Homeनागपूर न्यूजजाळपोळ, पवित्र दीक्षाभूमीचे पावित्र्य नष्ट करणारीच घटना

जाळपोळ, पवित्र दीक्षाभूमीचे पावित्र्य नष्ट करणारीच घटना

Advertisements

बुद्धिजीवी व मानवतावाद्यांचे मत
अखेर दीक्षाभूमी भूमिगत पार्किंगच्या निर्णयाला स्थगिती:उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत घोषणा
दीक्षाभूमीचा विकास थांबला: अनेक अनुयायांची खंत
नागपूर,ता.१ जुलै २०२४: दीक्षाभूमी येथील विकासाचा आराखडा हा २०१८ साली तत्कालीन दीक्षाभूमी स्मारक समितीद्वारे तयार करण्यात आला होता व शासनाकडे पाठवण्यात आला होता.या आराखड्याला शासन मंजुरी मिळून २०० कोटींचा निधी शासनाने मंजूर करुन नागपूर सुधार प्रन्यासकडे तो सुपुर्द केला.नासुप्रच्या देखरेखीत दीक्षाभूमी येथे भूमिगत पार्किंगचे बांधकाम सुरु होते मात्र,मधल्या काळात या बांधकामाच्या विरोधात समाजमाध्यमांवर अनेक समाजभावनेला हात घालणारे व्हिडीयोज व्हायरल झाले.त्याची परिणिती आज दीक्षाभूमीसारख्या अतिशय पवित्र स्थळावर जाळपोळीमध्ये झाल्याने ,लोकभावना लक्षात घेऊन विधानसभेत राज्याचे उपमुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली तसेच लवकरच एक बैठक घेऊन सर्वांच्या संमतीने निर्णय घेण्याची घोषणा त्यांनी केली.
दीक्षाभूमीवरील जाळपोळीच्या घटनेमुळे तसेच उपमुख्यमंत्र्यांच्या घोषणेमुळे फक्त आंबेडकरी समाजातील बुद्धिजीवी यांनीच नव्हे तर इतर समाजातील अनेक मानवतावादी यांनी ही घटना, दीक्षाभूमीसारख्या पवित्र स्थळाचे पावित्र्य नष्ट करणारी तसेच विकासविरोधी असल्याची खंत व्यक्त केली.आंबेडकरी जनतेच्या भावना भडकावून अनेकांनी आपापल्या ‘संघटनांची’पोळी शेकून घेतल्याची प्रतिक्रिया देखील उमटली.बाबासाहेब हे स्वत: कायदेमंत्री होते.ता-हयात आंदोलन करणा-या बाबासाहेबांनी कधीही कायदा हातात घेतला नाही.त्यामुळेच ज्या पवित्र स्थळी त्यांनी त्याग,करुणा आणि अहिंसक बौद्ध धम्माची दीक्षा घेतली त्याच पवित्र स्थळावर केवळ वैचारिक मतभेदातून अश्‍या स्वरुपाची जाळपोळ पराकोटीची निषेधार्ह्य ठरत असल्याचे मत आंबेडकरी समजातील अनेक बुद्धीजीवी व्यक्त करतात.
महत्वाचे म्हणजे २९ जूनच्या  स्मारक समितीच्या बैठकीत नासुप्रकडे या बांधकामावर पुर्नविचार करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला असताना, अश्‍या स्वरुपाच्या आततायीपणाची कृती योग्य नसून ,जगात दीक्षाभूमी स्मारकाविषयी चुकीचा संदेश गेला असल्याची खंत ते व्यक्त करतात.मूळात दीक्षाभूमी स्मारक हे ‘अ’दर्जाचे हेरिटेज स्मारकस्थळ असून ,जगभरात या स्मारकाविषयी नितांत पावित्र्याची भावना जपल्या जाते.हे स्थळ केवळ आंबेडकरी जनतेचे श्रद्धास्थान नसून राष्ट्रीय धरोहर आहे.स्थानिक स्वरुपाच्या मतभेदातून किंवा काही संघटनांच्या महत्वाकांक्षेतून त्या पावित्र्याला धक्का लागणे योग्य नव्हते.विकासासाठी दीक्षाभूमीकडे जागाच उपलब्ध नसल्यामुळे व  भविष्याचा विचार करीत भूमीगत पार्किंगस्थळ तसेच वरच्या भागावर बाबासाहेबांच्या जीवनावरील कन्वहेंशन सेंटर बांधल्या जाणार असल्याची माहिती ते देतात.
मात्र,२०० कोटींचा निधी मिळताच आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या.याच पार्श्वभूमीवर स्मारक समितीने १३ दिवसांपूर्वी स्मारक स्थळी सभागृहात आंबेडकरी जनता तसेच पत्रकारांसोबत संवादाचा उपक्रम राबवला.त्यात अनेक समज-गैरसमजूतीवर स्मारक समितीचे सचिव डॉ.राजेंद्र गवई यांनी उत्तरे दिली.पद्मश्री डॉ.चंद्रशेखर मेश्राम,प्रा.प्रदीप आगलावे यांच्यासह समितीतील आजी-माजी सदस्य त्यावेळी उपस्थित होते.पद्मश्री डॉ.मेश्राम किवा प्रा.आगलावे आदी यांच्यासारख्या बुद्धीजीवींवर एकप्रकारे अविश्‍वास दाखविण्याचा हा प्रकार घडला.

