Homeब्रेकिंग न्यूजनागपूरात पोलिसांनीच दिली चोरांना लाच!

नागपूरात पोलिसांनीच दिली चोरांना लाच!

गृहमंत्र्यांच्या नागपूरात ‘पोलिसांच्या उलट्या बोंबा’
जनता फाऊंडेशनच्या जीशान सिद्दीकीने पत्रकार परिषदेत व्हायरल केले पुरावे

नागपूर,ता.१२ सप्टेंबर २०२६ : कायद्यानुसार पोलिस चोरांना पकडते,त्यांना न्यायालयात हजर करते,न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना पोलिस किंवा न्यायालयीन कोठडी मिळते,यानंतर पोलिस गुन्ह्याचा सखोल तपास करते,पुराव्यांनिशी न्यायालयासमोर ते पुरावे मांडले जातात,यानंतर आरोपींना न्यायालयाकडून शिक्षा हाेत असते व आरोपी तुरुंगात जातात.निदान पूर्वीची भारतीय दंड संहिता असो किंवा हल्लीची भारतीय न्याय संहिता,या देशातील पोलिसी कारवाईची हीच दिशा राहीली आहे मात्र,राज्याचे मुख्यमंत्री व स्वत: ज्यांच्या हातात गृह मंत्रालय आहे त्या देवेंद्र फडणवीस यांच्याच शहरात व त्यांच्याच गृह खात्यात एक अभूतपूर्व घटना घडली व पोलिसांनीच त्यांच्यावरील गुन्हा मागे घेण्यासाठी आरोपींना लाच दिल्याचे प्रकरण घडले व ‘चोराच्या उलट्या बोंबा’ऐवजी ‘पोलिसांच्या उलटल्या बोंबा’अशी नवी म्हण प्रस्थापित करुन दाखवण्याचे सामर्थ्य नागपूरात पोलिसांनी दाखवले,असा थेट आरोप आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत जनता फाऊंडेशनचे अध्यक्ष जीशान सिद्दीकी यांनी केला.
काही महिन्यांपूर्वी नागपूरात एक घटना घडली.यात यशोधरा पोलिस ठाण्याचे तत्कालीन पाेलिस निरीक्षक संदीप बुवा यांनी २२ तोळे सोने चोरीच्या घटनेत साकिर अकरम व त्याची बहीण हुस्नारा यांना अटक करुन यशोधरा पोलिस ठाण्यातील कोठडीत ठेवले.नियमानुसार चोवीस तासात त्यांना न्यायालया समोर हजर करुन त्यांचा पीसीआर घेणे बंधनकारक होते मात्र,तब्बल दहा दिवस हे भाऊ-बहीण लॉकअपमध्ये होते व त्यांच्यावर चोरीची कबुली नव्हे तर सोन्याची माहिती देण्यासाठी वारंवार दबाव टाकला जात असे,असा गंभीर आरोप जीशान सिद्दीकी यांनी केला.
आरोपींचे वडील अकरम बेग ,त्यांची पत्नी,मुलगा साबिर अकरम बेग व मुलगी हुस्नारा अकरम बेग यांनी सिद्दीकी यांच्याकडे येऊन कश्‍याप्रकारे यशोधरा पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक संदीप बुवा यांनी तब्बल दहा दिवस बेकायदेशीररित्या त्यांना लॉकअप मध्ये ठेवले याची गाथा मांडली व न्याय मिळवून देण्याची विनंती केली.यानंतर जीशान यांनी आपल्या जनता फाऊंडेशन संघटनेच्या नावाखाली पत्रकार परिषद घेऊन या घटनेला वाच्यता फोडली.नागपूरातील जवळपास सर्वच वृत्तपत्रे व डिजिटल वृत्त वाहीन्यांनी या घटेनची मोठी दखल घेतली.पोलिस कोठडीत असताना आरोपी बहीणीने काही गंभीर आरोप देखील पोलिसांवर केले होते.चौकशी दरम्यान तिच्या गालाला हात लावला जात असे,तिच्यावर दबाव टाकला जात असे,तिला लालुच दाखवली जात असे इत्यादी आरोप पत्रकार परिषदेत तिने ऑन कॅमरा सांगितले होते.
