Homeब्रेकिंग न्यूजसोलेंचे अश्रू अनावर....!

सोलेंचे अश्रू अनावर….!

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पदवीधर उमेदवारीतून माघार 
‘निरंकुश’कार्यपद्धतीचा मात्र मुख्यमंत्र्यांकडूच अप्रत्यक्ष स्वीकार!

डॉ.ममता खांडेकर

(मुख्य संपादक ‘सत्ताधीश’)

नागपूर,ता.१२ ऑक्टोबर २०२६: नागपूरात भारतीय जनता पक्षाच्या गोटात आज सोमवार दिनांक १२ ऑक्टोबर रोजी दिवसभर उच्चदाब वीज वाहिन्यांच्या प्रवाहाप्रमाणे घडामोडी घडल्या व दुपारपर्यंतच भाजपचे बंडखोर प्रा.अनिल सोले माघार घेऊन भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करतील अशी चर्चा ऐकू आली.रात्रीपर्यंत चित्र स्पष्ट होईल याची भाजपचे आमदार,ज्येष्ठ पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्यासह नागपूरातील पत्रकार विश्‍वात देखील चर्चा होती.कोराडीतील नैवेद्यम हॉटेलमधील सहा ही जिल्ह्यातील भाजप कोअर कमेटीची बैठक संपताच रात्री आठच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सरळ प्रा.अनिल सोले यांच्या गंगोत्री,बुटी ले-आऊट,लक्ष्मीनगर येथील घरी पोहोचले.
त्यावेळी सोले हे वर्धा येथे पदवीधर निवडणूक प्रचार दौ-यात होते.त्यांना मुख्यमंत्री त्यांच्या निवासस्थानी आल्याचे कळवण्यात आले.पक्षाचा इतका जुना पक्षनिष्ठ कार्यकर्ता किमान मुख्यमंत्री स्वत: त्यांच्या घरी आले असल्याचे कळल्यानंतर त्यांना टाळू शकला नसता व ते तडक नागपूरसाठी प्रचार दौरा अर्धवट सोडून निघाले.मी इतका मोठा झालो नाही की मुख्यमंत्री घरी आले व मी त्यांना भेटणार नाही,असे सोले यांचे शब्द होते.या पूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी देखील सोले यांच्या घरी त्यांची समजूत घालण्यासाठी बरीच वाट बघितली होती मात्र,सोले हे ‘नॉट रिचेबलच’राहीले होते.मात्र,प्रत्यक्ष राज्याचे मुख्यमंत्रीच सोले यांच्या घरी पोहोयल्यावर सोले यांच्या पुढे त्यांना भेटण्याशिवाय दूसरा कोणताही पर्याय उरला नव्हता.
यानंतर बंद खोलीत मुख्यमंत्री,महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे,अनिल सोले व पक्षाचे आणखी एक पक्षनिष्ठ जुने कार्यकर्ते व माजी आमदार गिरीश व्यास यांच्यात बंदद्वार चर्चा झाली.तोपर्यंत सोले यांचे समर्थक हे बाहेर बैचेन होत निर्णयाची वाट पाहत होते.बाहेर आल्यावर मुख्यमंत्री यांनी सोले यांनी पक्षाचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांना आपला पाठिंबा जाहीर केला असल्याचे माध्यमांना सांगितले.
फडणवीसांसाठी झाला गोड शेवट!
मी जेव्हा पक्ष कार्याची सुरवात केली त्यावेळी जी काही नेते मंडळी होती त्यात अनिल सोले एक होते.त्यामुळे त्यांच्यासोबत एकत्र काम करण्याची संधी मला खूप वर्षे  मिळाली आहे. विशेषत: काही पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांना सांभाळण्याचं काम सोले करतात आणि म्हणूनच त्यांनी जेव्हा पदवीधर निवडणूकीचा अर्ज भरला त्यावेळी त्यांचे म्हणनं ऐकून घेण्याकरिता व त्यांनी भाजपसोबतच राहावं यासाठी आमची त्यांच्याशी चर्चा सुरु होती.त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की पक्षाच्या संदर्भात माझी कुठलीही नाराजी नाही.कार्यपद्धतीच्या संदर्भातील नाराजी आहे,असे माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले.
