन यांच्या घरी पोहोचलो.त्यांनी तिथून सरसंघचालक मोहन भागवतांना फोन करुन या मूर्ती विषयी सांगितले.
तत्पूर्वी मी नागपूरातील अनेक संघ शाखेत गेलो मात्र,सरसंघचालक मोहन भागवतांकडे भारत मातेची प्रतिकृती आधीपासूनच असल्याने त्यांना ही नवीन भारत मातेची संकल्पना आवडणार नाही,असे ते भ्रमनिरास करीत राहीले.मी त्यांना म्हणत असत,त्यांना त्यांचे ठरवू द्या ना !
मार्च २०२५ मध्ये सरसंघचालकांसोबत अखेर भेट झाली व त्यांनी माझी संकल्पना समजून घेतली.माधव नेत्रालयाच्या उद् घाटनाच्या वेळी त्यांच्याशी मी भेट घेतली होती व गुडीपाडवा पूर्वी मी त्यांना प्रत्यक्ष भेटलो.
स्वामी अवधेशानंद हे देखील माधव नेत्राल्याच्या उद् घाटनाप्रसंगी आले होते.त्यांना पंचधातूची विश्वगुरु भारत मातेची प्रतिमा भेट म्हणून दिली.जी त्यांना खूप आवडली.हे माझं भाग्य आहे स्वमी सत्यमित्रानंद गिरीजी महाराज ज्यांनी भारत माता ट्रस्टच्या माध्यमातून हरिद्वारला जगातलं पहीले भारत मातेचे मंदिर बांधले,त्यांचे शिष्य स्वामी अवधेशानंद यांच्या हातात मला विश्वगुरु भारत मातेची मूर्ती देण्याचे भाग्य प्राप्त झाले.
‘दिवार’चित्रपटातला एक संवाद खूप लोकप्रिय झाला होता,’मेरे पास माँ है’.‘आई’ हा शब्दच अध्यात्मिक आहे.भावनिक आहे,मानसिक आहे,धार्मिक आहे.विश्वगुरु भारत माता ही तीच,अगदी तशीच भावना आहे.आज अनेकांच्या दिवाणखान्याची शोभा हा चाईनाचा ’Laughing Budhha’ आहे,विश्वगुरु भारत मातेची ही प्रतिकृती प्रत्येक भारतीय घराचा अभिमान बनावा,एवढीच अपेक्षा आहे,असे काशीकर सांगतात.
आज फक्त देशाचा शेतकरीच आत्महत्या करीत नाही तर इंटरनेटच्या या महाजाळात देशाचा विद्यार्थी,बेरोजगार अभियंते आदी हे देखील आयुष्य संपवित आहेत.विश्वगुरु भारत मातेच्या या आदिशक्तीपासून त्यांनी शक्तीची प्रेरणा घ्यावी एवढंच मागणं आहे.
विश्वगुरु भारत मातेची ही मूर्ती चार स्वरुपात निर्माण होणार आहे.पंचधातूची मूर्ती तयार करणा-या कारागिरांना रोजगार मिळेल.ही मूर्ती आदिवासी समाजातील कलावंतांकडून तयार केली जाणार आहे.समुद्रपूर येथील ज्येष्ठ शिल्पकार गुरु कौशल यांनी याची जबाबदारी स्वीकारली असून,लहान मुलांना देखील ते कार्यशाळेच्या माध्यमातून ही मूर्ती घडवायला शिकविणार आहेत.त्यांचे साढे सात एकरवर ‘योगा आर्ट गुरुकुल’ समुद्रपूर येथे आहे.
याशिवाय पेंटिंगच्या स्वरुपात ही मूर्ती उपलब्ध होणार आहे यामुळे रंगकामकर्मींना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल.एआय थ्री-डी मध्ये देखील ही मूर्ती उपलब्ध असून यामुळे संगणक अभियंतांना राेजगार उपलब्ध होईल तर शोभायात्रेसाठी मातीच्या मूर्तीकारांना यातून रोजगार मिळेल.
माझ्या या संकल्पनेचं कौतूक फार झालं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इन्क्युबेशन केंद्राने याला मान्यता दिली आहे.गडकरी यांच्या संकल्पनेतून दर वर्षी आयोजित होणा-या ‘अॅडवाँजेट विदर्भ’या उपक्रमात देखील माझ्या या उपक्रमाला ’पेटेंट अवॉर्ड’मिळाला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील ‘धर्मवीर आनंद दिघे’चित्रपटाचे ठाणे येथील प्रचारक पांडूरंग धनवटे यांनी तर संकल्प घेतला आहे ते नाशिक,ठाणे,मुंबई व नवी मुंबई येथील गणेशोत्सवात, पँडोलमध्ये विश्वगुरु भारत मातेची प्रतिकृतीही ठेवणार आहेत.
माझी नागपूरातील गणेश मंडळांना देखील हीच विनंती आहे,त्यांनी त्यांच्या पॅण्डॉलमध्ये विश्वगुरु भारत मातेच्या मूर्तीचीही प्रतिष्ठाना करावी व अनेकांच्या हातांना रोजगार पुरवावा.हीच खरी गणेव व दूर्गा पूजा असेल.
माझ्या मनातील या मूर्तीला मूर्त रुपात यायला वीस वर्षे लागली.ती घराघरात,मनामनापर्यंत पोहोचावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
या कला साधनेत त्यांना सामाजिक कार्यकर्त्या प्रिती ठाकरे,मल्हार पुरोहित व प्रशांत पुराणिक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
प्रदीप काशीकर यांचा संपर्क क्रमांक-७७०९४४८६३२
(बातमीशी संबंधित व्हिडीयोज Sattadheesh official युट्युब चॅनलवर उपलब्ध)
……………………………………..