जनता फाऊंडेशने या विरोधात संदीप बुवा व त्यांच्या सहका-यांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली होती.बुवा यांना निलंबित करण्यासाठी आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता.मात्र,यशोधरा पोलिस ठाण्यातून त्यांचा संवैधानिक अधिकार असतानाही आंदोलन करण्याची परवानगी नाकारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.इतकंच नव्हे तर संदीप बुवा व सहाय्यक पालिस आयुक्त रोहित आव्हाड हे जीशान यांना आपल्या कक्षात घेऊन बसले व या प्रकरणातून अंग काढून घेण्याचे सांगत,जीशान यांच्या इतर कोणत्याही सामाजिक कार्यात मदत करण्याचे प्रलोभन दाखवले,असा आरोप आज पत्रकार परिषदेत जीशान सिद्दीकी यांनी केला.
संदीप बुवा व रोहित आव्हाड यांच्या कोणत्याही प्रलोभनाला बळी पडण्यास मी नकार दिल्याचे जीशान यांनी सांगितले.त्यामुळे जीशान यांना संदीप बुवांवरील कायदेशीर कारवाई व निलंबानासाठी आंदोलन करण्याची परवानगीच यशोधरा पोलिसांनी नाकाराली,असे जीशान यांनी सांगितले.यानंतर संविधान चौकात आंदोलन करण्याची परवानगी सीताबर्डी पोलिस ठाण्यात मागाण्यात आली जी मंजूर झाली.यानंतर आंदोलनाच्या अगदी अर्ध्या तास आधी जीशान यांना सीताबर्डी पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक सुहास राऊत यांनी आंदोलनापासून रोखले व संविधानाची व संवैधानिक अधिकारांची अवमानना करीत ,माझ्या आंदोलानाला राऊत यांनी ‘गैरकायदेशीर’संबोधले,असा आरोप जीशान यांनी केला.
याच दरम्यान सोने चोरीचे प्रकरण यशोधरा पोलिस ठाण्यातून कळमना पोलिस ठाण्याला हस्तांतरित करण्यात आले.कळमना पोलिसांनी आरोपी हुस्नारा व तिचा भाऊ शाकिर याला चौकशीसाठी ३५(ए)ची नोटीस पाठवली.यानंतर दोन्ही आरोपींनी न्यायालयात अंतरिम जामीनासाठी अर्ज केला जो फेटाळण्यात आला.यानंतर संदीप बुवा व दोन्ही आरोपींनी संगनमत करुन हे प्रकरणच दाबण्यासाठी आपासात समझौता केला.पोलिस हे चोरीचे प्रकरण पुढे नेणार नाही त्या मोबदल्यात दोन्ही आरोपी पोलिसां विरोधात दाखल केलेले प्रकरण मागे घेईल,यासाठी संदीप बुवा आरोपी व त्याच्या कुटूंबियांना लाखो रुपये लाच देईल,असा हा समझौता होता,असा गंभीर आरोप पत्रकार परिषदेत जीशान सिद्दीकी यांनी केला.
स्वत: आरोपींचा मोठा भाऊ साबिर अकरम बेग याने हे सर्व कबूल केले,याचे स्टींग ऑपरेशन ॲड.सूरज मिश्रा यांनी केले असून हा संपूर्ण व्हिडीयो पत्रकार परिषदेत पत्रकारांना दाखवण्यात आला.यात पोलिस उपनिरीक्षक सदाशिव कांसे व एक दलाल सूफी टायगर याचे ही नाव साबिर अकरम बेग याने घेतले.याच व्हिडीयोमध्ये साबिर हा ,मधल्या दलालांनी मध्येच पैसे खालले असून हुस्नारा व तिच्या कुटूंबियांना कबूल केल्याप्रमाणे पैसे नाही मिळाले,अशी तक्रार करताना दिसत आहे.हा सूफी टायगर उत्तर नागपूरात अशाच प्रकारची दलाली करण्यासाठी कुप्रसिद्ध असल्याचे जीशान यांनी सांगितले.