निर्णय कुठला होतो हे महत्वाचे नसून निर्णय कुठल्या पद्धतीने होतो ते म्हत्वाचे आहे,अशी सोलेंची नाराजी होती असे फडणवीसांनी स्पष्ट केले.सोलेंनी काही महत्वाच्या गोष्टी ही लक्षात आणून दिल्या.कश्‍याप्रकारे जास्तीत जास्त लोकांना विश्‍वासात घेऊन पक्ष पातळीवरील निर्णय झाले पाहिजे,त्यांचे हे म्हणने आम्ही मान्य केले,त्याची नोंद घेतली व कार्यपद्धतीत निश्‍चितच बदल करु,असे अभिवचन आम्ही सोलेंना दिले असल्याचे फडणवीसांनी सांगितले.
याशिवाय पक्षाचे असे अनेक जुने कार्यकर्ते आहेत ज्यांनी पक्षासाठी खूप काम केले मात्र,आता पक्षपातळीवरील कुठल्याही निर्णयात त्यांना सहभागी करुन घेतले जात नाही किंवा पक्षाच्या मुख्य प्रवाहापासून ते दूर असून, त्यांच्याकडे दूर्लक्ष होत असल्याची तक्रार देखील सोले यांनी केली आहे.त्याही संदर्भात चर्चा करुन त्या कार्यकर्त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात कसं आणायचं यासाठी आम्ही निश्‍चितपणे एक योजना तयार करुन त्यांच्यावर पक्ष किंवा सरकारमधील विविध जबाबदा-या कश्‍या देता येतील,या ही संदर्भात प्रयत्न करु.सोले यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली असल्याचे सांगून, आम्हाला जी खात्री होती की इतकी वर्षे सोले यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली नाही किंबहूना वर्षानुवर्षे ज्या वेळी एखादा व्यक्ति पक्षाशी नाराज झाला तेव्हा त्याला समजवण्याची जबाबदारी अनिल सोलेंचीच असायची.त्यामुळेच आम्हाला ही खात्री होती की ज्यावेळी आम्ही त्यांच्याशी चर्चा करु त्यावेळी त्यांना कितीही राग असला किंवा सात्विक संताप असला तरी तो दूर होईल आणि ते पक्षासोबतच राहण्याचा निर्णय करतील व मला आनंद आहे त्यांनी तोच निर्णय घेतला असून,या निवडणूकीची धुरा हातात घेऊन भाजपचा उमेदवार निवडून आणण्यासाठी पुन्हा एकदा आपली मानसिकता तयार केली आहे,असा निर्धार त्यांनी केला आहे.
याशिवाय आमचे एक दुसरे एक प्रमुख नेते माजी आमदार गिरीश व्यास ज्यांनी खूप वर्षे पक्षाची सेवा केली.पक्षाचे अध्यक्ष राहीले,विविध पदांवर काम केलं,त्यांनीही याच गोष्टीकरिता नाराज होऊन पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता,आज त्यांच्याशीही चर्चा झाली व त्यांचेही म्हणने आम्ही ऐकून घेतले व त्यांचे आक्षेप आम्ही मान्य केले.त्यांनीही आपला राजीनामा परत घेतला आहे.ते ही पक्षासोबत.पक्षाकरिता आमच्यासोबत काम करणार आहेत.मला या गोष्टीचा आनंद आहे की सोले आणि व्यास यांच्यासारखे आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते कदाचित आमच्या कार्यपद्धतीमुळे आमच्यावर नाराज होते परंतू ते आज परत पक्षाच्या पाठीशी उभे रहात आहेत आणि पक्ष मजबुत करत आहेत.आम्ही सगळे पुन्हा एकदा पक्षाला बळकटी देऊन आपला उमेदवार निवडून तर आणूच पण भविष्यात सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन मजबुत संगठन उभे करु,असा निर्धार आम्ही केला आहे.
बावणकुळे या चर्चेमध्ये होते,त्यांनी पुढच्या सगळ्या जबाबदा-या स्वीकारल्या आहेत.एक गोड शेवट झाला आहे,अशी पुश्‍ती मुख्यमंत्र्यांनी जोडली.
