Advertisements

५६ समाजांतील दांपत्यांकडून समिधा अर्पण; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ
नागपूर,ता.२२ जुलै २०२६ : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५६ व्या जन्मदिनानिमित्त पश्चिम नागपूर व दक्षिण-पश्चिम नागपूर भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांच्या कुलदैवत असलेल्या श्री लक्ष्मी-नृसिंह प्रभूंच्या महायज्ञाचे भव्य आयोजन रामनगर येथील श्रीराम मंदिराच्या प्रांगणात करण्यात आले. वेदमंत्रांच्या मंगलघोषात, भक्तिमय वातावरणात आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा महायज्ञ संपन्न झाला.
विशेष म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ५६ व्या जन्मदिनाचे औचित्य साधून ५६ विविध समाजांतील दांपत्यांनी विधिवत समिधा अर्पण करून राज्याच्या प्रगतीसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि निरंतर जनसेवेसाठी प्रार्थना केली.

माजी आमदार तथा माजी महापौर आमदार संदीप जोशी यांच्या संयोजनाखाली आयोजित या महायज्ञाचा शुभारंभ भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाला. यावेळी महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्रीमा. चंद्रशेखर बावनकुळे, राजे मुधोजीराजे भोसले, ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, राजे बख्त बुलंदशहा यांचे वंशज राजे वीरेंद्रजी शहा, महापौर नीताताई ठाकरे, भाजपा नागपूर महानगर अध्यक्ष दयाशंकर तिवारी, आमदार प्रवीण दटके, आ. कृष्णा खोपडे, आ. अविनाश ब्राह्मणकर, आ. संजय भेंडे, आ. डॉ. परिणय फुके, आ. डॉ. राजीव पोतदार, उपमहापौर लीलाताई हाथीबेड, मनपातील सत्ता पक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, मनपा स्थायी समिती सभापती शिवानी दानी वखरे, माजी आमदार सुधाकर कोहळे, माजी आमदार गिरीश व्यास, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

महायज्ञाच्या प्रारंभी आमदार संदीप जोशी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यज्ञातील प्रत्येक धार्मिक विधी वैदिक परंपरेनुसार पार पडला. संपूर्ण परिसर वेदमंत्र, भजन आणि भक्तिरसाने भारावून गेला होता. महाआरती आणि त्यानंतर आयोजित महाप्रसादाने या दिव्य सोहळ्याची सांगता झाली.
या महायज्ञाच्या यशस्वी आयोजनासाठी संयोजक आमदार संदीप जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहसंयोजक किसन गावंडे, आशिष पाठक, यश सातपुते तसेच भाजप नागपूर शहरचे महामंत्री संदीप जाधव, रितेश गावंडे, नरेश बरडे, विश्वास गोसेवाडे आणि पक्षाच्या विविध आघाड्यांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
……………………………….