गेल्या काही दिवसांपासून स्मारकाचा सात-बारा,आखीव पत्रिका,दीक्षाभूमीवर मेट्रोचे पार्किंग स्थळ बनत असल्याचा, दीक्षाभूमीचे नाव बदलणार असल्याचा खोटा प्रचार,खोदकामातून स्मारकाच्या मूळ गाभ्याला भविष्यात लागणारा धक्का असे अनेक आरोप करणारे व्हीडीयोज आंबेडकरी समाजामध्ये व्हायरल करण्यात आले.स्मारक समितीतील अंतर्गत मतभेदांचेही कोंदण त्याला लाभले असल्याची शक्यता ही वर्तवली जात आहे.महत्वाचे म्हणजे आंबेडकरी जनतेच्या भावना भडकावणे हे सर्वात सोपे काम असल्याचा दावा बुद्धीजीवी करतात.बाबासाहेबांवर नितांत श्रद्धा असणा-या अनुयायांना वैचारिक किवा कायदेशीर बाबींशी काही एक घेणेदेणे नसते.हेरिटेज जागेचा विकास करताना पुढील ४०-५० वर्षांचा विचार केला जातो असे ते सांगतात.दीक्षाभूमीकडे जागेचा अभाव असल्यामुळेच भूमिगत पार्किंगस्थळ बांधून जागेचा वापर वाढवण्यावर भर दिला गेला होता असे त्यांचे म्हणने आहे.

दीक्षाभूमीच्या उत्तर व पूर्वेकडील जागेवर शासनाची विविध कार्यालये असून अनेक दशकांपासून त्या जागा दीक्षाभूमीला देण्याचा लढा शासकीयस्तरावर सुरुच आहे मात्र,त्यात अद्याप यश आले नाही.त्या शासकीय जागा असून शासन त्यावरील आपला हक्क सोडण्यास तयार नाही. भविष्यात त्यात यश येण्याची शक्यता आहे मात्र,त्यामुळे आहे त्या जागेवरच दीक्षाभूमीचा अधिकाधिक विकास साध्य करण्याचा मानस समितीचे सदस्य व्यक्त करतात.मूळात भूमिगत पार्किंगचे बांधकामही मूळ स्मारकापेक्षा फार अंतरावर होते.तरी देखील आंबेडकरी जनतेला सोशल मिडीयाच्या माध्यमातून भ्रमित करण्याचे षडयंत्र यशस्वी झाले व दीक्षाभूमीचा विकास थांबला,अशी खंत बुद्धीजीवी व्यक्त करतात.५६ वर्षांपासून जे सुरु आहे ते पुढील ५६ वर्षे तसेच चालू द्या,ही मनोवृत्ती या जागतिक दर्जाच्या वारसास्थळासाठी योग्य नसल्याचे देखील ते सांगतात.

शासनाची यात कोणतीही भूमिका नसते.शासन फक्त स्मारक समितीद्वारे पाठविण्यात येणारे आराखडे आपल्या अधिका-यांकरवी तपासून त्यांना मंजुरी देण्याचे व विकासनिधी पुरविण्याचे काम करते.२०० कोटींचा निधीचा वापर हा दीक्षाभूमीच्या विकासासाठीच खर्च केला जात होता.आता मात्र,आंबेडकरी जनतेचा उद्रेग बघून शासनानेच यावर आज स्थगिती दिली.भविष्यात यात एकवाक्यता निर्माण करण्यास शासन किती प्रामाणिक प्रयत्न करणार?यात शंकाच आहे.त्यामुळेच दोन वर्षात निर्माण होणारा विकास आता दोन दशकांपर्यंतही थांबवला जाऊ शकतो,अशी मंशा ते व्यक्त करतात.

मूळात विधान सभा निवडणूकीच्या आधी शासन २०० कोटींचा निधी देऊन मतांची बेगमी करण्याचा हेतू जरी साधत असले तरी, तो दीक्षाभूमीच्या विकासाच्या पथ्यावर पडणाराच होता,असे ते सांगतात.निवडणूकी पूर्वी आंबेडकरी जनतेचा उद्रेग सत्ताधा-यांना न परवडणारा असल्यानेच तातडीने या विकासकामाला स्थगितीचा निर्णय त्यांनी जाहीर केला.समाजाचा भावनेचा प्रश्‍न हा अंतर्गत बैठकीतून, जनजागृतीतून आणि कायदेशीर आव्हानातून सोडविता आला असता,मात्र,तेवढा ही संयम न राखता व या पवित्र वास्तूचं महत्व न राखता,भावनिक उद्रेगातून जी जाळपोळ या पवित्र स्थळी करण्यात आली ती अतिशय निषेधाहार्य असून दीक्षाभूमीच्या विकासाला मारक ठरली,अशी खंत ते व्यक्त करतात.
उत्तर नागपूरचे आंबेडकरी समाजाचे आमदार हे आघाडी सरकारच्या काळात नासुप्रचे विश्‍वस्त असताना ज्या तातडीने स्वत:च्या पत्नीच्या नावे असणा-या महाविद्यालयाच्या जागेच्या विस्तारासाठी नासुप्रच्या अधिका-यांच्या बैठका घेऊन ,नियमांना चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करीत होते,त्या ऐवजी दीक्षाभूमीच्या आजूबाजूच्या शासकीय जागा ताब्यात घेण्यासाठी पुढाकार घेण्याची जास्त गरज होती,असा संताप देखील अनेक बुद्धीजीवी व्यक्त करतात.
थोडक्यात,नागपूरात दीक्षाभूमी या पवित्र स्थळी आंबेडकरी अनुयायांकडून घडलेल्या कृतीचा अनेक बुद्धीजीवी व मानवतावादी तीव्र निषेध व्यक्त करीत आहेत.

…………………………….
(तळटीप: नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ.रविंद्र सिंगल यांनी तात्काळ दीक्षाभूमीवर भेट देत परिसराची पाहणी केली व अनुयायांना शांत करुन दीक्षाभूमी स्मारका विषयी संबोधन केलं)

Latest बातम्या