थोडक्यात,स्वयंसेवक हा कधीही शिस्तीविरुद्ध काम करणारा नसतो,हे सोले यांच्या माघारीनंतर पुन्हा एकदा सिद्ध झाले.नागपूर पदवीधर निवडणूकीतून माघार घेतो असे सोले म्हणाले.मुख्यमंत्री स्वत: विनंती करायला माझ्या घरी आले,हा कोणाला काही वाटत असेल पण मला चांगलं वाटलं नाही,भाजप हा पक्ष वाढवण्याचं काम मी केलं असून पक्षाला कधीही धोका होणार नाही,असे सांगतांना सोले यांचे अश्रू अनावर झाले.मी माझी उमेदवारी मागे घेतो.बॅलेट पेपरवर माझी उमेदवारी कायम असली असली तरी सहाही जिल्ह्यातून एक ही मत मला पडणार नाही असा माझा प्रयत्न राहील,असे सोले म्हणाले.
या निवडणूकीची धुराच सोले हातात घेतील.ते स्वत: पदवीधरचे आमदार राहीले असल्याने त्यांच्यासोबत जुने लोकं जुळले आहेत,सोले यांच्या या निर्णयानंतर अत्यानंदच पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांना होईल.सोले यांचा भाजपच्या अधिकृत उमेदवाराला पाठिंबा ही बातमीच आमची आघाडी मजबुत करते असे फडणवीस म्हणाले.
वास्वतेत सोले यांची माघार काँगेसचे उमेदवार ॲड.अभिजित वंजारी यांचे पारडे पुन्हा एकदा २०२० सारखीच या निवडणूकीत जड करते,असा राजकीय विश्‍लेषकांचा कयास आहे.ज्या पदवीधर मतदारांचा कौल भाजपचे सुधाकर कोहळे व काँग्रेसचे अभिजित वंजारी या दोघांकडेही नव्हता ते सोले यांना मतदान करण्याच्या विचारात होते.मात्र,सोले यांच्या माघारीनंतर सोले यांना मिळणारी मते वंजारी यांच्याकडे जाईल,असे भाकीत ते वर्तवतात.इतकंच नव्हे तर कोहळे यांच्या ऐवजी सोले यांनाच परत उमेदवारी दिली असती तर कदाचित भाजपला २०२० मध्ये ५२ वर्षानंतर नागपूर पदवीधर निवडणूकीत जो पराभवाचा धक्का बसला होता,त्याची परतफेड करता आली असती.मतदारांचा कौल उच्चविद्याभूषित व स्वच्छ प्रतिमा असलेले सोले यांच्याचकडे असता व चमत्कार घडला असता,असा दावा ही ते करतात.आता ही निवडणूक २०२० सारखीच ‘एकांगी’झाली असून वंजारी यांचेच पारडे जड असल्याचे भाकीत ते वर्तवतात.
मूळात सोले हे स्वत:सोबतच पक्षाची प्रतिष्ठ जपणारे व्यक्तिमत्व आहे.स्वत: राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या घरी पाेहोचले त्यानंतर त्यांच्याकडे माघार घेण्याशिवाय पर्यायच उरला नव्हता.त्यांची बंडखोरी ही शाब्दिक निघाली,कृती ही भाजप संस्काराचीच राहीली.फडणवीस यांनी हाच प्रयत्न शुक्रवार दिनांक ८ ऑक्टोबर पूर्वी केला असता तर तो जास्त प्रभावी राहीला असता,शुक्रवार हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता.मात्र,फडणवीसांनी आजच्या कृतीतून पक्षातील बंडखोरांना विशेषत: गडकरी गटातील पदाधिका-यांना ‘मी म्हणेल तीच पूर्व दिशा‘ हा ‘योग्य‘संदेश पोहोचवला.याशिवाय स्वत:मुख्यमंत्री यांच्या दक्षीण-पश्‍चिम मतदारसंघामध्ये सोले यांचा विजय झाला असता तर सत्तेचे समीकरणही बदलले असते,जगातील कोणत्याही कद्दावर नेत्याला त्याचा प्रतिस्पर्धी त्याच्याच मतदारसंघात निर्माण झालेला चालत नाही,हा राजकीय इतिहास जुना नाही.
२०२० मधील भाजपचे पदवीधरचे उमेदवार संदीप जोशी हे पक्षादेशानंतर पश्‍चिममध्ये हिरीरिने कोहळे यांच्या प्रचारकार्याला लागले असून, कोहळे विजयी होऊन विधान परिषदेत गेल्यावर

