Homeब्रेकिंग न्यूजनमनालाच घडा भर पाणी:मुख्यमंत्र्यांच्या भाषणात विदर्भवाद्यांचा राडा

नमनालाच घडा भर पाणी:मुख्यमंत्र्यांच्या भाषणात विदर्भवाद्यांचा राडा


‘वेगळा विदर्भ झालाच पाहिजे’च्या दिल्या घोषणा

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

नागपूर,ता.३ जानेवरी २०२३:अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद् घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरु असतानाच काही विदर्भवाद्यांनी पत्रके भिरकावली व ‘वेगळा विदर्भ झालाच पाहिजे’अश्‍या घोषणा दिल्या.पोलिसांनी तत्परतेने घोषणाबाजी करणा-या विदर्भवादी पुरुष व महिलांना डोमच्या बाहेर काढून पोलिसांच्या गाडीत बसवून पोलिस ठाण्यात नेले.यामुळे कार्यक्रमस्थळी एकच खळबळ माजली,‘नमनालाच घडाभर पाणी’ या मराठी उक्तीचा अनुभव यावेळी डोमध्ये उपस्थित साहित्यप्रेमींनी घेतला.

विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त वर्धा येथे सुरु असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आजपासून सुरु झाले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संमेलनाचे उद् घाटन झाले.याप्रसंगी त्यांचे भाषण सुरु असतानाच हा प्रकार घडल्याने कर्तव्यावर असणारे पोलिसही अचंभित झाले.मात्र,तात्काळ तिन्ही आंदोलकांना ताब्यात घेऊन रामनगर पोलिस ठाण्यात घेऊन जाण्यात आले.

सोशल मिडीयावर आज या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या,हे विशेष!अखंड महाराष्ट्राचा राग ही आलापण्यात आला.ट्रोलर्सनी विदर्भ कधीही महाराष्ट्रापासून वेगळा केला जाणार नाही,असे ठणकावित ही घटना म्हणजे नक्कीच कोणत्या तरी राजकीय पक्षातर्फे करण्यात आलेला पूर्वनियोजित कट असल्याचे देखील ज्ञान पाजळले.पंतप्रधान मोदी ११ जानेवरी रोजी नागपूरात आले असता त्यांच्या समोर निदर्शने का करण्यात आली नाही?असा देखील प्रश्‍न उपस्थित करण्यात आला.विदर्भ वेगळा करण्याशी मुख्यमंत्री शिंदे यांचा संबंधच काय?असा ही प्रश्‍न नेटीझन्सने उपस्थित केला.

उपमुख्यमंत्री विदर्भाचेच आहेत व भारतीय जनता पक्षानेच सत्तेत येण्यासाठी वेगळ्या विदर्भाचे लिखित आश्‍वासन दिले होते मात्र २०१४ पासून राज्यात व केंद्रात भाजपची एकहाती सत्ता असताना देखील वेगळ्या विदर्भाबाबतची भूमिका ही भाजपने थंड बसत्यात टाकली.एवढंच नव्हे तर केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘निवडणूकी पूर्वी देण्यात आलेली वचने ही पाळायची नसतात’असे विधान केले होते.भाजपची उक्ती आणि कृती याचा देखील चांगलाच समाचार या घटनेच्या पार्श्वभूमीवर नेटीझन्सने घेतला.

पोलिसांनी कारवाई करीत ताब्यात घेतलेल्या घोषणाबाज विदर्भवाद्यांशी माध्यमकर्मींनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता,विदर्भावर प्रस्थापितांनी सातत्याने अन्यायच केला आहे.अखंड महाराष्ट्रात विदर्भ समाविष्ट झाल्यानंतर विदर्भाची उपेक्षाच करण्यात आली.येथील शेतकरी व विकास हे घटक सातत्याने दुर्लक्षीत राहीले असल्याची बतावणी त्यांनी केली.

प्रसिद्धीस येण्यासाठी ही सर्व स्टंटबाजी असल्याचे देखील सूर यानंतर ऐकू आले.

Latest बातम्या