याच स्टिंग ऑपरेशनच्या वेळी ॲड.सूरज मिश्रा यांनी हुस्नारा हिला देखील कॉल केला.तिने देखील स्पष्टपणे संदीप बुवाचे नाव घेत,बुवा याने कबूल केले होते तितके पैसे मिळाले नसल्याची तक्रार केली,ज्याची कॉल रेकाँर्डिंग जीशान यांनी ऐकवली.‘मैने उनको बोली कि जितने पैसे मे बात हुई उतने पैसे नहीं मिले तो मै जो लिख के दे रही हूँ वो तुमको डिलीट करना पडेगा’,असे तिचे शब्द होते.याच व्हिडीयोमध्ये साबिर अकरमने हे कबूल केले की २२ तोळे सोन्याची चोरी त्याच्याच भाऊ व बहीणीने केली आहे!
याहून महत्वाचे म्हणजे ज्या कळमना पोलिसांची चौकशीसाठी ३५(३)ची नोटीस या दोन्ही आरोपी बहीण-भावाला दिली होती,त्याचे उल्लंघन करीत ते दोघेही चौकशीसाठी हजर झालेच नाही.या विरोधात पोलिसांना कठोर कारवाई करण्याचे अधिकार असताना पोलिसांनी काहीही केले नाही.हे सिद्ध करतं की पोलिस आणि आरोपी यांच्याच संगनमत झाले असून त्यांनी कायदा,संविधान व न्यायालय यांची क्रूर थट्टा केली,अशी टिका जीशान यांनी केली.
मूळात हुस्नारा व तिच्या कुटूंबियांनी माझ्या ‘जनता फाऊंडेशन’संघटनेचाच स्वत:च्या स्वार्थासाठी दुरुपयोग केला.केवळ जनता फाऊंडेशनचाच नव्हे तर राज्याच्या अल्पसंख्यांक विभागाची देखील दिशाभूल केली.या दोन्ही आरोपींना गैरकायदेशीररित्या तब्बल दहा दिवस पोलिसांनी कोठडीत ठेवले होते,ही बाब आम्ही प्यारे खान अध्यक्ष असेलेल्या राज्य अल्पसंख्यांक विभागाच्याही निर्दशनास आणून दिली होती.त्यांनी यावर यशोधरा पोलिस ठाण्याला नोटीस देखील पाठवली,मात्र,आरोपी व काही पोलिसांनी राज्य अल्पसंख्यांक आयोगासारख्या शासकीय विभागाची देखील फसवणूक केल्याचा आरोप याप्रसंगी जीशान यांनी केला.
मेयोच्या प्रकरणातही संदीप बुवाचे कारनामे-
एका घटनेत कुख्यात अम्ली पदार्थ तस्कर सोहेल खान व त्याचे तीन सहकारी हे मध्यरात्री नशेत चारचाकी चालवत अनेकांना धडक देते झाले.याच वेळी ते मोमिनपुरात घूसले व तिथे ही त्यांनी अनेकांना जखमी केले.यानंतर ते एका लहानशा गल्लीत घूसले जिथे त्यांची कार फसून गेली.याच वेळी तपासासाठी पोलिस आले होते व सोहेल खानची कार रिव्हर्स होताना दोन पोलिस जखमी झाले.पोलिसांनी रात्री त्या चौघांनाही ताब्यात घेतले.रात्री १ वाजता सोहेल खानला संदीप बुवा व इतर पोलिस मेयोमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन आले.मात्र,अवघ्या वीस मिनिटात पोलिस परत निघून गेले व सोहेल हा आरामात मेयो रुग्णालयाच्या पाय-या उतरत निघून गेला.या संपूर्ण घटनेचे व्हिडीयो फूटेज जीशान सिद्दीकी यांनी पत्रकारांना दाखवले.