पश्‍चिममधून २०२९ च्या विधानसभेच्या निवडणूकीत संदीप जोशी यांची दावेदारी मजबूत होते,असे घडल्यास भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी काय फक्त गरबा खेळणार का?असा उपरोधिक सवाल ही केला जातो.दयाशंकर तिवारी यांनी पश्‍चिममध्ये फार मोठे तामझाम करुन गरबाचे आयोजन केले आहे मात्र,जो प्रतिसाद त्यांना मध्य नागपूरात चिटणीस पार्क मध्ये मिळत होता तो पश्‍चिममध्ये अगदी नगण्य आहे.२०१९ च्या विधानसभेच्या निवडणूकीतच त्यांनी मध्य नागपूरातून आपली दावेदारी पक्षश्रेष्ठींसमोर केली होती.यासाठी हिंदी भाषिक कार्ड देखील खेळले गेले मात्र,पक्षाने तिकीट नाकारले व त्यांचीही समजूत काढली.
नागपूर महानगरपालिकेत संदीप जोशी वर्सेस दयाशंकर तिवारी यांच्यात २०२० मध्ये महापौर पदासाठीही चांगलीच चुरस रंगली होती,यानंतर एक-एक वर्षाचे महापौर पद दोघांच्याही वाट्याला आले.जोशी यांच्या दूर्देवाने तुकराम मुंढे नावाचे वादळ उद्धव ठाकरे सरकारने नागपूर मनपात आयुक्त पदी पाठवले व २४ मार्च २०२० पासून करोनाने नागपूरसह जगभरात थैमान घातले.२०२९ मध्ये पश्‍चिममधून पुन्हा एकदा संदीप जोशी वर्सेस दयाशंकर तिवारी अशी चुरस भाजपात पहायला मिळाल्यास नागपूरकरांना नवल वाटणार नाही.
थोडक्यात,सोले आज माध्यमांसमोर फक्त कोसळण्याचे बाकी होते.त्यांची निराशा,हताशा,देहबोली,शब्द आणि भाव अगदी तसेच होते जसे २०१९ मध्ये बावणकुळेंचे कामठीमधून विधानसभेचे तिकीट कापल्यानंतरचे होते.परिणामी,सोले यांचे मानसिक,भावनिक आणि आंतरिक अंतद्वंद बावणकुळेंशिवाय इतर कोणीही समजणे शक्य नाही.मात्र,बावणकुळेंनी तिकीट कापल्या गेल्यानंतरही प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारुन संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला.अहोरात्र पक्षासाठी झटले व त्याचे फळ त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीतून विधान परिषदेचे द्वार उघडण्यात मिळाले.
सोले यांचा त्याग याची दखल,भविष्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील का किंवा दिल्लीतील लालकृष्ण अडवाणीप्रमाणे त्यांचीही मार्गदर्शक मंडळात रवानगी होते,याकडे आता भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
……………………………………………

Latest बातम्या