याचा अर्थ संदीप बुवा व ड्रग तस्कर सोहेल खानमध्ये ‘सेटलमेंट’झाली व पोलिस त्याला ताब्यात न घेताच निघून गेली.पुढे संदीप बुवा यांनी एफआयआरमध्ये सोहेल खान मोमिनपुराच्या घटनास्थळावरुनच पळून गेल्याचे व तिघांना ताब्यात घेतल्याचे नमूद केले.मात्र,सीसीटीव्ही फूटेजमध्ये पोलिसांनी सोहेल खानला वैद्यकीय तपासणीसाठी मेयोमध्ये मध्यरात्री १ वाजता आणले होते,हे स्पष्टपणे दिसत असल्याचे जीशान यांनी सांगितले.याविषयीची तक्रार तत्कालीन पोलिस आयुक्त डॉ.रविंद्र सिंघल यांच्यासह पोलिस उपायुक्तांपर्यंत केली मात्र,नागपूरातील वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी संदीप बुवा यांना ‘कवच’प्रदान करुन ठेवले असल्याची बोचरी टिका याप्रसंगी जीशान यांनी केली.स्वत: काँग्रेसचे पश्‍चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी ही घटना विधान सभेच्या अधिवेशनात पटलावर ठेऊन आरोपींना कठोर शिक्षेची मागणी केली होती मात्र,संदीप बुवां यांच्यावर सरकारच मेहरबान असल्याने कोणतीही कारवाई झाली नाही.
नुकतेच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी देशाला लवकरच ड्रग्जमुक्त करणार असल्याची घोषणा केली,पोलिसच ड्रग तस्काराला लाच घेऊन सोडून देत असतील तर देश तर सोडा राज्याची उपराजधानी नागपूर तरी ड्रग्जमुक्त होऊ शकेल का?असा प्रश्‍न केला असता,ड्रग्जमुक्त तर माहिती नाही मात्र,राज्याच्या गृहमंत्र्यांची पोलिस,मुख्यमंत्र्याच्याच शहरात ड्रग तस्काराला मात्र,सहज मुक्त करित असल्याचा टोला जीशान यांनी हाणला.
रामझुला प्रकरणात दोन तरुणांचा अपघातात जीव घेणा-या करोडपती रितू मालूला घटनास्थळावरुन पळून जाण्यासाठी मदत करणारा हाच पोलिस अधिकारी होता.या घटनेच्या केस डायरीतही मालू विरोधात अश्‍या कलमा लावल्या ज्यात जामीन मिळू शकतो.त्या दोन तरुणांच्या कुटूंबियांच्या न्यायासाठी जनता फाऊंडेशन फार-फार मोठी न्यायालयीन लढाई लढला.अखेर तहसील पोलिस ठाणेच नव्हे तर नागपूर पोलिसांवर अविश्‍वास दाखवत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ही केस सीआयडीकडे वर्ग केली.दोन निरपराध तरुणांचा नशेत कार चालविणा-या रितू मालूने रामझूल्यावर जीव घेतला.त्यांच्या कुटूंबियांचे अश्रू अजूनही न्यायाची वाट पाहत आहेत.इतक्या संवदेनशील घटनेत देखील संदीप बुवासारख्या पोलिस अधिका-याने गुन्हेगारांना संरक्षण देण्याचे अमानवीय कृत्य केले,अशा पोलिसाला तात्काळ निलंबित न करता, आता त्यांची बदली खापरखेडासारख्या अतिशय मलाईदार समजल्या जाणा-या पोलिस ठाण्यात करण्यात आली असल्याचा आरोप याप्रसंगी जीशान यांनी केला.
सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षीत जगण्यासोबत थेट जुळलेला अतिशय महत्वपूर्ण विभाग हा पोलिस विभाग आहे.त्यामुळे अश्‍या व इतक्या महत्वपूर्ण विभागाला स्वत: च्या फायदासाठी हवे तसे नाचविणारा,वाकवणारा,फसविणारा व पैसे घेऊन तथ्य दाबणा-या संदीप बुवासारखा पोलिस अधिकारी,रोहित आव्हाड,सदाशिव कांसे तसेच या प्रकरणांमध्ये सहयोग करणारे इतर पोलिसकर्मी यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी तसेच माझ्या सामाजिक संघटेनेचा फायदा स्वत:च्या स्वार्थासाठी उठविणा-या हुस्नारा व तिच्या कुटूंबियांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी लवकरच नवनियुक्त पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील यांना देखील निवेदन देणार असल्याचे जीशान सिद्दीकी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पत्रकार परिषदेत बाबू खान व नगरसेवक निकोसे उपस्थित होते.
(बातमीशी संबंधित व्हिडीयोज Sattadheesh Official युट्युब चॅनलवर उपलब्ध)

Latest बातम्या